Category Archives: श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक)

पडीलिंगी नेढ घाटघर

पडीलिंगी नेढ घाटघर

विषय तसा गमतीदार आहे. वाचक मित्रांनी वाचला असेलही किंवा ऐकण्यात तरी असेल. वानरलिंगि शब्द तर नक्कीच ऐकून असाल यात शंकाच नाही. वानर आणि लिंगी असे दोन शब्द जोडून वानरलिंगि शब्द तयार करण्यात आला आहे. का बर हा शब्दप्रयोग केला असेल? कदाचित वाचताना किंवा ऐकताना आपल्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असेलच. या बाबत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जमीनीवर 90 डिग्री उभा असा कातळाचा गोलाकार भाग कि ज्याचा आकार वानराच्या लिंगासारखा आसमंतात दृष्टिस पडतो, की ज्यास फक्त वानर सर करू शकतात व ज्याच्या सर्व दिशांना खोल दरी दृष्टीस पडते त्याचे नाव देण्यात आले ते वानरलिंगि. उदाहरणार्थ जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्याच्या दक्षिणेला जो उभा गोल कातळ दिसतो त्यास वानरलिंगि किंवा खडापारशी या नावाने संबोधले जाते. आता याच लिंगाच्या आकाराचा एक रेललेला भाग डोंगराच्या कुशीत कातळावर टेकलेला दिसून येत असून डोंगर आणि या लिंगीच्या रेललेल्या भागातून आपणास आरपार दोन दिशांना जाता येते त्यास नेढ असे म्हणतात. म्हणून या नेढ्याचे नाव पडीलिंगी नेढ असे देण्यात आले आहे. अशेच एक नेढ घाटघरच्या डोंगरात दिसून येते म्हणून त्याचे नाव घाटघरचे पडीलिंगी नेढ अस देण्यात आले.
दोन वर्षे माझी नाणेघाट परीसरात अनेक वेळा परीक्रमा झाली. एक दिवस किरण आणि मी नाणेघाट कडे जात असताना घाटघर येथून दृष्टीस पडणा-या नेढ्यात जाण्याची बोलनी झाली होती. अनेक वेळा या ठिकाणी जायचे म्हटले की निश्चितच व्यत्यय यायचा. आज तो दिवस उजाडला होता. किरण बाणखेले व विवेक पिंगळे माझ्याकडे येतानाच पिकलेले आंबे घेऊन आले होते. कारण त्यांच्या बॅगमधून आमरस (आंब्याचा ज्युस) जमिनीवर टपकताना दिसत होता. मिसेसचा व माझा बाहेर जाण्याचा बेत अचानकपणे त्यांच्यासोबत जाण्यामुळे रद्द झाल्याने काय झाले असेल हे आपणास ठाऊकच असेल. फुटलेले आंबे घरात देऊन आम्ही तीरकुट दुचाकीवर नाणेघाटच्या दिशेला निघालो. बेजवाट, सुराळे, आपटाळे, चावंड, खडकुंबे, फांगुळगव्हाण मागे टाकत आम्ही घाटघरला पोहचलो. मध्यंतरी फांगुळगव्हाण मधून लिंगिच्या डोंगरावर चढाई करून या नेढ्याकडे पोहचण्याचा आमचा विचार होता पण तो सार्थ ठरेल असे वाटत नव्हते त्यामुळे तो विचार त्यागून मदतीसाठी घाटघरच्या साबळे मामांच्या घरी पोहचलो.
येथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगाविशी वाटते कि ती अद्याप आपल्या ऐकण्यात नसावी. फांगुळगव्हाण च्या पश्चिमेला असलेला डोंगर अर्थात लिंगिचा डोंगर. या डोंगराच्या पुर्वेला मध्यभागी जवळपास 50 फुट उंच असलेली एक लिंगी निदर्शनास पडते तर याच लिंगिच्या पश्चिमेस हि पडीलिंगी अर्थात नेढ आढळून येते तर येथुन पश्चिमेला असलेल्या किल्ले जीवधनची वानरलिंगि आहे. या तिन्ही गोष्टी जवळपास एका रेषेत निर्माण कशा झाल्या असाव्यात? हा प्रश्न पडतो. असो.
साबळेमामा मार्ग दाखविण्यासाठी आले होते. झपझप आम्ही नेढ्याच्या दिशेने चालू लागलो. उजव्या बाजूला जीवधन तर डावीकडे लिंगिचा डोंगर होता. आता एका ओढ्यातून आम्ही पुर्वेकडे चढाई चढू लागलो. हिरव्यागार झाडीतून प्रवास सुरू झाला होता. साबळेमामांनी एका गुराख्यास मार्ग दाखवण्यास सांगुन माघारी परतले होते. गुराखी त्या गर्द वाढलेल्या जंगलातून मार्ग काढत पुढे चालले होते. जंगलातील ते वाढलेले मोठे मोठे वृक्ष जवळपास 150 ते 200 वय असल्याचे सांगत होते. वानर याच झाडांच्या फांद्यावर खेळ खेळताना दिसत होते. पक्षांना आमची चाहूल लागताच किलबिलाट सूरू केली होती. मध्येच पावश्या पक्षाचे मधूर स्वर कानी पडत होते. याच गर्द झाडीत वानरांची हुप हुप कानी येऊन जणू ते सांगत होते अरे मानवा झाडे लावा खुप खुपचा संदेश देत होते. एका मोठ्या उंच दगडापाशी की जो डोंगरावरून घरंगळत खाली आलेला होता तेथे गुराखी थांबला व गमतीने सांगून गेला की या बोचा नाळेने वर चढाई मार्ग आहे. मी आता माघारी फिरतोय. त्याला आम्ही धन्यवाद दिला खरा परंतु “बोचा नाळ” हा शब्द काही विचित्रच वाटला. हात टेकवत आम्ही नाळेने वर चढू लागलो. समोरच पडीलिंगी नेढ होत.90 डिग्री कातळात हे जवळपास 30 फुट लांब व 3 फुट रुंद नेढ खास आकर्षित करत होत. नाळेची कसरत करत वर चढून उजवीकडे वळून पुन्हा चालू लागलो.
थोडी विश्रांती व सोबत आणलेल्या बियांचे रोपणाचा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यास वरूणराजा पण धाऊन आला होता. आम्ही बिया लावत होतो तर वरूणराजा या बियांना पाणी घालत होता. पुन्हा आम्ही कार्यक्रम पुरा करत चालू लागलो.बहुतेक हा ट्रेक करणारे आम्ही प्रथमच असावेत. कारण गुराखी सांगत होते इकडे कुणीच जात नाही. तुम्ही कशाला जाताय? नेढ्याकडे दृष्टी टाकली तर येथे पोहचणे खुप अवघड वाटत होते. सोबत साहीत्य होतेच.
चढाईवर मात करून आम्ही या नेढ्यात शेवटी पोहचलो. येथे पोहचताच आनंद गगनात मावेनासा झाला होता. जवळपास 30 फुट लांब व 3 फुट रूंद असलेल्या नेढ्यात आम्ही पोहचलो होतो.
जुन्नर तालुक्यातील खिरेश्वरचे नेढ, आणेघाटचा मळगंगेचा नैसर्गिक पुल व हटकेश्वरचा नैसर्गिक पुल पार करण्याचे स्वप्न या आधिच पुर्ण झाले होते. त्यात या चौथ्या पडीलिंगी नेढ्यापर्यंत पोहचण्याचेही स्वप्न साकार झाले होते. येथे आनंद घेत आम्ही उतरणीला लागलो. पुन्हा प्रवास नाळेतून सुरू झाला. तीव्र उतार असल्याने बसून पुढे सरकत उतरणे बरे असे वाटत होते. आम्ही बसून उतरू लागलो. व आचानकच त्या गुराख्याचा शब्द आठवला “बोचा नाळ” अरे विवेक, किरण बोचा नाळेचा अर्थ उलगडला बघ. काय काय? अरे हो आपण खाली उतरताना कशावर घसरत पुढे सरकत आहे बघा व या नाळेचे नाव आठवा काय सांगितले सांगा. अचानकच त्या उतरणीत आमचे हास्य गुंजू लागले.
जंगलात प्रवेश केला होता. विविध वृक्षांबरोबर फोटो काढत आम्ही नांगरलेलेल्या शेतात आलो होतो. आता त्या नांगरलेलेल्या शेताच्या मध्यभागी मी पोहचलोच असेल तेवढ्यात एका सात आठ फुट लांब असलेल्या सापाने माझ्यावर झडप घातली. मी उडी मारत पाय फाकवले तेवढ्यात तो दोन्ही पायाच्या मधुन पाठीकडे गेला. मी तुरंत वळून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला कारण पाठीमागे किरण व विवेक होता. किरण खुप घाबरला. विवेक सर्पमित्र असल्याने त्यास काही वाटले नाही. तो साप पुन्हा दुसर्‍या सापापाशी गेला तो साप होता धामणसाप. दोन्ही साप तेथील होलात शिरले व तोच विषय काढत काढत आम्ही दुचाकी घेऊन जुन्नरच्या दिशेने वापशी प्रवास सुरू केला.
मित्रांनो या नेढ्याचा थरार पाहण्यासाठी आमचा YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G

लेख व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे
शिवनेरी भुषण
माजी सैनिक
८३९०००८३७०

टोलारखिंड मार्गे गर्द धुक्यातील हरिश्चंद्रगड दर्शन

टोलारखिंड मार्गे गर्द धुक्यातील हरिश्चंद्रगड दर्शन

मराठी चित्रपट “टिंग्या”मधील बालकलाकार म्हणून ज्याला 2011 साली राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तो “टिंग्या” अर्थात शरद गोयेकर मित्रांसह आमच्या सोबत हरिश्चंद्रगड ट्रेक ला येणार होता. धनगर समाजातील हे चिमुरड त्यावेळेस अवघ्या 11 वर्षे वयाच इयत्ता 5 वी मध्ये शिकत होत. कुठल्याही प्रकारच्या अभिनयाचा अनुभव नसताना निर्माता रविराय यांनी या छोट्या पात्राला जन्म दिला होता तर मंगेश हाडवळे यांनी शिवजन्मभुमीतील पुत्र या नात्याने एका हलाखीच्या परिस्थितीत जगणा-या धनगर समाजाच्या कुटूंबातील एक रत्न पारखून त्याच्या कुटुंबाला मोठा आधार दिला होता. असो
हरिश्चंद्रगडाला जाण्यासाठी गेली दिड वर्ष फोनवर टिंग्या व माझा संपर्कातून खेळ चालू होता. टिंग्या त्याचे आगामी येणारे मराठी चित्रपट “माझ्या प्रेमा” व “बब्या” चित्रपटाच्या शुटिंगसाठी व्यस्त होता. आज तो व्यस्ततेतून मोकळीक काढत राजुरीला आपल्या आई वडीलांना भेटायला आला होता. येतानाच सोबत कवी – धोंडीभाऊ टकले, संतोष गोयेकर या ढवळपुरीकरांना तर अभिनव कुमार या लखनौच्या युवकाला घेऊन आला होता. माझ्याबरोबर हरिश्चंद्राची गड सफर करायची ही टिंग्याची खुप दिवसांची इच्छा पुर्ण होणार होती.
पुर्वेकडुन आज सोनेरी रंगाची किरणे आसमंतात उधळन करत सुर्यदेवतेने डोके वर काढत परिसर प्रकाशमान केला होता. पक्षी किलबिलाट करत या कोवळ्या उन्हात आनंदाने विहार करताना दिसून येत होते. आमची हरिश्चंद्रावर जाण्याची लगबग सुरू झाली होती. मी खोडदला असल्याने जुन्नरला येऊन मग निघणार होतो. सोबतीला मित्र म्हणून आजुन पाच जण येणार होते. पैकी विनायक साळुंके भोसरीवरून येणार होता. टिंग्या व त्याचे मित्र आम्हाला मढ पारगाव फाट्यावर भेटणार होते. आवरा आवर करत व जुन्नरला पोहचायला वेळ झाला होता. विनायक दोन वाजता जुन्नरला पोहचला. मिलेट्रीमधील जवान अमोल भारमळ सुट्टीवर असल्याने तो पण येणार होता.
दोन वाजता तीन दुचाकीवर आम्ही विनायक,अमोल, स्वप्नील,मी,सोनू व गणेश सहाजण जुन्नरमधुन निघालो हरिश्चंद्राच्या सफरीसाठी. जुन्नर, पिंपळगाव सिध्दनाथ, गणेश खिंड मार्गे मढ पारगाव फाट्यावर पोहचलो. टिंग्या व त्याचे मित्र चारचाकी मधून येणार होते ते पोहचले नव्हते. त्यांना संपर्क केला तर समजले की त्यांच्या पैकी एका मित्राच्या घरी काही तरी मोठा अपघात घडला होता व बनकर फाट्यावरून चारचाकी घेऊन माघारी गेला होता. यांना येण्यासाठी वाहन नसल्याने ते जीप मधुन वाटखळपर्यंत येणार होते. तीन मित्रांना तेथेच सोडून आम्ही त्यांना वाटखळला आनायला गेलो.
प्रवास अडचणीचा होणार होता कारण दुचाकी तीन व आम्ही सर्व दहा. परंतु प्रवास जास्त नसल्याने एवढे विशेष वाटत नव्हते. मढ पारगाव फाट्यावरून आम्ही दहाजण निघालो. खुबी फाट्यावरून पिंपळगाव जोग धरणाच्या पश्चिम भिंतीवरून पाणी साचलेल्या वरखाली रस्त्यावरून हलाखीचा प्रवास सुरू झाला. ड्रायव्हर सोडून आम्ही येथील निसर्गाचा निखळ आनंद घेत पुढे चाललो होतो. पांढ-याशुभ्र आकाशात क्षणात एक काळी चादर कुणीतरी गुप्त रूपात ओढताना दिसत होत.धरणाच्या भिंतीवरचा वरखाली वरखाली करणारा प्रवास जहाजातून प्रवास करत असल्याचा भास निर्माण करत होता. पांढ-याशुभ्र ढगाला आता संपुर्ण काळ्या चादरीने झाकण घातले होते. कुठल्याही क्षणी मेघराजा आमच्या भेटी येण्याचे चिन्ह दिसत होते. हरिश्चंद्ररांगेस जणू एक आजगर गिळंकृत करत असल्याचे दिसून येत होते, आज प्रथमच हे सफेद रंग असलेले नविन प्रजातीचे आजगर धुक्याच्या रूपात पाहण्याची संधी मिळाली होती. जसजसे हे आजगर पुढे पुढे सरकत होते तस तसा हरिश्चंद्ररांग त्याच्या शरीरात प्रवेश करून अदृष्य होत होती. टोलारखिंडी पर्यंतचा संपूर्ण परिसर त्या अजगराने गिळून टाकला होता.
धाडधाड मोठाले थेंब आकाशातून अंगावर अचानकच कोसळू लागले. समोरच्या ऐश्वर्या हाॅटेल परिसरात बाईक पार्क करत आम्ही आडोशासाठी शिरलो. धावतच हाॅटेल मालक म्हणजे आमचा मित्र चिंतामण जवळ आला. या ना सर? बसा. बोलू लागला. अनेक पर्यटकांनी त्या छोट्या व छानशा हाॅटेलात गर्दीकेली होती. गरीब कुटुंबाची तुटपुंजी पर्यटकांच्या माध्यमातून भागावी म्हणुन चिंतामणने टाकलेले हे त्याच ऐश्वर्या नावाच विश्व होत. तोंडात साखर व डोक्यावर बर्फ असलेला हा चिंतामण पर्यटकांची काळजी घेणारा एक गरीब होतकरू छोटा हाॅटेल व्यवसायीक.
पाऊस उघडला होता. परंतु बुरबुर चालू होती. आम्ही चहा घेत सफरीला लागलो. सात डोंगररांगा तुडवण्यासाठी आमचा प्रवास सुरू झाला होता. सोबत आणलेल्या बियांचे रोपण करायचे होतेच.
जंगलातील प्रवास निसर्ग न्याहाळत चालू झाला. पायाखाली येणारे दगडधोंडे तुडवत गप्पा गोष्टी मारत वृक्षांची विविधता पाहत होतो. टिंग्याला झाडाला असलेले आंबे खायचे होते ते मिळतात का शोध चालू होता. करवंदाच्या पसरलेल्या जाळ्यांना करवंदे दिसत नव्हती. रान आवळेतरी खायला मिळेल अशी आशा सर्वांना होती परंतु आवळे आजुन हिरवीच दिसत होती. खिरेश्वर कडा पाॅईंटवर आम्ही पोहोचलो होतो. येथील आनंद घेत आम्ही पुढे झालो. पाऊस पुर्ण थांबला होता. टोलारखिंडीत पोहचायला जवळपास 1 तास गेला. खिंडीत असलेले व्याघ्र शिल्प पुरातन शिल्प कलेची आठवण काठून देत होत. ते शिल्प पुर्वी या परीसरात असलेल्या वाघांची जाण करून देत होते. पुन्हा एकदा जाम धुके दाटून आले होते. येथुन पुढे. रॅलिंगचा आधार घेत कातळ चढाई करावी लागणार होती. त्या काळात मार्गातुन आम्ही चालू लागलो.
धुक्यामुळे निसर्ग दर्शन दिसत नव्हते. आम्ही स्वर्गात प्रवेश केला की काय असा भास होत होता. पाऊलवाट सोडून चालने महागात पडणार होत. झप झप मार्गक्रमण चालू होते. दिवस मावळतीकडे चालला असावा कारण उजेड कमी होत चालला होता. पाऊलवाटेने आम्ही हरिश्चंद्रगड मंदिराकडेच चाललोय कि दुसरे कुठे काही समजत नव्हते. एका टेकडीवर आम्ही पोहचलो. छोट्या हाॅटेलात सरबत घेत प्रवास सुरू केला. आता बरेच लांबवर आम्ही चालून आलो होतो. पायवाट उताराच्या दिशेने जात असल्याचे लक्षात आले. नक्कीच आपण वाट चुकलो असल्याचे माझ्या लक्षात आले. आम्ही पुन्हा माघारी फिरलो.
आता मुख्य पाऊलवाटेवरून प्रवास सुरू झाला होता. मार्ग काढत काढत बरेच दुरवरपर्यंत पोहचलो. सर्वांना एकत्र करत बोललो. आपणास येथूनपुढे अडिच किलोमीटर जायचे आहे. क्षणात सर्वांनी चेहरे पाडल्याचे दिसून आले. थकलेल्या चेह-यावर हे ऐकल्यावर आनंद थोडाच दिसणार होता. परंतु तो मला पहायचा होता. धुक्यात काहीच दिसत नव्हते. त्यामुळे आपण प्रत्यक्ष जागेवर पोहचलोय हे कुणालाही कळले नव्हते. मी बोलू लागलो. आपणास जागेवर पोहचण्यासाठी व प्रवास थांबण्यासाठी जवळपास आता एक दोन मिनिटे लागणार आहेत. त्यामुळे मन घट्ट करा व चालत रहा. क्षणात सर्वांचे चेहरे पडले तर क्षणात सर्वजण चकीत होऊन माझ्या तोंडाकडे पाहत राहीली व एकच जल्लोष केला व बोलले म्हणजे आपण पोहचलोय? मी हो म्हटले.
धुक्यात गडप झालेले मंदिर चुकत चुकतच शोधले. महादेवाचे दर्शन घेत गणेश लेणी कडे विसाव्यासाठी मोर्चा वळवला. पाऊस जोरात पडू लागला होता. अंगात थंडी शिरली होती. चालून चालून गरम झालेले शरीर थंड पडू लागले होते. अंगात कापरे भरले होते. आम्ही दहाजण कोणत्या लेणींमध्ये जागा मिळेल ते सर्वत्र शोधत होतो. परंतु जागा कुठेच शिल्लक नव्हती. गड पहायला आलेल्या गडकरींना गर्द धुक्यामुळे परतीच्या वाटा बंद झाल्या होत्या. कोणत्या वाटेने कुठे जायचे काहीच समजत नव्हते. आमचा परतीचा मार्ग धो-धो कोसळणा-या पावसामुळे व धुक्यामुळे बंद झाला होता. रात्रीच्या परतीच्या प्रवासाचे आमचे स्वप्न भंगले होते.
एका लेणीत 15 मुली व 20 मुले होती. यामधे जागा बाकी होती. त्यांना विनवणी करूनही जागा मिळणे कठीण झाले होते. त्यांचीपण तशी चुक नव्हती, कारण मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी गट प्रमुखाकडे होती. मनात विचार आला होता. जेथे संरक्षणाची भिती वाटते तेथे मुलींना आनायच तरी कशाला? परंतु व्यक्ती स्वातंत्र आहे? त्यांनाही निसर्ग आनंद घेण्याची मोकळीक आहे त्यामुळे तोंडातील शब्द तोंडातच दाबले. याच लेणीच्या वरांड्यात रात्र साजरी करायची होती. सकाळ होताच परतीला निघायच होत. मस्त गप्पा माराव्यात म्हटले तर बसायला जागा नव्हती. लेणीच्या आतमधल्या रूम मध्ये दोघांसाठी जागा होती. त्यामध्ये मी आणि विनू झोपलो. टिंग्या व सोबती व अमोल त्याचे सोबती वरांड्यात झोपले. रात्र जवळपास जागुनच काढली. सकाळी लवकर उठून धुक्यातच परतीला लागलो. मंदिर, तारामती शिखर, कोकणकडा व बालेकिल्ला पहावयाचे स्वप्न स्वप्नच राहून गेल होतो. जडपावले टाकत आम्ही पुन्हा पावसातच व धुक्यात हरवलेल्या वाटा शोधत परतीला लागलो. प्रथम ओढा ओलांडताना तेथेच हातपाय तोंड धुत फ्रेश होऊन चालू लागलो. दुरवरून आवाज कानी येत होता. वाचवा वाचवा. Help help. आमचे लक्ष तो आवाजाची दिशा वेधू लागले. कानोसा घेत घेत आम्ही त्या दिशेने चालू लागलो. आता दोन महिलांचा आवाज कानी स्पष्ट ऐकू येत होता. आम्ही त्यांना धिर देण्यासाठी ओरडून सांगत होतो. काळजी करू नका आम्ही पोहचतोय.
त्या महिला खुप घाबरलेल्या होत्या. रात्री साधारण दोनच्या सुमारास लेणीतुन बाहेर पडल्यानंतर रस्ता भरकटलेल्या होत्या. ओरडून ओरडून त्यांची आवस्था खुप वाईट झाली होती. खाली टिंग्या आणि मित्र तयार होऊन पाऊलवाटेवर आम्हाला दिशा दाखवण्यासाठी उभे होते. त्या महिलांना रस्ता दाखवत आम्ही त्या हरवलेल्या वाटेला धुक्यामध्ये शोधत शोधत वापस टोलारखिंडीत कधी पोहचलो समजलेच नाही. येथून पुढे धुके संपले होते. खुप पाऊस येऊ लागला होता. आम्ही झपाझप उतरणीला लागलो होतो पुन्हा घरट्याकडे परतन्यासाठी.
मित्रांनो या हरिश्चंद्रगड थरार पाहण्यासाठी आमचा YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G

लेख व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे
शिवनेरी भुषण
माजी सैनिक

निसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.

निसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.

हिंगणे दप्तर खंड तिसरा या भारत संशोधक मंडळाने जी बखर लिहीली त्या पुस्तकात ज्या गावच्या ऐतिहासिक मंदिराच्या खर्चाचा उल्लेख मिळतो ते मंदीर म्हणजे जुन्नर तालुक्यातील उब्रज गावचे महालक्ष्मी मंदिर. या गावचा ऐतिहासिक वारसा सुरू होतो ते येथील पुष्पावती व कुकडी नदीच्या संगमाने. येथील धरणात लुप्त झाले ते संगमेश्वराचे मंदिर. येथील ऐतिहासिक वारसा पाहता नवीन गावातील शनि व हनुमान मंदिराच्या समोर असलेली विरघळ लक्ष वेधते. गावकरी या वीरघळीचा उपयोग पाऊस पाडण्यासाठी करतात ऐकून नवल वाटले. ते कसे विचारले असता सांगतात, पुर्वी पासून जर दुष्काळी परिस्थिती उद्भवली की या मुर्तीला पालथे घातले की त्यावर एक वजन ठेवतात. पाऊस पडला की त्या ठेवलेल्या वजनाचा इतकी शेरणी वाटतात म्हणे. विशेष म्हणजे उब्रज गाव एकच होते परंतु येडगाव धरण बांधण्यात आले व येथील गावाचे विभाजन झाले व दोन ठिकाणी विस्तारीत झाले. म्हणून येथे उंब्रज 1 व 2 अशी गावे पहावयास मिळतात. परंतु आजही गावच्या खुना व येथील मंदिरे जशास तशी आहेत. येथील विर नावाचे दगडी शिल्प परीसरात लक्ष वेधून घेते. महालक्ष्मी मंदिर पेशवेकालीन असून खुप काही येथे अभ्यास करण्यासाठी गोष्टी पहावयास मिळतात.
याच गावातून पुर्व पट्यातील आणे व इतर 10 गावांना येथुनच पाईपलाईन द्वारा पाणी पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यातील इतर चार धरणांचे पाणी या येडगाव धरणात आणले जाते. येथील परीसर पाहता आपण बाहेर देशात आहोत की काय असा भास होतो. या परीसरात विषयी जास्त काही लिहीता फक्त छायाचित्रेच येथील सुंदरता सांगून जातात. येथील मळगंगा मंदिराच्या आवारातील वडाचे झाड जवळपास 400 वर्ष जुने असुन आजही ते सुरक्षित आहे. जो एकदा या परिसरास भेट देईल तो निश्चितच वारंवार या परीसराच्या दर्शनास गेल्या शिवाय राहणार नाही. विविध पक्षी या परीसरात विहार करत असल्याने एक विशिष्ट संगिताची धुन पक्षांच्या वानितुन ऐकावयास मिळते.
येथील गद्य गळेचा इतिहास स्थानिकांकडून ऐकून नवलच वाटले. सांगतात जर पाठीची शिर भरली असेल तर या दगडावर झोपल्यावर व्यवस्थित होते व आराम मिळतो. याच गावाला लागुन येडगाव धरणभिंत लाभली असल्याने येथील परीसर नेहमीच हिरवाईचा शालू पांघरलेला दिसतो. संपूर्ण परीसरास उसाचे अच्छादन पहावयास मिळते.
या जुन्या उंब्रज गावचा एक पर्यटन म्हणून जर विकास केला गेला तर निश्चितच येथील तरूण व तरूणींना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील फक्त गरज आहे ती एक चांगल्या प्रकारच्या पर्यटन विकासीत आराखड्याची व गावकर्यांच्या सहभागाची. की ज्यांच्या माध्यमातून साकार होईल एक विकसीत पर्यटन स्थळ. या विकासासाठी मराठाबाणा फेम अशोकजी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती भक्तभवन बांधून सुरूवात झाली आहेच.
या परिसराचा अभ्यास करण्याची संधी डाॅ.राहूल हांडे व महालक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून प्राप्त झाली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. सर्व छायाचित्रे उंब्रज ग्रामस्थांना समर्पित करतो कारण तो आपला अनमोल ठेवा आहे.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)

लेखक/ छायाचित्र :-
श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .+

 

 

एक सेल्फी असाही

एक सेल्फी असाही.
जेवण करण्यासाठी हाॅटेलमध्ये बसलो होतो. एक गृहस्थ माझ्याकडे सारखी नजर लावून पहात होते. मी व माझ्या सौ स्वाती आम्ही गप्पा मारण्यात दंग होतो. माझे तोंड त्या व्यक्तीच्या दिशेला होते जो खुपवेळ माझ्याकडे एकटक पाहत होता. माझे अधुन मधुन त्यांच्याडे लक्ष जात होते. बहुतेक माझ्याकडे त्यांचे काही काम असावे असा मला भास होत होता. मी त्याकडे नजरा नजर होऊनही दर्लक्ष करत होतो. जेवणाची आॅर्डर करत सौ आणि मी गप्पा मारू लागलो. अचानकच ती व्यक्ती जवळ आली. आपणच खरमाळे सर का? असा मला प्रश्न केला. मी हो म्हटले व त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून थोडा चक्रावलोच. कारण मी या गृहस्थाला ओळखत नव्हतो मग एवढे आनंदी होण्याच कारण काय? काहीच समजले नाही. मी पुढला विचारच करत होतो की, तेवढ्यात तेच गृहस्थ बोलले सर एक सेल्फी हवाय तुमच्या सोबत. मी म्हटले घ्या की त्यात काय? दोघे हाॅटेल बाहेर दरवाजात उभे राहीलो. जवळच्या वेटरनी आमचा फोटो टिपला वपरत आतमध्ये आलो. या महाशयांनी 500/- रू नोट काढली व मला देऊ केली.मला रहावल नाही. आहो सेल्फी फोटोचे पाचशे रूपये का? नको नको नकोत पैसे? ते बोलले मग तुम्ही जेवन करा तुमचा हाॅटेलचा बिल मी भरतो. आहो नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही का बिल भरणार? तुम्हीच बसा सोबत जेवायला मीच बिल भरतो.
ते सांगू लागले मी गणेशजी काशिद चिंचोली गावचा गृहस्थ. आपल्या “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” या पेजवर मी भरभरून प्रेम करतो. आपले कार्य व ध्यास मी नेहमीच पाहतो. आपल्यासाठी आज मला फक्त एकदा खर्च करू द्या प्लीज. मी पुन्हा नकार दिला. ते सांगत होते नोकरी निमित्ताने मी मुंबईकर झालो. त्यामुळे गावी पुन्हा परतने शक्यच झाले नाही. शिवजन्मभुमीवर त्यांच प्रचंड प्रेम त्यांच्या बोलण्यातून जानवल. ते अहमदनगरला काही कामानिमीत्ताने निघाले होते. मला अचानक पाहीले व थांबले होते.
शेवटी ती 500/- रू नोट त्यांनी केलेल्या आट्टाहासाने मला त्यांनी थोपवलीच. व बोलले आपल्या हातुन एका गरीबावर किंवा गरजुवर खर्च करा. मी त्यांच्या भावनांची इज्जत करत नाविलाजास्तव ती नोट खिशात घातली. त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर 500/- रू गेल्याचे दुःख दिसले नाही तर लाख रूपये मिळाल्याचे समाधान झळकत होते.
माझा मोबाईल नंबर त्यांनी घेतला. मी त्यांना बोललो आपला नंबर मला नक्की पाठवा व नाव पण टाका व मेसेज करा. ते नंबर घेत पाठीमागे वळाले व झपझप एस.टी स्टॅन्डच्या दिशेने चालू लागले मात्र मी आ वासून त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बसलेल्या टेबलवरून पाहतच राहीलो. माझ्या सौ तर माझ्याकडे आश्चर्याने अवाक होऊन पहातच राहील्या.
नक्कीच गणेश भाऊ आपले 500/- रू अशा गरजुंवर खर्च होतील की ज्याची आपेक्षा आपण केली नसेल. मात्र नक्कीच सांगतो की ती 500/- ची नोट जेवढ्या दिवस माझ्याकडे असेल ती जेव्हा ती गरजुकडे जाईल तीच्या व्याजासकट जाईल. आपण जे प्रेम दाखवलत त्याबद्दल आपणास माझा लाख लाख मुजरा. आपण पाठवलेला सेल्फी माझ्यासाठी नक्कीच लाखमोलाचा आहे.
जे भावले ते लिहीले. आवडले तर नक्कीच शेअर करा.
जय भवानी
जय शिवाजी.
(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G व
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)

लेखक : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

खिरेश्वरच्या जुन्नर दरवाजा मार्गे हरिश्चंद्रगड दर्शनासाठी जाताना काय पहाल.

भटक्यांची किल्ले चावंडमध्ये ग्रंथदिंडी

भटक्यांची किल्ले चावंडमध्ये ग्रंथदिंडी.
सह्यसखे आयोजित “सुजाण नागरिक ते सजग ट्रेकर” तसेच बोंबल्या फकिर अर्थात रवी पवार आयोजित ग्रंथदिंडी हा उपक्रम किल्ले चावंड येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या संस्थांनी सहभाग घेतला होता. पैकी इस्रो मध्ये वैज्ञानिक म्हणून काम केलेले व जवळपास 24 विविध पदव्युत्तर असलेले व पुर्व राष्ट्रपती डाॅ. ए. पी. अब्दुल कलाम व अनेक देशांमध्ये पुरस्कृत करण्यात आलेले श्री. दामोदर मुगदुम सर, श्री. रवी पवार ( बोंबल्या फकीर) प्रसिद्ध ट्रेकर श्री. विवेक पाटील सर, श्री. अरूण पाटील सर यावेळी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून चावंड गावतील 51 शालेय विद्यार्थांना विविध पुस्तके व वह्यांचे वाटप करण्यात आले. फायर ब्रिगेड डेमो, स्वसंरक्षण बचाव, रॅपलिंग क्लायमिंग बाबत डेमो, पर्यावरण जनजागृती, किल्ले व इतिहास संवर्धन अशा अनेक विषयांची सांगड मान्यवरांनी घालून सर्वजण किल्ले चावंडचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी किल्यावर गेले.
मी या ग्रंथदिंडी व सर्व ट्रेकरग्रुपचे आभार व्यक्त करतो की आपण मला या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली व जुन्नरचा ऐतिहासिक व नैसर्गिक महत्त्व प्रकट करण्यासाठी मदतीचा हात दिलात. आपण मला दिलेले “महात्मा गांधी चरित्र ” निश्चितच माझ्यात सामाजिक कार्य करण्यास महत्वपूर्ण ठरेल.
श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

अमृतेश्वर रतनवाडी

अमृतेश्वर रतनवाडी 
नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेने हा भाग समृद्ध आहे. याच ठिकाणीच्या भटकंतीसाठी आज जुन्नरहुन ब्राम्हणवाडा, कोतुळ, राजुर मार्गे सांदण दरीकडे सकाळी 11:30 निघालो होतो. सर्व भुभाग सौंदर्य टिपताना भांडारदरा धरण किणा-याने सांब्रद कडे चाललो होतो. अचानकच सोबत करणारे विनोद तारू सर बोलले सर थांबा ही रतनवाडी आहे व येथेल अमृतेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जाऊया. मी नको म्हणत होतो. कारण तीन वाजले होते व पुढे सांदण दरी पहायला रात्र होणार होती. परंतु येथून सांदण दरी पुढे आठ कि.मी अंतरावर होती. मी संतोष बिरादार व अक्षय साळुंके या परिसरात प्रथमच पाऊल ठेवले होते. रतनवाडी लागताच रस्त्याच्या उजव्या बाजूला मला पुष्करणी निदर्शनास पडली व नकळतच शब्द पुटपुटलो थांबा.
भटक्यांना सदैव आकर्षण ठरणारा भाग म्हणजे सह्याद्री व याच रांगेत वसलेले भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेने हा भाग समृद्ध आहे. या मांदियाळीतच रतनवाडीचे अमृतेश्वराचे कोरीव मंदिर भटक्यांची प्रथमदर्शी पावले पडताच आकर्षित करते.
अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर, रंधा धबधबा ही स्थळे आता पर्यटकांच्या चांगल्याच परिचयाची बनली आहेत. पण या भागाचे खरे सौंदर्य हे या धरणाच्या पल्याडच्या भागात दडले आहे. घाटमाथ्यालगतच्या या भागात उंच डोंगररांगांनी एक वेटोळेच घातले आहे . आकाशाला भिडलेल्या उंच पर्वत-सुळके फना काढताना दिसता. कोकणात कोसळणारे खोल कडे, अनेक घाटवाटा, रतन, अलंग, कुलंग आणि मदन सारखे गडकोट, सर्वोच्च स्थानी विसावलेली ती कळसुबाई, या साऱ्यांवर पसरलेली दाट वनसंपदा, जीवसृष्टी, छोटी-छोटी आदिवासी खेडी, त्यांची संस्कृती आणि या साऱ्यांवर लक्ष ठेवून मधोमध विसावलेला तो रतनवाडीचा अमृतेश्वर!

रतनवाडी पुण्याहून २००, मुंबईहून १८० तर जुन्नरहुन 101 किलोमीटरवर आहे. या दोन्ही ठिकाणांहून भंडारदऱ्यापर्यंत थेट एसटी बससेवा आहेत पण तुरळक प्रमाणात. या भंडारदऱ्याच्या जलाशय पाहिले की शरीरावर आलेल्या थकावटीचे सावट क्षणात दुर होते. जलाशयाभोवतीचा डोंगरदऱ्यांचा आपण खेळ समोर पाहत उभा राहतो व ते सर्व विसरुनच . खरेतर हाच भाग हिंडण्या-फिरण्याचा, निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा, इथला इतिहास जागवणारा. या देखाव्यात शिरायचे असेल, तर धरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने गेलेल्या वाटांवर स्वार व्हावे. या दोन्ही वाटा बरोबर मध्यावर असलेल्या घाटावरच्या घाटघरला जाऊन मिळतात. यातल्या डाव्या हाताच्या वाटेवर आहे रतनवाडी आणि या वाडीत दडले आहे एक देखणे कातळशिल्प अमृतेश्वर! भंडारदरा ते रतनवाडी हे अंतर आहे वीस किलोमीटर. वाडीपर्यंत एसटी बसही धावते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा हा भाग आहे. वाडीकडे निघालो, की सुरुवातीला पाबरगड, घनचक्कर हे ओळखीचे डोंगर हाक देतात. त्यांच्या नंतर मग रतनगड उगवतो त्याच्या त्या खुट्टा नावाच्या सुळक्याला घेत. या खालीच गडाची रतनवाडी. तसे वाडीत येण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. भंडारदऱ्याहून धरणाच्या आतील भागात ये-जा करण्यासाठी लाँच-बोटी धावतात. यातील एकात बसायचे आणि आपल्या भाषेत रतनवाडीचा स्टॉप सांगायचा. कुठल्याही मार्गे आलो, तरी या भागाला पाय लागण्यापूर्वी त्या निळय़ा जलाशयाच्या पार्श्वभुमीच्या काठावरचा अमृतेश्वर, मागची छोटीशी रतनवाडी, त्यामागचा रतनगड, त्याच्या शेजारचा खुट्टा हे सारे निसर्गचित्र पाहणाऱ्याला गुंतवून टाकते. यातून त्या अमृतेश्वराबद्दलची उत्कंठा वाढते आणि मग या धुंदीतच त्या कोरीव वास्तू प्राकाराला आपण सामोरे जातो.
जलाशयाच्या काठावर एखाद्या गायीने पाय दुमडून बसावे तसे हे मंदिर दूरवरून दिसते. जवळ जाऊ तसे त्याचे कोरीव देखणेपण, सुडोल रचना मन खेचू लागते. नंदीमंडप, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. मंदिर वास्तुशैलीतील हे नवलविशेष याच भागातील सिद्धेश्वर (अकोले), हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड) येथेही पाहण्यास मिळते. या आगळय़ा शैलीमुळे नंदीमंडपातून गाभारा आणि त्यानंतर सभामंडप असा आपला प्रवास होतो. आत शिरताच इथले कोरीवपण आपला ताबा घेते. नक्षीदार खांब, कोरीव प्रवेशद्वारे, बाह्य़ भिंतीवरील विविध भौमितीक रचना, आतील भिंतीवरील मूर्तिकाम, छतावरील शिल्पपट हे सारे एकेक करत मंत्रमुग्ध करू लागते. या साऱ्यांवर पुन्हा ते यक्ष, अप्सरा, गंधर्व स्वार झालेले असतात. देव, दानव आणि नरांनीही इथे आपआपली जागा पटकावलेली असते. मैथुन शिल्पेही इथे आहेत. यातील तो समुद्रमंथनाचा देखावा तर अवश्य पाहावा असाच. आतील स्तंभ भरजरी आहेत. गर्भगृहाच्या दारी कीर्तिमुख, शंख, कमळवेलींच्या पायघडय़ा घातल्या आहेत. मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळय़ांची रचना केलेली आहे. सारेच विलक्षण! एखादा लेण्यात फिरल्यासारखे!!
या मंदिराचे शिखरही तेवढेच कोरीव, श्रीमंत! जाळीदार नक्षीचे उभे थर, त्यावर पुन्हा शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृतींची रचना, समोरच्या बाजूस शूकनास..प्राचीन स्थापत्यातील ‘नागर शैली’ अमृतेश्वराच्या देहबोलीवर जागोजोगी विसावलेली. या साऱ्या सौंदर्याचे रसपान करता करता आपल्याच मनाचा गोंधळ उडतो. मग अशा या गोंधळलेल्या अवस्थेतच अमृतेश्वराचे दर्शन घ्यायचे. खरेतर अमृतेश्वराची ही शिवपिंडीही कोरीव अशा पाच थरांपासून बनवलेली होती. पण कुणाच्या तरी डोक्यात खुळ आले आणि त्यांनी देव जुना झाला म्हणून हे दगड बाजूला करत त्या जागी नव्या शिवलिंगाची स्थापला केली. अमृतेश्वराचे दर्शन घेत पुन्हा बाहेर येत त्याच्यावर प्रेमाने नजर फिरवावी. या राईत एखादे रानफुल उमलावे तसे हे मंदिर भासते. त्या जलाशयाच्या काठावर आणि या कोरीव शिल्पासवे खूप सुखद, शांत आणि समृद्ध वाटू लागते. वैशाखाचे तप्त ऊन खात आलेल्या पावलांचा सारा क्षीण नाहीसा होतो. अमृतेश्वराचे दर्शन झाले तरी खरे ‘अमृत’ मात्र अजून आपल्या प्रतीक्षेत असते. मंदिरातून वाडीच्या दिशेने निघावे. शेतीवाडीतून जाणाऱ्या या वाटेवर थोडे अंतर गेलो, की जमिनीलगत साकारलेली एक जलवास्तू तिच्या सौंदर्यात बुडवून टाकते. पुष्करणी! नावाप्रमाणेच सुंदर! आपल्याकडे आड, विहीर, तलाव, तळी, टाकी अशी पाण्याशी नाते सांगणाऱ्या अनेक वास्तू आहेत. या साऱ्यांतील देखणी, कोरीव श्रीमंती लाभलेली वास्तू म्हणजे पुष्करणी! देवांचा सहवास लाभलेली ही जलवास्तूची निर्मितीही त्या देवांसाठी. प्राचीन मंदिराच्या भवतालात ही अशी पुष्करणी हमखास दिसणार. या पुष्करणीची निर्मितीही या अमृतेश्वराच्या रहाळात झालेली. सौंदर्य आणि पावित्र्य यांचा एकत्रित मिलाफ असलेला मंदिरानंतरचा हा दुसरा वास्तुप्रकार. त्याच्या ‘पुष्करणी’ या शब्दाएवढाच दुर्मिळ!

अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद. जमिनीलगत कोरीव, आखीव-रेखीव अशी तिची रचना. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या. आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले. भोवतीच्या भिंतीत सालंकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली. त्यांच्या डोईवर पुन्हा छोटय़ा-छोटय़ा कोरीव शिखरांची रचना. या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार विसावलेले. ही सर्वच शिल्पे पुन्हा सालंकृत. ही जलवास्तू जेवढी देखणी, तितक्याच नितळ पाण्याचीही तिला साथ मिळालेली. यामुळे की काय अमृतेश्वराच्या त्या भव्य शैल मंदिराने जसे सारे अवकाश व्यापल्यासारखे वाटते तेच सारे निळे रंग इथे या पाण्यावर विश्रांतीला आल्यासारखे वाटतात. कुठल्याही स्थापत्याला असे निसर्गाचे कोंदण मिळाले, की ते अजून खुलते. प्रसन्न होते. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. या कथांमधून बाहेर येत खरा इतिहास शोधू लागलो, की आपल्याला दहाव्या शतकातील झंज नावाच्या राजाजवळ येऊन थांबावे लागते. या झंज राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थळी एकेका सुंदर शिवालयाची निर्मिती केली. यातील प्रवरा नदीच्या उमगस्थळीचे हे अमृतेश्वर!

पूर्वजांच्या या कलासक्तीचे कधी-कधी खूप कौतुक वाटते. ..आज हजार एक वर्षे उलटून गेली. काळही बराच पुढे सरकला. इथले हे निर्माणही आता एक इतिहास झाला. इथल्याच निसर्गाचा एक भाग बनला. अगदी त्या डोंगर-झाडी, निर्झर पाण्याप्रमाणे..!
हे सर्व न्याहाळत आम्ही सांदण दरीकडे मार्गस्थ झालो.
(अभिजीत बेल्हेकर यांच्या लेखाचा आधार घेऊन हा लेख लिहिला आहे )
लेखक / छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश 
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका . 

 

 

 

 


 


 


थरार सांदन दरीचा

थरार सांदन दरीचा.

कालचा माझा प्रवास एका अशा ठिकाणी होता की तो सह्याद्री मला नविन रूप दर्शन देणार होता. सोबतीला संतोष बिरादार, विनोद तारू (अकोले) व अक्षय साळुंके होते. एकिकडे भांडारदरा धरणाचे अलौकिक दृष्य दिसत होत तर दुसरीकडे सह्याद्रीचे ब्रम्ह रूप होत. हा सह्याद्री म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच म्हणावे लागेल. या सह्याद्रीत विविध ठिकाणे असून त्याचे रंग बदलणार्‍या सरड्याप्रमाणे विविध प्रकारची रूपे पहावयास मिळतात. सुरुवातीला ही ठिकाणे फक्त भटक्या लोकांनाच माहिती असत. परंतु नंतरच्या काळात अनेक भटक्यांचा ओघ वाढला मग खरेतर गावकऱ्यांनी सुध्दा त्या जागेचे महत्त्व ओळखले आणि मग इतके दिवस अज्ञात असलेली विविध ठिकाणे सर्वसामान्य लोकांना माहित होण्यास सुरुवात झाली. यातुनच पर्यटनाला खरी चालना मिळाली व त्या ठिकाणी पर्यटकांचे लोंढे वाढू लागले. याच ठिकाणां पैकी असेच एक ठिकाण म्हणजे सांदन दरी. की जिचे महत्व व ख्याती आशियातील सर्वात मोठी लांब घळ म्हणुन करण्यात येतो.
अकोले तालुक्यातील व नगर जिल्ह्याचा अतिशय दुर्गम भाग म्हणजे साम्रद गाव , या साम्रद गावाजवळ असलेली आणि रतनगड, कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन या किल्ल्यांचा शेजार व नैसर्गिक सौंदर्य लाभलेली सांदन दरी अनेक वर्ष उपेक्षित होती. पण भटक्यांच्या माध्यमातून ज्यावेळी ही दरी लोकांना माहिती पडली आणि ज्यांनी ह्या दरीची थरारकता अनुभवली ते लोक वारंवार येथे भेट देऊ लागले आणि अशा तऱ्हेने अज्ञात असलेली दरी लोकांना ज्ञात झाली. व ती प्रकाश झोतात आली.
साम्रद गांवातून दिसणारा रतनगड (उजवीकडे) आणि खुट्टा सुळका (डावीकडे)यांचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडतात. साम्रद या आदिवासी पाड्यापासून साधारणपणे 10- 15 मिनिटांमध्ये रुळलेल्या पायवाटेने आपण घळीच्या तोंडापाशी येतो.अगदी एका ओढ्यात आपण उतरावे एवढा सोपा मार्ग या दरीच्या तोंडाशी दिसून येतो. सांदण दरी जमीन पातळीच्या खाली असल्यामुळे दरीत शिरण्यासाठी थोडेसे खाली उतरायला लागते. सांदण दरी हा निसर्गाचा चमत्कार आहे. लाखो वर्षांच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ही दरी निर्माण झाली असावी. त्यामुळे सांदण दरी म्हणजे जमिनीला पडलेली भेग वाटते.
दरीच्या सुरुवातीला दोन ओढे एकत्र मिळतात व याच ओढ्यावर जिवंत पाण्याचा झरा आहे. झरा दगडांनी बंदिस्त झालेला असल्यामुळे झऱ्याला वर्षभर पाणी असते. पुढे हे पाणी या उतरत्या ठिकाणी वाहत जाते.झऱ्याचे पाणी दगडांमधून वाहत असल्यामुळे थंडगार असते. ह्या झऱ्याच्या पुढे असलेला सोप्पा कातळटप्पा उतरून गेल्यानंतर आपण नाळेच्या घळीत प्रवेश करतो. ह्या ठिकाणावरून दरीचे अक्राळविक्राळ रुप समोर येते. नाळ काही ठिकाणी १५-२० फूट आहे, तर काही ठिकाणी अगदीच २-३ फूट आहे. दरी जमिनीच्या खाली असल्यामुळे दोन्ही बाजूला कातळाची उंचच उंच भिंत आहे.
पहिला कातळटप्पा पार केल्यानंतर १४-१५ फूट लांब आणि ३ ते ४ फूट खोल पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे. कुंडात असलेले दगड पाण्यात असल्यामुळे त्यांच्यावर शेवाळ जमले आहे त्यामुळे सांभाळून पाय ठेवत हे कुंड पार करावे लागते. हे कुंड ओलांडल्यानंतर तीव्र उतार सुरु होऊन नाळ अरुंद होण्यास सुरुवात होते. दरीमध्ये लहानमोठे दगड, मोठमोठ्या दरडी यांचा खच पडलेला असल्यामुळे सपाट भाग कुठेच आढळुन येत नाही. ह्या दगडांमधूनच वाटचाल करीत आपण पाण्याच्या दुसऱ्या नैसर्गिक कुंडाजवळ पोचतो. ह्या कुंड साधारणपणे 4 – 5 फूट खोल आणि 15 – 20 फूट लांब आहे. ह्या कुंडापर्यंत सूर्यप्रकाश पोचत नसल्यामुळे कुंडात वर्षभर थंडगार पाणी असते. हे कुंड पार करताना उडणारी तारांबळ आणि थरार ज्यांनी अनुभवला आहे ते सर्वजण ह्या दरीच्या प्रेमात नक्कीच पडले असतील. जवळपास छातीला लागेल एवढे पाणी येथे पार करून पुढे जावे लागते.
नाळ 1.5 किमी लांब आहे. पण वाटेवर पडलेल्या दगडांचा खचामुळे दरीच्या टोकापर्यंत जाण्यासाठी 50-55 मिनिटे लागतात. हे अंतर पार करीत असताना मोठमोठ्या दरडी, दोन्ही बाजुला असलेल्या कातळभिंती आणि मधूनच दिसणारे नभ या पलिकडे दुसरे काहीही नजरेस पडत नाही. नळीच्या टोकाला पोचल्यानंतर सह्याद्रीचे घडणारे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष येथे अप्सराच अवतरली की काय? असा भास होतो. शेकडो फूट खोल सरळ तुटलेले कडे पाहिल्यानंतर थरार म्हणजे काय ह्याची अनुभूती येते. इथूनच खाली जाणारी वाट पुढे करोली घाटातून डेहणे गांवात जाते.
परतीच्या मार्गाला पुन्हा साम्रद गांवात पोचण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे पुन्हा माघारी फिरत दगडांच्या खाचखळग्यातून मार्गक्रमण, दोन्ही थंड पाण्याची कुंड पार करत आणि सुरुवातीला लागलेला कातळटप्पा चढून याव लागते.
प्रस्तरारोहणाची साधनसामुग्री असेल तरच करोली घाट उतरून डेहणे गांवात जाणे शक्य होत, अन्यथा करोली घाट उतरण्याच्या प्रयत्न करून जीव धोक्यात घालू नये. सांदण दरीच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश पोहचत नसल्यामुळे दरीत कायम थंडावा असतो.
सांदण दरीकडे पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्या, दारूच्या बाटल्या, प्रातविर्धी इ. अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागत असेल असे चित्र येथे परीसर फिरून पाहील्यावर कळते . त्यामुळे ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊन ते कसे कमी होईल याकडे पर्यटकांबरोबर, ग्रामस्थ व वनाधिकारी यांनी सुध्दा लक्ष देणे गरजेचे आहे.

सूचना:

१. सुरक्षित भटकंती करा व सोबतीला कुणाला तरी घ्या.
२. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नये.
३. ट्रेकिंगला जाताना कमीतकमी ३-४ जणांच्या ग्रुपने जा. व सोबत अत्यावश्यक साधन सामुग्री ठेवा.
४. ट्रेकिंगला कुठे जात आहात ते घरातील सदस्यांना सांगूनच जा.
५. पायवाटा माहिती नसल्यास स्थानिक वाटाड्या बरोबर ठेवा.
६. मळलेल्या पाऊलवाटांचा वापर करा, अनोळखी वाटेने जाण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका.
लेखक / छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश 
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

श्रावण सुरू होताच तीन जणांना मिळाले जीवदान.

श्रावण सुरू होताच तीन जणांना मिळाले जीवदान.
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पुणे नाशिक हायवेवर कुकडी नदिवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या पात्रातील मध्यभागी असलेल्या प्लेरच्या कट्यावर श्री. भिवा हरिभाऊ दुधवडे (वय-50) पुजा (मुलगी) वय-10 पुष्पा (पत्नी) वय- 40 रा.अकोले ता- संगमनेर, जिल्हा – अहमदनगर, हे कुटुंब पावसात छताचा आधार मिळावा म्हणून रात्र कुठेतरी आश्रय काढण्यासाठी झोपले होते. स्वतःच घर नाही. मजुरी करून पोट भरणे व मिळालेल्या जन्माची मृत्यू पर्यंत वाट पहावी असा मनात विचार करत झोपले होते. एक एक दिवस याच पद्धतीने जगत आहे. मुलगी दहा वर्षांची परंतू शिक्षणासून दुर ती परीस्थितीमुळे , पत्नी पण अडाणीच व यांचे पण शिक्षण नाही. काय करणार मोल मजुरी सोडून हे, आणि याच मुळे नदिला आपण झोपलोय या ठिकाणी पाणी येऊन जीव धोक्यात येईल ही विचारक्षमताच त्यांनी केली नाही.
जुन्नर तालुक्यात पश्चिम पट्यात सतत पडणा-या पावसामुळे कुकडी नदीच्या पात्रातील पाणी रात्री अचानकच वाढले. यांना तेथून बाहेर पडणे शक्य झाले नाही. खुप आरडाओरडा त्यांनी केली परंतु काहीच उत्तर कुणी देईना. नदिच्या पाण्याचा खळखळाट व निर्मनुष्य जागा कोण जाणार तेथे व कसा अवाज ऐकू येईल कुणाला. सुरज गजानन चौगुले हा रात्री लघुशंका करण्यासाठी पुलाच्या कोपर्‍यावर थांबला. नदिपात्रात त्याला बॅटरी चमकताना दिसली. एवढ्या पाण्यात मध्यभागी बॅटरी का चमकते पाहून त्याला शंका आली. म्हणून तो खाली उतरला तर तो पण घाबरला. चारही बाजूंनी वेगवान वाहणाऱ्या पाण्यात हे तीघे अडकले होते. आता रात्रीचे 12 वाजले होते. सुरजने पोलीस स्टेशनला काॅन्टॅक केला.
नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी जगताप साहेब आज जुन्नर तालुक्यात सेक्टर ड्युटीवर होते. त्यांना हा मेसेज वायरलेसद्वारे देण्यात येत असताना हा मेसेज जुन्नर पोलीस स्टेशन चे अधिकारी पी. आय कैलास घोडके साहेब यांनी ऐकला. ते पण रात्री गस्तीवरच होते. त्यांना रहावल नाही व रात्री बरोबर 3:15 ला मला काॅल केला. बोलले खरमाळे मेजर आपण कुठे आहात? मी बोललो सर मी जुन्नरमध्येच आहे. त्यांनी मला सांगितले की पिंपळवंडी येथे पाण्यात तीन जण अडकले आहेत येताय का मदतीला. मी लगेच होकार दिला व दहा मीनीटांतच आम्ही पिंपळवंडीकडे रवाना झालो. माझ्या सोबत रोप साहीत्य होतच.
तीन जीवांचा प्रश्न होता म्हणून मी लगेच श्री. जितेंद्रजी देशमुख व श्री. विनायकजी खोत यांना फोन केला.घटनास्थळी परिस्थिती कशी आहे हे माहीत नसल्याने तीचा मी पुढे जाऊन आढावा घेतो व लगेच आपणास कळवतो. म्हणजे आपणास लागणारे साहीत्य काय हवे ते लक्षात येईल असे देशमुख बोलले व ते घेऊन आम्ही लगेच येऊ असे त्यांनी सांगितले.
घोडके साहेबांनी जगताप साहेबांना फोन करून आधार दिला व बोलले मी व मेजर खरमाळे जुन्नरहून साहित्य घेऊन निघालोय काळजी करू नका. आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आळेफाट्यावरून क्रेन बोलावले होते ते तेथे सज्ज होते. पहिला मी सर्च केला की नदिच्या पात्रातील वाहत्या पाण्यातून त्यांना बाहेर काढता येईल का? याचा मी आढावा घेतला. परंतु पाण्याचा वेग खुपच होता व रिस्क खुप मोठी होती. क्रेनने खाली उतरने सोपे होते व वर काढणे पण सोपे होते. सुरज प्रथम क्रेनने खाली उतरला.सौ. पुष्पा ला प्रथम वर घेतले. नंतर मी खाली उतरलो. ती दहा वर्षाची चिमुरडी भितीने व थंडीने कापत होती. खुप घाबरलेली होती. तील खुप आधार दिला. बेल्टवर तीला खुप जखडून बांधले. ताकी तीचा हात सुटला, भितीने चक्कर आली तरी ती सुरक्षित रहावी. तीला पण काढण्यात यशस्वी झालो. नंतर वडीलांना त्यांच्या सामानासोबत वर काढले. सुरज पण वर चढला व नंतर मी वर गेलो. अशा पद्धतीने या तीन जीवांच्या सुटकेने रोखून धरलेला श्वास सोडला. मी निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज च्या वतीने सुरज व पी. आय घोडके साहेब यांचे आभार व्यक्त करतो की आपण अति दक्षता घेत या तीन जीवांच्या मदतीला धावून आलात व या कार्यात मला एक छोटी सहभागाची संधी देऊन सामाऊन घेतलत. आणि जगताप साहेब व आळेफाटा क्रेन सर्विस यांचे कौतुक व अभिनंदन करतो की आपण कोणत्याही प्रकारे विनाविलंब येथे तत्पर सेवेस हजर होऊन उत्कृष्ट कामगिरी केलीत.
समाजाची अशी सेवा करताना खुप समाधान मला मिळते. आपणही समाजाच्या कारणी देह अर्पण करून मदत कराल ही सदिच्छा.

लेख व छायाचित्र श्री. खरमाळे रमेश 
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
मो. नं. 8390008370

 

 

 

श्री. क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान – नागापूर

श्री. क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान – नागापूर 

लहानपणी अनवाणी नऊ कि.मी अंतर चालत चालत खोडदवरून या थापलिंग दर्शनासाठी यायचो. पंचक्रोशीतील सर्वच कुटुंबियांच कुलदैवत म्हणजे थापलिंगचा खंडोबा. जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याचे श्रद्धास्थान म्हणुन नावलौकिक असलेल्या या खंडेरायावर जीवापाड प्रेम करणारे येथील भक्तगण जानेवारी महिन्यातील पौर्णिमेस मात्र दरवर्षी कुटूंबानिशी यात्रेत न चुकता भंडार खोबरे उधळण्यासाठी हजर असल्याने या परिसरास कुंभ मेळ्याचेच स्वरूप प्राप्त होते व हा परिसर भंडारा उधळल्याने सोनेरी रूपात दर्शन देऊन जातो. आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावास लौकिक प्राप्त झाला तो या खंडेरायाच्या पाऊल स्पर्शाने व वास्तव्याने. घोड नदिच्या उत्तर किना-यावर वसलेले हे छोटे परंतू शेतीप्रधान परिपूर्ण गाव. या गावच्या दक्षिणेस अगदी अर्ध्या कि.मी अंतरावर एक छोट्याश्या डोंगरावर या खंडेरायांच जागृत देवस्थान अगदी सहज निदर्शनास पडत. पावसाळ्यात तर ही डोंगरांग जेव्हा हिरवाईचा शालू नेसते तेव्हा म्हाळसा जणू खंडेरायास नटून थटून भेटण्यासाठीच आली आहे की काय असा भास होतो.
बैलगाडा शर्यत म्हणजे येथील सर्व भाविकांचा जीव कि प्राण होता. बैलगाड्यांवर आलेली बंदीने येथील यात्रेचे स्वरूपच बदलून गेले. बैल प्राण्यांवर मायेचे हाथ व थाप बळिराजा हमखास आपल्या गाड्याच्या बैलांवर टाकताना दिसत असे. खरेदी विक्री त बैल चांगला व तरबेज असला की बळीराजाला आर्थिक परिस्थिती बदलण्यास मदतगार साबित होत असे. एकच बैल पाळायचा व तोंडातला घास आजोबा त्याला देताना मी पाहीले आहे. अनेकदा त्याची विक्री करताना त्याच्या कुटूंबाच्या डोळ्यात पाणी येताना पण अनुभवल होत. त्याला विकुन मिळालेल्या पैशातून बळीराजाच्या कुटूंबाच्या पोरीच लग्न, ऑपरेशन, शाळा अशा अनेक अडचणी हा जीवापाड जपलेल्या बैल विकुन या मंडळीना सहारा मिळत असे. परंतु आज जेव्हा या बैल घाटावर मी गेलो तेथे फक्त एकच शब्द काणी येत होता भिर्र… झाली……. परंतु प्रत्यक्ष मात्र तो घाट पुन्हा येथे हा परीसर बैलांनी सजेल का या प्रतिक्षेची वाट पहाताना दिसला. येथील यात्रेचा मुख्य कणा म्हणजे येथील बैलगाडा शर्यतच होती व आज मोडल्याने येथील स्वरूप बदलले आहे.
जुन्या बांधनिचे हे मंदिर असून खंडोबा व म्हाळसाच्या गाभार्‍यातील मुर्ती भक्तांना आशिर्वाद देताना दिसतात. जेजुरीच्या खंडेरायाला ज्या भाविकांना जाणे शक्य होत नाही तेव्हा तेच दर्शन येथे घडते. बाहेर उभी असलेली दिपमाळ येथील पौराणिक इतिहासाची आठवण करून देते. यात्रेतील दुकानांसाठी बांधलेले ओटे, भक्त निवास व टोलेजंग मंदिर वेस येथील सुंदरतेत अजूनच भर घालते. नागापूर ग्रामस्थांनी येथील निसर्ग देवतेला फुलवण्यासाठी सोनचाफा आदि वृक्षलागवड गडावर केल्याने अभिमान वाटतो कारण कोणत्याही देवस्थानापाशी आपण जातो तेथे देवराई ही हमखास असायची परंतु ती या वर्षी निर्माण करण्याचे काम हाती घेतल्याचे जानवले.
गडाच्या पुर्वेला जवळच भिमाशंकर सहकारी साखर कारखाना येथील परिसरास गोडी निर्माण करत असून गडाच्या पश्चिमेस पायथ्याशी जागतीक महादुर्बिण विज्ञानात मानवाच्या प्रगतीचे पुरावे दर्शवित आहे. अशा या नयनरम्य वातावरणात एक फेफटका व देवदर्शन घेताना सुखाचा झरा ह्रदयातून वाहू लागतो. यासाठी थोडा वेळ काढा व कुटूंबातील सर्वांना येथील भुमीचे दर्शनासाठी घेऊन जा.
बोला येळकोट येळकोट जय मल्हार.
सदा आनंदाचा येळकोट
लेखक/ छायाचित्र
श्री.खरमाळे रमेश 
(माजी सैनिक खोडद)
वनरक्षक – जुन्नर
उपाध्यक्ष- शिवाजी ट्रेल
मो.नं 8390008370