Category Archives: समाजकार्य

निसर्ग कोपीत माळीण गाव घेऊ लागले श्वास.

निसर्ग कोपीत माळीण गाव घेऊ लागले श्वास.

दि. ३०/०७/२०१४  रोजी माळीण गावावर नैसर्गिक आपत्तीने घाला घातला व क्षणात मातीच्या ढिगा-याखाली गाव गाडले गेले. अनेक स्मृती आठवणी दबल्या गेल्या. अनेक चिमुरडे जे गावात, शाळेत बागडत होते ते शाळेला पोरके झाले. शाळा ओसाड पडली. ही बातमी जेव्हा जगात पसरली तेव्हा ज्याला शक्य होत त्याने या ढिगा-याकडे धाव घेतली. परीसर दुःखाच्या आकंताने रडणार्‍या किंचाळ्यांनी गुंजू लागला. जेसीबीच्या सहाय्याने ढिगा-याखाली गाडलेले एक एक करत १५१ मृतदेह बाहेर काढण्यात आले. वरूण राजाची थांबण्याची न मिळालेली साथ अडचण निर्माण करू लागली. अशा या वेळी सर्वात मोठा दुख:चा डोंगर येथे कोसळला व काही अनाथ व काही पोरके झाले. त्यांना आधार देऊन जनतेने पुन्हा जगण्याच्या आशा दिल्या तर सरकारने पुन्हा हक्काचे परिपक्व छत दिले.
उद्या या अतिदुर्गम भागात उभारलेल्या नविन वास्तुत त्यांना नवीन हक्काचे घर मिळताना पाहून खुप आनंद होतोय. व ज्या ठिकाणी या बांधवाच्या स्मृती दबल्या गेल्यात त्या ठिकाणी या 151 बांधवाचे स्मृती स्मारक उभारण्यात आले असून वनविभाग जुन्नर यांच्या वतीने त्याठिकाणी 1000 झाडे लावून तेथील झाडांना या मृतव्यक्तींची नावे दिल्याने पुन्हा हे माळीण गाव या झाड रूपाने येथे श्वास घेऊ लागले आहे.
या परिसराला भेट देण्याचे भाग्य लाभले.

छायाचित्रे श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर

 

 

 

शिवाजी ट्रेलची दुर्गसंवर्धनाची मराठा सिंडिकेटला किल्ले चावंडवर नवी दिशा.

शिवाजी ट्रेलची  दुर्गसंवर्धनाची मराठा सिंडिकेटला किल्ले चावंडवर नवी दिशा.

उन्हाळा सुरू झाला की दुर्ग संवर्धकांची दुर्गसंवर्धनासाठी चातका प्रमाणे पाहीलेली वाटच होय. रखरखत्या उन्हाळ्यात ४० डिग्री सेल्सिअस तापमानात उरावर चढाई करून किल्ला सर करत छत्रपतींचा लाभलेला वारसा निस्वार्थ जपण्याची धडपड करणारी मंडळी वाहत्या घामाच्या धारांत हातात टिकाव खोरे घेऊन का बर धडपडत असतील याचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. निव्वळ छत्रपतींच्या नावाने घोषणा देणे म्हणजे आम्हाला छत्रपतींविषयी किती जिव्हाळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. परंतु आम्हाला प्रत्यक्षात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज किती कळाले व त्यांचा वारसा आपण कितपत जपत आहोत व त्याचे अनुकरण स्वतः करत आहोत का? हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर आपले मनच आपल्याला खरे उत्तर देऊन जाते.
कालच मुंबई मधून १२० मराठा सिंडिकेटचे मावळे किल्ले चावंडवर प्रथमतःच दुर्गसंवर्धनासाठी आले होते. त्यांना दुर्गसंवर्धनासाठी “शिवाजी ट्रेलच्या श्री. विनायक खोत, श्री विजय कोल्हे, श्री. हर्षवर्धन कुर्हे व श्री. रमेश खरमाळे यांच्या वतीने किल्ले संवर्धन कसे करावे, ऐतिहासिक वास्तूंना वीजा न पोहचता काय उपाययोजना कराव्यात, पाण्याच्या टाक्यांतील काढलेली माती एका जागी का स्टोर करावी व ती खोदत असताना कोणती काळजी घ्यावी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून संवर्धनास श्री. अर्जुन म्हसे पाटील (उपवनसंरक्षक जुन्नर) यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तसेच जिवनात जैवविविधतेला असलेले महत्व हे मार्गदर्शन त्यांनी केले व संवर्धनास प्रारंभ करण्यात आला.
किल्ले चावंडवर असलेल्या पुष्करणीची स्वच्छता व त्यामधील गाळ काढण्यात आला तर पिण्याच्या पाण्याची वर्षेभर पर्यटकांची सोय व्हावी म्हणून खांब टाक्याकडे जाणारी वाट निर्माण करून टाक्याची स्वच्छता करण्यात आली तसेच गडावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक यांना गड परिसरातुन मुक्त करण्यात आले. गेली पाच वर्षे शिवाजी ट्रेल या किल्ले चावंडवर संवर्धन करत असून अनेक विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या संवर्धनातुन उदयास आणत आहे. ही निस्वार्थ सेवा प्रत्येकाच्या हातुन घडावी हाच शिवाजी ट्रेलचा मानस आहे. ऐतिहासिक वारसा पिढ्यानपिढ्या सतत टिकून रहावा व याच माध्यमातून श्री शिवछत्रपती शिवराय व त्यांचे विचार अजरामर व्हावेत हीच सदिच्छा शिवाजी ट्रेल उदराशी ही छोटीशी आशा घेऊन हे संवर्धन कार्य करत आहे. मराठा सिंडिकेट व परिवाराचे या कार्यासाठी विषेश आभार.
Iiजय शिवराय iI
श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल

 

किल्ले हडसरवर १२ जिल्हयातील पर्यटकांचे स्वच्छता अभियान व हडसर गावतील ग्रामस्थ व शाळा व मुलांना मदतीचा हात.

किल्ले हडसरवर १३ जिल्हयातील पर्यटकांचे स्वच्छता अभियान व हडसर गावतील ग्रामस्थ व शाळा व मुलांना मदतीचा हात.

रविवार दि. १९/०३/२०१७ रोजी महाराष्ट्रातील १२ जिल्हयातील ६०  पर्यटक “चला मारू फेरफटका या ग्रुपचे नियोजन करून एकत्र येऊन किल्ले हडसर सर करण्याच्या दृष्टीने “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबूक पेज व शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून आले होते. किल्ले हडसर स्वच्छता अभियान, हडसर गावातील शाळेतील मुलांच्या लायब्ररी स्थापनेसाठी ३५० पुस्तके देण्यात आली. तर मुलांसाठी जवळपास ३०० वह्या , पेन,पेन्सिल वाटप करण्यात आल्या. गरजू महिला, पुरूष व मुले यांच्या साठी १५० ड्रेस वाटप करण्यात आले. या नंतर संध्याकाळी ६:००  वा जुन्नर शहरातील आश्वरूढ शिवछत्रपतींच्या चौकातील पुतळा ते शिवसृष्ठी पर्यंत स्वच्छता अभियान राबवून पाच पिशव्या कचरा गोळा करण्यात आला.
ट्रेकमध्ये विशेष एका 65 वर्षे वयाच्या तरूणाचा समावेश लक्षवेधी होता. झपझप किल्ला चढणार हा वृध्द तरूण प्रेरणा वाटपाचे काम करताना दिसत होता. किल्ले हडसरचा इतिहास, किल्ला निरीक्षण, दगडी शिल्पकला अभ्यास व खिळ्याच्या वाटेचा प्रत्यक्ष उपयोग कसा करावा व संरक्षण कसे घ्यावे याबाबत मार्गदर्शन व प्रात्याक्षिक करून दाखविण्याची संधी मिळाली. किल्यांच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांना कशाप्रकारे मदत मिळते व त्या किल्यांची आपण कशी निगा राखली पाहीजे हा संदेश तेथील जनतेला मदत करून या चला मारू फेरफटका या परिवाराच्या माध्यमातून देऊन किल्ले जागवण्याचे काम केले जात आहे.
धन्यवाद चला मारू फेरफटका परिवार आपण जुन्नर तालुक्यात हा उपक्रम राबवून शिवजन्म भुमीत राजांचा आदर्श जागवत आहात. व गडकोटांची प्रेरणा घेऊन ती इतरांना देण्याचे पण कार्य करत आहात.
ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या व घेतलेल्या आनंदाचा क्षण खालील लींकवर क्लिक करून पहायला विसरू नका व काही माहीती संदर्भात मदत हवी असल्यास मो. 8390008370 फोनवर संपर्क साधावा.

https://youtu.be/VBsTxGuHAeI
https://youtu.be/jOcZWLKfEJw

श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)

 

 

 

स्वच्छता मोहीम किल्ले चावंड (जुन्नर)

स्वच्छता मोहीम किल्ले चावंड (जुन्नर)

नमस्कार मित्रांनो,
दि.२ आँक्टोंबर २०१६ वार रविवार रोजी किल्ले “चावंडवर” राज्य शासनाच्या पुरातत्व विभाग व गड संवर्धन समिति यांच्या समन्वयाने व किल्ले संवर्धक शिवाजी ट्रेलच्या मदतीने गड स्वच्छता अभियान राबवीण्यात येणार आहे. जर आपण राज्यात इतरत्र कुठे अशा अभियानात सहभागी नसाल तर किल्ले चावंड ता. जुन्नर जि.पुणे येथे येण्याचा विचार करावा ही विनंती.
जुन्नर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी व गडप्रेमी यांनी जास्त संख्येने उपस्थित राहुन तालुका पर्यटन व गडविकासासाठी या विकास कार्यात व मोलाच्या कामगिरीत सिंहाचा वाटा आपण उचलाल ही सदिच्छा व्यक्त करतो.
परंतु हे कार्य करताना येथे बघ्यांची व फक्त फोटोशेशन करून चमकणार्यांची गर्दी नको तर परिश्रम करणारांची व महाराजांना फक्त घोषणेनेत न ठेवता ह्रदयात जतन करणारांची गर्दी अपेक्षीत असावी.

शिवाजी ट्रेल आणि परीवार

14479729_1754048734849897_5332919942980566122_n

धन्यवाद मासिक “अनाहत” टिम व संपादक श्री. संदिपजी खळे.

मासिक “अनाहत” टिम व संपादक श्री. संदिपजी खळे. आपण माझी लेखणी जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलात. मी व माझ्या “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” पेज परीवारातर्फे खुप खुप आभार14089124_1746383432283094_57645570498811237_n14291710_1746383362283101_6075102094200661415_n14222171_1746383392283098_5391114799181023280_n14264230_1746383415616429_8286408548248302536_n

 

हटकेश्वर ट्रेक : एक अविस्मरणीय अनुभव

हटकेश्वर ट्रेक : एक अविस्मरणीय अनुभव.
कालचा रविवार,खूपच अविस्मरणीय ठरला..लहानपणापासूनच मला
डोंगरद-या,नदी नाले आणि नानाविध वृक्षलतांनी बहरलेली वने यातून भटकण्याचे आणि निसर्गातील सौंदर्य डोळे भरून पाहण्याचे विलक्षण वेड आहे.आपला जुन्नर तालुका म्हणजे निसर्गानी आपले सौंदर्य अनंत हातांनी उधळलेल्या सह्याद्रीच्या शिरावरचे कोंदणच जणू….
माझे निसर्गमित्र मित्र मेजर (निवृत्त) रमेश खरमाळे यांनी आपल्या मित्रांसोबत हटकेश्वरचा ट्रेक आयोजित केल्याचे सांगितले. या ट्रेकमध्ये किमान दोनशे जणांचा सहभाग असुन या डोंगरावर विविध वृक्षांच्या बिया लावण्याचे काम केले जाणार होते. निसर्ग पर्यटन हे त्याच्या संवर्धनासाठी एक सुसंधी असते हे यानिमित्ताने जाणवले.
हटकेश्वर ट्रेक हा अवघड आहे त्यापेक्षा आपल्या संयमाची आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा आहे. हे माझ्या मते मी भेट दिलेले तालुक्यातील सर्वोच्च शिखरांपैकी एक आहे. अलीकडे पर्वतराजीतून फिरणे कमी झाल्यामुळे ट्रेक थकविणारा असणार होताच.पण सोबत माझी पत्नी संगीता,मेहुणे प्रशांत आणि कन्या देवयानी येणार होत्या.माझे मित्र संदीप वाघोले त्यांचा मुलगा ‘तनय’ आणि गणेश मेहेर आपल्या ‘सर्वज्ञ’ या लेकाला आणणार होते. आमचे अष्टक छान जुळले.कौतुकाची गोष्ट म्हणजे केवळ साडेचार वर्षाचा सर्वज्ञ पायी चालत ,उड्या मारत चढला पण अजिबात थकला नाही.
सकाळी सात वाजता निघालो आणि आठच्या सुमारास ओतूर, बनकरफाटा, बल्लाळवाडी मार्गे आल्मे गाव गाठले.या गावाच्या पश्चिमेला हटकेश्वर आणि त्यालाच जोडून व-हाड्या डोंगरांची रांग आहे.हटकेश्वराची अभेद्य भिंत पाहून मन भारावून गेले.यावर आपण चढाई करणार या कल्पनेने आनंदून गेलो. विश्रांतीसाठी चार टप्पे घेत आणि जाताना छोट्या कुदळीने खड्डे खणत त्यात आंब्याच्या कोया, जांभळाच्या बिया लावत आम्ही माथ्यावर पोहोचलो. आमच्या संतवाडीच्या कान्होबाच्या डोंगरशिखरावरून आम्हाला केवळ येडगावचे धारण दिसते. पण या हटकेश्वर शिखरावरून तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी पाचघर अशी पाचही धरणे दिसतात.यावरून याच्या उंचीची कल्पना येते.
चढताना आभाळ भरून आले होते आणि माथ्यावर गेलो तर धुक्याची चादर डोईवर आणि भोवताली… त्यात पावसाच्या सरी… अशा स्वर्गीय वातावरणात आम्ही पश्चिमेकडून उतारावर असणा-या दोन गुहांमध्ये जाऊन श्रीगणेश आणि श्री सांब सदाशिवाची पिंडी यांचे दर्शन घेतले.डावीकडे पिंपळगाव जोगे धरणाचा निळा जलाशय डोळ्यांचे पारणे फेडीत होता.उजवीकडे माथ्यावर श्री हटकेश्वर मंदिर होते.त्याची अवस्था मन व्यथित करणारी आहे.त्याचे बांधकाम जमिनीखाली आहे पण चिरे सुटलेले आहेत. ते किमान १००० वर्षापूर्वीचे असावे. कारण पिंडीची झीज इतकी झालीय की शिवलिंग तेवढे शिल्लक आहे.समोर नंदी असायचा.पण तो दिसला नाही मात्र लोकांनी शेकडो नवसाचे नंदी आणून वाहिले आहेत.लोकांची श्रद्धा कशी असते याचा प्रत्यय येऊन मी शिवलिंगासमोर नतमस्तक झालो. जुन्नरकडून लेण्याद्री मार्गे आलेला शंभरावर जणांचा ग्रुप इथे भेटला.त्यांनी बिया लावण्यासोबतच शेजारील पाण्याचे कुंड झाडून अगदी स्वच्छ केले.ते पाण्याने भरल्यावर इथल्या प्राण्यांची वर्षभराची पाण्याची व्यवस्था होणार होती.सर्वांनी बरोबर आणलेल्या बिया लावून पावसाला साकडे घातले. हे पर्जन्यराजा आता बरस… मनसोक्त बरस .आम्ही लावलेल्या बिया रुजू दे .त्यातून हिरवाई फुलू दे. त्यानेही ऐकले जणू. तो आला आम्हाला भिजविले आणि मंदिर आणि शेजारचे पत्र्याचे शेड आम्हाला अपुरे पडले……एक आगळा निसर्गाविष्कार येथे आहे.तो म्हणजे हटकेश्वर आणि व-हाडी डोंगर यांना जोडणारा नैसर्गिक पूल.. तो दुरूनच पहिला. त्याच्यावरून चालण्याचा थरारक अनुभव घ्यायला पुढच्या वेळी ठेवू असे ठरवून मागे फिरलो. सोबत हटकेश्वर मनात ठेवूनच… असा हा हटकेश्वर ट्रेक माझ्या कायमच स्मरणात राहील.

जयसिंग गाडेकर.
रविवार ,दिनांक ११ जून २०१६.

13407247_1713665498888221_1784310566572030014_n
13466196_1713665535554884_8387319251158481326_n 13442141_1713665635554874_8799993047508114038_n 13432163_1713665652221539_5354246914273883580_n

अविस्मरणीय क्षण…

हडसर किल्यावर अडकलेल्या 16 पर्यटकांचा स्वतःचा जीव धोक्यात घालून सुखरूप सुटका केल्याबद्दल मा. पालकमंत्री गिरीशजी बापट यांच्या हस्ते आज राजुरी येथे शासन आपल्या दारी या आयोजित कार्यक्रम प्रसंगी पोलीस स्टेशन जुन्नर,वनविभाग जुन्नर तसेच किल्ले संवर्धक “शिवाजी ट्रेल जुन्नर यांच्या जवानांचा गुलदस्ता देऊन सन्मानित करण्यात आला तोच हा अविस्मरणीय क्षण.
धन्यवाद सर आपण सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहीत केलत. आपणास आम्ही ग्वाही देतो की आम्ही सदैव सामाजिक कार्यासाठी बांधील राहुन जनसेवा करू.

13221756_1700607353527369_5277436044263915890_n 13177403_1700607490194022_4276238879711465378_n 13087906_1700607446860693_432973106956281939_n 13174107_1700607396860698_8995185868833471600_n

एक हाक माणुसकीची

एक हाक माणुसकीची.
मित्रांनो मी मदतीचा आपला एक हात मागु एच्छितो आहे. मी गेली तीन वर्षे जुन्नर तालुक्याचा खुप बारकाईने अभ्यास केला असून अनेक वेळा 1ली ते 4 थीच्या वर्गात जाऊन तेथील लहान मुलांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. ही मुले बहुतांशी भिल्ल, ठाकर व अदिवाशी समाजातील असुन त्यांची शिकण्याची खुपच जिद्द आहे. परंतु सोबतीला असलेल्या श्रीमंत मुलांचे पेहराव, स्कुल बॅग, वेळोवेळी मिळणाऱ्या वह्या पुस्तके यांना ते सहज उपलब्ध होतात व याच गोष्टी यांना मिळत नाहीत. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या बालमनावर कुठेतरी वेदना निर्माण होतात व ते गड्या आपला गाव बरा याकडेच त्यांचा कल निर्माण होत असताना जाणवत असतानाचे दिसुन येत आहे. व परिणामी ही मुले पिढीजात परंपरेकडे आकर्षित होतात व आपले आयुष्य त्यांच्याच परंपरेनुसार जगतात.
त्यासाठी जुन्नर तालुक्यातील किंवा बाहेरील दानशूर व्यक्तींनी एक नम्र विनंती करू इच्छितो की आपण एक, दोन या आपणास इच्छा असेल तेवढ्या वर्षापर्यंत जर फक्त शिक्षणाकरीता या मुलांना कुणी दत्तक घेऊन एक सहकार्याची भावना जागविण्यासाठी बहुमोल कार्यासाठी योगदान केलेत तर खुपच महान कार्य केल्याचे भाग्य आपणास लाभेल.
या कार्या करिता कुणी इच्छुक असेल तर नक्कीच मो.नं. 8390008370 या श्री.खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद) वर संपर्क साधावा.
कृपया एक विनंती आहे की आपली या कार्यासाठी कोणत्याही रोख स्वरूपात किंवा चेकद्वारे रक्कम स्विकारली जाणार नाही. हे कार्य आपण स्वतःच करावयाचे आहे याची नोंद घ्यावी. आपणास वरिल नंबर मार्फत फक्त माहीतीच पुरवली जाईल.
श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
निसर्ग रम्य जुन्नर तालुका

किल्ले हडसरवर अडकलेल्या पर्यटकांना मिळाला मदतीचा हात…

किल्ले हडसरवर अडकलेल्या पर्यटकांना मिळाला मदतीचा हात

आज दि. 24 एप्रिल 2016 रोजी 11/134 लोकमान्य नगर पुणे येथील 2 लहान मुले 8 महीला व 6 पुरूष असे 16 पर्यटक हडसर किल्ला पाहण्याकरीता आले होते.दिवसभर संपुर्ण किल्याची छान माहिती घेऊन व भटकंती करून या टिमने संध्याकाळी 4 वाजता खिळ्याच्या वाटेने 100 फुट रॅपलिंग करून उतरण्यास सुरूवात केली. ही खिळ्याची वाट म्हणजे प्रत्यक्ष यमराजाला आव्हान करण्यासारखेच आहे. कारण येथील उतार हा 90 डिग्री अॅगलमध्ये आहे.तरीही त्यांनी या वाटेने रॅपलिंग करून उतरण्याचे धाडस करण्यास सुरूवात केली. रॅपलिंग संदर्भात जानकारी असलेली एकच व्यक्ती त्यात होती व त्यातल्या त्यात रोप कमी असल्यामुळे येथुन एका पर्यटकास उतरण्यास अर्धा ते पाऊणतास लागत असल्याने यांना उतरण्यास खुप वेळ गेला व संपुर्ण निसर्गावर अंधाराने पांघरून घालण्यास सुरुवात केली. चांगले दिसेपर्यंत यातील महीलांना ते हा टप्पा उतरण्यास ते यशस्वी झाले परंतु जास्तच अंधार झाल्याने पुरूष व मुलांना उतरवण्यासाठी त्यांना मोठे आव्हान निर्माण झाले. येथील स्थानिकांनी यांना सकाळीच कल्पना यांना दिली होती की हे बिबटय़ा प्रवणक्षेत्र आहे व येथे बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे ते खुपच घाबरलेले होते व रडत होते. तेथे मोबाईल रेंज असल्याने व येथे भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने तातडीची मदत म्हणून पोलीस्टेशन जुन्नर येथे संपर्क केला. जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. कैलास घोडके साहेब यांनी तत्पर सेवा म्हणून व तेथील गडाची माहीती असलेली व्यक्ती म्हणून मला म्हणजेच श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद ) वनरक्षक जुन्नर (वनविभाग जुन्नर) यांना त्वरित संपर्क करून संबंधित पर्यटकांना तातडीची मदत करून त्यांना सुखरूप खाली उतरून आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. त्याच वेळी जुन्नर पोलीस उपविभागीय अधिकारी डी.वाय एस पी सौ. जयश्री देसाई मॅडम यांनीही फोन करून तातडीची मदत आपणास करावयाची आहे सांगितले. मी तुरन्त किल्ले संवर्धक ” शिवाजी ट्रेल” चे खंदे प्रा.श्री. विनायक खोतसर व वनविभाग जुन्नरचे वनपाल श्री. शशिकांत मडके यांना संपर्क साधून संबंधित घटनेची थोडक्यात माहिती देऊन आपण आहे त्या परिस्थितीत कोंडाजी बाबा डेरे आश्रम येथे येण्याची विनंती केली व तेही तुरंत उपस्थित झाले. पोलीस कांस्टेबल बी आर हराळ व पी सी तडवी हेही पोलीस व्हॅन सोबत पोहचले. 20 मिनीटांतच आमचे पर्यटक बचाव पथक हडसर गावी पोहचले.तेथे उतरून 15 ते 20 मिनिटांतच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचण्यात कामयाब झालो. तोपर्यंत महीला पर्यटक खिळ्याच्या वाटेने मध्यापर्यंत उतरले होते.फोनवरच त्यांचा हौसला अपजाई केला होता. आम्हाला पाहून त्यांना आजुनच रडू कोसळले व एकामेकिच्या गळ्यात गळा घालून त्यांनी दाटून आलेला कंठ मोकळा केला. पुन्हा त्यांचा हौसला बुलंद करत येथील आमची बचाव मोहीम सुरू झाली होती. पुरूष पर्यटक जास्त अंधार झाल्याने मध्यंतरी अडकले होते. त्यांना खाली उतरवले. येथुन अर्धा किल्ला अतितीव्र उतार व झाडीझुडप्यांतुन उतरायचा होता. हडसर गावापर्यंत सुखरूप उतरण्यास साधारण 3 तास वेळ लागला. खाली आल्यानंतर आमच्या टिमकडे घोडके साहेबांनी पाणी व अल्पोपहार पर्यटकांसाठी दिला होता. तो त्यांना देण्यात आला परंतु तोही त्यांनी घेण्यास नकार दिला आपण आमच्यासाठी देवरूपाने धाऊन आलात तोच आमचा अल्पोपहार आहे बोलत फक्त पाणीच घेतले. आमच्या सोबत ते जुन्नरपर्यंत आले. व छायाचित्र घेण्याचा आग्रह केला.श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापाशी सर्वांनी छायाचित्र काढली व आम्हा सर्वांना धन्यवाद आशिर्वाद देत अगदी प्रसन्न मुद्रेने त्यांना रात्री 12:30 पर्यंत पुण्याला रवाना करण्यात आले.

13103419_1694988520755919_1489065880764738656_n 13096265_1694988574089247_2259652701166223436_n

मी व आमची टीम सौ जयश्री देसाई मॅडम व श्री. कैलास घोडके साहेब यांचे आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला ही मानवीय मदतीची सेवा करण्याची संधी दिलीत. या आधीपण माळशेज घाटात एस टी दुर्घटनेत श्री. कैलास पिंगळे साहेबांनी मानवीय सेवा करण्याची संधी दिली होती. याही पुढे जेवढे शक्य असेल तेवढ्या सेवेस निश्चितच आम्ही आपल्या सोबतच असेल अशी ग्वाही देऊन सदिच्छा व्यक्त करतो.
जयहिंद

पाहुयात हडसर किल्याचे थोडक्यात स्वरूप व इतिहास
” किल्ले हडसर”

हडसर,
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. हडसर हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंड, शिवनेरी, लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे.

हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठा प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :- हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं , नळीत खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे आहेत. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते. तर दुसरी वाट डावीकडे असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जाते. दुसऱ्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडेवळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे. येथून थोडे पुढे कातळात खोदलेली प्रशस्त गुहा आहे.मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर दिसतो. समोरच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो.

जाण्याच्या वाटा :- या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची व दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या कोरून बांधून काढलेली आहे.कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात बुरूजापाशी पोहचता येते. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.njunnartaluka

किल्ले संवर्धक शिवाजी ट्रेल सदस्यांचे गौरव कार्य.

किल्ले संवर्धक ” शिवाजी ट्रेल” सदस्यांचे गौरव कार्य.

कालच हिवरे नारायणगाव येथे महापुरुष व समाजसुधारकांच्या अथांग कर्तुत्वाला विनम्र अभिवादन व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 वी जयंती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने साजरी करण्यात आली. आयोजकांनी हा एकत्र समाजसुधारकांच्या जयंतीचा उत्सव अतिशय उत्कृष्ट व समाजाला प्रेरणा व उर्जा देणारा कसा ठरेल याकडे विशेष लक्ष देऊन कौतुकास्पद कार्य घडवून आणले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून तालुक्यातील विशेष असे कार्य करणाऱ्या 10 पुरस्कारार्थिंना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये
मा.खंडूराज शंकर गायकवाड:आदर्श पत्रकारिता
मा. डाॅ.जे.के सोळंकी :आदर्श विज्ञान प्रसारक
मा. प्रा. कुमार काळे :आदर्श समाजप्रबोधनकार
मा. सचिन खरात :युवा नेता शौर्य
मा. प्रा. विनायक खोत : आदर्श दुर्गसंवर्धक
मा.खरमाळे रमेश(माजी सैनिक ):आदर्श निसर्ग मित्र
मा.नम्रता मनोज हाडवळे : आदर्श सृजन
मा. आशोक खरात : गुणवंत पत्रकारिता
मा. राजकुमार डोंगरे : आदर्श वनस्पतीमित्र
मा. सुभाष कुचिक : आदर्श पक्षीमित्र
पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यामधील सहा पुरस्कारार्थि हे किल्ले संवर्धक “शिवाजी ट्रेलचे” सभासद आहेत.

1) मा. प्रा. विनायक खोत : गेली 20 वर्षे दुर्ग संवर्धनात कार्यरत असून गडकोट व हिस्ट्रीक्लबच्या माध्यमातून आपले मोठे योगदान देत आहेत.

13006584_1690857301169041_4329249020369527289_n

2) मा.खरमाळे रमेश(माजी सैनिक ): हे दुर्ग संवर्धनाबरोबरच जुन्नर तालुक्याचा ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्याचे कार्य आपल्या लेखाणितून मांडत आहेत.

11214732_1690856591169112_681099114204071022_n

3)मा.नम्रता मनोज हाडवळे : दुर्गसंवर्धनाबरोबरच महिलांना आपल्या विविध प्रकारच्या सहकार्यतुन एकोप्याची भावना जागृत करून देत आहे व सृजन शाळेच्या मार्फत मुलांमध्ये आपल्या कलागुणांना खेळ , वस्तू बनवुन कसे गुणसंपन्न करता येते यासाठी कार्य करत आहेत.

13012689_1690856907835747_2744622023098363589_n

4) मा. आशोक खरात : हे दुर्गसंवर्धनाबरोबरच समाजातील अनेक तरूण वर्गाला “दुर्गप्रेमी निसर्गमित्र” या व्हाॅट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संवर्धन कार्याची गोडी वाढवत असून तळागाळातील गोरगरीबांसाठी आपल्या पत्रकारीतेतुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

12974507_1690856747835763_5505943860987476531_n

5) मा. राजकुमार डोंगरे : हे दुर्गसंवर्धनाबरोबरच तालुक्यातील वनस्पतींची माहीती व छायाचित्रे घेऊन जगासमोर मांडत आहेत.

13000283_1690857201169051_2134399437192421055_n

6) मा. सुभाष कुचिक : हे दुर्गसंवर्धनाबरोबरच तालुक्यातील विविध पक्षांची माहीती जगासमोर मांडत आहेत.

12963666_1690857071169064_6121288137291236362_n
सांगताना अभिमान वाटतो की किल्ले संवर्धनाबरोबर ही गोडी निर्माण करण्याचे कार्य “शिवाजी ट्रेल ” करत आलेली आहे. हा पुरस्कार फक्त या पुरस्कारार्थिंचा नसुन तो सर्व शिवाजी ट्रेलच्या सदस्यांचाच आहे. आपणही या थोर कार्यात “शिवाजी ट्रेल बरोबर जोडले जाऊन किल्ले संवर्धनात सहभागी होऊन मदत कराल ही सदिच्छा.
निसर्ग रम्य जुन्नर तालुका पेज परिवारातर्फे सर्व पुरस्कारार्थिंचे हर्दिक अभिनंदन! !

12963672_1690856471169124_5204459243489909688_nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान जुन्नर आपले खुप खुप आभार मानतो कि आपण या समाजकार्याची दखल घेऊन पुरस्कारार्थिंच्या कार्यास नवप्रेरणा दिलीत.