Category Archives: निसर्ग

भेकर प्राणी

भेकर प्राणी

भेकर हरीणांच्या सारंग कुळातील हरीण आहे. याचे वैशिठ्य म्हणजे इतर सारंग कुळातील हरणांसारखे याला शिंगे नसतात. परंतु शरीरातील इतर वैशिठ्ये ही सारंग कुळातील हरीण असल्याची साक्ष देतात. याचे नाव भेकर हे त्याच्या आवाजावरुन पडले आहे. याला भुंकणारे हरीण असेही म्हणतात. जंगलातील शांततेत याच्या भुंकण्याचा आवाज चांगलाच घुमतो व दुरवर ऐकू येतो.

जुन्नर तालुक्यातील माझी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी.
कृपया विनंती आहे ठिकाण विचारू नये.
छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

शिवशाहीचा जन्म झालेले व निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळ असलेले ठिकाण.

शिवशाहीचा जन्म झालेले व निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळ असलेले ठिकाण.

कल्याण पासून पुर्वेस १२०  कि.मी अंतरावर, अहमदनगरच्या पश्चिमेला १०० कि.मी अंतरावर, नाशिक हुन दक्षिणेस १२० कि.मी अंतरावर व पुण्याच्या उत्तरेला ९० कि.मी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण असलेल्या बालाघाट रांगेत शिवशाहीने जन्म घेतला. शिवशाहीचे धुरंदर याच एका रांगेतील वसलेल्या किल्ले शिवनेरीवर जन्माला आले आणि ते म्हणजे राजे शिवछत्रपती शिवराय. त्यांनी फक्त आणि फक्त मनुष्य धर्म जोपासत हिंदुस्थानातील रयतेला आपलस करत स्वराज्य निर्माण केले. अशा या शिवपावण स्पर्श भुमीच्या, जुन्नर तालुक्याची अलौकिक निसर्ग सौंदर्याची मी काही उधळण आपल्या पर्यंत छायाचित्रांच्या माध्यमातून पोहचवतोय. आवडली तर नक्कीच शेर करा.
आमचे इतर नाविन्यपुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल खालील लिंक वर क्लिक करून सब्स्क्राईब करायला विसरू नका व हा अविष्कार इतर आपल्या मित्रमंडळीना पाहण्यासाठी शेर करायला विसरू नका.
https://www.youtube.com/c/NisargramyaJunnarTaluka…
छायाचित्रे व चित्रांकन: श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
 “शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.

नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.

ऐंशी वर्षे वयाचा नवतरूण अवलीया गाईड.

आज मला नाणेघाटच्या दक्षिणेला असलेल्या किल्ले जिवधन ते दा-याघाट या अफाट व ह्रदयात धडकी भरविणा-या बालाघाट रांगेच्या माथ्यावरून फिरायचे होते. दुपारचे एक वाजले होते. उन्हाचा तडाखा शरिराला चटके बसत असल्याने जाणवत होता. पत्नी स्वातीला बोललो मी फिरून येतोय. तीने पण होकार दर्शविला पण एक अट घातली कुणाला तरी सोबत घेऊन जा.मी हो म्हणत व बॅगेत पाण्याच्या दोन बाटल्या, ओल्या भुईमूगाच्या शेंगा ठेवत स्वारी जाण्यासाठी तयार झालो.
कार ड्राईव्ह करत करत एकच विचार मनात घर करत होता. सुरूवात कुकडेश्वराच्या पाठीमागील डोंगरमाथ्यावरून करावी. पण स्थानिक गाईड मिळेल का? हा मोठा प्रश्न होता. मनातील विचार दाबत ठेवून आपटाळे रोडणे उजविकडे वळण घेतले. तेथे बसथांब्यावर चार जण चावंड, कुकडेश्वर, खडकुंबे व फांगुळगव्हाणचे बस प्रवासी बसले होते. मी गाडी थांबवत त्यांना आवाज दिला. कुणाला यायचय का? मी नाणेघाटला चाललोय. चौघेही गाडीत बसले. मीच विषय काढला. मला या कुकडेश्वराच्या डोंगरावरून नाणेघाट व दा-याघाट यांचे दृश्य पाहता येईल का? कुकडेश्वराचे प्रवासी बोलले नाही. फांगुळगव्हाणचे प्रवाशी बोलले हो आमच्या लिंगीच्या डोंगरावरून करता येईल. मी प्रवासी त्यांच्या थांब्यावर सोडत सोडत फांगुळगव्हाणला पोहचलो. फांगुळगव्हाण बस थांब्यावर चारचाकी थांबवत कुणी गाईड मिळेल का विचारणा करू लागलो. परंतु भातकापणीची कामे असल्याने व तेथील नवतरूणांना वर लिंगी डोंगरावर जाण्याची वाट माहित नसल्याने कुणी यायला तयारच होईना. मी खुप नाराज झालो. एकटे जाणे सोपे नव्हते. परंतु प्रयत्न करूया म्हणुन ओढ्यात म्हशी धुत असलेल्या गृहस्थाला विचारले. त्या गृहस्थाने सोबत येण्यास मनाई केली.त्यांच्या शेजारी एक खुपच वयस्कर बाबा होते.तेवढ्यात ते बाबा बोलले मी येतो.
मला त्या बाबां बरोबर एवढे वर जाणे योग्य वाटत नव्हते. कारण खुपच वय झाले होते त्यांचे,व एवढी जीवघेणी चढाई चढतील का? यांना काही समस्या निर्माण झाली तर ते पण खुप अवघड होईल. मी काहीच बोललो नाही. शेजारच्या व्यक्ती बोलल्या घेऊन जा यांना ते वाट दाखवतील. मी माझा कॅमेरा, ट्रायपॉड, स्टीक व न्याहरीची बॅग बगलेत अडकुन चालु लागलो. बाबा पुढे व मी पाठीमागे प्रवास लिंगी डोंगराच्या दिशेने चालु झाला.
बाबा सांगू लागले. एकच मुलगा होता. भजन खुप छान म्हणायचा व लोकांची सेवा करायची त्याला खुप आवड होती. व्यसन काय हे त्याला माहीत नव्हते. दूर दूरची लोक त्याला भजनासाठी न्यायला यायची. परंतु परमेश्वरास पहावल नाही. त्याला आजाराने ग्रासले होते. पुण्यात ऑपरेशन केले व पोटातून एक किलोचा गोळा बाहेर काढला. त्याला घरी आणले परंतु नियतीला त्याने या जगात रहावे मंजूर नव्हते. शेवटी तो मला दहा वर्षापुरवी सोडून गेला. आज मी तुमच्यात त्याला पाहीले व दहावर्षानंतर प्रथमच बाहेर पडलोय. मी खुप खचून गेलो होतो. घर सोडून निघून जाण्यासाठी निघालो होतो. परंतु एका नातेवाईकाने थांबविले. व नातवांचा सांभाळ कर म्हणजे तुला तुझ्या मुलाचे समाधान मिळेल म्हणून थांबलो.
चालता चालता बाबांच्या गालावरून टप टप ओघळणारे अश्रु पाहून मला पण गहीवरून आल होते. माझ्या डोळ्यांच्या कडा पण ओल्या झाल्या होत्या. मीच विषय हुंदके देत बदली केला. बाबा तुमचे नाव काय हो. खेमा बुळे म्हणुन सांगितले व शिक्षण विचारले तर चक्क अंगठा बहादुर म्हणुन सहज सांगून गेले. शाळा का शिकले नाही? प्रश्न केला तर बोलले येथे त्या काळी शाळाच जवळपास अस्तित्वात नव्हत्या. अफाट जंगले येथे पसरलेली होती. वाघ प्राण्यांचा तर येथे सुळसुळाट असे.त्यामुळे कोठे जायचे म्हटले तर खुप भीती.
सपाट जंगलवाट सोडून आम्ही चढाईला लागलो होतो. बाबांचे पाय त्या सरळ चढाईला पण झपझप पुढे पडत होते. घामांच्या धारा शरिरातुन फुटू लागल्या होत्या. बाबा सांगतात की याच डोंगरावरून आम्ही पुर्वी दोन ओझे गवत कापुन आनायचो. आजची पिढी तर आपण आलोय इथपर्यंत सुध्दा यायला तयार होत नाही. वाळलेल्या व संपूर्ण बुजलेल्या पाय वाटेचा अंदाज घेत कारव्यांची लाकडे बाजुला सारत त्या चढाईवर आम्ही चाललो होतो.
एवढ्या गरमीत बाबांच्या डोक्यात जी टोपी होती ती त्यांनी काढलेली नव्हती. मध्येच बाबा घसरून खाली यायचे व तेवढ्याच जिद्दीने पुन्हा ते वर चढायचे त्यांच्या जिद्दीला मी मनोमन सलाम केला. लगातार दोन तास चालून सुद्धा बाबा थांबायचे नाव घेत नव्हते. माझी मात्र बाबांनी संपूर्ण हवा काढून घेतली होती. मला खुप गर्व वाटायचा की माझ्या एवढे कुणी चालू शकणार नाही. परंतु आज माझे गर्वहरण झाले होते. एक म्हण मला आठवली “दिसत तसे नसत” कारण बाबा चालतील का? या प्रश्नाचे उत्तर माझ्या समोरच मला मिळाले होते. आता उलट प्रश्न हा होता की मी चालेल का?
माझे वय एक्केचाळीस तर बाबांचे ऐंशी. लाजकाज मान खाली घालून बाबांच्या मागे मी चालत राहीलो. वानरलिंगी पाशी खराळ गेलेल्या अवघड भागातुन वर चढलो व लाजेने मी बाबांना बोललो बाबा थकला अशाल थांबा पाण्याचे दोन घोट घ्या. खरेतर मीच थकलो होतो. कोणत्या तोंडाने त्यांना मी सांगणार होतो की बाबा थांबा मी थकलोय. कारण निघताना मी त्यांना बोललो होतो तुम्ही चालशाल ना?
बाबांचे चित्रिकरण व गप्पागोष्टी कॅमेरात मी चित्रित करतच चाललो होतो. हे व्हिडिओ मी आपणास आमच्या या https://www.youtube.com/c/NisargramyaJunnarTaluka…youtube चायनलवर दाखवणार आहेच. आपण पहाल तर निश्चितच थक्क होशाल यात शंकाच नाही. पाण्याचे घोट घेत आम्ही त्या जिवघेण्या चढाईतुन खिंडीत पोहचलो. तेथून पुन्हा उजव्या बाजूने वर चढत पठारावर चढलो. समोरील दृश्य पाहून मी बेधुंद होऊन गेलो. त्या कड्याकडे पळतच सुटलो. बाबा तर जागेवरच थांबले. निश्चितच म्हटले असतील एका वेड्यासोबत मी आज वर आलोय. किल्ले जीवधन, वर्डीहा डोंगर व घाटघरचे दृष्य टिपत पुन्हा बाबांजवळ पोहचलो. बाबा नानेघाट येथून दिसत नाही हो प्रश्न केला. बाबा बोलले तीन कडे पार करून त्या समोरच्या कड्यावर गेल्यावर दिसेल. आता मात्र सपाट पठारावरून जायचे होते. त्यामुळे काहीच चिंता नव्हती. बाबा सांगतात या पठारावर पाच सहा फुट उंच गवत येथे असायचे. परंतु सर्वकाही नष्ट झालय. मनुष्याने आग लावूनच हे सर्व संपवले. मला वाटत होत की उंच उंच वाढलेले गवत मला पुन्हा दहा वर्षांनी पहायला मिळेल परंतु सर्व काही नाश पावलेल दिसतय.
एका कड्याच्या ठिकाणी वाढलेल्या वृक्षाखाली आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी आम्ही विसावलो घड्याळाकडे लक्ष टाकले तर पावणेपाच वाजले होते. तीनही कड्यावरून दिसणारी दृश्य टिपत व तेथील वातावरण व निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही परतीला लागलो. उतरणीला खरा कस लागणार होता. क्षणोक्षणी पाय घसरणार होते. बाबांची काळजी वाटत होती. उतरताना बोलू लागले. डोळ्यांचे ऑपरेशन झालय माझ्या. दिसायला कमी झालय. एकमेकांना आधार देणपण शक्य नव्हते. बाबांचे पाय घसरले की माझ्या छातीत धस्स व्हायचे. त्या उतरणीतुन पडतझडत उतरत होतो. अचानकच तीव्र उतारावरील मोकळ्या दगडावर माझा पाय पडला व मी घसरलो. क्षणात डाव्या हातातील घड्याळात त्या साईडच्या कातळभिंतीत हात आदळला व मनगटी घड्याळ तुटले. बाबा बोलले हळुहळु उतरा. डाव्या हाताला दगडाने खरचटले होते. रक्तश्राव होऊ लागला. ते सर्व तसेच दाबत मी उतरू लागलो. बाबांना याबाबत थोडीशी कल्पना सुद्धा येऊ दिली नाही. शेवटी आम्ही बाबांच्या घरी व माझ्या चारचाकी पाशी पोहचलो. बाबांच्या पायाशी लोटांगनच घालून बाबांना दंडवत घातला. माझ्या आयुष्यात प्रथमच मला सोबत लाभलेला ऐंशी वर्षांचा हा नवतरूण अवलिया गाईड होता. बाबांना त्यांचा मोबदला देत. मी चारचाकी सुरू करत जुन्नर शहराच्या दिशेने बाबांना सॅल्युट करत परतीला लागलो.
मी टिपलेली सर्व छायाचित्रे ही बाबांच्या चरणी अर्पण करतो. कारण त्यांचा सहवास लाभला नसता तर कदाचित ही छायाचित्रे मी आपणपर्यंत दर्शनासाठी पोहचू शकलो नसतो.
बाबांच्या शक्तीचा एक चमत्कार मला पहायला मिळाला. बाबांच्या या शक्तीचा चमत्कार समाजासमोर पोहचावा म्हणुन पोष्ट शेर करायला विसरू नका.
लेखक/छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश 
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

 

 

 

 

 

निसर्ग दर्शन जुन्नर तालुका.

निसर्ग दर्शन जुन्नर तालुका.
श्रावण आपले जादुई दर्शन देऊ लागला की निसर्ग हे गतवैभव पाहण्यासाठी व ते टिकविण्यासाठी विविध संरक्षकांची रक्षण करण्यासाठी नेमणूक करत असतो.
छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – जुन्नर
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पे

 

नैसर्गिक सौंदर्यात जुन्नर तालुका अग्रेसर का असावा बर?

नैसर्गिक सौंदर्यात जुन्नर तालुका अग्रेसर का असावा बर? 
वाचा
व्यापाराची राजधानी म्हणून जुन्नर तालुक्याची ओळख पुर्वी होती. ऐतिहासिक वास्तूंच्या बाबतीत म्हटले तर जगातील एकमेव तालुक्याची ओळख आहे ती येथील असलेल्या 350 च्या वर लेण्यांमुळेच. ज्या राजाने प्रशासन व जनहिताच्या बाबतीत, संक्षणार्थ किंवा आदर्श कसा असावा याची महती संपूर्ण विश्वात निर्माण केली अशा राजाचे म्हणजे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान म्हणजेच जुन्नर तालुका. जगात एकमेव प्राणी वेद बोलला त्या प्राणी रेड्याची समाधी असलेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका. संत महंत ज्यांना जगद्गुरू म्हटले जाते अशा संत तुकाराम यांना रामकृष्ण हरी मंत्र देणारे त्यांचे गुरू चैतन्य प्रभू यांची समाधी असलेला तालुका अर्थात जुन्नर तालुका होय. आणि माझ्या मायबोली मराठी भाषेचा जन्म किंवा जीला अमिजात भाषेचा मान मिळवून देणारे पुरावे असतील ते पुरावेही मिळणारे ठिकाण असेल तेही जुन्नर तालुक्यातच. अशा कितीतरी गोष्टी जुन्नर तालुक्यात पहावयास व अभ्यासावयास मिळतात.
निसर्ग सौंदर्याची उधळण या तालुक्यातच का? असा प्रश्न उपस्थित झाला असेलच. सह्याद्रीच्या सात रांगामध्ये वसलेला हा तालुका व याच तालुक्यात सर्वाधिक असलेले सात किल्ले व तेही येथेच का निर्माण केले गेले असावेत बर? या व्यतिरिक्त तालुक्यात तीन भुईकोट किल्ले, जलव्यवस्थापणाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मलिकांबर पाणी पुरवठा योजना, दोन अष्टविनायक मंदिरे तर तीन हेमाडपंती मंदिरे, कुंभमेळा, वैज्ञानिक क्षेत्रातील जागतीक महादुर्बिण, प्राणी क्षेत्रातील साखळीतील एक नंबरचा प्राणी म्हणजे बिबटे जो निसर्ग परिपूर्ण असल्याची ओळख निर्माण करून देत आहे.औषधी वनस्पतींनी परिपूर्णता. अशा अनेक गोष्टींचा विचार केला गेला म्हणून मी नैसर्गिक सौंदर्यात जुन्नर तालुका अग्रेसर का असावा बर याचे संशोधन करूनच हे टायटल दिले आहे. पावसाळ्यात येथील धबधबे तर येथील सौंदर्यास अधिकच भर घालतात व पर्यटक या ठिकाणांकडे सहाजिकच आकर्षिले जातात.
मित्रांनो हे सौंदर्य आपणासच जोपासायला हवे. मनुष्याला हे पहायला खुप आवडते परंतु जोपासायला अजिबात आवडत नाही म्हणून अशा ठिकाणांना आपला आदर्श मानून येथील पर्रावरणाचा कोणत्याही प्रकारचा -हास न होता हे वर्षेन वर्ष टिकून राहण्यासाठी फक्त येथील पाउलवाटांचाच वापर करा.
आपल्याला असलेल्या व्यसनांना करण्यासाठी खुप काही हाॅटेल्स आहेत ते तेथे बसून आपण करू शकता. परंतु या निसर्ग देवतेला अधिक फुलविण्यासाठी व तीचे सौंदर्य जपण्यासाठी आपण स्वतःहूनच पुढे यायला हवे.
जुन्नर तालुक्यातील आंबोली (दार्याघाट) चे हे निसर्ग सौंदर्य वैभव आहे. आपण येथे मनसोक्त आनंद लुटा परंतु येथील पर्रावरणाचा आनंद घेत असताना कोणत्याही स्वरूपाचा -हास होणार नाही याची पण जिम्मेदारी आपण स्वतः घ्या. काचेच्या बाटल्या फोडू नका, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या पुन्हा सोबत घेऊन जावे ही सदिच्छा.
छायाचित्र/ लेखक – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल.
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका.
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज, मोबाईल अँड्रॉइड अप व युट्यूब चाईनल.
मो. नं 8390008370

 

जुन्नर तालुक्यात येथे अवतरलाय स्वर्ग

जुन्नर तालुक्यात येथे अवतरलाय स्वर्ग

मित्रांनो खुप इच्छा होती की जुन्नर तालुक्यात पर्यटन वाढाव व तालुका विकासाला या पर्यटनातुन चालना मिळावी, म्हणुन गेली तीन वर्षे “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” या फेसबुक पेजच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची आशा न बाळगता जीवाचे रान केले व येथील विविधतेचे सौंदर्य व माहीती पाठवण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा नाणेघाटला जाताना पाहतो तेव्हा पर्यटक वाढल्याचा आनंद होतो परंतु बेशिस्त पर्यटकांना पाहून मन खिन्न होऊन जाते. रोडच्या कडेला, पवित्र ठिकाणी बाटल्या व गाडीतील लावलेल्या टेपरेकाॅर्डवर थिरकनारे बेशरमीची हद्द पार करणारे पर्यटकांचा नंगा नाच पाहून रक्तदाब वाढतो. शिवजन्मभुमी म्हणजे शिवरायांची पवित्र भुमी अशा पवित्र भुमिचे पावित्र्य जो राखताना दिसणार नाही त्याकडे खास लक्ष दिले जावे ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि म्हणूनच मित्रांनो आज मी या स्वर्गरूपात अवतरलेल्या अशा या पवित्र ठिकाणाची माहीती आपणास देत नाही त्यामुळे क्षमा असावी. आवडले तर नक्कीच पोस्ट शेर करा.

छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल.
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका.
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज, मोबाईल अँड्रॉइड अप व युट्यूब चाईनल.
मो. नं 8390008370

 

माणिकडोह (जुन्नर) येथील शोध नव्या बौद्धकालीन लेण्यांचा

माणिकडोह (जुन्नर) येथील शोध नव्या बौद्धकालीन लेण्यांचा.

जुन्नर शहराच्या पश्चिमेला सात कि.मी अंतरावर डोंगराळ भागात वसलेले छोटेसे गाव म्हणजे माणिकडोह होय. येथे जाण्यासाठी वापरात येत असे ती पुरातन व्यापाराची व नाणेघाटला जाणारी वाट. परंतु काळ बदलत गेला व या पाऊल खुणा व या वाटेचा इतिहास बुडला गेला तो माणिकडोह धरणाखाली. श्री. शिवछत्रपतींच्या दुसर्‍या सुरतेच्या लुटीतील लुटलेले मानिकरत्न ज्या डोहात बुडावले गेले ते येथील कुकडी नदीच्या डोहात. कुकडी माईच्या पात्रखडकात पाण्याने जवळपास  सांदन व्हॅली सारखी ५००  मीटर लांब घळ नैसर्गिक रित्या तयार झालेली असून जवळपास ती ४० ते ५० फुट खोल असून तिच्या तोंडावर बांधलेला यशवंत घाट व गावातील विविध दगडी शिल्प आपणास पुरातन इतिहासात डोकावण्यास भाग पाडतात.
गावाच्या दक्षिणेस जवळच अर्ध्या कि.मी अंतरावर पुर्व, पश्चिम डोंगररांग पसरलेली असून ही रांग पुर्वेकडे तुळजाभवानी लेणी समुहापाशी संपते. परंतु पश्चिमेस गेलेल्या रांगेतील लेणींचादरा म्हणुन नाव असलेल्या ठिकाणी ही लेणी पहावयास मिळते. ज्या ठिकाणी सध्या खडी क्रेशर जे माणिकडोह धरणाच्या भिंतीच्या रेषेत दक्षिणेस दिसून येते त्याच ठिकाणी डोंगराच्या मधभागी वाटीच्या आकारातील कातळात या लेणी कोरलेली दिसून येतात. ही लेणी कोरण्या आधी येथे प्रथमतः पाण्याची दोन टाकी खोदण्यात आल्याचे लक्षात येते. येथील डोंगररांगावर त्याकाळी येथे सहज कंदमुळे उपलब्ध होत असे परंतु पाण्यासाठी मात्र माणिकडोह गावाकडे धाव घ्यावी लागत असेल कारण मानवाच्या दोन मुख्य गरजा म्हणजे अन्न आणि पाणी होय. त्यामुळेच प्रथम येथे टाकी कोरली गेली असावित.
येथील कातळाचा अभ्यास करता या लेणी कोरताना कच्च्या स्वरूपात आढळुन आला व त्या त्या ठिकाणी काम अर्धवट सोडलेल्या खुणा आढळतात.
या लेणीमधून समोरील दृश्य मनाला भुरळ घालणारे असून, माणिकडोह धरण, किल्ले हडसर, हटकेश्वर डोंगररांग व यामधील येणारा सपाट भुभाग न्याहाळता येतो. त्यामुळे येथे लेणी कोरण्या पाठीमागचा उद्देश देखरेख संरक्षण म्हणून असावा असे वाटते.
येथील सुंदरतेला चार चांद पावसाळ्यात लागलेले दिसतात. दोन्ही बाजूने कड्यावरून घरंगळत येणारे दोन धबधबे लेणी संपताच एकमेकांना अलिंगण देऊन या लेणी समूहाला आपल्या मिठित घेतल्याचे सुंदर दृष्य पाहून मन भारावून जाते.कधी माणिकडोह धरण दर्शन तेजूर गावाकडून घेण्याची इच्छा झालीच तर या लेण्यांना पाहून नेत्रसुख नक्कीच घ्या.
या अपरिचित लेण्या.श्री. विनायक खोत सर, शिवाजी ट्रेल व हिस्ट्री क्लबने जगासमोर आणण्याचा छोटा प्रयत्न केला असून या माणिकडोहच्या बौद्धकालीन लेणी दुर्गप्रेमींसाठी अभ्यासपर्वणी ठरणार आहेत. आपण हा पौराणिक ठेवा जगासमोर आणण्यासाठी पोस्ट लाईक न करता शेर कराल ही सदिच्छा.

लेखक /छायाचित्र श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल

 

 

निसर्गरम्य जुन्नर तालुका पेज च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

मित्रांनो हे फक्त आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच शक्य झाले. खरे तर हे यश आपलेच आहे. आपल्यामुळेच हा निसर्ग ठेवा मी मांडण्यात यशस्वी झालो.
धन्यवाद दै. लोकमत व पत्रकार अशोकभाऊ खरात.
निसर्ग रम्य जुन्नर तालुका पेजचा उपक्रम आपण निस्वार्थपणे जनतेसमोर आणलात. पेज परिवार आपले ऋणी आहे.

निसर्गरम्य जुन्नर तालुका

शिवाजी ट्रेलची दुर्गसंवर्धनाची मराठा सिंडिकेटला किल्ले चावंडवर नवी दिशा.

शिवाजी ट्रेलची  दुर्गसंवर्धनाची मराठा सिंडिकेटला किल्ले चावंडवर नवी दिशा.

उन्हाळा सुरू झाला की दुर्ग संवर्धकांची दुर्गसंवर्धनासाठी चातका प्रमाणे पाहीलेली वाटच होय. रखरखत्या उन्हाळ्यात ४० डिग्री सेल्सिअस तापमानात उरावर चढाई करून किल्ला सर करत छत्रपतींचा लाभलेला वारसा निस्वार्थ जपण्याची धडपड करणारी मंडळी वाहत्या घामाच्या धारांत हातात टिकाव खोरे घेऊन का बर धडपडत असतील याचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. निव्वळ छत्रपतींच्या नावाने घोषणा देणे म्हणजे आम्हाला छत्रपतींविषयी किती जिव्हाळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. परंतु आम्हाला प्रत्यक्षात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज किती कळाले व त्यांचा वारसा आपण कितपत जपत आहोत व त्याचे अनुकरण स्वतः करत आहोत का? हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर आपले मनच आपल्याला खरे उत्तर देऊन जाते.
कालच मुंबई मधून १२० मराठा सिंडिकेटचे मावळे किल्ले चावंडवर प्रथमतःच दुर्गसंवर्धनासाठी आले होते. त्यांना दुर्गसंवर्धनासाठी “शिवाजी ट्रेलच्या श्री. विनायक खोत, श्री विजय कोल्हे, श्री. हर्षवर्धन कुर्हे व श्री. रमेश खरमाळे यांच्या वतीने किल्ले संवर्धन कसे करावे, ऐतिहासिक वास्तूंना वीजा न पोहचता काय उपाययोजना कराव्यात, पाण्याच्या टाक्यांतील काढलेली माती एका जागी का स्टोर करावी व ती खोदत असताना कोणती काळजी घ्यावी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून संवर्धनास श्री. अर्जुन म्हसे पाटील (उपवनसंरक्षक जुन्नर) यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तसेच जिवनात जैवविविधतेला असलेले महत्व हे मार्गदर्शन त्यांनी केले व संवर्धनास प्रारंभ करण्यात आला.
किल्ले चावंडवर असलेल्या पुष्करणीची स्वच्छता व त्यामधील गाळ काढण्यात आला तर पिण्याच्या पाण्याची वर्षेभर पर्यटकांची सोय व्हावी म्हणून खांब टाक्याकडे जाणारी वाट निर्माण करून टाक्याची स्वच्छता करण्यात आली तसेच गडावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक यांना गड परिसरातुन मुक्त करण्यात आले. गेली पाच वर्षे शिवाजी ट्रेल या किल्ले चावंडवर संवर्धन करत असून अनेक विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या संवर्धनातुन उदयास आणत आहे. ही निस्वार्थ सेवा प्रत्येकाच्या हातुन घडावी हाच शिवाजी ट्रेलचा मानस आहे. ऐतिहासिक वारसा पिढ्यानपिढ्या सतत टिकून रहावा व याच माध्यमातून श्री शिवछत्रपती शिवराय व त्यांचे विचार अजरामर व्हावेत हीच सदिच्छा शिवाजी ट्रेल उदराशी ही छोटीशी आशा घेऊन हे संवर्धन कार्य करत आहे. मराठा सिंडिकेट व परिवाराचे या कार्यासाठी विषेश आभार.
Iiजय शिवराय iI
श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल