Category Archives: पुरातन मंदिरे

अपरिचीत भागडेश्वर लेणी वळती ता. आंबेगाव जि. पुणे

अपरिचीत भागडेश्वर लेणी
(वळती ता. आंबेगाव जि. पुणे)
मी राहणार खोडद ता. जुन्नर येथील पुर्वेस जेव्हा सुर्य उदय होतो तेव्हा भागड्या डोंगर रांगांशी लपछपत वर मान काढताना सुर्यनारायण हळुच डोकावून पहाताना दिसतो. व आम्हा खोडदकरांना त्याचे दर्शन घडते. ही डोंगररांग म्हणजे आंबेगाव तालुक्यातील पुर्वेकडील रांग होय. उत्तरेकडून औरंगपूर, भागडी, आणि वळती अशी दक्षिणेकडे जवळपास तीन ते चार कि.मी पर्यंत पसरलेली रांग आहे. जंगलव्याप्त सपाट भुभागामध्ये येथील वनराई असल्याने, अनेक विविध पक्षी, प्राणी व वनस्पतींचा वारसा या परिसरास लाभलेला आहे. पुर्व पट्यातील एकमेव भटक्या पर्यटकांची जणू ही पंढरीच. येथे फिरताना मोकळा श्वास घेता येतो. ट्रेकसाठी तर सर्वोत्तम पुर्व मार्ग म्हणता येईल. आणि तो पण डोंगराच्या क्षितीजावरून. दोन्ही बाजूचे नयनदृष्य एकाच वेळी सहज टिपता येते एवढे निकट असलेला हा पायवाट मार्ग आहे. दुरवरून कानी येणाऱ्या विविध पक्षी व प्राण्याचे आवाज मनमोहीत करतात.
अशा या नयनरम्य परिसरातील डोंगरकपारीत वसलेली एक लेणी आहे. या लेणीत 12/13 व्या शतकातील दोन दगडी शिल्प व एक मोठी दगडी गणेशमूर्ती आहे कि जी मुर्ती हरिचंद्रगडावरील दक्षिण लेणितील गणेशमूर्ती प्रमाणे भासते. कारभारी भोर बाबा सांगतात. की या लेणीच्या तोंडावर कोरीव दगडी बांधकाम होते. त्यांचा अंत नविन सिमेंट मंदिर बांधकामात झाला. या लेणी मधील दगडी शिल्पे येडगाव धरणात बुडविण्यात आली. अनेक कोरीव शिल्पे बांधकामातील चौथर्‍यात गाडली गेल्याने तेथेच त्यांनी दम तोडला व त्यांचा अस्त झाला. जुन ते सोने हे का म्हटले जाते हे कधी आम्ही समजून घेतले नाही. या मंदिरात पुर्वी दगडी संदूक होती व ती चोरीस गेल्याचे बाबा सांगतात. जेव्हा मी मंदिराच्या पुर्वेस असलेल्या मैदानातील दगडांबाबत मी त्यांना विचारले तेव्हा ते बोलले की हे दोन संदूकीचे दगडी आहेत.
मंदिराचे पौराणिकत्व नवीन बांधण्यात आलेल्या मंदिराने हिरावून घेतले असून जुन्या शिल्प मुर्तींची जागा जयपुरवरून आणलेल्या मुर्तीने घेतली आहे. जेव्हा जुन्या मुर्तींबाबत गावात चर्चाने जोर धरला तेव्हा पुन्हा धरणात बुडविलेल्या मुर्ती पुन्हा आणल्या गेल्या परंतु त्यांचे प्रथमस्थान प्राप्त झाले नाही व त्या शोरूम मधील देखावा म्हणुन गणेश शिल्पाला टेकून ठेवण्यात आल्या. खरे तर ही ग्रामस्थांची चूक म्हणता येणार नाही. कारण शिक्षण क्षेत्राचा विस्तार शहरीभागात झपाटय़ाने झाला व तेथील मनुष्यास इतिहास व त्याचे महत्त्व समजू लागले. परंतु खरे पाहता जास्त इतिहास घडला गेला तो अतिदुर्गम भागात. सह्याद्रीच्या कुशीत. जोपर्यंत येथे शिक्षणाचे महत्व समजले जाऊ लागले तो पर्यंत खूप उशीरा झाला होता व येथील ऐतिहासिक वास्तू नष्ट होताना दिसतात. आजही या दगडधोंड्यांना खरच एवढे महत्त्व आहे हे येथील जनतेला ठाऊक नाहीए. हेच पौराणिक दगड धोंडे गावचा इतिहास लिहीन्यास मदत करणार आहेत हे सांगणारे कुणीच दिसत नाही. त्यामुळे आज पण या पौराणिक वास्तुंचे वास्तव्य खुप मोठ्या संकटात सापडलेले दिसत आहे. पौराणिक मंदिरे तोडली जात आहे व तेथील दगडी शिल्पे नविन मंदारांच्या पायाभरणीतच दम तोडत आहे. हाच प्रकार येथे घडला. खरे पाहता वळती ग्रामस्थांनी येथील सर्व दगडी शिल्पांना एकत्र करून गावाला लाभलेल्या पौराणिकतेसाठी नवजीवन द्यायला हवे.
लेणी गाभार्‍यातील जलकुंड व जलकुंडातील अतिस्वच्छ पाणी आश्चर्य चकित करते. ग्रामस्थ या जलकुंडातील पाण्याचा वापर कुंडातील पाणी व चिंच पाला सेवन केल्यास सर्दि खोकला , ताप यासारखे आजार नाहीसा करत आहे. लेणीच्या बाहेर च्या टाकीला सिमेंटचा लेप करून व विटेचे बांधकाम करून बंदिस्त केले आहे.
लेणीच्या पुर्वेस शंभर फुट अंतरावर एक नांदरूक नावाचा वृक्ष आहे या वृक्षाला लाकडे बांधून झोपडी बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ती पडलेल्या स्वरूपात असून तीच्या खाली दोन पाण्याच्या टाक्या गाडल्याचे निदर्शनास येत आहे. त्या टाक्यांचे संवर्धन केल्यास बराचसा इतिहास कळण्यास मदत निश्चितच होईल.
मंदिरा पासून पश्चिमेस डोंगरावर एक पाऊल वाट जाते. या वाटेचा वापर करत डोंगर रिजवर पोहचता येते. ही पायवाट येथील पर्यटकांना ट्रेकसाठी खुपच छान आहे. सहज आठ ते दहा कि.मी अंतरावरील ट्रेक येथे आयोजित केला जाऊ शकतो.
आतील एक शिल्प खरे तर अवलोकितेश्वर आहे सोबत तारा व भृकुटी आहे …पण ह्याना आज आपण भगवान विष्णू म्हणतो … तर दुसरे शिल्प धनुष्यबाण धारकाचे आहे व ही दोन्ही शिल्पे 12 व 13 व्या शतकातील असल्याचे श्री. महेंद्र शेगावकर सांगतात.
ही लेणी कोणत्या गटात मोडतात याबाबत थोडी शंका असल्याने याबाबत वादग्रस्त खुलासा करने योग्य वाटत नाही. त्यामुळे याबाबत निश्चितच येणार्‍या काळात मी आपणास सांगेलच.
वळती ग्रामस्थांना मी एकच विनंती करेल की आपल्या गावाला इतिहास याच पौराणिक वास्तुमुळेच प्राप्त होणार आहे. जर आपण तो ठेवा नष्ट केलात तर आपणास इतिहास दाखविण्यासाठी काहिच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे जेवढी दगडी शिल्पे मंदिर परीसरात शेवटची घटका मोजत असलेली दिसत आहेत त्यांची जपवणूक करून गावचा इतिहास जपण्यासाठी आपण त्यांना एकत्र करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. की जेणेकरून येणाऱ्या पिढीला ती अभ्यासावयास मिळतील.
येथील इतिहास भार्गवराम व त्यांच्या सहाव्या अवतारा बाबत लिहिला गेला आहे व त्यामुळे येथील डोंगराला भागड्या डोंगर म्हणुन संबोधतात. कदाचित भार्गव शब्दाला इंग्लिश मध्ये लिहीताना र च्या ठिकाणी ड चा उच्चार होत असल्याने भागड्या म्हणुन संबोधले गेले असावे किंवा शब्द उच्चारताना येथील त्यावेळच्या अशिक्षित ग्रामस्थांनी असा उल्लेख केला असावा असे मला वाटते.

छायाचित्र /लेखक
श्री. खरमाळे रमेश गणपत
(माजी सैनिक खोडद)
8390008370
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज, मोबाईल अँड्रॉइड अॅप व युट्यूब चॅनेल

 

 

 

 

 

 

नरसिंह देवस्थान रांजणी (आंबेगाव)

नरसिंह देवस्थान रांजणी (आंबेगाव)

पुणे जिल्ह्य़ात एकमेव असलेले आंबेगाव तालुक्यातील नरसिंह मंदिर हे असून येथे पुण्याहून नाशिक महामार्गावर मंचर येथून रांजणी येथे जाण्यासाठी फाटा आहे. साधारण मंचर येथुन चांडोली, थोरांदळे, कारफाटा व रांजणी असे 14 किमी अंतर कापत रांजणी या गाव पोहचावे. हे गाव आंबेगाव तालुक्यातील पुर्व पट्यात असल्याने सपाट भू-भागाने व्याप्त असल्याने येथे जाण्यासाठी चांगले रस्ते असून हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे. या गावाला व मंदिराला मिना नदिचा किनारा लाभल्याने येथील शेतकरी प्रगतशील असून विविध प्रकारचा शेतीव्यवसाय येथे पहावयास मिळतो. गावातील ग्रामस्थांच्या ऐक्याने येथील परिसराला नवलाईचा शालू नेसवलेला आपल्या दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही. अशा या नैसर्गिक वातावरणात गावच्या पश्चिमेस प्रचंड सुंदरतेने नटलेले व भक्त प्रल्हादाच्या भक्तीने मोहून टाकण्या-या व आपल्या वेगळ्याच रूपात प्रकट होऊन भक्ताच्या मदतीला धावून आलेल्या भगवान नरसिंहाचे सुंदर मंदिराचे व देवाचे दर्शन घडते. गावक-यांनी जुनं ते सोन या म्हणीला येथे प्रत्यक्षात साकार करत या मंदिराला आहे त्या स्थितीत संवर्धित करून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. म्हणूनच आपणास सभा मंडपातील असलेले लाकडी नक्षीकाम कारागिराने किती चातुर्याने केले होते तो पुरावा पहावयास मिळतो. बाह्य मंदिराला केलेल्या रंगरंगोटी व लेपामुळे या मंदिराची पौराणिकता लुप्त झाली आहे.साधारण सतराव्या शतकात नाना फडणविसांनी हेमाडपंती बांधणीच्या पद्धतीचा अवलंब करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला व नदीच्या घाटाचीही बांधणी केली, असे सांगितले जाते. या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश निषेध असल्याने गाभाऱ्यात केलेल्या दगडी शिल्पांचे वर्णन आपणास सांगू शकलो नाही या बद्दल खेद व्यक्त करतो. परंतु गाभार्‍याच्या प्रेवशव्दारावर जिर्ण झालेले गणपती शिल्प या मंदिराचा पुरातण इतिहास जागवताना दिसतो. ग्रामस्थ हे मंदिर पेशवे कालखंडाच्या आधीचे मंदिर असा उल्लेख करतात. याच मंदिरात भगवान मारूतीचे मंदिर असून कातळकोरीव मारूती मुर्ती सेंदुराने रंगवलेली असल्याने कोणत्या कालखंडात निर्माण केली गेली असावी हा तर्क करता येत नाही.

रांजणी येथे नरसिंह मंदिर निर्माण झाले तो इतिहास

रांजणी येथील रहिवासी लखोजी हे नरसिंह भक्तीत नियमित तल्लीन असत.भगवान भक्ती ने त्यांची तहान भूक हरपल्याने ते पायी चालत चालत नेहमी सोलापूर येथील टेंभुर्णी फाट्यावरून आत नीरा नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिरात देवसेवा घडावी, देवाचे दर्शन व्हावे व हा मानव जन्म सार्थ व्हावा हीच त्यांची विचारधारा होती. त्यांच्या भक्तीकडे पाहून गावकरी त्यांना आवडिने महाराज म्हणत.
परंतु आता लखोजीचे पाय थकले होते. लखोजी नियमित चिंता सतावू लागली की यापुढे ही वारी आपणास वृद्धापकाळामुळे करता येणार नाही. माझे देवदर्शन होणार नाही. भगवंत माझ्यावर रागवणार तर नाही ना? अशा अनेक शंका कुशंकांनी त्यांच्या डोक्यात थैमान घातले होते. काय करू ? कसे दर्शन घडणार माझ्या भगवंताचे? या विचाराने महाराज हवालदिल होऊन झोपी जात. आता तर त्यांचे डोळे खोल गेल्याचे स्पष्ट जानवत होते. खुपच थकलेले व अशक्त झालेले दिसत होते. आजही ते भगवंत दर्शनाचाच विचार कथा-कीर्तनात करत होते.कशातच त्यांचे मन रमत नव्हते. परंतु चेहर्‍यावर असलेले तेज आज जास्तच झळकत होते. त्यांना झोपेतही नृसिंहाचाच ध्यास लागला होता. त्यांचे दोन्ही डोळे बंद झाले होते. त्यांच्या निरोगी शरीरातून फक्त आणि फक्त श्वासाची होत असलेली हालचालच जानवत होती. ते अचानक दचकले मध्यरात्रीचा तो प्रसंग असावा बहूतेक तेव्हा लखलखाट झाला त्यांचे शरिर तेजोमय झाले व त्यांच्या आत्म्यास नरसिंहाने दृष्टांत दिला. भगवंत त्यांच्या आत्म्याशी बोलू लागले “तू आता नरसिंहपूरला येऊ नकोस. मी तुझी या त्रासातून सूटका करणार आहे. मी तुझ्या भक्तीवर एवढा प्रसन्न झालो आहे की मी तुझ्या सहवासात रांजणी गावी येत आहे.असे अभिवचन दिले.झोपलेल्या लखोजींच्या चेहर्‍यावर प्रसन्नता साफ झळकत होती.
आज लवकरच लखोजी उठले.नरसिंह भगवंताची पुजा अर्चना करत रांजणी गावची वाट धरली. शरिरात असलेला थकवा दूर पळाला होता. लखोजी १८ वर्षेच्या तरूणासारखे आनंदाने झपझप चालू लागले होते. त्यांना आज स्वतः वृध्द आहे हे पण आठवत नव्हते. रस्त्यात भेटणारी माणसे लखोजींकडे पाहून जगातील आश्चर्यकडे पहावे अगदी तसेच पहात होते. लखोजींचे लक्ष फक्त रात्री भगवंताने दिलेल्या दृष्टांताकडेच होते.चालून चालून आता रात्र झाली होती. लखोजींना कोठेही नाही थांबता रांजणी गावी पोहचायचे होते. संपूर्ण रात्र त्यांनी चालून पायाखाली घातली परंतु स्वारीला आपण दिवसा चाललोय कि रात्री काहीच माहित नव्हते. जेवण,पाणी सर्व काही विसरून गेले होते. आता सकाळचे तिन वाजले असावेत लखोजींनी रांजणी गाव हद्दीत प्रवेश केला होता. चार वाजता ते गावात पोहचले. गावच्या उत्तरेला असलेल्या मीना नदी पात्रात ते स्नानासाठी पायर्‍या उतरू लागले. गावातील इतर मंडळी तेथे स्नान करत होती. त्यांना बाजूला करत लखोजी उद्गरले बाजूला व्हा माझे भगवंत तेथे स्नान करत आहेत. काही क्षण गावकरी चिंताजनक नजरेने लखोजींकडे पाहू लागले. ते बाजूला झाले. लखोजींनी प्रथम स्नान केले. जवळच असलेल्या दोन गावकर्यांना जवळ बोलावले. शेजारीच पाण्यात गवताच्या अर्धवट जळत्या पेंढ्या पडल्या होत्या त्या बाजूला केल्या तर सर्वजण आश्चर्य चकित झाले. सर्वजण डोळे फाडून पाहू लागले की त्या ठिकाणी नृसिंहाची मूर्ती होती. लखोजींना दिलेला दृष्टांत खरा ठरला होता. त्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, व लखोजी रोज नित्य नियमाने त्या मुर्तीची पुजा शरिरात प्राण असे पर्यंत करत राहिले. अशी अख्यायिका सांगितली जाते. मी जवळच खोडदगावचा रहिवासी असल्याने व माझी 12 वी शिक्षण येथेच नृसिंह विद्यालय व वाणिज्य काॅलेज रांजणी झाल्याने व घरचा दुग्ध व्यवसाय असल्याने नियमित नरसिंहाचे दर्शन येथे घडत होते.

नरसिंहाची सुंदर बोलकी मूर्ती

उभ्या असलेल्या सिंहाच्या रूपातील ही मूर्ती अतिशय रेखीव असून पुढचे दोन पाय भू मातेवर टेकवून जणू भक्तांना आशिर्वादच देत आहेत व सांगत आहेत की मी तुमचा पाठीराखा आहे. मी सदैव भक्ताच्या संकटी धावून येण्यासाठी तयारच आहे. दगडी आयाळ शक्ती , लांब टोकदार दात शत्रुंचा काळ व लोंबणारी जीभ भक्तांना आशिर्वादच देत आहे असे वाटते. डोळे व नाकावर सोन्याचा पत्रा असल्याने चेहर्‍यावर चमक दिसते , तर भुवयांना मढवलेला चांदीचा पत्रा भक्तांसाठी प्रेमभाव दर्शवित आहे. मूर्तीच्या मागील बाजूला असलेल्या महिरपीवर सुंदर कोरीवकाम केलेले दिसते. त्यावर डाव्या बाजूस मोराची सुंदर प्रतिकृती असून, मध्यभागी नागाची व सिंहाच्या चेहऱ्याची शत्रुंचा नायनाट करण्यासाठी साकारलेली कोरीव प्रतिमा दिसते.

नरसिंह मंदिराची रचना

मुख्य सभागृहात लाकडी खांब असून, एक मंजिल लाकडाचा वापर करून बांधलेला आहे. तेथेच नगारावादन केले जाते. मंदिरातच उजव्या बाजूस मारुतीची मूर्ती बसवलेली दिसते. मंदिराच्या पुढे मोठा सभामंडप असून, डाव्या बाजूला शंकराचे मंदिर आहे. अंगणात तुळशी वृंदावन आहे. मंदिरासभोवतीचा परिसर व समोरच घाटा शेजारी उभे असलेले चिंचेचे झाड आपल्या १५०  ते २०० वर्षे वृध्दत्वाची आठवण करत उन्हाळ्यात यात्रेकरूना थंडावा देत आहे. मीना माईच्या कृपाशिर्वादाने बाजूच्या परिसरात थंडावा निर्माण करत तो हिरव्यागार वनश्रीने नटलेला आहे.
मंदिराची व्यवस्था, पूजा-अर्चा, अभिषेक इत्यादी कामे मंदिर ट्रस्ट व बह्मणवृंद करतात. नरसिंह जयंतीच्या वेळी (नरसिंहाचे नवरात्र) येथे मोठा उत्सव असतो. कथा-कीर्तन, वाचन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अभिषेक व दर्शनासाठी येथे भाविकांची गर्दी असते.
आज पर्यंत येथील एक आश्चर्य म्हणजे नरसिंह जयंतीला वरूणराजा गडगडाट करतच येथे बरसतो, पवनराजा वेगाने धावू लागतो, मोठ मोठाले वृक्ष आनंदाने हवेत डोलू लागतात व अशा या वातावरणातच नरसिंहाचा हजारो भक्तांच्या साक्षिणे जन्म होतो. हजारो फुले पाकळ्या उधळल्या जातात. वातावरण या पाकळ्यांच्या फुलांच्या सुगंधाने सुगंधित होऊन जाते.
दि. ०९ मे २०१७रोजी  नरसिंह जयंती. आपण या नरसिंह अवतार जन्मासाठी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवाल हिच सदिच्छा.
रांजणी गावी माझे १२ वीचे शिक्षण झाले व मला येथे खुप काही ज्ञान प्राप्त झाले व या गावचा इतिहास जागवण्याचे श्रेय प्राप्त झाले ते नरसिंह विद्यालय व वाणिज्य काॅलेज रांजणी येथील मला शिक्षण दिलेल्या शिक्षकांच्या परिश्रमाने. भरभरून प्रेम दिले ते राजणींकर ग्रामवासियांनी त्यामुळे मी हा संपूर्ण लेख या माझ्या गुरूजनांना व प्रियजण रांजणिकरांना अर्पण करतो. लेखात काही त्रुटी असल्यास ती माझी वैयक्तीक चुक असेल व त्याबद्दल आपण क्षमा कराल ही सदिच्छा व्यक्त करतो.

लेखक / छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश गणपत
(माजी सैनिक खोडद)
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका ” फेसबुक पेज
मो. नं 8390008370

 

 

 

 

 

ब्रम्हस्थान…

ब्रम्हस्थान…

घर असो, वाडा असो किंवा मंदिर असो. वास्तुशास्रानुसार घर,वाडा किंवा मंदिर या वास्तूचा मध्यबिंदू म्हणजेच त्या वास्तुचे ब्रम्हस्थान होय. या जागेस अगदी पुर्वी पासुन खुप महत्व दिले गेले आहे. या जागेवर कोणत्याही प्रकारचे वजन पडू नये, पाय पडू नये म्हणून आज मंदिरात त्या ठिकाणी कासव बसविण्यात येते Continue reading ब्रम्हस्थान…

Shivai Devi Temple Rrenoation

किल्ले शिवनेरीवर शिवाईदेवी माता मंदिरातील बदलते चित्र…

किल्ले शिवनेरीवर शिवाईदेवी माता मंदिरातील बदलते चित्र…

before-temple

Shivai Devi Temple Rrenoation
छायाचित्र – खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)

www.nisargramyajunnar.in

देवराई अंजनावळ्याच्या भैरवनाथाची

देवराई अंजनावळ्याच्या भैरवनाथाची.
तापलेल्या डांबरी रस्ताने जुन्नर शहरातून पश्चिमेला आपटाळे रस्त्याने उजवीकडे वळून 40 कि.मी अंतरावर असलेल्या अंजनावळे गावातील वनराई मध्ये जायचे होते. उन्हाच्या झळा चेहर्‍यावर आदळताना आजच्या उष्णतेची आठवण करून देत होत्या. दुचाकीची चैन सैल असल्याने दुचाकीमधुन येणारा खडखड आवाज दुचाकीचा वेग वाढवू नये म्हणून संकेत देत होता. दुष्काळाच्या झळा सोसत उभा व निराश असलेला निसर्ग न्याहाळतच पुढे चाललो होतो. घाटघर गावच्या आधी 400 मी. अंतरावर उत्तरेला वळण घेतले येथुन तीन कि.मी अंतरावरच अंजनावळे गावच्या पुर्वेला देवराई आहे. परंतु डाव्या हाताला आसमंताकडे टोकदार व निमुळती होत गेलेले एकाच डोंगर रांगेवरील वेगवेगळी टोके असलेले छोटे छोटे सुळके पाहताक्षणीच मन आकर्षित करून घेतात. याच डोंगररांगेस वर्हाडी डोंगर म्हणुन संबोधन्यात येते. कोकणाकडून वाहत येणारी तेज हवा कोकणकड्याला आदळत अतिशय वेगाने पुर्वेला येते. त्या हवेपासुन बचाव याच डोंगरांगेने अंजनावळे गावचा केला आहे.
गावातून पुढे होत दुचाकी छोटी इमारत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात उभी केली. व शाळेला लागुनच 45 गुंठे वनक्षेत्र असलेल्या देवराईत प्रवेश केला.
या देवराईच्या सौंदर्याने माझ्यावर एवढी भुरळ घातली की मी येथील एक एक वृक्ष पाहतच राहीलो. माझ्या निरीक्षणातील ही अतिशय अगळीवेगळीच असलेली देवराई आहे. या देवराईवर सन.1986 मध्ये पुण्यातील एका संस्थेने संशोधन करून येथील औषधी वनस्पती व वृक्षांचा अभ्यास करून त्यावर एक पुस्तक प्रकाशित केले होते. एवढी अफलातून ही देवराई आहे. या देवराईची काळजी घेतली आहे ती या देवराईत असलेल्या भैरवनाथ देवतेने. या देवतेच्या मंदिराचा जिर्णोध्दार वनविभाग जुन्नर याच्याकडून करण्यात आला आहे. अतिशय आकर्षक असे भव्यदिव्य मंदिर बांधण्यात आले आहे. या देवतेची कथा येथील पुजारी शिवलिला या ग्रंथाच्या 12 व्या अध्यायाच्या माध्यमातून सांगतात.
मंदिरात असलेले शिवलिंग व समोर असलेले पौराणिक दगडी तोडीतील घडीव व कोरीव नंदी, पाठीमागे देवीच्या आकाराचे कोरलेले चतुर्भुज दगडी शिल्प व समोरील 12 फुट उंचीचा दिपस्तंभ येथिल पुरातन इतिहास जागवताना दिसून येतात. येथील ग्रामस्थ कोणत्याही प्रकारचे नवकार्य करायचे असेल तर, सर्वप्रथम या देवतेच्या पुजना नंतरच करतात.
या देवराईतील प्रत्येक वृक्ष हा निरीक्षण व माहीत करून घेण्यायोग्य आहे. प्रत्येक वृक्षातील एक वेगळपण आपणास जाणवतो. मला तर येथील वृक्ष पाहून चमत्कारच वाटला. मला आज प्रथमच अनेक बांबूना एकत्र करून बांधल्यास जी मोळी तयार होते अगदी तसेच खोड असलेले वृक्ष पहावयास मिळाले. अशा अनेक वेगवेगळ्या प्रजाती पाहून आनंद गगनात मावेणासा झाला येथे आल्यावर.
कधी नाणेघाट, किल्ले जीवधन पाहवयास गेलात तर या 2000 लोकसंख्या असलेल्या छोट्या गावतील वनराईचे दर्शन घेण्याचे विसरू नका.
लेखक/ चित्रांकन : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका

13221103_1704712386450199_3263789095603373809_n 13102738_1704712356450202_2597165138885810608_n 13254089_1704712289783542_5209292360777945494_n 13245349_1704712269783544_3193443683052611846_n 13254374_1704712233116881_8987766166683754139_n 13226715_1704712129783558_6825463614992184435_n 13244841_1704712089783562_5990968452481309417_n 13260127_1704712053116899_1205641686566587608_n 13263915_1704712026450235_2433994782474381322_n

वडज खंडोबा देवस्थान (जुन्नर)

वडज खंडोबा देवस्थान.(जुन्नर)

जुन्नर शहराच्या दक्षिणेस 6 कि.मी अंतरावर माता मिना नदिच्या दक्षिण किनार्यावर वसलेले ऐतिहासिक व सर्व गुण संपन्न गाव म्हणजेच “वडज” गाव होय. या गावला नावलौकिक प्राप्त झाला तो येथील गावच्या उत्तरेस असलेल्या भंडार्या डोंगराच्या पुर्व भागात एका जोगधावा नावाने प्रसिद्ध असलेल्या व डोंगर कपारीत पालीच्या खंडोबाच्या स्थापित पादुकांमुळे. दुसरे नावलौकिकास पात्र असलेले व मिनामाईला अडवून सुजलाम सुफलाम करणार्या शेतकरी वर्गाला वडज धरणामुळेही या गावच्या कारकिर्दीस चांगलाच उजाळा मिळाला आहे.
या गावातील जुने जिर्ण व पडझड झालेले वाडे आजही पुरातन ऐतिहासिक वारसेची आठवण करून देतात. अशा या गावात मुळचे कर्हाड, सातार्याचे रहिवासी असलेले चव्हाण कुटूंब येथे राहण्यासाठी आले. हे कुटुंब मुळातच धार्मिक वृत्तीचे असल्याने व आपल्या कुलदैवताची येथुन पूढे जाग्यावर जाऊन सेवा करता येणार नाही, म्हणून त्यांनी कर्हाड, सातार्याहून येताना आपले कुलदैवत असलेल्या पालीच्या खंडोबाच्या पादुका ते घेऊन आले होते. या पादुकांची प्रतिस्थापणा भंडार्या डोंगरावर असलेल्या कपारीत करण्यात आली. कारण मुळातच खंडोबा हे डोंगरदर्यामध्ये फिरणारे असल्याने तेथेच त्यांची जोगधावा म्हणुन स्थापना करण्यात आली.

13239186_1702595486661889_7467030792462422502_n

13239124_1702595423328562_6396252950395099307_n
सदानंद चव्हाण रोज सकाळी 3 वा उठून मिना मातेच्या पात्रात अंघोळ करून नित्यनियमाने देवाची भक्ती भावे पुजा करू लागले. देवाचा जवळचा व नित्यनियमाचा भक्त म्हणून त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरू लागली. गावातील व पंचक्रोशीतील समाज पण देव पुजा श्रध्देने व भक्ती भावाने करू लागले. देवापुढे आपल्या समस्या मांडू लागले व त्यांच्या समस्या पण हल होऊ लागल्या, व त्यामुळे लवकरच हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. ही ख्याती दुरवर पोहचण्यास वेळ लागला नाही. हळू हळू यात्रा, उरूस येथे साजरा होऊ लागला. परंतु देव पुजारी सदानंदाचे आता खुपच वय झाले होते. दिसायला व ऐकायलापण कमी झाले होते. पायांची गती मंदावली होती. परंतु देव भक्तीची भुक कमी होत नव्हती. दिवसभर हळु हळू चालत चालत ते संध्याकाळपर्यंत पोहचत असत व रात्र तेथेच काढत असत. शरिर साथ सोडू लागले होते. आज ते पुजा करुन भगवंताला विनंती करू लागले,की मला आता तुझ्या भक्तीची खुपच चिंता भासत आहे. मला तुझी पुजा येथपर्यंत येऊन करने शक्य होणार नाही. याच विचारात मी रोज खचलो जाऊ लागलो आहे. तुझ्या भक्ती वाचून माझा दिवस जाऊच शकत नाही. मी काय करू? जीव अगदी कासावीस होऊन जातो. सदानंदने आपले गार्हाने भगवंताला बोलून दाखवले. व हळु हळु आपल्या पडझड झालेल्या झोपडीकडे मार्गस्थ झाले. सदा चालून चालून खुप थकलेला होता. सकाळी निघालेला सदा रात्री घरी पोहचला. आज तो दिवसभर उपाशीच होता व रात्री थकावट घालावी म्हणुन तेथेच झोपडीत जमीनीवर आडवा झाला ते ही काही न खाताच.
आज चम्पाषष्टीचा दिवस होता. सदा गाढ झोपेत होता. खंडोबाच्या स्वारीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला.

13240741_1702595643328540_6775342740801660772_n

13221461_1702595356661902_3763816923814362725_n
देव बोलु लागले. सदा उठ, मी तुझी काळजी दुर करायला आलो आहे. मला माहीत आहे की तु माझ्या भक्तीचा किती भुकेला आहेस. तु माझ्या भक्ती पोटी प्राण देण्यासाठी पण मागे फिरणार नाहीस. तुझी काळजी ती आता माझी काळजी आहे. तु उद्या जेव्हा पुजा करण्यासाठी येशील तेव्हा मी तुझी पुजा झाली की तुझ्या पाठी पाठी कायमचाच तुझ्या घरी येणार आहे,फक्त एक लक्षात ठेव तु जेव्हा जोगधाव्यापासुन परतिला निघशिल तेव्हा तु घरापर्यंत मागे बघू नकोस. व नंतर तु माझी तेथेच घरी पुजा करायची. तुला कुठे जाण्याची अवश्यकता पडणार नाही. हे सांगुन देव निघुन गेले. सदा दचकून जागा झाला. सकाळचे तीन वाजले होते. सदाने नित्य नियमाचे पालन म्हणून पुन्हा भंडार्या डोंगराकडे चालण्यास सुरूवात केली. आज त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या आनंदाच्या भरात तो सोळा वर्षांचा होऊन चालू लागला होता. अगदी अर्ध्या तासात मीना मातेच्या पवित्र पात्रात स्नान करून सदा जोगधाव्यापाशी पोहचला होता. सर्व संपन्न पुर्ववत पुजा अर्चा करून तो घरच्या परतीच्या मार्गाला लागला. तो जस जसा पुढे चालु लागला तस तसा घोड्यांच्या टापाचा, घुंगरांचा आवाज सदाच्या कानी येऊ लागला. सदा या आवाजाने आजुनच गदगदित झाला होता. त्याच्या उत्साहाला सिमाच उरली नव्हती. या आवाजाने व भगवंताचा जास्त वेळ सहवास लाभेल म्हणून तो अगदी रमत गमत चालला होता. मना मध्ये कधी कधी भगवंताला पाहण्याची लालसा भेडसावत होती. परंतु मागे पाहू नये ही भगवंताची अज्ञा होती. घोड्याच्या खिंखाळीने त्याचे भान पुन्हा जाग्यावर येत होते. साधारण जोगधावा ठिकाणापासून सदा वडज गावाच्या दिशेने 1 कि.मी अंतर चालुन आला होता. आज सदाच्या शरीराला शक्ती मातेने शक्ती व बळ प्रदान केले होते, म्हणूनच की काय त्याला थकवा जाणवत नव्हता. रोज थोडा वेळ विसाव्यासाठी सदा ज्या वृक्षाचा आधार घेत असे तो बोरीचा वृक्ष समोरच 10 ,12 फुटावर होता, परंतु भगवंताला एकदातरी वळुन पाहण्याचे काहुर सदाच्या मनात माजल होत. हळु हळु पावले टाकत सदा चालला होता. बोरीचा वृक्ष मागे टाकत सदा 12, 15 पावले पुढे चालून गेला असेल नसेल तेवढ्यात भगcवंताला एकदा पाहण्याची लालसा सदाला तीव्र झाली व त्याने मागे वळून पाहीले. तेवढ्यात बोरीच्या वृक्षाच्या खोडाचा अत्यंत मोठा कडकड आवाज झाला व भगवंत त्या वृक्षात गुप्त झाले. भगवंताने सदानंद ला दृष्टांत दिला होता की तुझी भक्ती पाहून मी एवढा खुष झालो आहे की भक्त माझे नाव घेण्याआधी तुझे नाव पहीले घेतील. म्हणून आपण आज केव्हाही खंडोबा देवदर्शन साठी जातो तेव्हा सदानंदाचा येळकोट असे उच्चार करतच देव दर्शन घेत असतो. अशी कथा येथील भक्त सांगत असतात.
बोरीच्या वृक्षात भगवंत गुप्त झाल्यानंतर येथील भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले. येथे एक छोटेसे मंदिर उभारण्यात आले. हळु हळु या मंदीराचा जिर्णोध्दार होत गेला. सन 1825 ते सन 1877 पर्यंत ग्रामस्थ,देणगी निधी व देणगी धान्य कोठाराच्या माध्यमातून मुस्लिम व मराठी गवंड्यानी आपल्या छन्नी हातोड्याच्या बळावर 51 वर्षे सतत काम करून एक आखीव व रेखीव असे सुंदर मंदिर निर्माण केले. आजही मंदिराची रंगरंगोटी व हस्तकला पाहण्या व वाखानन्या योग्य आहे. आजही तो बोरी वृक्ष सदाच्या भक्तीची व सदाच्या विश्रांतीची साक्ष देण्यासाठी मंदिराच्या समोर उभा आहे. व आजही ते धान्य कोठार मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी मदतगार साबीत होत आहे.

13256187_1702595776661860_4482272641802012577_n

13238961_1702595266661911_22454931492906519_n

13177773_1702595219995249_2833276764005733404_n

13232950_1702595326661905_3591551308000978270_n

13227128_1702595183328586_7018517424017433805_n
मंदिराचे काम सुरळीत व चांगले चालण्यासाठी सन 1966 मध्ये खंडोबा देवस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सन 1976 साला पासुन मंदिराच्या आवारात लग्न कार्याची सुरूवात करण्यात आली. व आज पर्यंत 16,000 (सोळा हजार) विवाहाची साक्ष व जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त विवाह सोहळे आयोजन करण्यात आग्रेसर असलेले हे तालुक्यातील एकमेव मंदिर आहे.
माघ पौर्णिमेला फेब्रुवारी महिन्यात येथे सर्वात मोठा यात्रोत्सव साजरा केला जातो. तसेच चम्पाषष्ठी व दसर्याला येथे यात्रा, सहा दिवसाचा सप्ता व रात्रोत्सव साजरा करण्यात येत असतो.
श्री. खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने ITI आणि हायस्कूल मुलांच्या भवितव्य लक्षात घेऊन चालविण्यात येत आहे. व आज मंदिराच्या परिसराचे चांगले नुतनिकरन करण्यात आले असून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. कधी आपण जुन्नर शहरात किल्ले शिवनेरी दर्शनासाठी आलात तर नक्कीच या देवस्थानास भेट दिल्या शिवाय माघारी परतीला जाऊ नये ही सदिच्छा व्यक्त करतो.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.njunnartaluka

माणिकडोह धरणात(जुन्नर) दडलेल्या ऐतिहासिक खजान्याचे रहस्य.

माणिकडोह धरणात(जुन्नर) दडलेल्या ऐतिहासिक खजान्याचे रहस्य.

श्री.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पारतंत्र्यातुन मुक्तता करण्याचा विडाच उचलेला होता. मनुष्य बळ स्वबळाने निर्माण केल होत.परंतू यासाठी मुबलक प्रमाणात साधनसंपत्तीची गरज होती. या आधी आपल्याच बांधवाकडून शत्रुसैन्याने लुबाडलेली धनदौलत त्यांनी सुरतवर आक्रमण करून ती पुन्हा मिळविण्यासाठी छापे टाकून लुटले होते, परंतु तरीही स्वातंत्र्यासाठी ती धनदौलत पुरेशी नव्हती. पुन्हा एकदा सुरतवर छापा टाकण्यात आला परंतु यावेळी राजांनी पुण्याला राजगडावर पोहचण्याचा मार्ग बदललेला होता. कारण शत्रु सैन्याला याची भनक लागली होती. राजांनी तुरंत निर्णय घेऊन ठाणे, कल्याण,आजचा माळशेजघाट, मढ (पारगाव) निमगीरी मानिकडोह, जुन्नर मार्गाने घोडदौड सुरू केली. शत्रू सैनिकांना याबाबतची भनक पुन्हा लागली व महाराजांचा पाठलाग सुरू झाला. जवळपास असलेले लुटीतील माणिकरत्ने प्रवासाला अडथळा निर्माण करू लागले. राजांना काही पर्यायच सुचत नव्हता. हाती आलेल्या धनावर शत्रू पुन्हा कब्जा करतो की काय असे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये डोकाऊ लागले. तो पर्यंत ही घोडदौड सह्याद्रीच्या झाकाळलेल्या किर्र जंगल मार्गाने माणिकडोह (जुन्नर) गावापर्यंत पोहचली होती. माणिकडोह गावाला वरदान लाभलेली कुकडी माई नदि या घोडदौड करणार्या व भारतभुमीचे पालनहार करणार्या राजाकडे कुतुहलाने पाहत होती. ती अबोल असल्याने राजाशी वार्तालाप करण्याची इच्छा असुनही काही बोलु शकत नव्हती. तीचे ते वाहत असतानाचे शांत रूप काहीतरी विचार करण्यासारखे राजांना भासले व घोडदळ करणारे सर्व सैन्य येथे थांबले. राजांनी येथे थांबण्याचा घेतलेला निर्णय सर्वांना आश्चर्य कारक वाटत होता. कारण पाठलाग करनारा शत्रू जवळ येऊ लागला होता.
माणिकडोह आय टी आय च्या पश्चिमेला अगदीच 200 मीटर अंतरावर व मळगंगा मंदिराच्या पुर्वेला जेथे कुकडी माई नदि उत्तरोन्मुख होते तेथे एक मोठा डोह आहे तेथे सर्वजण थांबले होते. त्यावेळेस माणिकडोह धरण अस्तित्वात नव्हते, फक्त हा डोहच होता व आजही तो दिसून येतो. या डोहात क्षणाचा विलंब न करता लुटून आणले माणिकरत्ने राजांनी त्यात बुडविण्याचा आदेश दिला. ती सर्व माणिकरत्ने तेथे आपणास शत्रुपासून सुरक्षित राहुन पुन्हा उपलब्ध होतीलच ह्या दृढ निश्चयाने महाराजांनी पुण्याच्या दिशेने तेज घोडदौड सुरू केली. आणि ही संपत्ती एक महिन्यानंतर सुखरूप राजगडावर पोहचविण्याची जबाबदारी मोरोपंत पिंगळेवर सोपविण्यात आली होती. मोरोपंतांनी पण हे आव्हान स्वीकारून जबाबदारी पुर्ण केली होती.
एवढा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या कुकडी माई डोहाला माणिकडोड नाव देण्यात आले. नविन बांधण्यात आलेल्या धरणालाही माणिकडोह धरण म्हणुन संबोधन्यात आले. या धरणाला शहाजी सागर म्हणुन ओळखले जाते.हे धरण बिबटय़ा निवारणकेंद्र माणिकडोह च्या अगदिच लागुन पश्चिमेला आहे. याच धरणातून पुर्वीचा सर्वात मोठा कल्याण , नाणेघाट ते पैठण पुरातन मार्ग होता. त्यामुळे या वाटेत अनेक ऐतिहासिक वास्तू बांधण्यात आल्या होत्या. त्याच पैकी आपणास छायाचित्रात असलेल्या निजामशाहीच्या कालखंडातील दोन मस्जिद दिसत आहे. एक मस्जिद सध्याच्या तेजूर गावच्या उत्तरेस धरणात आहे, तर तीन मस्जिद राजुर नंबर 1 या गावाच्या दक्षिणेस धरणात एकाच ठिकाणी पडझड झालेल्या अवस्थेत आहे.या मस्जिदी निजामकालीन असुन यामध्ये पारशी भाषेतील शिलालेख कोरलेले आहेत.गेली चाळीस वर्षे या मस्जिदींना व माणकेश्वर पडझड झालेल्या हेमाडपंती मंदिराला जलमय समाधी मिळाली होती. परंतु या वर्षी पावसाचे घटते प्रमाण असल्याने व पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्याने धरणाची पाणी पातळीने निचांक गाठल्याने गावकर्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत असून पर्यटक या वास्तू पाहण्यासाठी आकर्षित होत आहेत. चाळीस वर्षापुरर्वी याच मस्जिदीच्या पाठीमागे लागुनच तेजूर आणि राजुर ही दोन गावे होती. धरण बांधण्यात आल्याने ही दोन गावे एक धरणाच्या उत्तरेला तर दक्षिणेला डिव्हाईड झाली व राजुर गावचे दोन भाग झाले. आज त्यांना ग्रामपंचायत जरी एक असली तरी तेजूर नं – 1, तेजूर नं – 2 अशी एक वेगळीच ओळख
निर्माण झाली आहे.
आपणास या वास्तु पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच या स्थळाला भेट द्यायला विसरू नका. कारण आज आपण पाहीले व नंतर कालावधीत सतत चांगला पाऊस झाला तर पुन्हा कधी या वास्तूंचे दर्शन घडेल हे सांगणे कठीणच आहे.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

13103338_1696376490617122_5567707444443412761_n 13091957_1696376477283790_175432674304795466_n 13102712_1696376453950459_5911160059019539819_n 13062065_1696376440617127_6460867737557975831_n 13087844_1696376420617129_644119554804231777_n

13062107_1696376513950453_4120089493039984483_n 13061918_1696376500617121_3037479801734123762_n

सह्याद्रीच्या रांगेत आढळतात हेमाडपंती १२ जोतीर्लिंगे

सह्याद्रीच्या रांगेत आढळतात हेमाडपंती १२ जोतीर्लिंगे.
मी आज जो लेख आपणास सादर करत आहे त्या लेखाशी आपण किती सहमत असाल हे सांगणे कठीणच आहे. परंतु माझे निरीक्षण आणि वैचारीक पातळी या 12 जोतिर्लिंगाबाबत लिहीण्यास मला वारंवार सतावत आहे. नेहमीच नवीन नवीन शोधने व ते वाचकांपर्यंत लेखनीच्या माध्यमातून पोहचवीताना खुप समाधान मिळत असते.
मी तर म्हणेन महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत हेमाडपंती 12 ज्योतिर्लिंगाचे निर्माण नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिरापासून निर्माण केले असुन त्या शृखलेचा शेवट भिमाशंकर मंदिराशी केला आहे.
या मंदिरांविषयी अनेक माहीती वेगवेगळ्या स्वरूपात व वेगवेगळ्या माध्यमातून आपणापर्यंत पोहचलेली आहे.
सह्याद्रीने आपल्या ह्रदयात अनमोल असा नैसर्गिक व ऐतिहासिक ठेवा जतन केलेला असून आज तो शोधताना व मांडताना उजागर होत आहे. व तो वाचकांना उपलब्ध होत आहे. जुन्नरहुन ज्या ज्या वेळी माझी सह्याद्रीच्या कुशीत शिरून भटकंती सुरू होते, तेंव्हा तहान भुक आपोआपच हरपून जातानाचा अनुभव मला कित्येक वेळा आला आहे. कधी कधी तर पुर्ण दिवस दोन घोट पॅलेल्या पाण्यावरच काढलेले आठवतात. याही पेक्षा मजेशीर गोष्ट म्हणजे पक्षी निरीक्षण करण्यासाठी किंवा त्यांचे छायाचित्र काढण्यासाठी तास दोन तास न हालता एकाच जागेवर उभे राहिलेले क्षण मलाच माझ्या वेडेपणाची आठवण करून देतात. माझे मित्र मला नेहमीच म्हणतात काय राव तुम्ही एकटेच फिरता. कधी कधी आम्हालापण घेऊन जात जा की ? अशा वेळी माझ मन मला उत्तर देत तु तर वेडा झाला आहेस कशाला उगाच दुसर्‍याला वेड लावतोस. क्षणभर चेहर्‍यावर स्मित हास्य येत व क्षणात काही न बोलताच विरून जाते. असो.
हातविज (जुन्नर) येथील भटकंती चालु होती. येथील गाव व परिसर न्याहाळताना एक गोष्ट लक्षात आली की हा परीसर अतिदुर्गम आहे. हा जुन्नरपासुन साधारण 45 कि.मी अंतरावर असुन येथे नेहमीच एस.टी सेवा संपूर्ण विस्कळित झालेली असते. अशा या गावात वेगवेगळ्या स्वरूपाची शिवलिंगे व कोरीव दगडी शिल्पे आढळुन येतात. हि शिल्पे अस्तव्यस्त पडलेली असून येथील पौराणिक इतिहास सांगण्यास मदत करतात. यावरून असा तर्क बांधला जातो की त्र्यंबकेश्वर (नाशिक) अमृतेश्वर (रतनगड) हरिश्चंद्र गड, नागेश्वर (खिरेश्वर) माणकेश्वर (माणकेश्वर ) कुकडेश्वर (पुर) कपर्दिकेश्वर ( ओतूर) ब्रम्हनाथ (पारूंडे) डिंभे धरणातील आंबेगावाच्या ठिकाणी असलेले मंदिर, भिमाशंकर मंदिर ( भिमाशंकर ) आणि दोन मंदिरांचे अवशेष जुन्नर शहरात दिसुन येतात. यावर असे समजते की, नाशिक ते भिमाशंकर हा सह्याद्रीच्या कुशितील त्या काळी असलेला एक पैदल व जवळचा मार्ग होता.जो मार्ग हरिश्चंद्र गड, खिरेश्वर, आंबोली , ढाकोबा, हातविज, डोनी, आहुपेहून पुढे भिमाशंकरला जाऊन मिळतो. मध्यवर्तीत ठिकाण म्हणजेच पुरातन व्यापारी मार्ग व व्यापाराची राजधानी अर्थातच “जुन्नर” होय. म्हणूनच या ठिकाणी सहा हेमाडपंती मंदिरे दिसत असून ती जुन्नर शहराच्या पश्चिम पट्यात दिसतात. सर्वात जास्त सात किल्ले, सर्वात जास्त लेणी समुह, त्या व्यतिरिक्त जुन्नर,ओतूर, नारायणगाव, बेल्हे या ठिकाणी असलेले भुईकोट किल्ले या परीसराच्या संरक्षणाची साक्ष देतात. आणि म्हनूनच आपणास त्यावेळी येथे असलेला राबता किती मोठ्या प्रमाणात होता याची खात्री पटते. या आधीच्या लेखात जुन्नर म्हणजे हेमाडपंतीयांची राजधानी असा त्यात मी उल्लेख केलेला आहे.
मित्रांनो हा ऐतिहासिक वारसा जाणून घ्यायचा असेल तर आपणास सह्याद्रीच्या प्रेमात पडून, सह्याद्रीच्या रानावनात पायपीट करून तो जाणुन घ्यायला हवा. त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात. त्यांच्याकडे पाहताना एक वेगळ्याच दुरदृष्टीने निरीक्षण करायला हवे.
मला खात्री आहे की या सह्याद्रीच्या कुशीत राजे श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखे सुवर्ण रत्न जन्माला आले तो सह्याद्री आपणास कसाकाय निराश करेन.आजपर्यंत हजारो इतिहासकार, कवी,लेखक, संशोधक जगासमोर आणले आहेत ते फक्त या सह्याद्रीने. लाखो परीवार आपला उदरनिर्वाह याच अफाट पसरलेल्या सह्याद्रीच्या उदात्तीकरणानेच. हजारो वेगवेगळ्या स्वरूपाची मंदिरे उभारली गेली ती याच सह्याद्रीच्या रागांवर का? कशासाठी? हे आपण कधी जाणूनच घेतले नाही. हा संकेत आहे. की मित्रांनो आपण नेहमीच सह्याद्रीच्या संपर्कात रहा. आपले आयुष्य सुखमय करनारा दुसरा तिसरा कोणी नसून मीच तो आहे.मी रोगवर्धक आहे, मी शोधक आहे, मी सत्मार्गी आहे, मी सन्याशी आहे, मी आपला भक्त आहे हे तो नेहमीच सांगतो. पण त्याकडे लक्षच देणारा कुणी नाही. असो.
इतिहासकार प्रेमींना एक विनंती करू इच्छितो की जुन्नर तालुक्यात असलेल्या प्राचीन इतिहासावर आपण एकदा सहज नजर टाकण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या हातून एक अतिशय मोठ्या प्रमाणावर येथील इतिहास लिहीला जाऊ शकतो यात शंकाच नाही. असा ठाम विश्वास मला वाटतो.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

13177101_1698457027075735_4746608138669361493_n 13138869_1698457010409070_1018517018056570001_n 13124875_1698456993742405_4287487625880592066_n 13100884_1698456943742410_6463852947621150117_n 13124973_1698456920409079_8976844893103589480_n 13124436_1698456903742414_1629664540788715521_n 13177461_1698456880409083_5020141088732933200_n 13178061_1698456860409085_5641947162101473697_n

हेमाडपंथीयांची नगरी म्हणजेच जुन्नर तालुका(इतिहास जुन्नरचा)

हेमाडपंथीयांची नगरी म्हणजेच जुन्नर तालुका.
(अभ्यासकांना एक आव्हान असणारा तालुका)
इतिहास जुन्नरचा…

जुन्नर तालुक्यात असलेली अनेक हेमाडपंती बांधनितील मंदिरे व त्यांचे अवशेष फेसबुक पेज ” निसर्ग रम्य जुन्नर तालुका” हे जगासमोर निदर्शनास आणून देत आहे. खिरेश्वर, नागेश्वर, ब्रम्हनाथ, ही तीन हेमाडपंती मंदिरे अस्तित्वात असून माणकेश्वर, जुन्नर शहरातील अनेक ठिकाणी अस्तव्यस्त पडलेले कोरीव हेमाडपंथी शिल्पकलेचे दगड, ओतुर गावात तसेच कपर्दिकेश्वर मंदिर असे अनेक तालुक्यात हेमाडपंथी बांधनितील उदाहरणे देता येतील अशी ठिकाणे आहेत.
या मंदिराची निर्मिती दर्या खोर्यात केली असून नाशिक के त्रंबेकेश्वर ते भिमाशंकर मंदिराच्या मधिल सह्याद्रीच्या रांगात ही निर्मिती केली गेली आहे. सर्वात जास्त मंदिरे मध्यवर्ती ठिकाण व पुरातन व्यापारी मार्ग म्हणुन ज्या तालुक्याचे नाव प्रथम घेतले जाते तो तालुका म्हणजेच शिवजन्मभुमी जुन्नर तालुका होय.
राजे श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज सर्वोमुखी प्रत्येकाला हवेत परंतु ते ज्या पावन भुमीत जन्मले त्या भुमीचा विकास येथे सर्वप्रथम होणे गरजेचे होते तसे झाले नाही याचीच खंत वाटते.
राजांविषयी असलेला अभिमान जर खरोखरच प्रत्येकास वाटला असता तर सर्व प्रथम पर्यटन विकास येथे होणे गरजेचे होते. परंतु तसे कधी घडलेच नाही. आपणच सांगा मग शिवजन्मभुमीला अनेक पर्यटकांचे पदस्पर्श कसे लागतील ? येणार्या पर्यटकांना तेवढ्या दिवसापुरते का होईना राजांचे आचार विचार मनी या माध्यमातून नक्कीच कळाले असते. म्हणूनच सांगु इच्छितो की येथील माझा असलेला आदिवासी बांधव आज पण येथे आदिवासीच जीवनाची झळ सोसत आहे. कधी घडणार येथे परिवर्तन? जेथे अमाप साधनसंपत्ती कमविण्याचे प्रकल्प आहेत तेथेच स्मारके बांधून तेथील आपण विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहात मग ज्या ठिकाणी श्री.छत्रपती जन्मले आशा ठिकाणी का नाही? प्रशासनाला मी एक विनंती करू इच्छितो की किल्ले शिवनेरीच्या दक्षिणेस जवळच असलेल्या वडज धरणात आपण असाच एखादा प्रकल्प राबवला तर नक्कीच आपणास शिवजन्मभुमी वर खुप मोठे कार्य केल्याचे सुख लाभेल. असो.

13087867_1694746727446765_8017429854572526360_n13062224_1694746744113430_6799418078678349724_n 13077048_1694746784113426_7169151462498910535_n 13015442_1694746814113423_6831560666623270132_n 13043812_1694746830780088_4244248937801756889_n 13087834_1694746904113414_3298315592185899756_n
तालुक्यात असलेल्या आदिवासी भागात विकास न झाल्याने या बांधवांना पुरातन वास्तूचे महत्वच उमगले नाही. याला जबाबदार कोण आहे?
कालच माणकेश्वर या गावी हेमाडपंती बांधनितील मंदिराला भेट देण्याचा योग आला व तेथील दृश्य पाहून जीव अगदी कासावीसा होऊन गेला. ज्या माणिकडोह धरणाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे त्या माणिकडोह धरणाचे अलिकडेच पाण्याची पातळी वाढावी या हेतूने काम करण्यात आले. त्या धरणक्षेत्रात येणार्या गावांचे शासनाने पुणर्वसनपण केले. हे करत असताना येथील नाणेघाटाकडुन जुन्नर शहराकडे येणारा पुरातन व्यापारी मार्ग या धरणात बुडून गेला. परंतु या मार्गावरील असलेल्या पौराणिक पाऊल खुणांना कोणत्याही स्वरूपात इजा होऊ दिली नाही. त्या खुणा पाण्यात बुडाल्या खर्या परंतु पाण्याची पातळी कमी झाली की त्या आपले वास्तव निदर्शनास आणून देण्यासाठी डोके वर काढून आठवणी ताज्या करून देण्यात सक्षम असत. परंतु माणकेश्वर येथील हेमाडपंती मंदिरास जेसीबी च्या सहाय्याने उकरून त्या मंदिराचे अवशेष शिक्षणाचा अभाव कमी असल्याने व त्या वास्तुची नियमित पुजा व्हावी या उद्देशाने वाहतुक करून गावात पुन्हा एक माणकेश्वराचे सिमेंटचे नवीन मंदिर उभारण्यात आले व तेथे हे शिल्प मंदिराच्या बाहेरील चौथर्यास वापरण्यात आले आहे. एका हेमाडपंथी मंदिराचा झालेला अंत पाहून खुप वाईट वाटले. कोण सांगणार याचे महत्व येथील रहिवासी बांधवांना? नक्की कोण चुकतय याचेच कोढ पडलेल दिसतय.
मंदिरा समोरील असलेला एक हजार टनी वजनाचा दगडी शिल्पातील कोरीव पौराणिक नंदि पहाताच क्षणी डोळ्यांमध्ये भरतो व क्षणात वाटते की याला नजर तर लागणार नाही ना? मी आजपर्यंत अनेक नंदि शिल्प पाहीली परंतु हे नंदि शिल्प आपली वेगळीच ओळख सांगण्याचा प्रयत्न करत आहे की काय असा प्रश्न पडतो.
येथे मंदिरा समोर अनेक वाहतुक करून ठेवलेली दगडी शिल्प प्रदर्शन मांडावी तसी मांडण्यात आली आहे. त्यांच्याकडे एक दु:खी नजर फिरवतच जड मनाने माघारी फिरावे लागते.
या स्वरूपात अनेक मंदिरे जुन्नर शहरात अवशेषांवरून असावेत असे वाटते म्हणून मनी प्रश्न पडतो की हेमाडपंथीयांची नगरी म्हणून तर जुन्नर शहराला महत्व तर नव्हते ना?
मित्रांनो आपल्या प्रत्येक गावाला काही ना काही तरी पौराणिक महत्व आहे. परंतु ते आपण भुतकाळाप्रमाणे गाडत चाललो आहे. त्याला उजागर करण्याचा प्रयत्न प्रत्येक ग्रामपंचायतीने करायला हवा होता, परंतु तो शिक्षणाच्या अभावापोटी केला गेला नाही. मला प्रशासनाला एक विनंती करावी वाटते की आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला या पौराणिक वास्तुंबाबतची एक जागृती करण्याचे आवाहन केले तर निश्चितच काही आशा आंधारात दडलेल्या पौराणिक वास्तु नक्कीच उजेडात येतील की ज्या बाबतची माहीती अद्याप कुणाकडेही उपलब्ध नसेल. कारण प्रत्येक गावात काही अशा वास्तु आहेत त्या गावातील अनेक गुराख्यांना माहीत आहेत परंतु त्या जगासमोर आल्याच नाहीत. म्हणून हा उपक्रम आपण राबवाल हीच सदिच्छा व्यक्त करतो.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.njunnartaluka

418 वर्ष पुरातन जैन मंदिर जुन्नर…

418 वर्ष पुरातन जैन मंदिर जुन्नर.
( हनुमान जयंती निमित्त हा लेख मी जैन बांधवांना समर्पित करत आहे )
पुण्यापासुन उत्तरेस 100 कि.मी अंतरावर असलेला तालुका म्हणजेच शिवजन्मभुमी “जुन्नर” तालुका होय. या शिवजन्मभुमीचा ऐतिहासिक वारसा व वास्तूंचा गोडवा जेवढा गाऊ तेवढा थोडाच आहे. अशा या शहराला संपुर्ण विळखा होता तो भुईकोट किल्याचा. या शहराला पाण्याची कधीच कमतरता भासत नसे. या किल्याचा पुर्व दरवाजा म्हणजेच आजची सदाबाजार वेस होय. या वेसीला लावलेले गंडभेरूड दगडी शिल्प निजामशाहीची ओळख करून देत आहे. याच वेशीच्या पर्वेला लागुनच एक ओढा वाहत जातो.
याच ठिकाणी असलेला कागदीवाडा, तेलीबुधवारपेठ,मंगळवारपेठ, आणि सदाबाजार पेठ येथे जैन धर्मायांची खुप मोठी वस्ती होती. व या ठिकाणी आजपण खुप मोठ्या प्रमाणात जैनधर्मियांची जागा येथे आहे. आपण सदाबाजार वेशीच्या बाहेर पुर्वेला पडलो की ओढ्यातच उजव्या बाजूला एक राजस्थानी स्वरूपातील बांधलेल्या तिरकस नक्षी रचना करून विटेच्या भिंती पहावयास मिळतात. हे बांधकाम म्हणजे त्यावेळी येथे एक तलाव होता या तलावावर येथे जैन मंदिर उभारण्यात आलेले होते. कालांतराने येथील तलाव लुप्त पावला गेला परंतु या मंदिराची रचना आजही 16 विहीरींवर असलेली पहावयास मिळते. जुने प्रवेशद्वार उत्तरेला होते परंतु मुस्लिम समाज व जैन समाजातील बांधव एकत्र येऊन या उत्तरेला प्रवेशद्वार पाशी असलेल्या मस्जिदीसाठी ही जागा सोडण्यात आल्याने आज हे प्रवेशद्वार बंद आहे. या मस्जिदीच्या पाठीमागेच एक पौराणिक विहीर आहे. या विहीरीचे पाणी बाराही महीने जशाच्या तसेच असते.
जैन मंदिरात आपण पुर्वेला असलेल्या दरवाजातून प्रवेश करतो. येथेच भव्यदिव्य स्वरूपात भक्त निवास बांधण्यात आलेले आहे. आत प्रवेश करताच उजव्या हाताला असलेले चुन्याच्या मळणीसाठी गोल असलेले दगडी चक्र आपली नजर त्याकडे आकर्षित करून घेते. मंदिर परिसरात ऐन उन्हाळ्यात सुद्धा थंडावा शरिराला स्पर्श करतो. कारण या मंदिराची रचनाच 16 विहीरींवर केलेली आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार 200 वर्षापुर्वी व 1987 साली करण्यात आला. आतमध्ये असलेल्या विहीरींवर पुणर्बांधनित ढापे टाकण्यात आलेले आहेत. दोन नविन मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. व पुरातन मंदिराला नवा रंगरंगोटीचा लेप करण्यात आलेला आहे. परीसरात साधारण अस्तव्यस्त पडलेले दगडी चौरंग की ज्याचे वजन साधारण 300 ते 400 किलोच्या आसपास आहे. ते आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. येथील पाहण्यासारखी विहीर मंदिराच्या पश्चिम भिंतीत बाहेरील बाजूस असून तिची रचना खुपच अप्रतिम आहे. सभामंडपाच्या बाहेरील बाजूस असलेल्या लाकडाचा वापर कसा करावा व ते कसे टिकले जाईल याचे उत्तम उदाहरण पहावयास मिळते.
आपणास येथे एक विशेषतः सांगावी वाटते की जगातील कोणत्याही जैन मंदिर बांधणीत लोखंड वापरले जात नाही. या लोखंडाच्या जागी पितळ आणि तांब्याचाच वापर केला जातो व मंदिराच्या पायाभरणी करीता पंचधातुचाच वापर केला जातो. व आपण येथील बाहेरून लाकडी वर्क पाहीले तर त्यावर सुध्दा तांब्याच्याच प्लेटी लावलेल्या दिसतात.
सभामंडपात उत्तरेकडून प्रवेश होतो. सभामंडपातील केलेले लाकडी नक्षीकाम मला प्रथमदर्शी थेट म्हैसूर येथील मैसुर पॅलेसमधील लाकडी नक्षीकामाची आठवून करून देतात. हे कोरीव काम खुपच छान स्वरूपात केलेले असून 418 वर्ष झालेतरी जशाच्या तसेच आहे. सभामंडप व गाभार्‍याची रचना खुपच छान असून ती न्याहाळण्यायोग्य आहे.

12985620_1693898097531628_6189221622287591029_n 13001260_1693898050864966_3784971168997955648_n 13087361_1693897997531638_3347560905397403109_n 13015667_1693897980864973_8629068950479958240_n
जैन धर्मात एकूण 24 तिर्थनकार आहेत. त्यातले प्रथम आदेश्वर असुन 24 वे भगवान महावीर आहेत. जुन्नर जैन मंदिरातील ” शांतीनाथ महाराज” हे 16 वे तिर्थनकार होय. आपण कोणत्याही जैन मंदिरात गेलात तर आपणास सर्व तिर्थनकारांच्या मुर्ती एकसारख्याच असलेल्या दिसतात परंतु या वेगवेगळ्या असतात. या मुर्तिची ओळख या मुर्तिच्या खाली एक चित्र असते. हे चित्र म्हणजेच या तिर्थनकाराचे वाहन होय.या चित्रावरूनच या मुर्तिची ओळख केली जाते. जुन्नर मधील “शांतीनाथ महाराज यांच्या मुर्तीच्या खाली हरणाचे चित्र दर्शविले आहे.
शांतीनाथ महाराज यांना शांतीदुत म्हणुन संबोधतात. मनोभावाने जो कुणी या देवतेची पुजा करेल त्याच्या कुटुंबात नेहमीच शांतता नांदते.
शांतीनाथांची मुर्ती ही प्रथमतः काळया पाषाणात होती. परंतु 200 वर्षापुर्वी या मुर्तीचा जिर्णोध्दार केला गेला व या मुर्तीला लेप केला गेला तेव्हा पासुन ही मुर्ती आपणास सफेद रंगामध्ये दिसून येते. हा लेप रियल मोत्यांचा चुरा करून त्यात फुलांचे रियल रंग वापरून तयार करून वापरतात.
मंदिराला ऐतिहासिक वारसा खुप लाभलेला आहे परंतु येथील अनेक विविध मुर्ती कुठे आहे असा प्रश्‍न मी श्री. सुनीलजी शहा यांना केला तर मला ऐकुणच आश्चर्याचा धक्काच बसला. ते सांगु लागले की मंदिर परीसरात खुप मोठा शिल्प व मुर्ती यांचा प्रचंड साठा होता. तो 1987 च्या जिर्णोध्दारादरम्यान मंदिराच्या पश्चिमेस असलेल्या विहीरीत सोडून दफण करण्यात आला. परंतु त्याच जागेत गाडलेल्या मुर्ती या मुडद्या समान
समजल्या जातात असे त्यांना सांगण्यात आले व या सर्व मुर्ती मुंबई – कल्याण महामार्गावरील वेल्होळी या ठिकाणी असलेल्या “धर्मचक्रतीर्थ” येथे प्रदर्शिनीय म्हनून ठेवण्यात आलेल्या आहेत. आजही आपण तेथे गेलात तर त्या पहावयास मिळतात.
मंदिराची प्राचीनता आजही खुप मोठ्या प्रमाणात टिकून आहे.येथील पुजेसाठी वापरण्यात येणारी पौराणिक पद्धतीची भांडी पाहण्या योग्य आहेत. प्रत्येक महिन्याच्या प्रथमदिनी मोठ्यासंख्येने येथे वेगळीच पुजा केली जाते त्या पुजेस स्नात्र पुजा असे म्हणतात, व ही पुजा दररोजपण केली जाते.
अनेक ठिकाणाहून खुप सारे भक्तगण येथे दर्शनासाठी येत असतात. आपण कधी आलात तर एक धावती भेट येथे द्यायला नक्कीच विसरू नका.
जैन बांधवांना विनंती करू इच्छितो की येथील गाडला गेलेला इतिहास आपण पुन्हा एकदा उकरून त्यास जर नवचैतन्य देण्याचा प्रयत्न केलातर निश्चितच आपल्या जैन मंदिराला लाभलेला 418 वर्षा पुर्वीच पौराणिक वैभव अनुभवयास मिळाल्याशिवाय राहणार नाही.आपल्या या पौराणिक मंदिराला bomby state gazetter या पुस्तकात खुप महत्व दिले गेले आहे. त्यामुळे हा पौराणिक ठेवा आपणाकडून जोपासला जाईल ही सदिच्छा व्यक्त करतो.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.njunnartaluka