अपरिचीत भागडेश्वर लेणी वळती ता. आंबेगाव जि. पुणे

अपरिचीत भागडेश्वर लेणी
(वळती ता. आंबेगाव जि. पुणे)
मी राहणार खोडद ता. जुन्नर येथील पुर्वेस जेव्हा सुर्य उदय होतो तेव्हा भागड्या डोंगर रांगांशी लपछपत वर मान काढताना सुर्यनारायण हळुच डोकावून पहाताना दिसतो. व आम्हा खोडदकरांना त्याचे दर्शन घडते. ही डोंगररांग म्हणजे आंबेगाव तालुक्यातील पुर्वेकडील रांग होय. उत्तरेकडून औरंगपूर, भागडी, आणि वळती अशी दक्षिणेकडे जवळपास तीन ते चार कि.मी पर्यंत पसरलेली रांग आहे. जंगलव्याप्त सपाट भुभागामध्ये येथील वनराई असल्याने, अनेक विविध पक्षी, प्राणी व वनस्पतींचा वारसा या परिसरास लाभलेला आहे. पुर्व पट्यातील एकमेव भटक्या पर्यटकांची जणू ही पंढरीच. येथे फिरताना मोकळा श्वास घेता येतो. ट्रेकसाठी तर सर्वोत्तम पुर्व मार्ग म्हणता येईल. आणि तो पण डोंगराच्या क्षितीजावरून. दोन्ही बाजूचे नयनदृष्य एकाच वेळी सहज टिपता येते एवढे निकट असलेला हा पायवाट मार्ग आहे. दुरवरून कानी येणाऱ्या विविध पक्षी व प्राण्याचे आवाज मनमोहीत करतात.
अशा या नयनरम्य परिसरातील डोंगरकपारीत वसलेली एक लेणी आहे. या लेणीत 12/13 व्या शतकातील दोन दगडी शिल्प व एक मोठी दगडी गणेशमूर्ती आहे कि जी मुर्ती हरिचंद्रगडावरील दक्षिण लेणितील गणेशमूर्ती प्रमाणे भासते. कारभारी भोर बाबा सांगतात. की या लेणीच्या तोंडावर कोरीव दगडी बांधकाम होते. त्यांचा अंत नविन सिमेंट मंदिर बांधकामात झाला. या लेणी मधील दगडी शिल्पे येडगाव धरणात बुडविण्यात आली. अनेक कोरीव शिल्पे बांधकामातील चौथर्‍यात गाडली गेल्याने तेथेच त्यांनी दम तोडला व त्यांचा अस्त झाला. जुन ते सोने हे का म्हटले जाते हे कधी आम्ही समजून घेतले नाही. या मंदिरात पुर्वी दगडी संदूक होती व ती चोरीस गेल्याचे बाबा सांगतात. जेव्हा मी मंदिराच्या पुर्वेस असलेल्या मैदानातील दगडांबाबत मी त्यांना विचारले तेव्हा ते बोलले की हे दोन संदूकीचे दगडी आहेत.
मंदिराचे पौराणिकत्व नवीन बांधण्यात आलेल्या मंदिराने हिरावून घेतले असून जुन्या शिल्प मुर्तींची जागा जयपुरवरून आणलेल्या मुर्तीने घेतली आहे. जेव्हा जुन्या मुर्तींबाबत गावात चर्चाने जोर धरला तेव्हा पुन्हा धरणात बुडविलेल्या मुर्ती पुन्हा आणल्या गेल्या परंतु त्यांचे प्रथमस्थान प्राप्त झाले नाही व त्या शोरूम मधील देखावा म्हणुन गणेश शिल्पाला टेकून ठेवण्यात आल्या. खरे तर ही ग्रामस्थांची चूक म्हणता येणार नाही. कारण शिक्षण क्षेत्राचा विस्तार शहरीभागात झपाटय़ाने झाला व तेथील मनुष्यास इतिहास व त्याचे महत्त्व समजू लागले. परंतु खरे पाहता जास्त इतिहास घडला गेला तो अतिदुर्गम भागात. सह्याद्रीच्या कुशीत. जोपर्यंत येथे शिक्षणाचे महत्व समजले जाऊ लागले तो पर्यंत खूप उशीरा झाला होता व येथील ऐतिहासिक वास्तू नष्ट होताना दिसतात. आजही या दगडधोंड्यांना खरच एवढे महत्त्व आहे हे येथील जनतेला ठाऊक नाहीए. हेच पौराणिक दगड धोंडे गावचा इतिहास लिहीन्यास मदत करणार आहेत हे सांगणारे कुणीच दिसत नाही. त्यामुळे आज पण या पौराणिक वास्तुंचे वास्तव्य खुप मोठ्या संकटात सापडलेले दिसत आहे. पौराणिक मंदिरे तोडली जात आहे व तेथील दगडी शिल्पे नविन मंदारांच्या पायाभरणीतच दम तोडत आहे. हाच प्रकार येथे घडला. खरे पाहता वळती ग्रामस्थांनी येथील सर्व दगडी शिल्पांना एकत्र करून गावाला लाभलेल्या पौराणिकतेसाठी नवजीवन द्यायला हवे.
लेणी गाभार्‍यातील जलकुंड व जलकुंडातील अतिस्वच्छ पाणी आश्चर्य चकित करते. ग्रामस्थ या जलकुंडातील पाण्याचा वापर कुंडातील पाणी व चिंच पाला सेवन केल्यास सर्दि खोकला , ताप यासारखे आजार नाहीसा करत आहे. लेणीच्या बाहेर च्या टाकीला सिमेंटचा लेप करून व विटेचे बांधकाम करून बंदिस्त केले आहे.
लेणीच्या पुर्वेस शंभर फुट अंतरावर एक नांदरूक नावाचा वृक्ष आहे या वृक्षाला लाकडे बांधून झोपडी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ती पडलेल्या स्वरूपात असून तीच्या खाली दोन पाण्याच्या टाक्या गाडल्याचे निदर्शनास येत आहे. त्या टाक्यांचे संवर्धन केल्यास बराचसा इतिहास कळण्यास मदत निश्चितच होईल.
मंदिरा पासून पश्चिमेस डोंगरावर एक पाऊल वाट जाते. या वाटेचा वापर करत डोंगर रिजवर पोहचता येते. ही पायवाट येथील पर्यटकांना ट्रेकसाठी खुपच छान आहे. सहज आठ ते दहा कि.मी अंतरावरील ट्रेक येथे आयोजित केला जाऊ शकतो.
आतील एक शिल्प खरे तर अवलोकितेश्वर आहे सोबत तारा व भृकुटी आहे …पण ह्याना आज आपण भगवान विष्णू म्हणतो … तर दुसरे शिल्प धनुष्यबाण धारकाचे आहे व ही दोन्ही शिल्पे 12 व 13 व्या शतकातील असल्याचे श्री. महेंद्र शेगावकर सांगतात.
ही लेणी कोणत्या गटात मोडतात याबाबत थोडी शंका असल्याने याबाबत वादग्रस्त खुलासा करने योग्य वाटत नाही. त्यामुळे याबाबत निश्चितच येणार्‍या काळात मी आपणास सांगेलच.
वळती ग्रामस्थांना मी एकच विनंती करेल की आपल्या गावाला इतिहास याच पौराणिक वास्तुमुळेच प्राप्त होणार आहे. जर आपण तो ठेवा नष्ट केलात तर आपणास इतिहास दाखविण्यासाठी काहिच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे जेवढी दगडी शिल्पे मंदिर परीसरात शेवटची घटका मोजत असलेली दिसत आहेत त्यांची जपवणूक करून गावचा इतिहास जपण्यासाठी आपण त्यांना एकत्र करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. की जेणेकरून येणाऱ्या पिढीला ती अभ्यासावयास मिळतील.
येथील इतिहास भार्गवराम व त्यांच्या सहाव्या अवतारा बाबत लिहिला गेला आहे व त्यामुळे येथील डोंगराला भागड्या डोंगर म्हणुन संबोधतात. कदाचित भार्गव शब्दाला इंग्लिश मध्ये लिहीताना र च्या ठिकाणी ड चा उच्चार होत असल्याने भागड्या म्हणुन संबोधले गेले असावे किंवा शब्द उच्चारताना येथील त्यावेळच्या अशिक्षित ग्रामस्थांनी असा उल्लेख केला असावा असे मला वाटते.

छायाचित्र /लेखक
श्री. खरमाळे रमेश गणपत
(माजी सैनिक खोडद)
8390008370
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज, मोबाईल अँड्रॉइड अॅप व युट्यूब चॅनेल