Category Archives: समाजकार्य

दुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान

दुर्गवाडी येथील दुर्गादेवी देवराईमध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता,वृक्ष व बिजारोपण अभियान

जुन्नर तालुका पर्यटन तालुका नुकताच घोषित करण्यात आला आहे. येथील परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने पर्यटन कसे घडेल यासाठी आज हातवीजच्या दुर्गवाडी येथील अतिदुर्गम भागातील देवराई मध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता , वृक्ष व बिजारोपण उपक्रम “चला मारू फेरफटका ” परिवार व “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज परीवारातर्फे राबविण्यात आला होता. या उपक्रमात महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, नगर,पारनेर,संगमनेर सोलापूर,उस्मानाबाद, बिड, कोल्हापूर, अमरावती, परभणी, कोकण,अकोला, मुंबई, नाशिक अशा अनेक जिल्हय़ातील 350 पर्यटक सहभागी झाले होते. पर्यटकांना जुन्नर तालुक्याचे मार्गदर्शन, स्वच्छता अभियान व वृक्ष व बिजारोपणाची जबाबदारी माजी सैनिक रमेश खरमाळे (वनरक्षक) यांना देण्यात आली होती. याआधी पण हा उपक्रम जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधन, नाणेघाट, किल्ले हडसर, किल्ले नारायणगड, हटकेश्वर व शिवसृष्टी जुन्नर येथे मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात आला होता. निसर्ग भटकंतीत पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची इजा पोहचू नये व पर्यावरण टिकविणे हाच उद्देश ठेवून व अशी प्रार्थना करूनच फेरफटका मारला जातो.
वड,उंबर व जांभळ या वृक्षाची रोपे दुर्गादेवी परीसरात वनपरीक्षेत्र जुन्नरच्या वनरक्षक तेजस्विनी भालेकर यांच्या मार्गदर्शनाने लावण्यात आली तर जवळपास पाच एकर क्षेत्रात विविध बियांचे रोपण करण्यात आले. स्वच्छता अभियानात जवळपास 45 बॅगा प्लास्टीक , पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, दारूच्या बाटल्या यावेळी भर पावसात गोळा करण्यात आल्या.
पर्यटकांनी खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गादेवी दर्शन, तीन हजार फुट खोल कोकणकडा दर्शन, दुर्गेचा डोंगर,आंबे घाट व आंबे येथील घंटेसारखे वाजणारे दगड याचा भरभरून आनंद घेतला.
“चला मारू फेर फटका” कोअर कमिटीचे सदस्य एस आर शिंदे यांनी पर्यटकासाठी शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केले होते. यावेळी “चला मारू फेर फटका” परीवारातील श्री. राजेश देशमुख, बाळासाहेब चव्हाण, हरिभाऊ दुधाळ, किरण कांबळे,कृष्णा परिट,
सुनील धुमाळ,बळीराम कातांगळे,राजेंद्र माने,
योगेश चौधरी,विश्वजीत पवार,नाना नलावडे,उद्धव वाजंळे.शरद गिरवले.चंद्रकांत भोसले,भरत बिडवे.
तसेच “निसर्गरम्य जुन्नर तालुका” परिवाराचे विनायक साळुंके, स्वाती खरमाळे हातवीज गावचे ग्रामस्थ रघुनाथ पारधी व सोनावळे गावातील सैराट टिमचे विशाल बो-हाडे व टिम उपस्थित होती.
पर्यावरण हाच खरा आपल्या सर्वांचा बाप आहे हे लक्षात घेता “फादर्स डे” म्हणुन येथे स्वच्छता राबवुन पर्यावरणाला सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
“निसर्गरम्य जुन्नर तालुका” या पेज परिवारातर्फे अभियानात सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याचे खुप खुप आभार.

त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहे. 

त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहे
जुन्नर तालुक्यात भटकंती करताना अनेकांच्या समस्या नेहमीच समोर येत असतात. कथा आणि व्यथा स्थानिकांकडून ऐकताना तर कधी अंगावर शहारे येतात तर कधी डोळ्यांच्या कडा पण पाझरू लागतात. मग एक प्रश्न काळजाला भिडतो तो म्हणजे खरोखरच हि “शिवरायांची” जन्मभुमी आहे का? प्रत्येक जण आपापल्या परीने लढा देतो व आपल्या समस्या सोडविण्याची धडपड करताना दिसतो व त्या पुर्ण पण होतात. परंतु ज्यांच्यामध्ये धडपड करण्याची क्षमताच नाही त्यांनी जावे कुठे? हा पण मोठा प्रश्न आहे.
जुन्नर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून चार गावांचा उल्लेख नेहमीच ऐकावयास मिळतो ती गावे म्हणजे दक्षिणेकडील सुकाळवेढे व हातविज तर उत्तरेकडील कोपरे व मांडवे. या ठिकाणी एस. टी सुविधा गावात पोहचल्या ही आनंदाची बाब निश्चितच आहे. व त्यातुन त्यांना दिलासा पण मोठ्या प्रमाणात मिळाला. आता अपेक्षा आहे ती चांगल्या प्रकारे रस्ते होण्याची.
जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील गाव म्हणजे #देवळे. या गावात सुविधा मिळाली खरी पण त्याच गावातील 40 कुटूंबातील जवळपास 250 लोकवस्ती असलेली #दरेवाडी मात्र शासन सुविधांपासून वंचित असलेली पहावयास मिळते.
अक्षांस – N 19*18’16.4 रेखांश – 073*44’18.3 वर वसलेल्या या दरेवाडीचा अंधार मिटला तो सन 2013 मध्ये तो पण एकल विद्यालयाच्या व गावच्या तरूणांच्या मदतीने. मुळात जर्मनीची असलेली #बाॅश्च (Bosch) कंपनीला एकल विद्यालयाने या दरेवाडीची माहीती दिली कि त्यांना हा प्रकल्प राबविण्यासाठी दुर्गम भागातील 30/40 घरांची अवश्यकता होती. कंपनीने सोलर प्रोजेक्ट येथे उभा केला व दरेवाडीला स्वातंत्र्यानंतर 65 वर्षांनी उजेड मिळाला.
या कंपनीने जवळपास 40 घरांमध्ये मिटर बसवलेले असून प्रत्येक घराघरामध्ये लाईट पुरवली जाते. एक इनव्हायटर रूममध्ये 6 बॅटरी संचात सोलरच्या माध्यमातून वीज सेव केली जाते व तीचा वापर टिव्ही, बल्प व वाडीच्या पाणीपुरवठा पंपासाठी केला जातो. मुलांचा अभ्यास, माता भगिनींचा स्वयंपाक याच प्रकाशात केला जातो. राॅकेल वर चालणारे दिवे नष्ट झाले व आरोग्यदायी यांचे जीवन ठरले. यासाठी प्रकल्पासाठी जागा दिली ती श्री. नामदेव सिताराम बुळे यांनी. या बदल्यात त्यांना घरात मोफत वीज देण्याचा निर्णय कमेटीने घेतला.
प्रत्येकी मिटर प्रमाणे रू 90/- आकारले जातात व त्याचा विनियोग या प्रोजेक्टच्या मेंटनससाठी केला जातो व याचे ताळेबंद ठेवण्यासाठी वाडीतील सात सदस्यांची वनदेवी कमेटी स्थापण्यात आली आहे. गेली पाच वर्षे हा वीज पुरवठा आमच्यासाठी उजेड घेऊन आल्याचा आनंद येथील ग्रामस्थ सांगतात. परंतु काही समस्या विचारले असता त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या पहावयास मिळाल्या.
ते सांगतात घरात लाईट आली परंतु वाडीत यायला रस्ता नाही. एखादी बाळंतपणात आडलेली महीला किंवा आजारी पडलेल्या व्यक्तींना येथुन तीन कि.मी अंतरावर स्ट्रेचरवर घेऊन जावे लागते. तीन महिने येथे एवढा पाऊस पडतो की आमचा इतर सर्वांशी संपर्क तुटतो. कारण दोन मोठ्या ओढ्यांनी व डोंगरांनी वेढलेल्या भागावर ही वाडी असल्याने पुर्ण पाण्याचा वेढा आम्हाला पडतो व मुख्य रस्त्यावर येणेही शक्य होत नाही. आरोग्य सेवा मिळणेही कठीण होत. राशनपाणी याचा साठा करून ठेवावा लागतो. आम्हाला सर्वांना महत्वाची गरज आहे ती हा पावसाळा सुरू होण्याआधी येथील रस्त्याची, असे ग्रामस्थ केविलवाणे सांगतात.
मी “निसर्गरम्य जुन्नर तालुका” पेज परिवार तर्फे मा. आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करेल की आपण दरेवाडीच्या समस्येवर लवकरच निर्णय घेऊन येथील जणतेच्या समस्या लक्षात घेता त्यांच्या निश्चितच अडचणी दुर कराल. कारण त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहेत.
ही दरेवाडी म्हणजे निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असून जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी निश्चितच ट्रम्पकार्ड म्हणुन उदयास येईल यात शंकाच नाही. परंतु येथील सुखसुविधांसाठी उच्च पावले उचलली जाणे गरजेचे आहे.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

अडीच वर्षे वय असलेल्या बालवाडीतील मुलीमुळे वाचले दोन जीव.

अडीच वर्षे वय असलेल्या बालवाडीतील मुलीमुळे वाचले दोन जीव.
सकाळी सकाळी नुकताच अंघोळ करून बसलो होतो. तेवढ्यात मोबाईल वर श्री. संजय गर्भे यांची काॅल रिंग वाजू लागली. मोबाईल रिसिव्ह केला तर बोलले घुबड पक्षाचे पिल्लू शाळेच्या वरांड्यात पडलेले आहे. येताय का? मी हो म्हटले व लगेच 10 मीनीटांत बेलसरला पोहचलो.पिल्लाची परिस्थिती पाहिली तर पिल्लू अगदीच खाली मान टाकलेल्या अवस्थेत होते. परंतु जखम कूठेच दिसत नव्हती. बहुतेक 20 /25 मुलांनी गराडा घातल्यामुळे घाबरले असावे असा तर्क केला. कोणत्या मुलाने पाहिले याला मी विचारले तर कु.वर्षना देवदत्त ताजणे या अडीच वर्षे वयातील बालवाडीच्या मुलीने पाहिले समजले. जवळच सौ शैलजा गर्भे व सौ छाया अरगडे या मुलांच्या शिक्षिका होत्या. त्यांनी मुलांना एकत्र करून पक्षांची माहिती देण्याचा मला आग्रह केला. मी माहीती देण्याआधी प्रथम खिशात 20 रू होते ते काढत कु.वर्षना देवदत्त ताजणे या मुलीस सर्वांसमक्ष बक्षीस म्हणून दिले. आणि बोललो छान काम केलेस बेटा. पक्षी हे आपले मित्र असतात. त्यांना कधीच मारायचे नसते. अश्या घायाळ झालेल्या पक्षांना नेहमीच जीवदान द्यायचे असते. कारण याच पक्षांमुळे पृथ्वी तलावर लाखो झाडे लावली जातात. मानव झाडे तोडतो व हे पक्षी मात्र फळे खातात व त्यांच्या विष्ठेतुन या फळांच्या बिया इतरत्र पसरतात व पाऊस पडला कि या बिया उगवतात तीच झाडे आपणास न लावता इतरत्र दिसतात. या शाळेत बहुतांशी मुले ठाकर समाजातील असल्याने त हा संदेश देणे खुप गरजेचे होते.
वर्षनाला ज्या ठिकाणी हे पिल्लू दिसले त्या ठिकाणी संजयजी गर्भे यांना दुसरे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. ते पण तेथेच उभे होते. डाॅ. अजय देशमुख यांना फोन करत असतानाच त्या पिल्लांची आई झाडावर दिसली. जीवाच्या आकांताने ओरडत होती. दु:ख कुणाला सांगणार ती. एक बाळ मरनासन्न होते तर दुसरे आईच्या कुशीत जाण्यासाठी धडपडत होते. आई मात्र आक्रोश करत होती. या झाडावरून त्या झाडावर फिरताना दिसत होती. दोन्ही पिल्ले मी एकत्र ठेवली होती व बाजुला जाऊन त्यांना आई घेऊन जाईल म्हणून वाट पाहू लागलो.
आता आईचा आवाज जोरातच येऊ लागला. मी जाऊन पाहिले तर मांजर या पिल्लांकडे पाहून हळु हळु पुढे शिकारीसाठी सरकत होती. त्या मांजरीला हुसकावून लावत ती पिल्ले उचलत पुन्हा उंच टाकीवर मी आणि संतोष बिरादार आम्ही ठेवली. त्या पिल्लाच्या आईला धिर आला असावा. कारण तीचा आवाज आपल्या लेकरांवर आलेले संकट टळल्यामुळे कमी झाला होता. निलगिरीच्या उंच झाडावरून एकटक ती आपल्या लाडल्यांना न्याहळत होती. त्यांना उचलून घेऊन जाण्यात ती असमर्थ होती. उंच टाकीवरून मात्र ओरडून आपल्या बाळांना आवाज देत त्यांचे सात्वन करत होती. जणू सांगत होती काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीशी. आजुनही एक बाळ शांत मरनासन्न अवस्थेत पडलेले होते. मला त्या पिल्लाची खुप काळजी वाटत होती. परंतु नाविलाज होता. परंतु खात्री होती की ते नक्कीच स्वतःला सावरेल. कारण उचलून घेताना त्याच्या पायांच्या नख्यांनी माझी हाताची बोटे घट्ट पकडली होती.
आम्ही खुप लांबुन कॅमेरा झुमकरून या बाळांची हालचाल टिपत होतो. आता झाडावरून आई त्यांच्या जवळच्या असलेल्या फांदीवर आली होती. आई जोरात ओरडत होती. अचानकच मरनासन्न अवस्थेत असलेल्या बाळात प्राण संचार झाल्याचे दिसून आले. त्याची हालचाल दिसून लागली व ते एकदम उभे राहिले. हे दृष्य पाहून मला अत्यानंद झाला. ते झोपलेल्या बाळाच्या कानावर पडलेल्या आईच्या आवाजाने संजीवनचे काम केले होते. अचानकच ते पळु लागले. आम्हा सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद खुलला होता. तेवढ्यातच एका बाळाने अचानक टाकीवरून खाली जमीनीवर झेप घेतली. पंख हवेत विखुरली गेली व अलगत ते जमीनीवर उतरले. ही क्रिया पाहून
दुस-या पण बाळाने पंख उडवत जमीनीकडे झेपावले. आई त्या दिशेला उडताना दिसली. शेवटी दोन्ही बाळे आईच्या कुशीत सुखरूप पोहचली व आम्ही मोकळा श्वास घेत व आनंद व्यक्त करत व वर्षनाला दोन जीव वाचविल्याबद्दल शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी मार्गस्थ झालो.
मित्रांनो कृपया पक्षी वाचवा व पक्षांशी मैत्री पुर्ण जगा. Please save birds
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

एक सेल्फी असाही

एक सेल्फी असाही.
जेवण करण्यासाठी हाॅटेलमध्ये बसलो होतो. एक गृहस्थ माझ्याकडे सारखी नजर लावून पहात होते. मी व माझ्या सौ स्वाती आम्ही गप्पा मारण्यात दंग होतो. माझे तोंड त्या व्यक्तीच्या दिशेला होते जो खुपवेळ माझ्याकडे एकटक पाहत होता. माझे अधुन मधुन त्यांच्याडे लक्ष जात होते. बहुतेक माझ्याकडे त्यांचे काही काम असावे असा मला भास होत होता. मी त्याकडे नजरा नजर होऊनही दर्लक्ष करत होतो. जेवणाची आॅर्डर करत सौ आणि मी गप्पा मारू लागलो. अचानकच ती व्यक्ती जवळ आली. आपणच खरमाळे सर का? असा मला प्रश्न केला. मी हो म्हटले व त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून थोडा चक्रावलोच. कारण मी या गृहस्थाला ओळखत नव्हतो मग एवढे आनंदी होण्याच कारण काय? काहीच समजले नाही. मी पुढला विचारच करत होतो की, तेवढ्यात तेच गृहस्थ बोलले सर एक सेल्फी हवाय तुमच्या सोबत. मी म्हटले घ्या की त्यात काय? दोघे हाॅटेल बाहेर दरवाजात उभे राहीलो. जवळच्या वेटरनी आमचा फोटो टिपला वपरत आतमध्ये आलो. या महाशयांनी 500/- रू नोट काढली व मला देऊ केली.मला रहावल नाही. आहो सेल्फी फोटोचे पाचशे रूपये का? नको नको नकोत पैसे? ते बोलले मग तुम्ही जेवन करा तुमचा हाॅटेलचा बिल मी भरतो. आहो नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही का बिल भरणार? तुम्हीच बसा सोबत जेवायला मीच बिल भरतो.
ते सांगू लागले मी गणेशजी काशिद चिंचोली गावचा गृहस्थ. आपल्या “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” या पेजवर मी भरभरून प्रेम करतो. आपले कार्य व ध्यास मी नेहमीच पाहतो. आपल्यासाठी आज मला फक्त एकदा खर्च करू द्या प्लीज. मी पुन्हा नकार दिला. ते सांगत होते नोकरी निमित्ताने मी मुंबईकर झालो. त्यामुळे गावी पुन्हा परतने शक्यच झाले नाही. शिवजन्मभुमीवर त्यांच प्रचंड प्रेम त्यांच्या बोलण्यातून जानवल. ते अहमदनगरला काही कामानिमीत्ताने निघाले होते. मला अचानक पाहीले व थांबले होते.
शेवटी ती 500/- रू नोट त्यांनी केलेल्या आट्टाहासाने मला त्यांनी थोपवलीच. व बोलले आपल्या हातुन एका गरीबावर किंवा गरजुवर खर्च करा. मी त्यांच्या भावनांची इज्जत करत नाविलाजास्तव ती नोट खिशात घातली. त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर 500/- रू गेल्याचे दुःख दिसले नाही तर लाख रूपये मिळाल्याचे समाधान झळकत होते.
माझा मोबाईल नंबर त्यांनी घेतला. मी त्यांना बोललो आपला नंबर मला नक्की पाठवा व नाव पण टाका व मेसेज करा. ते नंबर घेत पाठीमागे वळाले व झपझप एस.टी स्टॅन्डच्या दिशेने चालू लागले मात्र मी आ वासून त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बसलेल्या टेबलवरून पाहतच राहीलो. माझ्या सौ तर माझ्याकडे आश्चर्याने अवाक होऊन पहातच राहील्या.
नक्कीच गणेश भाऊ आपले 500/- रू अशा गरजुंवर खर्च होतील की ज्याची आपेक्षा आपण केली नसेल. मात्र नक्कीच सांगतो की ती 500/- ची नोट जेवढ्या दिवस माझ्याकडे असेल ती जेव्हा ती गरजुकडे जाईल तीच्या व्याजासकट जाईल. आपण जे प्रेम दाखवलत त्याबद्दल आपणास माझा लाख लाख मुजरा. आपण पाठवलेला सेल्फी माझ्यासाठी नक्कीच लाखमोलाचा आहे.
जे भावले ते लिहीले. आवडले तर नक्कीच शेअर करा.
जय भवानी
जय शिवाजी.
(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G व
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)

लेखक : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

भटक्यांची किल्ले चावंडमध्ये ग्रंथदिंडी

भटक्यांची किल्ले चावंडमध्ये ग्रंथदिंडी.
सह्यसखे आयोजित “सुजाण नागरिक ते सजग ट्रेकर” तसेच बोंबल्या फकिर अर्थात रवी पवार आयोजित ग्रंथदिंडी हा उपक्रम किल्ले चावंड येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या संस्थांनी सहभाग घेतला होता. पैकी इस्रो मध्ये वैज्ञानिक म्हणून काम केलेले व जवळपास 24 विविध पदव्युत्तर असलेले व पुर्व राष्ट्रपती डाॅ. ए. पी. अब्दुल कलाम व अनेक देशांमध्ये पुरस्कृत करण्यात आलेले श्री. दामोदर मुगदुम सर, श्री. रवी पवार ( बोंबल्या फकीर) प्रसिद्ध ट्रेकर श्री. विवेक पाटील सर, श्री. अरूण पाटील सर यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून चावंड गावतील 51 शालेय विद्यार्थांना विविध पुस्तके व वह्यांचे वाटप करण्यात आले. फायर ब्रिगेड डेमो, स्वसंरक्षण बचाव, रॅपलिंग क्लायमिंग बाबत डेमो, पर्यावरण जनजागृती, किल्ले व इतिहास संवर्धन अशा अनेक विषयांची सांगड मान्यवरांनी घालून सर्वजण किल्ले चावंडचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी किल्यावर गेले.
मी या ग्रंथदिंडी व सर्व ट्रेकरग्रुपचे आभार व्यक्त करतो की आपण मला या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली व जुन्नरचा ऐतिहासिक व नैसर्गिक महत्त्व प्रकट करण्यासाठी मदतीचा हात दिलात. आपण मला दिलेले “महात्मा गांधी चरित्र ” निश्चितच माझ्यात सामाजिक कार्य करण्यास महत्वपूर्ण ठरेल.
श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील प्रथम श्रेणीतील अधिकारी यांची किल्ले शिवनेरीस भेट.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील प्रथम श्रेणीतील अधिकारी यांची किल्ले शिवनेरीस भेट.
आज पुणे येथील यशदा ट्रेनिंग सेंटर चा ऐतिहासिक अभ्यास दौरा किल्ले शिवनेरी होता. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यातील 65 क्लास वन अधिकारी माहिती घेण्यासाठी आले होते. जुन्नर तालुक्याला लाभलेला संपूर्ण ऐतिहासिक वारसा कथन करण्यासाठी मला आयोजक श्री. अशोक आमले ,श्री जयवंत शेरकर, श्री अनिल मेहेर श्री. नरेंद्र तांबोळी श्री.सचिन कालेकर यांच्या माध्यमातून संधी मिळाली.
किल्ले शिवनेरीचे व जुन्नर तालुक्यातील इतर ऐतिहासिक व नैसर्गिक वारसेचे महत्व किल्ला दर्शन घेताना सांगण्यात प्रसन्न वाटले. मला साथ दिली ती ओंकार ढाके यांनी. यामध्ये डिप्टी कलेक्टर, तहसीलदार, बि.डि.ओ, फायनान्स ऑफिसर, सेल टॅक्स ऑफिसर, चिफ ऑफिसर या सर्व अधिकारी वर्ग यांचा समावेश होता.
किल्ले शिवनेरी नंतर आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र गोळेगाव येथील मेजवानी सर्वांना खुपच आवडली. नंतर जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी या गावचा पण अभ्यास दौरा करण्यात आला. या अभ्यास दौऱ्याचे नियोजन यशदाचे अधिकारी डाॅ. राजेंद्र पवार श्री.मारूती मुळे श्री.सदाशिव पाटील यांनी खुप छान केले होते. जुन्नर टिमच्या आयोजकांनी यावेळी उपस्थित यशदा अधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
मी यशदा अधिकारी वर्ग यांचे “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” पेज परीवरातर्फे आभार व्यक्त करतो की आपण जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर अभ्यास दौरा आयोजित करून श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभुमीचे महत्व राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी यांच्या पर्यंत या माध्यमातून पोहचविण्याचा प्रयत्न केला.
छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370

“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

श्रावण सुरू होताच तीन जणांना मिळाले जीवदान.

श्रावण सुरू होताच तीन जणांना मिळाले जीवदान.
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पुणे नाशिक हायवेवर कुकडी नदिवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या पात्रातील मध्यभागी असलेल्या प्लेरच्या कट्यावर श्री. भिवा हरिभाऊ दुधवडे (वय-50) पुजा (मुलगी) वय-10 पुष्पा (पत्नी) वय- 40 रा.अकोले ता- संगमनेर, जिल्हा – अहमदनगर, हे कुटुंब पावसात छताचा आधार मिळावा म्हणून रात्र कुठेतरी आश्रय काढण्यासाठी झोपले होते. स्वतःच घर नाही. मजुरी करून पोट भरणे व मिळालेल्या जन्माची मृत्यू पर्यंत वाट पहावी असा मनात विचार करत झोपले होते. एक एक दिवस याच पद्धतीने जगत आहे. मुलगी दहा वर्षांची परंतू शिक्षणासून दुर ती परीस्थितीमुळे , पत्नी पण अडाणीच व यांचे पण शिक्षण नाही. काय करणार मोल मजुरी सोडून हे, आणि याच मुळे नदिला आपण झोपलोय या ठिकाणी पाणी येऊन जीव धोक्यात येईल ही विचारक्षमताच त्यांनी केली नाही.
जुन्नर तालुक्यात पश्चिम पट्यात सतत पडणा-या पावसामुळे कुकडी नदीच्या पात्रातील पाणी रात्री अचानकच वाढले. यांना तेथून बाहेर पडणे शक्य झाले नाही. खुप आरडाओरडा त्यांनी केली परंतु काहीच उत्तर कुणी देईना. नदिच्या पाण्याचा खळखळाट व निर्मनुष्य जागा कोण जाणार तेथे व कसा अवाज ऐकू येईल कुणाला. सुरज गजानन चौगुले हा रात्री लघुशंका करण्यासाठी पुलाच्या कोपर्‍यावर थांबला. नदिपात्रात त्याला बॅटरी चमकताना दिसली. एवढ्या पाण्यात मध्यभागी बॅटरी का चमकते पाहून त्याला शंका आली. म्हणून तो खाली उतरला तर तो पण घाबरला. चारही बाजूंनी वेगवान वाहणाऱ्या पाण्यात हे तीघे अडकले होते. आता रात्रीचे 12 वाजले होते. सुरजने पोलीस स्टेशनला काॅन्टॅक केला.
नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी जगताप साहेब आज जुन्नर तालुक्यात सेक्टर ड्युटीवर होते. त्यांना हा मेसेज वायरलेसद्वारे देण्यात येत असताना हा मेसेज जुन्नर पोलीस स्टेशन चे अधिकारी पी. आय कैलास घोडके साहेब यांनी ऐकला. ते पण रात्री गस्तीवरच होते. त्यांना रहावल नाही व रात्री बरोबर 3:15 ला मला काॅल केला. बोलले खरमाळे मेजर आपण कुठे आहात? मी बोललो सर मी जुन्नरमध्येच आहे. त्यांनी मला सांगितले की पिंपळवंडी येथे पाण्यात तीन जण अडकले आहेत येताय का मदतीला. मी लगेच होकार दिला व दहा मीनीटांतच आम्ही पिंपळवंडीकडे रवाना झालो. माझ्या सोबत रोप साहीत्य होतच.
तीन जीवांचा प्रश्न होता म्हणून मी लगेच श्री. जितेंद्रजी देशमुख व श्री. विनायकजी खोत यांना फोन केला.घटनास्थळी परिस्थिती कशी आहे हे माहीत नसल्याने तीचा मी पुढे जाऊन आढावा घेतो व लगेच आपणास कळवतो. म्हणजे आपणास लागणारे साहीत्य काय हवे ते लक्षात येईल असे देशमुख बोलले व ते घेऊन आम्ही लगेच येऊ असे त्यांनी सांगितले.
घोडके साहेबांनी जगताप साहेबांना फोन करून आधार दिला व बोलले मी व मेजर खरमाळे जुन्नरहून साहित्य घेऊन निघालोय काळजी करू नका. आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आळेफाट्यावरून क्रेन बोलावले होते ते तेथे सज्ज होते. पहिला मी सर्च केला की नदिच्या पात्रातील वाहत्या पाण्यातून त्यांना बाहेर काढता येईल का? याचा मी आढावा घेतला. परंतु पाण्याचा वेग खुपच होता व रिस्क खुप मोठी होती. क्रेनने खाली उतरने सोपे होते व वर काढणे पण सोपे होते. सुरज प्रथम क्रेनने खाली उतरला.सौ. पुष्पा ला प्रथम वर घेतले. नंतर मी खाली उतरलो. ती दहा वर्षाची चिमुरडी भितीने व थंडीने कापत होती. खुप घाबरलेली होती. तील खुप आधार दिला. बेल्टवर तीला खुप जखडून बांधले. ताकी तीचा हात सुटला, भितीने चक्कर आली तरी ती सुरक्षित रहावी. तीला पण काढण्यात यशस्वी झालो. नंतर वडीलांना त्यांच्या सामानासोबत वर काढले. सुरज पण वर चढला व नंतर मी वर गेलो. अशा पद्धतीने या तीन जीवांच्या सुटकेने रोखून धरलेला श्वास सोडला. मी निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज च्या वतीने सुरज व पी. आय घोडके साहेब यांचे आभार व्यक्त करतो की आपण अति दक्षता घेत या तीन जीवांच्या मदतीला धावून आलात व या कार्यात मला एक छोटी सहभागाची संधी देऊन सामाऊन घेतलत. आणि जगताप साहेब व आळेफाटा क्रेन सर्विस यांचे कौतुक व अभिनंदन करतो की आपण कोणत्याही प्रकारे विनाविलंब येथे तत्पर सेवेस हजर होऊन उत्कृष्ट कामगिरी केलीत.
समाजाची अशी सेवा करताना खुप समाधान मला मिळते. आपणही समाजाच्या कारणी देह अर्पण करून मदत कराल ही सदिच्छा.

लेख व छायाचित्र श्री. खरमाळे रमेश 
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
मो. नं. 8390008370

 

 

 

बेसहारांचा कृपया सहारा बना मित्रांनो

बेसहारांचा कृपया सहारा बना मित्रांनो.

काल संध्याकाळी 7 वाजता अक्षयभाऊंचा व्हाॅट्सअपवर मेसेज आला की सर कुठे आहात?
मी रिप्लाय दिला जुन्नरला आहे.
एक काम होत?
मी म्हटलो सांगा.
ते बोलले मी मुंबईला आलोय.
मी बोललो काम बोला.
त्यांनी पुन्हा लिहिले की एक 70 वर्षांची निराधार आजी घाटकोपर बसस्थानकात खुप दैनीय अवस्थेत पडून आहे. बस ड्रायव्हर स्वतः आणलेल्या जेवणातुन तिची उपजीविका करत आहे. तील घेऊन जुन्नरला यायचय परंतु माझ्याकडे गाडी भाडे देण्यासाठी पैसे नाहीत व जीप ड्रायव्हर 4000/- हजार भाडे मागतोय. मी लगेच रिप्लाय केला भाऊ काळजी करू नका पैसे जुन्नरला आल्यावर घेऊन जा. मानवता धर्म महत्वाचा आहे व तो जोपासला जायला हवा हिच शिकवण राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य निर्माण करताना दिली होती. आपण ती पाळलीच पाहिजे. व आपण तर शिवजन्मभुमीत जन्माला आलोय. या मातीचे ऋण पण आपणास फेडायलाच हव. तुम्ही बिनधास्त घरी या पैशाची चिंता करू नका.
घाटकोपर मध्ये माझा भाचा सुहास शिवाजी कोरडे राहत आहे त्यास हि खबर दिली.अक्षयभाऊ व सहकार्यांची त्याने जेवायची सर्व सोय केली होती परंतु अक्षयभाऊंना पोलीस स्टेशनची कारवाई करायची असल्याने हे नाकारले. मी अक्षयला विचारले किती वाजता तुम्ही जुन्नरला पोहचाल. तर त्यांनी 11:00 वाजेपर्यंत पोहचेल म्हणुन सांगितले.
मी अक्षयची वाट पाहू लागलो. एरवी पडत असलेल्या पावसाने जास्त जोर धरला होता. मला काळजी वाटत होती की एवढ्या पावसात हे येतील तर कसे? कारण मध्यंतरी माळशेज घाट चढून यायचे होते. अक्षयचा फोन लागत नव्हता. घड्याळात एक वाजले होते. माझी चिंता वाढू लागली होती. काही सुचत नव्हते. रात्र भयानक भासू लागली होती. काय झाले असावे? नको ते प्रश्न डोक्यात डोकावत होते. जीवाची घालमेल चालू झाली होती. दोनची वेळ झाली होती. फोनवर सारखीच काॅल करण्याची धडपड चालू होती. घरातील व्यक्तींना त्रास नको व त्यांना डिस्टर्ब नको म्हणून घराबाहेरच उभा होतो. असंख्य मच्छरांचे माझ्या शरीरात सुया खुपसून शरिरातील रक्त खेचून भुक भागविण्यासाठीचे प्रयत्न चालू होते. खरखर अंग नखांनी खाजवत फोन काॅल लावत होतो. 2:30 च्या दरम्यान फोन उचलला गेला हा सर असे अक्षयचे शब्द कानी पडले. आनंद द्विगुणित झाला. अरे कूठे आहात विचारले. फक्त म शब्द कानी पडला व फोन डेड झाला. पुन्हा काही सुचेनासे झाले.
आता खुपच मच्छरांनी मला गराडा घातला होता. मी घरात येऊन आंथरलेल्या सतरंजीवर विचार करत आडवा झालो. विचारांचे थैमान डोक्यात माजले होते. काहीच सुचत नव्हते. चार वाजले होते. रात्रभर डोळा लागला नव्हता. सर्व रात्र विचित्र विचारांच्या मंथनात गेली होती. सारखे लक्ष मोबाईल फोनकडे लागले होते. आत्ताच अक्षयचा फोन येईल मगच फोन येईल काही उमगत नव्हते. हाच विचार करत करत डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप मंदावत चालली होती. आत्ता तर अर्थवट डोळे मिटले होते. तेवढ्यात मोबाईलमधील जय जय रामकृष्ण हरी रिंगटोन वाजू लागली. नक्कीच अक्षयचा फोन असणार यात शंकाच नव्हती. फोन रिसिव्ह केला. पलीकडून येणारा आवाज अक्षयचा होता. सर दहा मिनिटांनी घरी पोहचतो बोलु लागला. डोळ्यावरील आलेली झापड क्षणात नाहीशी झाली. पत्नी स्वातीला उठवले. चहा ठेव सहा सात कप ठेव बोललो. मी बाहेर जाऊन उभा राहिलो. अक्षय गाडी घेऊन घरापुढे उभा राहीला. खुप समाधान वाटले. सगळ्या चिंता दुर झाल्या. गाडीत डोकावले तर आजी व आजुन दोघे निराधार गाडीत होते.
अक्षयला विचारले आजून दोघे कोठे मिळाले. तो बोलला कल्याण मार्गावर यातील आसामचा राहणार कचराकुंडीत सडलेले अन्न रात्री एकला खाताना दिसला व त्याला सोबत घेतले. तर दुसरा कल्यानजवळ दीड च्या दरम्यान पडत असलेल्या पावसात उघडाच तेथील डबकात बीड्या शोधत होता. त्याला प्रथम घरात जमा केलेली कपडे घालायला दिली. त्याला ती पण घालता येत नव्हती. हाताला मार लागल्याच्या जखमा दिसत होत्या. त्याला कपडे घालण्यास मदत केली. त्याला काहीच बोललेल समजत नव्हते. अंडरपॅण्ट सोडून अंगावर काहीच नव्हते. थंडीने खुप धडधड उडत होता. आजी गुजरातच्या मारवाडी समाजाच्या होत्या. काम धंद्यासाठी घाटकोपरला आल्या होत्या. परिस्थितीने त्यांना गुडघे टेकायला लावले होते. मुलगा असूनही तो त्यांच्याकडे पहात नव्हता. दोन्ही तळपाय सोलून निघले होते. त्यांना हलने सुद्धा असह्य होत होते. त्या सर्वांची समजूत घालावी हा अग्रह अक्षयने केला तेंव्हा मी बोलू लागलो होतो. तिघांपैकी कुणालाही मराठी भाषा समजत नव्हती. एकाकडेच आधारकार्ड होते व त्यावरून तो बिहारचा असल्याचे समजत होते.
पत्नीने बनवलेला चहा फक्त त्यातील एकजण प्याला. त्यांना आरामाची गरज भासत होती. अक्षयला पैसे व जवळपास दहा ड्रेस व आजीला एक साडी दिली. व यांची व्यवस्था करण्यात कोणत्याही प्रकारची कसर सोडु नकोस म्हणुन सांगितले. अक्षय त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला व सकाळी त्या दोघांना पोलीस ठाण्यात नेऊन तेथील कार्यवाही करून पुण्यास निराधाराश्रमात नेऊन सोय करणार होता. अक्षयचा हेवा वाटला. कुणाचा कोण परंतु जीवन या निराधारांच्यासाठी या लहान वयातच बहाल केल्याचा गर्व झाला. शेवटी शिवबांचा शेवकच या निराधारांसाठी शिवजन्मभुमीत जन्माला आल्याचे समाधान वाटते.
धन्यवाद अक्षयभाऊ आपल्यामुळेच माझ्या हातून या तीन निराधारांची सेवा करण्याचे भाग्य लाभले.
आत्ताच अक्षयभाऊंचा फोन आला होता की सर मी यांना पुण्याला घेऊन निघालोय. काही समस्या आल्यावर फोन करा भाऊ म्हटले. नक्कीच सर म्हणून अक्षयने फोन कट केला. भाऊ आपल्या हातुन अश्याच निराधारांची सेवा घडत राहो व त्यांचा मसिहा म्हणुन समाजात एक शिवबांचा निस्वार्थ सेवक म्हणून नावलौकिक प्राप्त होवो हीच सदिच्छा. मित्रांनो या कार्यात सहभागी होऊन आपण अक्षयभाऊंच्या कार्यास हातभार लावाल ही विनंती.
(बेसहारांच्या हितासाठी ही पोस्ट शेर करून मानवतेच्या प्रचारास मदत करा जेणेकरून त्यांना सहारा मिळु शकेल )
श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल.
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका.
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज, मोबाईल अँड्रॉइड अप व युट्यूब चाईनल.
मो. नं 8390008370

 

 

 

निसर्गरम्य जुन्नर तालुका पेज च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

मित्रांनो हे फक्त आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच शक्य झाले. खरे तर हे यश आपलेच आहे. आपल्यामुळेच हा निसर्ग ठेवा मी मांडण्यात यशस्वी झालो.
धन्यवाद दै. लोकमत व पत्रकार अशोकभाऊ खरात.
निसर्ग रम्य जुन्नर तालुका पेजचा उपक्रम आपण निस्वार्थपणे जनतेसमोर आणलात. पेज परिवार आपले ऋणी आहे.

निसर्गरम्य जुन्नर तालुका

३५ पर्यटकांची थरारक व धडकी भरवणारी वानरलिंगीवर झेप एक नवीन विक्रमाची नोंद.

३५ पर्यटकांची थरारक व धडकी भरवणारी वानरलिंगीवर झेप एक नवीन विक्रमाची नोंद.

आज “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुज पेज व रेंज अॅडव्हेंचरच्या माध्यमातून जीवधन ते वाणरलिंगी (खडापारशी) २५० फुट व्हॅली क्रॉसिंग तसेच ३३० फुट रॅपलिंगचा भर उन्हाळ्यात अनेक हौसी पर्यटकांनी प्रत्यक्ष थ्रिल थराराचा रोमांचक , धडकन वाढवणारा आनंद घेतला. या मध्ये 7 महीलांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यामध्ये खोडद गावच्या पाच महिलांनी सहभाग घेऊन जुन्नर तालुक्यात एक वेगळाच इतिहास रचला. या वानरलिंगीवर जुन्नर तालुक्यात प्रथमच या पाच महिलांचे पाउल पडले व यांनी आपल्या भागातील इतर महिलांनी असा धाडसी सहभाग नोंदवावा हा संदेश दिला.
आज या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग करण्याचं नवीन रेकॉर्ड रचलं गेलं.३५ ट्रेकर्स ने हि २५० फूट लांब व्हॅली क्रॉस केली व ३३०ल रॅपलिंग केली. हि व्हॅली अतिशय धडकी भरवणारी व भयानक असल्याने सहजासहजी ट्रेकर या व्हॅली क्रॉसिंग इव्हेंट उपक्रम राबवत नाहीत. २०१४ ला पुण्याच्या एका ग्रुप ने हि व्हॅली क्रॉस केल्याची नोंद आहे त्यांच रेकॉर्ड होत २५ गिर्यारोहकांच. त्यानंतर २००८ ला काहींनी हा प्रयत्न केला होता. मात्र आज त्यापेक्षा जास्त म्हणजे 35 पर्यटकांनी हा थरार अनुभवला. …आणि या रेकॉर्डचे आम्ही साक्षीदार आहोत….माळशेज रांगांमध्ये नाणेघाटाच्या कुशीत जीवधनाच्या सोबतीला असलेली वाणरलिंगी गेली अनेक दिवस ऊन, वारा पाऊस झेलत आहे…या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारा असतो आणि पाऊसही यांमुळे वाणरलिंगी ला मधोमध उभे आणि खालच्या बाजूला आडवे तडे गेले आहेत…भविष्यात किती ट्रेकर यावर क्लायबिंग व रॅपलिंगचा आणि क्रॉसिंगच्या थराराला जातील याचा अंदाज सांगू शकत नाही. मला हे रेकॉर्ड पर्यटकांना सहभागी करून घेऊन हा उपक्रम राबविण्याचा विलक्षण आनंद होत आहे. सहभागी सर्व पर्यटकांचे खुप खुप आभार व अभिनंदन.

श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
“निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज