Category Archives: पुरातन मंदिरे

पौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

पौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

जुन्नर शहरातून नाशिकला जाण्यासाठी 1:45 वा निघालो होतो. विषय होता आयुर्वेदिक औषध नाशिकला जाऊन आणण्याचा. आम्ही जयहिंद काॅलेज मागे टाकत भरघाव वेगाने नारायणगावच्या दिशेने आमची चारचाकी जात असताना अचानक मोबाईल घरीच जुन्नरला विसरल्याचे लक्षात आले. सोबत चिन्मय होता. त्याच्या मोबाईल माझा नंबर डायल केला तर तो पत्नीने घरी रिसिव केला व बोलली फोन विसरलात. जुन्नरहून सासरे बोरी शिरोलीला जायला निघाले होते त्यांच्याकडे मोबाईल पाठवून देते व तुम्ही तेथेच थांबा म्हणुन पत्नी बोलली व संभाषण कट झाले. विसाव्या मिनीटातच मला मोबाईल मिळाला. हायबाय करत आम्ही निघालो. नारायणगाव, आळेफाटा,संगमनेर मागे टाकत आता सिन्नरच्या पौराणिक गोंदेश्वर मंदिराचे दर्शन घ्यावे म्हणुन थांबलो. वेळ थोडा होता व त्याच वेळेत परिपूर्ण छायाचित्रांसह दर्शन व्हावे हा उद्देश होता. चारचाकी पार्क करत कॅमेरा सोबत घेत बाहेर पडलो. मंदिराच्या बाह्यांगाचे छायाचित्र घ्यावे म्हणुन कॅमेरा ऑन केला व प्रथम क्लिक केला. तेव्हा समजले की कॅमेरा मेमरीकार्ड घरीच लेप्टाॅपमध्ये राहीले. मग काय पुन्हा सिन्नर शहराकडे कार्ड शोधन्यासाठी धाव घेतली. 30 मिनीटांत कार्ड मिळाले व मंदिर दर्शन सुरू झाले.
पुणे नाशिक व मुंबई – शिर्डी मार्गावर सिन्नर नावाच गाव आहे. या गावात रस्त्यालगतच तहसीलदार कार्यलयाच्या उत्तरेला अगदी 300 मीटर अंतरावर हे गोंदेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर केव्हा व कोणी बांधल याचा उल्लेख व शिलालेख मिळत नाही. यादवांच्या राजवटीत १२ व्या शतकात हे मंदिर बांधले असावे असा तर्क या मंदिराच्या रचनेतुन निदर्शनास येतो. या गोंदेश्वर मंदिरा भोवती ५ फूट उंच तटबंदी असुन पुर्वेकडील भिंत बाहेरून ढासळलेली आहे.या तटबंदीत असलेल्या दोन दरवाजातून म्हणजे पश्चिम आणि दक्षिण दिशेकडून मंदिराच्या परीसरात प्रवेश केल्यावर समोर ५ फूटी उंच चौथर्‍यावर (अधिष्ठाण) मध्यभागी गोंदेश्वराचे उंच मंदिर व त्याच्या चार बाजूला असलेली चार छोटी कलाकुसरींनी युक्त मंदिर आपले लक्ष वेधून घेतात.
गोंदेश्वराचे मंदिर संकुलात ५ मंदिर आहेत. हे शिव पंचायतन असून यात मुख्य मंदिर शिवाचे असून चार बाजूला पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूचे मंदिर आहे. या शिवाय शिव मंदिरा समोर नंदिचा मंडप आहे. शिव मंदिराचे सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. मध्यभागी कासव कोरलेले असून खांबांवर व छ्तावर नक्षी कोरलेली आहे. खांबाबर काही शिल्पपट व मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शंकराची पिंड आहे. मंदिराच्या सभामंडपाला पूर्वेकडे असून मंदिराचे मुख्य दार दक्षिणेकडून आहे. मंदिराच्या दरवाजा समोर नंदिचा मंडप आहे. मंदिराचे शिखर भूमिजा पध्दतीचे आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही पायापासून छतापर्यंत कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे. सर्वात खालच्या बाजूच्या शिल्पपट्टीवर हत्ती कोरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या मंदिरांवरही कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे.
मंदीर सध्या संवर्धित होणे गरजेचे असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा लवकरच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पर्यटकांना येथील आवारात क्रिकेट खेळणा-या मुलांकडून अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सिन्नर ग्रामस्थ व पुरातत्व विभाग यांनी विशेष लक्ष देत संवर्धन केले तर भविष्यात हेच मंदिर सिन्नरकरांचे मुख्य पर्यटन आकर्षण ठरले जाऊन अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात मुख्य भुमिका निभावेल असे वाटते. …. येथील छायाचित्र व माहीती घेत आम्ही पुढे गारगोटी मुझीयम पाहण्यासाठी निघालो. वेळ झाली होती 4:00 ची. … क्रमशः पुढे पाहू गारगोटी मुझीयम. ..
हे वैभव आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढील आमचा चायनलवर पाहु शकता. YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्र – श्री खरमाळे रमेश 
शिवनेरी भुषण
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – वनविभाग जुन्नर
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
सदस्य :- रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details…

लालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.

लालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.
हरिश्चंद्राची भेट घेऊन पुष्पावती माई धाकटी बहिण मांडवीला भेटायला निघते. द-याडोंगर खोरे तुडवत तुडवत व वेडीवाकडी वळणे घेत घेत ती जेव्हा जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे येते तेव्हा तीची भेट मांडवीशी होते. एकमेकींना भेटून झाल्यावर पुष्पा, मांडवीला विचारते अग तु कोठे निघालीस एवढे नटून थटून? मांडवी उत्तरते मोठ्या ताई कुकडीला भेटायला निघाले. येतीस का ताई तु पुढे? पुष्पा म्हणते अग मी मोठ्या ताईलाच भेटायला निघाले होते. म्हटले रस्त्यात तुला भेटून पुढे कुकडी ताईला भेटावे. मग काय पुष्पा व मांडवी दोघी मोठी बहीण कुकडीला भेटायला निघतात. बरेच अंतर चालत चालत त्या एका ठिकाणी कुकडीला भेटतात तेच ठिकाण म्हणजे जुन्नर तालुक्यातील लालखण हिवरे होय.
त्यांची भेट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणास आपण संगम असे म्हणतो. या ठिकाणी तीन नद्या एकत्र आल्याने येथे हेमाडपंती संगमेश्वराचे मंदिर बांधण्यात आले होते. संपूर्ण मंदिर जमीनदोस्त झाल्याने मंदिराबाहेरचे चार नंदी पहावयास मिळतात. हेमाडपंती मंदिराचे अवशेष पालथे असून फक्त एक मुर्ती निदर्शनास पडते. गणपती शिल्प जीर्ण अवस्थेत पहावयास मिळते. या ठिकाणी येण्यासाठी आज प्रथतःच कपडे उतरून छातीभर खोल पाण्यातुन 30 मीटर प्रवास करावा लागला तेव्हा कुठे येथील शिवलिंगास स्नान घालण्याचा व स्वच्छ करण्याचा योग आला.
नियमित पाण्याची सुखसुविधा उपलब्ध असल्याने येथे गाव वसले ते लालखन हिवरे.हेमाडपंती मंदिराचे जीर्ण अवशेष येथे पहावयास मिळतात. 1977 पर्यंत येथे येडगाव धरणाची निर्मीती करण्यात आली व या तीनही बहिणींचा रस्ता येथे अडविण्यात आला. व निर्माण झाले ते येडगाव धरण. त्यामुळे #संगमेश्वर_मंदिर व लालखण गाव पाण्याखाली गेले.
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कि ज्यांनी 15 वर्षे आपली सत्ता प्रस्थापित केली ते मा. वल्लभशेठ बेनके यांचे हे गाव. धरणामुळे गाव विभागले गेले व #कैलासनगर व #हिवरे_बुllअशी दुभागणी झाली.
आता आपणास प्रश्न पडला असेलच कि लालखण हे नाव कसे? यावर भोर बाबा आख्यायिका सांगतात की खुप खुप वर्षापूर्वी अहमदनगर मधील लालखण बाबांच्या समाधीपाशी असलेले दोन अतिशय लाल व मोठे भुंगे फिरत फिरत येथे आले व मरण पावले. त्यांची समाधी लालखण म्हणुन येथे बांधण्यात आली. ते भुंगे येथे बाबाच्या रूपात आले होते म्हणून तसे नाव देण्यात आले. #लालखण_मंदिर ही वास्तु बहुतेक निजामशाही कालखंडात बांधण्यात आली असावी असे वाटते. मंदिरात एक व मंदिराच्या बाहेर पश्चिमेस लागुन एक अशी दोन पिरस्थाने पहावयास मिळतात. नुकतीच 4 तारखेला मंदिर पाण्याची पातळी कमी झाल्याने येथे यात्रा संपन्न झाली होती.
याच समाधीच्या अगदी दक्षिणेला 30 मीटर अंतरावर भारताचे सर्वप्रथम वनसंरक्षक इंग्रज अधिकारी गिब्सन येथे सरकारी बंगल्यात वास्तव्यास होते. धरण निर्माण झाल्याने त्यांचे राहते घर पाण्याखाली गेले व त्याची पडझड मोठ्या प्रमाणात झाली व आज फक्त त्या इमारतीचे अवशेष पहावयास मिळतात. येथे विविध ठिकाणी समाधीस्तल पहावयास मिळतात. आखीव व रेखीव सुंदर तुळस येथील पसरलेल्या हिरवाईमधे तल्लीन होऊन उभी असल्याचे दिसते. बौद्ध समाधी याच तुळशीच्या पुर्वेस पहावयास मिळते. परंतु ती बौद्ध समाधी नसून समाधीस्तल असावे की जीच्या छतावर चुन्यामध्ये चारही दिशांना बसलेल्या अवस्थेतील मुर्ती कोरलेल्या दिसतात.
धरणाची पातळी खाली गेली की येथील ग्रामस्थांच्या पुर्वीच्या आठवणी ताज्या होऊ लागतात. सर्व बाजुंना लाबवर हरळीच्या गवताचे साम्राज्य पसरल्याने हा परिसर हिरवाईने व सौंदर्याने नटलेला पहावयास मिळतो. एकदा का या परिसरात आलात तर येथून निघता पाय काढणे फारच कठीण. अगदी अंधार होईपर्यंत मी येथून हललो नव्हतो.
ओझरच्या विघ्नहर्त्याच दर्शन झाले की पर्यटकांनी हिवरे बुll या गावातील या ठिकाणी भेट देणे सोयीस्कर आहे. अगदीच तीन कि.मी अंतरावर हे गाव आहे. गाव परिसर संपूर्ण उस क्षेत्राने अच्छादीत असल्याने येथील रस्ते नेहमीच हिरवाईच्या छायेत असतात. येथील सौंदर्य दर्शन जर सांजवेळी घेत असाल तर अतिउत्तम कारण सुर्यमावळतीचे दृष्य तर अप्रतिमच. मग पहातायना #हिवरे_बुll परिसर?

आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचे हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचे हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर.
नुकतीच #जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावाला भेट देण्याचा योग आला. पुणे – नाशिक हायवेपासुन अगदीच दोन कि.मी अंतरावर पश्चिमेस वसलेले हे गाव. या गावची एक ओळख सांगायची झाली तर विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार महाराष्ट्रतुन निवडून आले ते म्हणजे मा.शरददादा सोनवणे त्यांचे गाव म्हणजेच #पिंपळवंडी गाव.
गावाला असे नाव का पडले असावे असा प्रश्न पडतो व विचारधारा सुरू होते ती या नावाच्या शोधाची. माझा प्रवास उंब्रज, काळवाडी मार्गे पिंपळवंडी असा होता. हा सर्व परिसर येडगाव धरणाच्या पाणलोटाखाली असल्याने येथील सुंदरतेला तर चार चांद लागलेले दिसतात. गावाच्या पाठीमागे पश्चिमेस एक 100 मी. अंतरावर पिंपळेश्वर ओढा लागतो. या ओढ्याच्या काठी एक हेमाडपंती मंदिर दृष्टीस पडते. येथील परिसर अनेक पिंपळ वृक्षांनी व्यापलेला दिसतो व नकळतच #काशीखंड अध्याय – 50 मधील ओव्या आठवू लागतात.
श्री गणेशाय नमः षडास्यलणे आगस्ती मुनी
त्या दक्षिणदेशी काम्यकवनी महाक्षेत्र असे पुण्यजीवनी
पापनाशनी जोदाते ll1ll
गोदावरीचे उत्तरपारी प्रतिष्ठान आसे पुण्यनगरी
तेथे लींग रछायना बरव्यापरी पिंपळेश्वरतो ll2ll
दुधचीऋषीचा कुमार पीपलाद नामे मुनेश्वर तेणे गोदातिरी
छपीलाहार त्यानाव पिंपळेश्वर ll3ll
हे आठवताच येथील अख्यायिका समोर एक चित्रपट रूपात उभी राहते. ती पुढील प्रमाणे.
स्वतःच्या हाडाची शस्त्रे इंद्रास करून दिली ते ऋषी म्हणजे दधीची ऋषी जे सप्तऋषी होऊन गेले त्यापैकी हे त्यातील एक होय. त्यांचे पुत्र पिंपलाद हे खुप मोठे शिवभक्त होते. त्यांनी काही वर्षे विश्वेश्वराची सेवा करून ते नर्मदातिरी तपचर्या परिक्रमा केली व पुन्हा ते काशिला आले. व विश्वेश्वराची भक्ती व सेवा केली. काही वर्षे निघून गेली व पिंपलाद यांना भगवंतांचा आदेश झाला की तिर्थांटन करा.ते तिर्थांटन करत करत “शिवजन्मभुमी” आज ज्या नावाने ओळखले जाते तेव्हा त्यावेळी हा भुभाग “दंडकारण्य” म्हणुन ओळखला जायचा ते या ठिकाणी पोहचले. येथील परिसरातून जात असताना त्यांना हा परीसर खुप आवडला. दक्षिणेस जवळच अंतरावर कुकडी माई संथ प्रवाहीत होत्या. घणदाट जंगल असल्याने जपासाठी त्यांना येथे सर्व काही मांगल्य वाटले व ते येथेच वाहत्या ओठ्याकाठच्या खडकावर तपश्चर्या करू लागले. परंतु त्यांचे प्रत्येक वर्षी महाशिवरात्री काशियात्रेस जाणे टळत नसे.
यात्रा संपली की येथील भुमाता पुन्हा त्यांची येथे वाट पाहत असे. पिंपलाद ऋषींचे वय होत चालले होते. तपश्चर्येच्या बळावर त्यांना अनेक सिध्दी प्राप्त झाल्या होत्या. आजुबाजुच्या परिसरातही ऋषींची ख्याती पसरत चालली होती.
पिंपलाद ऋषींचे आता खुपच वय झाले होते. महाशिवरात्रीस काशियात्रेस जाण्याची चिंता वाटू लागली होती. त्यांना त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. कारण वृद्धापकाळात यात्रा करणे शक्‍य होणार नव्हते. शेवटी त्यांनी आपल्या साधनेचा वापर केला व स्वतःचे शिर काशियात्रेस योगसाधनेने पाठवले.
पिंपलाद ऋषींच्या तपाची व श्रद्धेची भगवान शंकरांना जाणीव झाली व भगवान शंकराची व या पिंपलाद ऋषींच्या शिराची भेट #नगर जिल्ह्यातील #पारनेर तालुक्यातील #विरोलीगावात झाली. या भक्ताचे निस्सीम भक्ती पाहून या भक्ताच्या शिराची भगवान शंकरांनी प्रतिष्ठापना या #विरोली गावातच केली व ते शिर स्वतः भगवान शंकर पिंपळवंडी या गावात या पिंपलाद ऋषींच्या तपश्चर्ये ठिकाणी येऊन त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले व आता तुला काशियात्रेस येण्याची गरज नाही. मी सतत लिंग रूपात निवास करीन व मला या ठिकाणी पिंपळेश्वर या नावाने ओळखले जाईल. असे सांगून त्यांनी लिंग रूपात पिंपळेश्वराची लिंगरूपामध्ये व येथे गंगेसह स्थापना केली व भगवान शंकर अंतर्धान झाले.
मित्रांनो ही जरी अख्यायिका सांगितली जात असली तरी येथील गंगा कुंड रूपात वर्षाच्या 365 दिवस गायमुखातुन वाहताना दिसते या कुंडास आजही गंगातिर्थ व छोट्या कुंडास काशितिर्थ म्हणुन ओळखले जाते. मंदिराच्या शेजारीच पिंपलाद ऋषींची समाधी आहे. मंदिर गर्भगृहात डावीकडे पिंपलाद ऋषींची शिरविरहीत मुर्ती आहे. व समोरच एक गोल दगड ठेवला असून आपण मांडी घालून बसुन त्या दगडावर हात ठेवून मनात प्रश्न केला की त्याचे उत्तर मिळते.
पिंपलाद ऋषींच्या ख्यातीने एक एक भक्त या स्थानी राहु लागला. येथे बाजारपेठेची निर्मीती झाली व उभे राहीले एक खेडेगाव अर्थात #पिंपळवंडी.
येथे काळानुरून एक प्रचंड कोरिव व आखीव व रेखीव दगडी शिल्पांचे एक हेमाडपंती मंदिर उभे राहिले. काळ वाढू लागला व भुतकाळात लोटला जाऊ लागला. मनुष्य इतिहासाच्या पाऊलखुणा विसरू लागला. जिर्ण व पडझड झालेली मंदिरे हटवू लागला. हळूहळू पडझड झालेल्या वास्तु धरणात, गंगेत तर कधी कधी जमीनीखाली दडपून टाकू लागला. जुणी मंदिरे पाडून त्या जुन्या मंदिरांचे पुरावे नवनिर्मित मंदिराच्या पायथ्यातच गाडून त्यावर उभी राहिली ती नवीन मंदिरे. आज जेव्हा मी येथे या पाऊलखुणा शोधू लागलो तर एकच दगडी शिल्प मंदिराच्या उत्तरेला टेकवून ठेवल्याचे दिसले कदाचित ते श्री गणेशाचे शिल्प असल्याने ते ठेवण्यात आले असावे.तसेच दक्षिणेस विरघळ दिसून येते. मंदिराच्या आतील भाग पुरातन वाटतो खरा परंतु तो पुनरस्थापीत करण्यात आले असावे असे वाटते. हेमाडपंती बांधनीतील दगडांचा रिघ मंदिराच्या पुर्वेस ओढ्यात पडलेला दिसतो खरा परंतू येथील कोरीव मुर्ती पहावयास मिळत नाहीत. गावचे ग्रामस्थ श्री. विकास बाजीराव काकडे यांना हेमाडपंती बांधनीतील मुर्ती आजुबाजुला कुठे पहावयास मिळतील का? विचारले असता त्यांनी पिंपळवंडी गावतील मारूती मंदिराच्या चार दिशेला भिंतीला उभ्या केलेल्या मुर्ती दाखवल्या. त्या पाहून मन प्रसन्न झाले. व खात्री पटली कि खरोखरच येथे पिंपळेश्वराचे हेमाडपंती मंदिर होते. या मुर्ती व मंदिराच्या पायथ्याच्या भरावात गाडलेल्या मुर्ती बाहेर काढणे खुपच गरजेचे वाटले. कारण या परीसराचा व गावचा खरा पौराणिक इतिहास फक्त आणि फक्त याच मुर्तींमुळे जीवंत ठेवला जाऊ शकतो.
मी समस्त ग्रामस्थ पिंपळवंडी व मा.आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करेल की आपण हे इतिहासाचे ठोस पुरावे आपल्या गावच्या इतिहासासाठी खुप मौलिक असून त्यांचे संवर्धन करूने गरजेचे आहे. जर ते नष्ट झाले तर निश्चितच गावचा इतिहास पुसला जाईल. या ठिकाणी एक भव्य दिव्य मंदिराची निर्माण करून “पिंपळेश्वराचा” वारसा जपला पाहिजे. याच रस्त्यावर व पुढे काळवाडी व पुढे ऐतिहासिक वारसा लाभलेले उंब्रज गाव असल्यामुळे निश्चितच पर्यटनासाठी एक मोठी उपलब्धी सहज होऊन येथील रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होऊ शकतील.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

 

निसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.

निसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.

हिंगणे दप्तर खंड तिसरा या भारत संशोधक मंडळाने जी बखर लिहीली त्या पुस्तकात ज्या गावच्या ऐतिहासिक मंदिराच्या खर्चाचा उल्लेख मिळतो ते मंदीर म्हणजे जुन्नर तालुक्यातील उब्रज गावचे महालक्ष्मी मंदिर. या गावचा ऐतिहासिक वारसा सुरू होतो ते येथील पुष्पावती व कुकडी नदीच्या संगमाने. येथील धरणात लुप्त झाले ते संगमेश्वराचे मंदिर. येथील ऐतिहासिक वारसा पाहता नवीन गावातील शनि व हनुमान मंदिराच्या समोर असलेली विरघळ लक्ष वेधते. गावकरी या वीरघळीचा उपयोग पाऊस पाडण्यासाठी करतात ऐकून नवल वाटले. ते कसे विचारले असता सांगतात, पुर्वी पासून जर दुष्काळी परिस्थिती उद्भवली की या मुर्तीला पालथे घातले की त्यावर एक वजन ठेवतात. पाऊस पडला की त्या ठेवलेल्या वजनाचा इतकी शेरणी वाटतात म्हणे. विशेष म्हणजे उब्रज गाव एकच होते परंतु येडगाव धरण बांधण्यात आले व येथील गावाचे विभाजन झाले व दोन ठिकाणी विस्तारीत झाले. म्हणून येथे उंब्रज 1 व 2 अशी गावे पहावयास मिळतात. परंतु आजही गावच्या खुना व येथील मंदिरे जशास तशी आहेत. येथील विर नावाचे दगडी शिल्प परीसरात लक्ष वेधून घेते. महालक्ष्मी मंदिर पेशवेकालीन असून खुप काही येथे अभ्यास करण्यासाठी गोष्टी पहावयास मिळतात.
याच गावातून पुर्व पट्यातील आणे व इतर 10 गावांना येथुनच पाईपलाईन द्वारा पाणी पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यातील इतर चार धरणांचे पाणी या येडगाव धरणात आणले जाते. येथील परीसर पाहता आपण बाहेर देशात आहोत की काय असा भास होतो. या परीसरात विषयी जास्त काही लिहीता फक्त छायाचित्रेच येथील सुंदरता सांगून जातात. येथील मळगंगा मंदिराच्या आवारातील वडाचे झाड जवळपास 400 वर्ष जुने असुन आजही ते सुरक्षित आहे. जो एकदा या परिसरास भेट देईल तो निश्चितच वारंवार या परीसराच्या दर्शनास गेल्या शिवाय राहणार नाही. विविध पक्षी या परीसरात विहार करत असल्याने एक विशिष्ट संगिताची धुन पक्षांच्या वानितुन ऐकावयास मिळते.
येथील गद्य गळेचा इतिहास स्थानिकांकडून ऐकून नवलच वाटले. सांगतात जर पाठीची शिर भरली असेल तर या दगडावर झोपल्यावर व्यवस्थित होते व आराम मिळतो. याच गावाला लागुन येडगाव धरणभिंत लाभली असल्याने येथील परीसर नेहमीच हिरवाईचा शालू पांघरलेला दिसतो. संपूर्ण परीसरास उसाचे अच्छादन पहावयास मिळते.
या जुन्या उंब्रज गावचा एक पर्यटन म्हणून जर विकास केला गेला तर निश्चितच येथील तरूण व तरूणींना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील फक्त गरज आहे ती एक चांगल्या प्रकारच्या पर्यटन विकासीत आराखड्याची व गावकर्यांच्या सहभागाची. की ज्यांच्या माध्यमातून साकार होईल एक विकसीत पर्यटन स्थळ. या विकासासाठी मराठाबाणा फेम अशोकजी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती भक्तभवन बांधून सुरूवात झाली आहेच.
या परिसराचा अभ्यास करण्याची संधी डाॅ.राहूल हांडे व महालक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून प्राप्त झाली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. सर्व छायाचित्रे उंब्रज ग्रामस्थांना समर्पित करतो कारण तो आपला अनमोल ठेवा आहे.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)

लेखक/ छायाचित्र :-
श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .+

 

 

ठाकुर द्वार मधुसुदन मंदिर जुन्नर एक आगळी वेगळी कथा. 

ठाकुर द्वार मधुसुदन मंदिर जुन्नर एक आगळी वेगळी कथा
बालाजींची येथील अप्रतिम मुर्ती 
मित्रांनो चार वर्षे झाली जुन्नरची भटकंती करतोय व दिसणारा ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा “निसर्गरम्य जुन्नर तालुका ” या पेजच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता वैयक्तिक जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. खरेतर कुटूंबाच्या सहकार्यामुळेच हे शक्य होतय. फक्त जुन्नर तालुक्यातच ऐतिहासिक वारस्याचे जाळे प्रचंड मोठे असून ते सध्या अस्तव्यस्त स्वरूपात आढळुन येते. ते पुन्हा पुर्ववत माहीतीच्या स्वरूपात विनता येईल का? यासाठी माझा नियमित प्रयत्न असतो. कधीकधी एकाच ठिकाणची माहिती घ्यायची झाली तर वीस वीस दिवस लागतात. कधी कधी तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीने समाधान झाले नाही तर त्यासाठी विशेष तज्ञ व्यक्तींना त्रास देऊन माहिती घ्यावी लागते. अर्थात अशा तज्ञ व्यक्तिंचा अशिर्वाद नेहमीच पाठीवर असताना कोठे अडचण जाणवत नाही हे माझे मोठे भाग्यच. आज जी माहिती मिळाली ती कदाचित आपणास माहीत आहे की नाही हे सांगणे कठीण. परंतु जे काही ऐकले ते मात्र वाचताना आपल्या विचारांना कोड्यात टाकण्या सारखे निश्चितच आहे. मी तर अनेक वेळा विचार केला की हे खरोखरच सत्य असेल का? परंतु शक्यता नाकारता येत नाही हेच मला वाटले.
जुन्नर शहर एका भातखळ्या तलावाच्या किनारी व किल्ले शिवनेरीच्या दक्षिण पायथ्यालगत वसले होते. आजही त्याचे भक्कम पुरावे आपणास तेथे पहावयास मिळतात. मग प्रश्न असा पडतो की सर्वच गाव तेथून दुसरीकडे का गेले असावे? तीच कथा पुढे ऐकावयास मिळाली.
रोगराई व आकस्मिक मृत्यूचे तांडव या भातखळ्या ठिकाणी चालू झाले होते. संपूर्ण परिसर झाडाझुपांनी वेढलेला होता. जागेचा दोष म्हणून काही कुटूंबांनी येथून निघता पाय घेतला होता. जो तेथे राहील तो संकटाच्या भोव-यातच फिरत राहत असे. कुकडी माईचे पाणी येथे उपजिवीकेसाठी जवळ आहे म्हणून लोक (नविन सध्याचे जुन्नर) आहे येथेच झोपडय़ा करू लागले. एक एक करून सर्वजण तेथून नवीन जागी सध्याचे जुन्नर या ठिकाणी स्थलांतरित झाले. मग गावचा देव तेथे कसा राहणार म्हणून गावक-यांनी तो उचलून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणे ती शिळा उचललीच नाही. अथक प्रयत्न केले सर्व व्यर्थ गेले. एकदिवस एका ठाकराच्या स्वप्नात “हा बालाजी” देव गेला व त्यास दृष्टांत दिला, की मला घेऊन जायचे असेल तर नंदी असलेल्या बैलगाडीत घेऊन जा. त्यावेळी फक्त दोनच व्यक्ती मला उचलतील व गाडीत ठेवतील. ती गाडी ज्या ठिकाणी थांबेल तेथेच माझे मंदिर बांधण्यात यावे.
त्या ठाकराने घडलेला प्रकार सर्व ग्रामस्थांना सांगितला. अगदी दृष्टांताप्रमाणेच सर्व काही केले. अगदी अलगतच दोन व्यक्तींनी ती मुर्ती उचलली व बैलगाडीत ठेवली व ती गाडी न हाकता बैले चालू लागली. व बैले आज मंदिर आहे त्या ठिकाणी थांबली. व त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले तो कालखंड होता दिडशे वर्षा पुर्वीचा. ठाकराला दृष्टांत दिला म्हणून मंदिराचे नाव ठाकुरद्वार मंदिर असे देण्यात आले. आहे की नाही कथा विचार करण्यासारखी?
आज जेव्हा मी मंदिर दर्शनासाठी गेलो तर मंदिराच्या दक्षिणेस सती मंदिर, विहिर व समाधी आहे. पश्चिमेस कल्याणपेठ लेंडीनाला आहे. पुर्वेस भास्कर घाट व स्मशान तर उत्तरेस कुकडी नदी. संपूर्ण परिसर शेतीने व हिरवाईचा शालू पांघरलेला आहे. सतीमंदिरांची रचना तर खास आकर्षित करते. येथील दक्षिणेला खोदलेली विहीर फक्त आणि फक्त देवस्नानासाठीच बांधली गेली असल्याचे समजले. यावर मोट किंवा कातडी चमड्याची वस्तू वापरणे बंदी होती. अनेक समाधीस्थळे ठिकठिकाणी विखुरलेली दिसतात. संपूर्ण परिसर सध्या विटभट्यांच्या विळख्याने व्यापलेला आहे. येथील मंदिराची रचना पेशवेकालीन ओळखली जाते व कातळातील मुर्तीची रचना ही मुर्तीकाराने जेंव्हा मुर्ती साकारायला घेतली तेंव्हा त्याच्या समोर इ.स.दुसऱ्या , तिसऱ्या शतकातील लेणीमधील पद्मपाणी यांच्या मुर्त्या नजरेसमोर ठेवून बनविली असावी. अशा मुर्त्या 16 व्या 17 व्या शतकातील भगवान बालाजी ,विष्णु ,केशव ,हरी ,,म्हणूनच महाराष्ट्रात अशा मुर्त्या ओळखल्या जातात अनेक जून्या मंदिरात ह्या पाहयला मिळतात.मुर्तीच्या खालच्या हातात चक्र आणी गदा स्पष्टपणे दिसत आहेत. हीच आठ फुटाची मुर्ती बुलढाणा जिल्हातील मेहकर येथे भव्य मंदिरात आहे. मित्रांनो कधी जुन्नर मध्ये असाल तर या मंदिरास धावती भेट द्यायला विसरू नका.
या माहीती साठी मला श्री.राजेंद्र दामोदर वैष्णव (पुजारी), आशोक भिकू डोके (वैष्णव साधू संप्रदाय शितलगिरी महाराज), लेखक – महेंद्र शेगावकर ,लेखक अशुतोष बापट व लेखक प्र.के घाणेकर सर यांचे शुभाशिर्वाद लाभले त्यांचा मी खुप खुप ऋणी आहे.
(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G व
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)

लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details…

 

 

सोनतीर्थ अर्थात कुकडी नदी उगमस्थान.

सोनतीर्थ अर्थात कुकडी नदी उगमस्थान.
(व्हिडीओच्या माध्यमातून हे दृष्य पहायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा व आनंद घ्या.
https://www.youtube.com/channel/UCIYgK500Nl9uqNClaDckmUg)
अनेकदा आपण जुन्नर तालुक्यातील हेमाडपंती मंदिर #कुकडेश्वरास भेट दिलीच असेल. हे #कुकडेश्वर मंदिर कुकडी नदीच्या दक्षिण
किना-यावर सुंदर अशा आखिव व रेखिव दगडीशिल्पांच्या तोडीत बांधलेले आपणास पहावयास मिळते. विशेष म्हणजे नाशिकच्या त्रंबकेश्वरामंदिरापासून ते खेडच्या भिमाशंकर मंदिरापर्यंत पसरलेल्या अतिशय दुर्गम डोंगराळ भागातील बालाघाट रांगेत जवळपास अशी बारा महाराष्ट्रातील जोतीर्लिंगाची रचना नदी किनारी केलेली पहावयास मिळते. त्याच पैकी असलेले येथील कुकडी नदीच्या काठावरील कुकडेश्वर मंदिर आहे.
#जुन्नर -आपटाळे – चावंड – कुकडेश्वर असा येथे जवळपास 17 कि.मी प्रवास करून पोहचता येते. हे मंदिर भु- लगत असल्याने येथपर्यंत चारचाकी प्रवास करणे सहज शक्य आहे. हा परीसर चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला असल्याने येथील सुंदरतेचे वर्णन कोणत्या शब्दात व्यक्त करावे हेच कळत नाही.
याच मंदिराच्या पश्चिमेस एक दक्षिणोत्तर पसरलेली एक डोंगर रांग निदर्शनास पडते. याच डोंगराच्या मध्यभागी आपणास कुकडी नदिचे उगमस्थान असून येथे पोहचण्यासाठी पुर – शिरोलीमध्ये गाडी पार्क करून चढण्याचा सोपा मार्ग मिळतो. पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे कारण खुप दमछाक करणारी येथील जंगलवाट आहे. साधारण तासा भरात आपण येथे पोहचतो. जाताना निसर्गाच्या विविधतेचे दर्शन घडतेच. सध्या करवंदाच्या जाळ्या भरगोस फळांनी लगडलेल्या असून करवंदाच्या फुलांचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळलेला असल्याने आपणास चालताना तो गंध जाणवतो. विविध वृक्ष व वेलींणी हा परीसर व्याप्त असल्याने विविध पक्षी व प्राणी यांचा हा स्वर्गच आहे की काय असा भास होतो.
कातळकड्यात उंचीवर कोरलेली येथे लेणी असून यामध्ये बसण्यासाठी ओटे कोरलेले आहेत.दोन लहान मोठे शिवलिंग असून पश्चिम भिंतीवर कातळातच एक मुर्ती कोरलेली आहे. साधारण पाच बाय अडीच फुट लांबी व रूंदिची एक टाकी कोरलेली असून तीची खोली साधारण पाच फुट असावी. याच टाकीच्या पश्चिम व दक्षिण किना-यात डोंगरातुन पाण्याची सतत वाहत असलेली नैसर्गिक धार टाकीत पडते व ती पुढे खाली दरीत जाते. याच ठिकाणास सोनतीर्थ संबोधतात. ही सतत वाहणाऱ्या पाण्याची धार वर्षभर वाहत असल्याने कुकडी नदिचे उगमस्थान दर्शवित आहे. येथील दर्शन घेतल्यानंतर निसर्ग लावण्याचा अनुभव घेण्यासाठी आपणास खाली न उतरता आलेली वाट डोंगर माथ्यावर घेऊन जाते. आपल्याला थकवा जाणवत नसेल तर निश्चितच डोंगर माथ्यावरून ढाकोबा, किल्ले जिवधन, किल्ले चावंड, व-हाडी डोंगररांग, शंभू डोंगर, कुकडेश्वर मंदिर परीसर, माणिकडोह धरण, उच्छिलचा तलाव अशी अनेक निसर्गाने नटलेली दृश्य पहावयास मिळतात. परंतु यासाठी वेळ मात्र जास्त लागतो.
याठिकाणच्या सुंदर सोनतीर्थास कधी भेट द्यावयाची झालीच तर नक्कीच वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल अशी सदिच्छा व्यक्त करतो.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री.  रमेश गणपत खरमाळे
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
माजी सैनिक संघ जुन्नर.

खिरेश्वरच्या जुन्नर दरवाजा मार्गे हरिश्चंद्रगड दर्शनासाठी जाताना काय पहाल.

अमृतेश्वर रतनवाडी

अमृतेश्वर रतनवाडी 
नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेने हा भाग समृद्ध आहे. याच ठिकाणीच्या भटकंतीसाठी आज जुन्नरहुन ब्राम्हणवाडा, कोतुळ, राजुर मार्गे सांदण दरीकडे सकाळी 11:30 निघालो होतो. सर्व भुभाग सौंदर्य टिपताना भांडारदरा धरण किणा-याने सांब्रद कडे चाललो होतो. अचानकच सोबत करणारे विनोद तारू सर बोलले सर थांबा ही रतनवाडी आहे व येथेल अमृतेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जाऊया. मी नको म्हणत होतो. कारण तीन वाजले होते व पुढे सांदण दरी पहायला रात्र होणार होती. परंतु येथून सांदण दरी पुढे आठ कि.मी अंतरावर होती. मी संतोष बिरादार व अक्षय साळुंके या परिसरात प्रथमच पाऊल ठेवले होते. रतनवाडी लागताच रस्त्याच्या उजव्या बाजूला मला पुष्करणी निदर्शनास पडली व नकळतच शब्द पुटपुटलो थांबा.
भटक्यांना सदैव आकर्षण ठरणारा भाग म्हणजे सह्याद्री व याच रांगेत वसलेले भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेने हा भाग समृद्ध आहे. या मांदियाळीतच रतनवाडीचे अमृतेश्वराचे कोरीव मंदिर भटक्यांची प्रथमदर्शी पावले पडताच आकर्षित करते.
अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर, रंधा धबधबा ही स्थळे आता पर्यटकांच्या चांगल्याच परिचयाची बनली आहेत. पण या भागाचे खरे सौंदर्य हे या धरणाच्या पल्याडच्या भागात दडले आहे. घाटमाथ्यालगतच्या या भागात उंच डोंगररांगांनी एक वेटोळेच घातले आहे . आकाशाला भिडलेल्या उंच पर्वत-सुळके फना काढताना दिसता. कोकणात कोसळणारे खोल कडे, अनेक घाटवाटा, रतन, अलंग, कुलंग आणि मदन सारखे गडकोट, सर्वोच्च स्थानी विसावलेली ती कळसुबाई, या साऱ्यांवर पसरलेली दाट वनसंपदा, जीवसृष्टी, छोटी-छोटी आदिवासी खेडी, त्यांची संस्कृती आणि या साऱ्यांवर लक्ष ठेवून मधोमध विसावलेला तो रतनवाडीचा अमृतेश्वर!

रतनवाडी पुण्याहून २००, मुंबईहून १८० तर जुन्नरहुन 101 किलोमीटरवर आहे. या दोन्ही ठिकाणांहून भंडारदऱ्यापर्यंत थेट एसटी बससेवा आहेत पण तुरळक प्रमाणात. या भंडारदऱ्याच्या जलाशय पाहिले की शरीरावर आलेल्या थकावटीचे सावट क्षणात दुर होते. जलाशयाभोवतीचा डोंगरदऱ्यांचा आपण खेळ समोर पाहत उभा राहतो व ते सर्व विसरुनच . खरेतर हाच भाग हिंडण्या-फिरण्याचा, निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा, इथला इतिहास जागवणारा. या देखाव्यात शिरायचे असेल, तर धरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने गेलेल्या वाटांवर स्वार व्हावे. या दोन्ही वाटा बरोबर मध्यावर असलेल्या घाटावरच्या घाटघरला जाऊन मिळतात. यातल्या डाव्या हाताच्या वाटेवर आहे रतनवाडी आणि या वाडीत दडले आहे एक देखणे कातळशिल्प अमृतेश्वर! भंडारदरा ते रतनवाडी हे अंतर आहे वीस किलोमीटर. वाडीपर्यंत एसटी बसही धावते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा हा भाग आहे. वाडीकडे निघालो, की सुरुवातीला पाबरगड, घनचक्कर हे ओळखीचे डोंगर हाक देतात. त्यांच्या नंतर मग रतनगड उगवतो त्याच्या त्या खुट्टा नावाच्या सुळक्याला घेत. या खालीच गडाची रतनवाडी. तसे वाडीत येण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. भंडारदऱ्याहून धरणाच्या आतील भागात ये-जा करण्यासाठी लाँच-बोटी धावतात. यातील एकात बसायचे आणि आपल्या भाषेत रतनवाडीचा स्टॉप सांगायचा. कुठल्याही मार्गे आलो, तरी या भागाला पाय लागण्यापूर्वी त्या निळय़ा जलाशयाच्या पार्श्वभुमीच्या काठावरचा अमृतेश्वर, मागची छोटीशी रतनवाडी, त्यामागचा रतनगड, त्याच्या शेजारचा खुट्टा हे सारे निसर्गचित्र पाहणाऱ्याला गुंतवून टाकते. यातून त्या अमृतेश्वराबद्दलची उत्कंठा वाढते आणि मग या धुंदीतच त्या कोरीव वास्तू प्राकाराला आपण सामोरे जातो.
जलाशयाच्या काठावर एखाद्या गायीने पाय दुमडून बसावे तसे हे मंदिर दूरवरून दिसते. जवळ जाऊ तसे त्याचे कोरीव देखणेपण, सुडोल रचना मन खेचू लागते. नंदीमंडप, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. मंदिर वास्तुशैलीतील हे नवलविशेष याच भागातील सिद्धेश्वर (अकोले), हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड) येथेही पाहण्यास मिळते. या आगळय़ा शैलीमुळे नंदीमंडपातून गाभारा आणि त्यानंतर सभामंडप असा आपला प्रवास होतो. आत शिरताच इथले कोरीवपण आपला ताबा घेते. नक्षीदार खांब, कोरीव प्रवेशद्वारे, बाह्य़ भिंतीवरील विविध भौमितीक रचना, आतील भिंतीवरील मूर्तिकाम, छतावरील शिल्पपट हे सारे एकेक करत मंत्रमुग्ध करू लागते. या साऱ्यांवर पुन्हा ते यक्ष, अप्सरा, गंधर्व स्वार झालेले असतात. देव, दानव आणि नरांनीही इथे आपआपली जागा पटकावलेली असते. मैथुन शिल्पेही इथे आहेत. यातील तो समुद्रमंथनाचा देखावा तर अवश्य पाहावा असाच. आतील स्तंभ भरजरी आहेत. गर्भगृहाच्या दारी कीर्तिमुख, शंख, कमळवेलींच्या पायघडय़ा घातल्या आहेत. मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळय़ांची रचना केलेली आहे. सारेच विलक्षण! एखादा लेण्यात फिरल्यासारखे!!
या मंदिराचे शिखरही तेवढेच कोरीव, श्रीमंत! जाळीदार नक्षीचे उभे थर, त्यावर पुन्हा शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृतींची रचना, समोरच्या बाजूस शूकनास..प्राचीन स्थापत्यातील ‘नागर शैली’ अमृतेश्वराच्या देहबोलीवर जागोजोगी विसावलेली. या साऱ्या सौंदर्याचे रसपान करता करता आपल्याच मनाचा गोंधळ उडतो. मग अशा या गोंधळलेल्या अवस्थेतच अमृतेश्वराचे दर्शन घ्यायचे. खरेतर अमृतेश्वराची ही शिवपिंडीही कोरीव अशा पाच थरांपासून बनवलेली होती. पण कुणाच्या तरी डोक्यात खुळ आले आणि त्यांनी देव जुना झाला म्हणून हे दगड बाजूला करत त्या जागी नव्या शिवलिंगाची स्थापला केली. अमृतेश्वराचे दर्शन घेत पुन्हा बाहेर येत त्याच्यावर प्रेमाने नजर फिरवावी. या राईत एखादे रानफुल उमलावे तसे हे मंदिर भासते. त्या जलाशयाच्या काठावर आणि या कोरीव शिल्पासवे खूप सुखद, शांत आणि समृद्ध वाटू लागते. वैशाखाचे तप्त ऊन खात आलेल्या पावलांचा सारा क्षीण नाहीसा होतो. अमृतेश्वराचे दर्शन झाले तरी खरे ‘अमृत’ मात्र अजून आपल्या प्रतीक्षेत असते. मंदिरातून वाडीच्या दिशेने निघावे. शेतीवाडीतून जाणाऱ्या या वाटेवर थोडे अंतर गेलो, की जमिनीलगत साकारलेली एक जलवास्तू तिच्या सौंदर्यात बुडवून टाकते. पुष्करणी! नावाप्रमाणेच सुंदर! आपल्याकडे आड, विहीर, तलाव, तळी, टाकी अशी पाण्याशी नाते सांगणाऱ्या अनेक वास्तू आहेत. या साऱ्यांतील देखणी, कोरीव श्रीमंती लाभलेली वास्तू म्हणजे पुष्करणी! देवांचा सहवास लाभलेली ही जलवास्तूची निर्मितीही त्या देवांसाठी. प्राचीन मंदिराच्या भवतालात ही अशी पुष्करणी हमखास दिसणार. या पुष्करणीची निर्मितीही या अमृतेश्वराच्या रहाळात झालेली. सौंदर्य आणि पावित्र्य यांचा एकत्रित मिलाफ असलेला मंदिरानंतरचा हा दुसरा वास्तुप्रकार. त्याच्या ‘पुष्करणी’ या शब्दाएवढाच दुर्मिळ!

अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद. जमिनीलगत कोरीव, आखीव-रेखीव अशी तिची रचना. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या. आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले. भोवतीच्या भिंतीत सालंकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली. त्यांच्या डोईवर पुन्हा छोटय़ा-छोटय़ा कोरीव शिखरांची रचना. या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार विसावलेले. ही सर्वच शिल्पे पुन्हा सालंकृत. ही जलवास्तू जेवढी देखणी, तितक्याच नितळ पाण्याचीही तिला साथ मिळालेली. यामुळे की काय अमृतेश्वराच्या त्या भव्य शैल मंदिराने जसे सारे अवकाश व्यापल्यासारखे वाटते तेच सारे निळे रंग इथे या पाण्यावर विश्रांतीला आल्यासारखे वाटतात. कुठल्याही स्थापत्याला असे निसर्गाचे कोंदण मिळाले, की ते अजून खुलते. प्रसन्न होते. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. या कथांमधून बाहेर येत खरा इतिहास शोधू लागलो, की आपल्याला दहाव्या शतकातील झंज नावाच्या राजाजवळ येऊन थांबावे लागते. या झंज राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थळी एकेका सुंदर शिवालयाची निर्मिती केली. यातील प्रवरा नदीच्या उमगस्थळीचे हे अमृतेश्वर!

पूर्वजांच्या या कलासक्तीचे कधी-कधी खूप कौतुक वाटते. ..आज हजार एक वर्षे उलटून गेली. काळही बराच पुढे सरकला. इथले हे निर्माणही आता एक इतिहास झाला. इथल्याच निसर्गाचा एक भाग बनला. अगदी त्या डोंगर-झाडी, निर्झर पाण्याप्रमाणे..!
हे सर्व न्याहाळत आम्ही सांदण दरीकडे मार्गस्थ झालो.
(अभिजीत बेल्हेकर यांच्या लेखाचा आधार घेऊन हा लेख लिहिला आहे )
लेखक / छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश 
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका . 

 

 

 

 


 


 


जुन्नर तालुक्यातील वडज खंडोबा मंदिरात दडलय लाख मोलाचे सोने.

जुन्नर तालुक्यातील वडज खंडोबा मंदिरात दडलय लाख मोलाचे सोने.

जुन्नर तालुक्यातील इतिहास किती नाविन्य पूर्ण आहे याची माहिती मी आपणास “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” या फेसबुक पेज माध्यमातून नेहमीच अवगत करत आलो आहे आणि ही माहिती आपल्या सारख्या वाचकांनी अगदी डोक्यावर झेलून धरल्याने मला खुपच अत्यानंद होत आहे. मला नेहमीच इतिहास काय होता तो सांगण्याऐवजी तो इतिहास आज किती व कसा टिकून आहे हे सांगायला आवडतो. म्हणून आपणास आज वडज खंडोबा मंदिरातील लाख मोलाचे सोने याच माध्यमातून वाटायचे आहे. मंदिरातील इतिहास या आधी पेजवर मांडला आहे परंतु बाकी लाख मोलाचे सोने सांगायचे राहूनच गेले त्याचे कारण म्हणजे योग्य संशोधन होत.
मला माहिती आहे की आपण या मंदिरात हजार वेळा गेला खरे परंतु हे सोने आपणास कधी दिसलेच नसणार. ते येथे कसे? ते खरच दुर्मीळ आहे का? नाणेघाटातील दगडी रांजणाचा छोटा भाऊ येथे का बर असावा? असे कितीतरी प्रश्न विचारला करायला भाग पाडतात.
मित्रांनो वडज खंडोबा मंदिराच्या जिर्णोध्दारात त्याची मुळ प्रतिमा धुळीस मिळाली. सिमेंटचा लेप देऊन त्यांचे पौराणिकत्व लुप्त झाले. आज पाहणारा या मंदिराकडे एक नवनिर्माण मंदिर म्हणुन पाहतो खरा परंतु हा लेप जर काढला तर भिमाशंकराच्या मंदिरानंतर दगडी तोडीतील सर्वात मोठे मंदिर म्हणून हे पुन्हा उदयास येऊ शकते. असो.
या मुख्य मंदिराच्या बाहेर दक्षिणेस एका झाडाखाली असलेले शिल्प मात्र लक्ष वेधून घेते. हे शिल्प जवळपास फक्त याच ठिकाणी दिसून येते. लेण्याद्री चा गिरिजात्मज व ओझरचा विघ्नहर्ता या ठिकाणी हे शिल्प असायला हवे होते परंतु ते येथे कसे? हा प्रश्न पडतो. कारण हे शिल्प आहे ते गणेशाच्या असणाऱ्या दोन पत्नी रिद्धी आणि सिध्दी यांच्या समवेत. यावरून गणेशाच्या परिवारातील झाले ला प्रकार आपणास माहितच आहे. गणेशाच्या लग्ना आधी शंकर पार्वतीने मुलांचा वाद मिटविण्यासाठी लग्न कुणाचे आगोदर होणार यावर उपाय म्हणून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण जो करेल त्याचे लग्न आधी होणार ही युक्ती शोधून काढली व गणेशाच्या चातुर्याने आपल्या वेद आणि शास्रात जो कोणी आपल्या मातापित्यांना प्रदक्षिणा घालेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळेल आणि तुम्ही जर हे अमान्य कराल तर तुम्ही वेदसुध्दा अमान्य करता आणि तुमचा अवतार सुद्धा. हे जेव्हा मातापित्यांना सांगितले तेव्हा याच रिद्धी, सिद्धीशी गणेशाचा विवाह संपन्न झाला. आज तेच शिल्प म्हणजे पौराणिकतेचे लाख मोलाचे सोने येथे मला पहायला मिळाले.
तसे जर पाहीले तर प्रदेशानुसार श्रीगणेशांच्या पत्नी बदललेल्या दिसतात. उत्तर प्रदेशात त्या रिद्धी सिद्धी म्हणुन ओळखल्या जातात आपल्याकडे विवाहित आणि दोन पत्नी असणारा गणेश मात्र दक्षिणेत ब्रम्हचारी आहे. तरी पण दक्षिणेकडे अनेकदा त्या सिध्दी, बुध्दी असतात व त्या गणेशाच्या सकारात्मक शक्ती मानल्या जातात.
जेव्हा हे शिल्प मी पाहिले तर येथील इतिहास एवढाच आहे की तो काळरूपाने बदलत गेला हे मात्र सांगणे कठीण झाले. कारण या मंदिराच्या चारही बाजूंनी असलेली भक्कम दगडी तटबंदी व प्रशस्त लाकडी दरवाजा याची आजही सिमेंटच्या लेपात साक्ष देत उभा आहे.
मंदिराच्या बाहेर प्रदक्षणा पुर्ण करत जेव्हा बाहेर पडलो तर आजून एक आश्चर्य वाटले. मी अनेक मंदिरे पाहीली परंतु कोणत्याही मंदिरात मी दगडी रांजण पाहीला नाही. नाणेघाटात असलेला दगडी रांजण मोठा आहे परंतु त्याच्यासारखाच परंतु छोटा रांजण येथे पहावयास मिळातो. तो कधी कोरला गेला असावा? तो येथे ठेवण्यात का आला असावा? येथेही जकात वसुली केली जायची का? या मंदिराचा इतिहास नाणेघाटाशी निगडीत तर नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. याचे संशोधन करणे गरजेचे आहे. आणि खरच हे मंदीर या गोष्टीचा उलगडा करेल का? हा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
वडज ग्रामस्थ गेली अनेक वर्ष या मंदिरास ‘ब’ दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि खरोखरच जुन्नर तालुक्यातील श्रध्दास्थान म्हणून प्रत्येक जण या मंदिराची भक्तीभावनेने पुजा करत आला आहे व करत आहे.
निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज परिवारातर्फे विनंती असेल की या वडज खंडोबा देवस्थानास ‘ब’ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी प्रत्येकजणाने पुढाकार घेऊन येथील वास्तुच्या लौकिकाला हातभार लावावा ही सदिच्छा.
लेखक / छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश 
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक :- वन विभाग जुन्नर
उपाध्यक्ष :- शिवाजी ट्रेल
सदस्य :- माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
संस्थापक :-निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज

श्री. क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान – नागापूर

श्री. क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान – नागापूर 

लहानपणी अनवाणी नऊ कि.मी अंतर चालत चालत खोडदवरून या थापलिंग दर्शनासाठी यायचो. पंचक्रोशीतील सर्वच कुटुंबियांच कुलदैवत म्हणजे थापलिंगचा खंडोबा. जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याचे श्रद्धास्थान म्हणुन नावलौकिक असलेल्या या खंडेरायावर जीवापाड प्रेम करणारे येथील भक्तगण जानेवारी महिन्यातील पौर्णिमेस मात्र दरवर्षी कुटूंबानिशी यात्रेत न चुकता भंडार खोबरे उधळण्यासाठी हजर असल्याने या परिसरास कुंभ मेळ्याचेच स्वरूप प्राप्त होते व हा परिसर भंडारा उधळल्याने सोनेरी रूपात दर्शन देऊन जातो. आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावास लौकिक प्राप्त झाला तो या खंडेरायाच्या पाऊल स्पर्शाने व वास्तव्याने. घोड नदिच्या उत्तर किना-यावर वसलेले हे छोटे परंतू शेतीप्रधान परिपूर्ण गाव. या गावच्या दक्षिणेस अगदी अर्ध्या कि.मी अंतरावर एक छोट्याश्या डोंगरावर या खंडेरायांच जागृत देवस्थान अगदी सहज निदर्शनास पडत. पावसाळ्यात तर ही डोंगरांग जेव्हा हिरवाईचा शालू नेसते तेव्हा म्हाळसा जणू खंडेरायास नटून थटून भेटण्यासाठीच आली आहे की काय असा भास होतो.
बैलगाडा शर्यत म्हणजे येथील सर्व भाविकांचा जीव कि प्राण होता. बैलगाड्यांवर आलेली बंदीने येथील यात्रेचे स्वरूपच बदलून गेले. बैल प्राण्यांवर मायेचे हाथ व थाप बळिराजा हमखास आपल्या गाड्याच्या बैलांवर टाकताना दिसत असे. खरेदी विक्री त बैल चांगला व तरबेज असला की बळीराजाला आर्थिक परिस्थिती बदलण्यास मदतगार साबित होत असे. एकच बैल पाळायचा व तोंडातला घास आजोबा त्याला देताना मी पाहीले आहे. अनेकदा त्याची विक्री करताना त्याच्या कुटूंबाच्या डोळ्यात पाणी येताना पण अनुभवल होत. त्याला विकुन मिळालेल्या पैशातून बळीराजाच्या कुटूंबाच्या पोरीच लग्न, ऑपरेशन, शाळा अशा अनेक अडचणी हा जीवापाड जपलेल्या बैल विकुन या मंडळीना सहारा मिळत असे. परंतु आज जेव्हा या बैल घाटावर मी गेलो तेथे फक्त एकच शब्द काणी येत होता भिर्र… झाली……. परंतु प्रत्यक्ष मात्र तो घाट पुन्हा येथे हा परीसर बैलांनी सजेल का या प्रतिक्षेची वाट पहाताना दिसला. येथील यात्रेचा मुख्य कणा म्हणजे येथील बैलगाडा शर्यतच होती व आज मोडल्याने येथील स्वरूप बदलले आहे.
जुन्या बांधनिचे हे मंदिर असून खंडोबा व म्हाळसाच्या गाभार्‍यातील मुर्ती भक्तांना आशिर्वाद देताना दिसतात. जेजुरीच्या खंडेरायाला ज्या भाविकांना जाणे शक्य होत नाही तेव्हा तेच दर्शन येथे घडते. बाहेर उभी असलेली दिपमाळ येथील पौराणिक इतिहासाची आठवण करून देते. यात्रेतील दुकानांसाठी बांधलेले ओटे, भक्त निवास व टोलेजंग मंदिर वेस येथील सुंदरतेत अजूनच भर घालते. नागापूर ग्रामस्थांनी येथील निसर्ग देवतेला फुलवण्यासाठी सोनचाफा आदि वृक्षलागवड गडावर केल्याने अभिमान वाटतो कारण कोणत्याही देवस्थानापाशी आपण जातो तेथे देवराई ही हमखास असायची परंतु ती या वर्षी निर्माण करण्याचे काम हाती घेतल्याचे जानवले.
गडाच्या पुर्वेला जवळच भिमाशंकर सहकारी साखर कारखाना येथील परिसरास गोडी निर्माण करत असून गडाच्या पश्चिमेस पायथ्याशी जागतीक महादुर्बिण विज्ञानात मानवाच्या प्रगतीचे पुरावे दर्शवित आहे. अशा या नयनरम्य वातावरणात एक फेफटका व देवदर्शन घेताना सुखाचा झरा ह्रदयातून वाहू लागतो. यासाठी थोडा वेळ काढा व कुटूंबातील सर्वांना येथील भुमीचे दर्शनासाठी घेऊन जा.
बोला येळकोट येळकोट जय मल्हार.
सदा आनंदाचा येळकोट
लेखक/ छायाचित्र
श्री.खरमाळे रमेश 
(माजी सैनिक खोडद)
वनरक्षक – जुन्नर
उपाध्यक्ष- शिवाजी ट्रेल
मो.नं 8390008370