Category Archives: किल्ले

किल्ले निमगीरी

 1. किल्ले निमगीरी उर्फ हनुमान गड – Nimgiri
  किल्ल्याची ऊंची : 2900 ft
  किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
  जिल्हा : पुणे
  डोंगररांग:नाणेघाट
  श्रेणी : मध्यम
  सह्याद्रीच्या बालाघाट रांगेची निसर्गाच्या लावण्याची उधळण प्राप्त असलेली ही पश्चिम व पूर्व पसरलेली रांग आहे. ती पुणे, अ.नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतुन एक देखण्या कड्यांची रेषा निर्माण करत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प व हेमाडपंती मंदिरे आहेत, माळशेज, दर्या्घाट, नाणेघाट,
  साकुर्डीघाट असे अनेक सौंदर्यमय घाट वाटा आहेत. तर जीवधन, चावंड, निमगिरी, हडसर,सिंदोळा हरिश्चंद्रगड,कुंजरगड, पाबर, कलाड,आणि भैरवगड
  सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगड एकटाच
  उजवीकडे असून बाकी सर्व डावीकडे आहेत असे म्हणावे लागेल. हरिश्चंद्रगडाच्या एकदम समोर सिंदोळा व त्या समोर निमगिरी किल्ला आहे. श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसरी सुरतेची लुट याच निमगिरी च्या पाऊलवाटेने केली व पुढे शत्रुसैन्याची भनक कानी येताच याच मार्गावर असलेल्या कुकडी नदीच्या पात्रातील डोहात ती लुट बुडवून ते निश्चिंत होऊन पुण्याकडे रवाना झाले. आज याच डोहाचे नाव माणिकडोह म्हणून जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध असून याच नावाने माणिकडोह धरण बांधण्यात आले व येथेच बिबटय़ा निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
  पाहण्याची ठिकाणे : किल्ला चढाई करताना गडपायथ्याला प्रथमच आपणास अतिशय पुरातन हनुमानाचे दगडी शिल्प व जुनी देवराई दर्शन व या देवराईत अगदी एकमेकांना चिकटून असलेली 50 थडगी येथे घडलेला नरसंहारच बयान करतात. तेथे जवळपासच 9 व्या शतकातील पुष्करणी संपुष्टात आलेली शिल्पे पहावयास मिळते. किल्ल्याच्या
  पाय-यांची रचना कातळात केलेली असून या पायर्‍या शत्रुसैन्यांना दिसुन येऊ नये म्हणून दोन्ही बाजूंनी कातळ भिंती आहेत. या पायर्‍या आपणास उजवीकडच्या डोंगरावर घेऊन जातात.ही वाट दोन डोंगरांना एकत्र जोडते. परंतु ही वाट पश्चिमेकडील भाग म्हणजेच हनुमान गड होय.पडझड होऊन लुप्त झालेल्या दरवाजाच्याच बाजूला पहारेकर-यांच्या खोल्या पडझड अवस्थेत दिसून येतातत. गडमाथ्यावर 7 ते 8 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत.यापैकी दोन टाक्यांतील पाणी पिण्यास योग्य आहे. तर उध्वस्त केलेल्या वास्तुंच्या मिटलेल्या खुणा चौथ-यांमुळे निदर्शनास पडतात. किल्याच्या बालेकिल्ल्यावर भग्न अवस्थेतील शिवमंदिर असून शिवपिंड व गजांतलक्ष्मी शिल्पाची पुजा करताना येथील भाविक दिसतात. गजांतलक्ष्मी शिल्पे जुन्नर तालुक्यात सर्वत्र म्हणजे पुर्वेला बोरी शिरोली पश्चिमेला नाणेघाट, उत्तरेला निमगिरी तर दक्षिणेला घंगाळधरे या ठिकाणी असून एकूण सहा शिल्पे आढळतात. जेथे धनसंपत्तीचा ढिग असेल अशाच ठिकाणी या शिल्पांचा वापर त्यावेळी प्रवेशाव्दाराला केला जात असे.त्यातील एक शिल्प येथे आढळते. पर्व दिशेला पडझड झालेल्या दुरावस्थेत काही लेणी आहेत. पैकी दोन लेण्यांमध्ये एक एक खोली आहे. यात ५ त ६ जणांना मुक्काम करता येतो. परंतु एक लेणी पुर्व डोंगर कपारीत अर्ध गाडलेली दिसून येते परंतु तेथे जाण्याचा मार्ग दिसत नाही हे एक आश्चर्य वाटते. मग येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग होता का? तो काळाच्या ओघात गाडला गेला असेल का ? असे प्रश्न पडतात. किल्याच्या बालेकिल्ल्यावरून किल्ले शिवनेरी, सिंदोळा,जिवधन, चावंड तसेच हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला, तारामती शिखर आणि टोलारखिंड दिसते. दोन्ही बाजूने असलेले पिंपळगाव जोग धरण व माणिकडोह धरण या किल्याच्या सौंदर्यात भर घालतानाचे अलौकिक दृश्य दिसते.
  किल्ल्याच्या पश्चिमेस असलेल्या हनुमान गडावर २ पाण्याच्या टाक्यांशिवाय तटबंदी व याच तटबंदीत कोरलेल्या दरवाजा रूपी वास्तुत एक वेगळेपण असून त्याच्या चौकटीवरील गोलाकार व त्याला वर दिलेली शेंडी याचा अर्थबोध होत नाही.येथे खुपसारा इतिहास गाडलेला पहावयास मिळतो. तो उजाडात येणे खुप गरजेचे आहे. हनुमान गडाच्या बालेकिल्ल्यावर एक दगडी राऊंड भिंत बांधलेली असून ती संपूर्ण उध्वस्त झाली आहे. संपूर्ण किल्याची तटबंदी नामसेस झाली असून उर्वरित ठिक ठिकाणी असलेल्या तटबंदीच्या संवर्धनासाठी वेळीच पावले उचलली गेली नाही तर त्या इतिहासाच्या खुणा कायमस्वरूपी नष्ट होतील.

संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी लागणारा वेळ: – १ तास

 • किल्यावर पोहोचण्याच्या वाटा : मुंबई मार्गे – मुरबाड – माळशेज – मढ – बागडवाडी – निमगिरी
  पुणे मार्गे – जुन्नर – हडसर – निमगिरी
  माळशेज घाट पार केल्यावर दोन किमी वर खुबी फाटा आहे. त्याच्या पुढे ४ किमी वर वेळखिंड लागते. वेळखिंड संपली की मढ पारगाव नावाचे गाव आहे.
  या पारगाव वरुन एक रस्ता उजवीकडे जातो.
  तो बोरवाडी – मढ मार्गे निमगिरी कडे जातो. हाच
  रस्ता पुढे हडसरला पण जातो. पारगाव पासून निमगिरी ७ किमी वर आहे.
  छायाचित्र / लेखक श्री. खरमाळे रमेश
  (माजी सैनिक खोडद)
  उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
  निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज
  मो.नं – 8390008370

३५ पर्यटकांची थरारक व धडकी भरवणारी वानरलिंगीवर झेप एक नवीन विक्रमाची नोंद.

३५ पर्यटकांची थरारक व धडकी भरवणारी वानरलिंगीवर झेप एक नवीन विक्रमाची नोंद.

आज “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुज पेज व रेंज अॅडव्हेंचरच्या माध्यमातून जीवधन ते वाणरलिंगी (खडापारशी) २५० फुट व्हॅली क्रॉसिंग तसेच ३३० फुट रॅपलिंगचा भर उन्हाळ्यात अनेक हौसी पर्यटकांनी प्रत्यक्ष थ्रिल थराराचा रोमांचक , धडकन वाढवणारा आनंद घेतला. या मध्ये 7 महीलांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यामध्ये खोडद गावच्या पाच महिलांनी सहभाग घेऊन जुन्नर तालुक्यात एक वेगळाच इतिहास रचला. या वानरलिंगीवर जुन्नर तालुक्यात प्रथमच या पाच महिलांचे पाउल पडले व यांनी आपल्या भागातील इतर महिलांनी असा धाडसी सहभाग नोंदवावा हा संदेश दिला.
आज या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग करण्याचं नवीन रेकॉर्ड रचलं गेलं.३५ ट्रेकर्स ने हि २५० फूट लांब व्हॅली क्रॉस केली व ३३०ल रॅपलिंग केली. हि व्हॅली अतिशय धडकी भरवणारी व भयानक असल्याने सहजासहजी ट्रेकर या व्हॅली क्रॉसिंग इव्हेंट उपक्रम राबवत नाहीत. २०१४ ला पुण्याच्या एका ग्रुप ने हि व्हॅली क्रॉस केल्याची नोंद आहे त्यांच रेकॉर्ड होत २५ गिर्यारोहकांच. त्यानंतर २००८ ला काहींनी हा प्रयत्न केला होता. मात्र आज त्यापेक्षा जास्त म्हणजे 35 पर्यटकांनी हा थरार अनुभवला. …आणि या रेकॉर्डचे आम्ही साक्षीदार आहोत….माळशेज रांगांमध्ये नाणेघाटाच्या कुशीत जीवधनाच्या सोबतीला असलेली वाणरलिंगी गेली अनेक दिवस ऊन, वारा पाऊस झेलत आहे…या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारा असतो आणि पाऊसही यांमुळे वाणरलिंगी ला मधोमध उभे आणि खालच्या बाजूला आडवे तडे गेले आहेत…भविष्यात किती ट्रेकर यावर क्लायबिंग व रॅपलिंगचा आणि क्रॉसिंगच्या थराराला जातील याचा अंदाज सांगू शकत नाही. मला हे रेकॉर्ड पर्यटकांना सहभागी करून घेऊन हा उपक्रम राबविण्याचा विलक्षण आनंद होत आहे. सहभागी सर्व पर्यटकांचे खुप खुप आभार व अभिनंदन.

श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
“निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज

 

 

 

 

शिवाजी ट्रेलची दुर्गसंवर्धनाची मराठा सिंडिकेटला किल्ले चावंडवर नवी दिशा.

शिवाजी ट्रेलची  दुर्गसंवर्धनाची मराठा सिंडिकेटला किल्ले चावंडवर नवी दिशा.

उन्हाळा सुरू झाला की दुर्ग संवर्धकांची दुर्गसंवर्धनासाठी चातका प्रमाणे पाहीलेली वाटच होय. रखरखत्या उन्हाळ्यात ४० डिग्री सेल्सिअस तापमानात उरावर चढाई करून किल्ला सर करत छत्रपतींचा लाभलेला वारसा निस्वार्थ जपण्याची धडपड करणारी मंडळी वाहत्या घामाच्या धारांत हातात टिकाव खोरे घेऊन का बर धडपडत असतील याचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. निव्वळ छत्रपतींच्या नावाने घोषणा देणे म्हणजे आम्हाला छत्रपतींविषयी किती जिव्हाळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. परंतु आम्हाला प्रत्यक्षात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज किती कळाले व त्यांचा वारसा आपण कितपत जपत आहोत व त्याचे अनुकरण स्वतः करत आहोत का? हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर आपले मनच आपल्याला खरे उत्तर देऊन जाते.
कालच मुंबई मधून १२० मराठा सिंडिकेटचे मावळे किल्ले चावंडवर प्रथमतःच दुर्गसंवर्धनासाठी आले होते. त्यांना दुर्गसंवर्धनासाठी “शिवाजी ट्रेलच्या श्री. विनायक खोत, श्री विजय कोल्हे, श्री. हर्षवर्धन कुर्हे व श्री. रमेश खरमाळे यांच्या वतीने किल्ले संवर्धन कसे करावे, ऐतिहासिक वास्तूंना वीजा न पोहचता काय उपाययोजना कराव्यात, पाण्याच्या टाक्यांतील काढलेली माती एका जागी का स्टोर करावी व ती खोदत असताना कोणती काळजी घ्यावी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून संवर्धनास श्री. अर्जुन म्हसे पाटील (उपवनसंरक्षक जुन्नर) यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तसेच जिवनात जैवविविधतेला असलेले महत्व हे मार्गदर्शन त्यांनी केले व संवर्धनास प्रारंभ करण्यात आला.
किल्ले चावंडवर असलेल्या पुष्करणीची स्वच्छता व त्यामधील गाळ काढण्यात आला तर पिण्याच्या पाण्याची वर्षेभर पर्यटकांची सोय व्हावी म्हणून खांब टाक्याकडे जाणारी वाट निर्माण करून टाक्याची स्वच्छता करण्यात आली तसेच गडावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक यांना गड परिसरातुन मुक्त करण्यात आले. गेली पाच वर्षे शिवाजी ट्रेल या किल्ले चावंडवर संवर्धन करत असून अनेक विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या संवर्धनातुन उदयास आणत आहे. ही निस्वार्थ सेवा प्रत्येकाच्या हातुन घडावी हाच शिवाजी ट्रेलचा मानस आहे. ऐतिहासिक वारसा पिढ्यानपिढ्या सतत टिकून रहावा व याच माध्यमातून श्री शिवछत्रपती शिवराय व त्यांचे विचार अजरामर व्हावेत हीच सदिच्छा शिवाजी ट्रेल उदराशी ही छोटीशी आशा घेऊन हे संवर्धन कार्य करत आहे. मराठा सिंडिकेट व परिवाराचे या कार्यासाठी विषेश आभार.
Iiजय शिवराय iI
श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल

 

किल्यांवरील पाणपोडी, न्हाणपोडी व पुष्करणी पाण्याच्या टाक्यांची महती.

किल्यांवरील पाणपोडी, न्हाणपोडी व पुष्करणी पाण्याच्या टाक्यांची महती.

ऐतिहासिक वारसेतील व स्वातंत्र्याचे खरे माणबिंदू असतील तर ते गडकोट किल्लेच होय. आणि मानवतेच्या तंत्रज्ञान विकासाची साक्ष म्हणुन ज्यांची ओळख आहे त्या म्हणजे लेण्या.
लेण्या आणि किल्ले या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू. ज्या प्रमाणे शिवराय आणि गडकोटांचे एक घट्ट नाते आपण विसरू शकत नाही तसेच लेणी आणि किल्ले यांचे ही घट्ट नाते आपल्याला विसरता येणार नाही. लेणी म्हटले की मानवाने बुद्धीचा केलेला सुयोग्य वापर. विज्ञान युगातील प्रारंभीच्या काळाची सुरूवात मानवाने येथुनच केली असावी असे म्हणणे वावगे ठरणार नाही. याच गोष्टींची प्रेरणा घेत घेत मानवाने विज्ञानात प्रगती करत आकाशाला गवसणी घातली.
मानवाच्या मुलभूत गरजांची पुर्तता ज्या ठिकाणी होईल अशा ठिकाणांची निवड करत आदिमानव ते विकसनशील मानव ही दरी दुर करत एक उच्चांक मानवाने प्रस्थापित केला.
सजीव सृष्टीवरील हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळावे या हेतूने अनेक औजारांची मानवाने विचारांची दुक्कल लढवत निर्मिती केली व या औजारांचा विनियोग मानव त्याच्या चाणक्ष बुध्दीने करू लागला. सर्वात महत्त्वाचे विषय मानवाने स्वतःसाठी निवडले ते म्हणजे संरक्षण व उपजिवीका.
येथे एक मुद्दा मला प्रकर्षाने लिहावसा वाटतो की मानवाचे आदिमानव निर्मिती दरम्यान झालेले बदल हे असंख्य वनस्पतींचा वापर करतच होत गेल्याने त्या वनस्पतींचा वापर खाद्य म्हणून कसा केला जाऊ शकतो तसेच औषधी उपयोग हे अवगत ज्ञान नैसर्गिकतेनेच मानवाला बहाल केले होते. त्यामुळे त्या कालखंडात वनौषधी देणारे वैद्य अस्तित्वात होते. परंतु मानवाच्या परिपूर्ण अवस्थेत बदल झाला व मानव नवनवीन शोधासाठी फिरू लागला.
पाण्याचे महत्त्व हे आपल्यासाठी किती महत्वाचे आहे. ते आपल्याला वर्षभर जाग्यावर उपलब्ध झाले पाहिजे यासाठी मानवाने लेण्या कोरल्या. जेथे निवारा तयार केला तेथेच पाण्याची व्यवस्था मानवाने करण्यासाठी सुरूवात केली. व या विचारांनी मानवाने खडकात पाण्याच्या टाक्या कोरण्यात यश मिळविले. परंतु या टाक्या उघड्या असल्याने त्यातील पाणी शेवाळे व अन्य कचरा व ते पाणी सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने लवकरच दुर्गंधी होऊ लागले. ते पिण्या योग्य नसल्याचे पाहून मानव त्याचा वापर धुणीभांडी व इतर वापरासाठी करू लागला व या टाक्यांना आज आपण न्हाणपोडी या नावाने ओळखतो.
मानवाने दुसर्‍या टाक्या खडकाच्या आत कपारी मार्गात सुर्य प्रकाशाच्या संपर्कात यांचे पाणी येवू नये व ते पाणी वर्षभर पिण्या योग्य राहील याची दखल घेऊन कोरलेल्या. त्यांना आपण आज पाणपोडी या नावाने ओळतो. व हे पाणी आपण किल्यांवर गेल्यावर पिण्यासाठी वापरतो. हे पाणी अतिशय चविष्ट व अनेक आजारांवर पण औषध म्हणून काम करते. याचे कारणही तसेच आहे की अनेक औषधी वनस्पतींवर पावसाचे पडलेले पाणी या टाक्यांमध्ये झिरपून साचल्याने ते पाणी औषधाचे काम करत असते.
अंतराळातील येणाऱी पाॅजीटीव्ह तरंगे ज्या ठिकाणी एकत्र येतात ती जागा म्हणजे त्या वेळी साकारलेली पुष्करणी होय. की ज्याच्या पुर्व,पश्चिम व दक्षिणेला ब्रम्हा, विष्णू व महेश यांचे मंदिर बांधले जायचे व मध्यभागी चारही दिशांना आतल्या बाजूला उतरत्या पायर्यांची रचना करून पाण्याची टाकी बांधली जायची की जिच्या तळापर्यंत खाली उतरने सोपे होते. या टाकीच्या पाण्यात मनुष्य अंघोळ करून स्वतःला शुध्द करत देव दर्शन करत असे.
अशा स्वरूपाची रचना आपणास फक्त आणि फक्त गडकोट किल्यावरच पहावयास मिळते. परंतु याचा उपयोग काय? हा प्रश्न नियमित पडत असेलच नाही का? बौद्ध भिक्षूक किंवा किल्यावरील राबता किती मोठ्या प्रमाणात असावा हे जर माहीत करून घ्यायचा असेल तर आपणाला या पाण्याच्या टाक्याच सांगून जातात.
मी आपणास जुन्नर तालुक्यातील लेणी समुह व सात किल्ले शिवनेरी, नारायणगड, चावंड, जीवधन, हडसर, निमगीरी व चावंड यांच्या कुशीत असलेल्या या तिनही पाणी संग्रहाचे छायाचित्र आपल्या दर्शनासाठी माहीती सह देत आहे परंतु कधी येथे आलात तर यामध्ये एक गम्मत म्हणून एक छोटासा दगड,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या किंवा कचरा टाकण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. आपली ही साथ एक संवर्धनासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.

लेखक /छायाचित्र श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद )
निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज

किल्ले शिवनेरी कमानी टाके

पुष्करणी चावंड

सिंदोळ

किल्ले जीवधन

किल्ले शिवनेरी गंगा जमुना टाके

 

चावंड किल्ला

चावंड किल्ला
मराठीशाहीच अस्तित्व निर्माण करणारे म्हणजेच किल्ले. याच किल्यांच्या जोरावर आपले साम्राज्य स्थापन करून सुराज्याच स्वराज्य निर्माण करणारा जगातील एकमेव राजा ठरला तो राजा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज होय. सह्याद्रीच्या निधड्या छातीवर या मातीत जन्माला आला तोच हाच रयतेचा राजा. माझा मावळा बलदंड व बळकट होऊन शत्रूला आपल्या कर्तुत्वाने घाम फोडुन त्याला धडा शिकवेन व शंभराच्या बरोबर हा एक ठरेल अशी ताकद निर्माण करायची असेल तर ती याच सह्याद्रीच्या मातीत आहे हे शिवबांनी हेरले व अनेक किल्ले या सह्याद्रीच्या अंगावर उभे केले. याच सह्याद्रीवर उभा असलेला किल्ला चावंड उर्फ पर्वतगड होय. या किल्याच्या शिखरावरून शिवनेरी, जिवधन, निमगिरी,हडसर, सिंदोळा किल्यांचे मनमोहक दृश्य पाहून जुन्नर तालुक्यातील पसरलेल्या सात सह्याद्री रांगांचे दर्शन घडते.
जुन्नर पासून चावंड किल्ला 15 कि.मी अंतरावर असून चावंड गावात पोहचण्यास साधारण 30 मिनीटे लागतात. परंतु येथे मोबाईल फोन सेवा नेटवर्क अभावी बंद असते. आपली वाहने चावंड गावात किंवा किल्याच्या पायथ्याला पार्क करावीत.
पुर्वीचा अतिशय अवघड वाटणारा व गावानेच अवघड शब्द वापरून भितीदायक ठरवलेला हा किल्ला आज वनविभागाने केलेल्या पायर्‍या व शिवाजी ट्रेल आणि वनविभागाने केलेल्या रॅलिंगमुळे फक्त सोपा न वाटता पर्यटकांचे लक्ष वेधून घेऊन नावारूपास येऊ लागला आहे. चारही दिशांना 90 अंश कोणात उभे असलेली कातळे आकाशाला गवसणी घालताना जरी दिसत असली तरी अगदी ३० मिनिटात गडावर सहज पोहचता येते.
गड सर करत असताना. सोबत पाणी असणे आवश्यक आहे. कारण गडावर जरी पाण्याच्या टाक्या असल्या तरी त्यातील पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे.
गडाची बांधकाम शैली. वरून खाली कोरत आणलेल्या कातळभिंती, दिड फुट ऊंचीच्या दमछाक करायला लावणा-या 60 पाय-या व त्यांचे शिवाजी ट्रेलने केलेल्या संवर्धनामुळे सहज सोप्या झाल्यात , कातळातील ४० फुट कोरलेल्या पाय-या व अस्तित्वात गणेशपट्टी शिल्प असलेला दरवाजा पाहतच गडावर कधी पोहचलो ते लक्षातच येत नाही.
गडाच्या माथ्यावर पावले पडताच तेथील जुनाईचे दर्शन उध्वस्त केलेल्या व बांधकामतील ढिगारे पडलेले दगडी तेथील भव्य वास्तूची जाणिव करून देतात. त्या ढिगा-या खाली आजही दफन झालेला इतिहास तसाच दफन आहे. 450 वर्षापुर्वी वापरात असलेली दगडी शौचालये आजही तेथे पुर्वेस पहावयास मिळतात. बाले किल्यावरील माता चावंडा देवीचे मंदिर गडाच्या माथ्यावर निदर्शनास पडते.
बालेकिल्ला न चढता जर आपण पुर्वेकडे गेलेल्या पाऊलवाटेने पुढे गेल्यावर आपणास पुष्करणी पहावयास मिळते व या पुष्करणीला पुरातन काळात खुप मोठे महत्त्व प्राप्त होते. की ज्या ठिकाणी अंतरळातील येणार्या सर्वात जास्त शुभ लहरी एकत्रित होत असत ती जागा म्हणजेच पुष्करणी होय.पुष्करणीच्या उत्तरेस असलेल्या सप्तमातृका पाण्याच्या टाक्या गडावर असलेला राबता किती मोठ्या प्रमाणात असावा याचा अंदाज बांधण्यासाठी मदत करतात. तेथेच थोडे खाली उतरून गेलात तर तेथील लेणी समुह व कोल्ड स्टोरेज बारूद भंडार पहावयास मिळते.
गडावर पुर्वेकडील असलेला सपाट भुभाग गडावर युध्दकलेचे विद्यापीठ असल्याचे संकेत दर्शवितो. मर्द मावळे अथवा शत्रू सैन्यांस याच ठिकाणी युध्द कलेचे डावपेच शिकवले जायचे असा तर्क आपण लावू शकतो.
बाकी गडाच्या चारही बाजूंनी कोरलेले चोरमार्ग जे गडावरूनच शत्रूशी गड लढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतगार साबित होत असत ते आज चावंड गावच्या बाजुने पहावयास मिळतात ती बनावट विचार करायला भाग पाडते. ढासळलेल्या संरक्षण भिंती आजही नव्या उमेदिने अर्धवट श्वास घेत उभ्या राहिल्या आहेत.
गडदर्शन अगदी एक तासातच पुर्ण होते व आपण येथील आठवणी मनात घेऊन खाली पुन्हा परतीला लागतो.
मित्रांनो कधी नाणेघाटला जाणार असाल तर याच रूटवर हा अगदीच हकेच्या अंतरावर असलेला किल्ला अगदीच गम्मत म्हणून पाहुन जरी गेलात तरी आपला आनंद व्दिगूणा झाल्याशिवाय राहणार नाही. मग पाहशाल ना?
लेखक -श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल

स्वच्छता मोहीम किल्ले चावंड (जुन्नर)

स्वच्छता मोहीम किल्ले चावंड (जुन्नर)

नमस्कार मित्रांनो,
दि.२ आँक्टोंबर २०१६ वार रविवार रोजी किल्ले “चावंडवर” राज्य शासनाच्या पुरातत्व विभाग व गड संवर्धन समिति यांच्या समन्वयाने व किल्ले संवर्धक शिवाजी ट्रेलच्या मदतीने गड स्वच्छता अभियान राबवीण्यात येणार आहे. जर आपण राज्यात इतरत्र कुठे अशा अभियानात सहभागी नसाल तर किल्ले चावंड ता. जुन्नर जि.पुणे येथे येण्याचा विचार करावा ही विनंती.
जुन्नर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी व गडप्रेमी यांनी जास्त संख्येने उपस्थित राहुन तालुका पर्यटन व गडविकासासाठी या विकास कार्यात व मोलाच्या कामगिरीत सिंहाचा वाटा आपण उचलाल ही सदिच्छा व्यक्त करतो.
परंतु हे कार्य करताना येथे बघ्यांची व फक्त फोटोशेशन करून चमकणार्यांची गर्दी नको तर परिश्रम करणारांची व महाराजांना फक्त घोषणेनेत न ठेवता ह्रदयात जतन करणारांची गर्दी अपेक्षीत असावी.

शिवाजी ट्रेल आणि परीवार

14479729_1754048734849897_5332919942980566122_n

रहस्यमय गडकिल्ले

रहस्यमय गडकिल्ले

आपण आज पाहत आहोत की नवतरूण तरूणी गडकोट किल्ले, डोंगर, पर्वत रांगांकडे जास्तच आकर्षित होत चाललेले दिसतात. गडकोटांची दखल घेत शासनही या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी सज्ज झालेले किंवा होत असल्याचे लक्षात येत आहे. काहींच्या मते गडकोटा फिरणे, येथील विकास करणे हा फक्त व्यर्थ खर्च आहे. काही म्हणतात ज्या गडकोट किल्ल्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी संरक्षणाची महत्वाची जबाबदारी स्विकारली, आपल्या आई बहीणींची इज्जत वाचविण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला, जेथे माझ्या शुर मराठी शिवबांच्या मावळ्यांचे रक्त सांडले, अनेक थोर योद्ध्यांनी आपले बलिदान स्वार्थासाठी नव्हेत तर जनतेसाठी न्योच्छावर केले, अनेक मातांनी आपले सुपूत्र या किल्ल्यांना संरक्षणार्थ बहाल केले अशा या किल्ल्यांचा एक अभिमान वाटावा म्हणून व धारातीर्थी पडून माझ्या बांधवाच तेथे रक्त सांडले आहे म्हणून त्यांचे संवर्धन करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु काही म्हणतात की आपणाला निरोगी बनायचे आहे तर किल्यांकडे चला. आपणाला काही शोधायचे आहे तर किल्यांकडे चला. आपणाला काही बनवायच आहे तर तेथे पाहुनच आपण ते बनवू म्हणुन किल्ल्यांकडे चला. आणि आपणाला सुरक्षित राहण्यासाठी, संघर्ष रूपी जीवनाचा पाठ वाचण्यासाठी, एकरूपतेची पुन्हा आठवण करून घेण्यासाठी, एकमेकांशी प्रेमभावाने रहायला शिकायचे असेल तर किल्ल्यांकडे चला.

किल्ले आपणास काय शिकवतात? किल्ले आपणास इतिहास, भुगोल, वास्तुशास्र, भुगर्भशास्र, गणित, भाषा, प्रेमभाव,स्नेहभाव, एकता,एकरूपता, भुतकाळ,भविष्यकाळ, वर्तमानकाळ व सर्व काही गोष्टी शिकवत असतात.परंतु आपण वैचारीक आडानी व स्वार्थी असल्याने त्यांच्याकडून आम्हाला ते शिकता येत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. माझे विश्व म्हणजे माझी संपत्ती, माझे कुटुंब या दोन गोष्टींच्या पलीकडील जग पाहण्याची मनुष्याची शक्ती जागरूक का होत नाही हेच समजत नाही. आणि म्हणूनच आज अनेक रोगांना आम्ही जन्माला घातल्याचे चित्र दिसत आहे. शाळेतील शिक्षकांनी मुलगा शिकला नाही तरी चालेल परंतु आपण त्यास शिक्षा केलीच कशी? असे प्रश्न विचारणारे पालक जन्माला आले आहेत.कसा काय समजणार हो या छोट्या जीवाला संघर्ष आणि शिक्षण म्हणजे काय? विद्यार्थी गुरूचे नाते कसे असावे हे माझ्या बाळराजे शिवबाला विचारा. द्रोण आणि अर्जुनाला विचारा. कारण शक्ती,युक्ती,सक्ती म्हणजेच गुरू आणि संघर्ष, एकाग्रता, निष्ठा, एकता, आणि सहनशीलता म्हणजेच शिष्य होय. ज्या शिष्याकडे यातील गुण दिसत नाही तो शिष्य गुणवंत गणलाच जाऊ शकत नाही. आज शिष्यांचा संघर्ष आणि सहनशीलता आपल्याच माता पित्याकडूनच धोक्यात आली असल्याने मुलाचा बौद्धिक विकास जरूर होतो परंतु शारिरीक विकास होत नाही.परीणाम शाररीक कष्ट करण्याची क्षमता मुलांमधून नाहीशी होत चालली आहे. त्याचमुळे अनेक रोगांना शरीरात मोफत प्रवेश दिला जातो व त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. म्हणून पुर्वी कष्ट करणारा मनुष्य 100 वर्ष जगायचा परंतु आजचा 50 वर्षे झाली की मनुष्याची आखरी घटिका मोजण्याची वेळ येते. कधी कधी मनुष्य अगदी भर तारूण्यातच आपल्या वृध्द आई वडीलांना तडपवण्यासाठी मधीच साथ सोडून कोणत्यातरी आजाराने वैकुंठवाशी होतो. म्हणून सांगतो की महिन्यातून किमान दोनदा तरी किल्ल्यांकडे चला, कि जेथे निरोगी जीवन जगण्यासाठी व आपले आयुष्य वाढविण्यासाठी एक गुप्त रहस्यमय खजिना ठेवलेला आहे तो आपणास न मागताच त्या किल्यांकडून शरीराला प्राप्त होत असतो. तो आपणास माहीत करून घ्यायचा असेल तर, व तो पुढील पिढीसाठी साठवून ठेवायचा असेल तर आपण त्यांना संवर्धित करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतःहून पुढे या. किल्ले संवर्धनासाठी शारिरीक कष्टाद्वारे योगदान स्वतःहून देण्यासाठी प्रयत्नशिल रहा.
आज पाणी दुष्काळी परिस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. याला कोण जबाबदार आहे हो? याचे उत्तरही स्वतः आपणच आहोत असे मिळेल. परंतु या संदर्भात किल्ले आपणास जोरा जोरात पुर्विपासून ओरडून सांगतात की बाबांनो माझ्या ह्रदयात मानवाने अनेक पाण्याचे वर्षभर पुरेल एवढे झरे निर्माण केले आहेत. त्याचे निरीक्षण करा व त्याचा उपयोग त्या पध्दतीने तुमच्यासाठी अमलात आणा. माझ्या ह्रदयात साठलेले पाणी हे मात्र फक्त आणि फक्त पाऊसाचेच आहे. परंतु तेथील केलेली पाणीपुरवठा योजना पाहण्यासाठी जाणार कोण? कारण मी आज चार पाऊल चढाई करायची म्हटले तर चार वेळा विश्रांती घ्यावी लागते. एवढा मी आळशी बनलो आहे.
किल्ला सांगतो तुम्हाला घर बांधायचे असेल तर माझ्या अंगावर बांधलेल्या वास्तुच्या बांधणीची पध्दत वापरात आणा. किल्ला सांगतोय की तुमच्या शेतीची पद्धत कशी असावी. असे अनेक मानविय गरजेच्या परंतु अतिशय महत्त्वाच्या गोष्टी किल्ला आपणास शिकवत असतो.
या गडकोटावर जाताना मात्र आपण पुढील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
१. गडकोटांवर जाताना स्वयंशिस्त नक्की पाळा.
२. गडकोटांवर जाताना आपले पोट भरण्यासाठी आपण आणलेल्या वस्तू वापरानंतर कचरा पेटीत आठवणीने टाका.
३. गडकोटा वर जाताना मद्यपान करू नका.
४. गडकोटा वर बेशीस्तपणे वागणार्या पर्यटकास तेथील इतिहासाची आठवण करून द्या.
५. गडकोटावर असलेल्या वृक्ष वनस्पतीला कोणत्याही प्रकारची हानी पोहचवू नका.
६. गडकोटा वर असलेल्या वास्तुवर आपण कोणतेही नाव कोरू नका.
७.गडकोटा वर जाताना किंवा वापसी करताना जमिनीवर पडलेले चाॅकलेट चेहरा कागद किंवा प्लास्टिक पेपर उचलून ते कचरा पेटीत टाका.
८. गडकोटावरील असलेल्या जीवघेण्या वाटांचा वापर शक्यतो करूच नका.
९. गडकोटावरील असलेल्या वास्तूंची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करा.
१०. गडकोटांवर कधी आग लावण्याचा प्रयत्न करू नये.
११. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या योग्य जागीच टाकाव्यात.
अशा अनेक शिस्त पालणाच्या गोष्टी स्वतःहून आमलात आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपले गडकोट या मानवांनी नेहमीच गजबजला जाऊ लागेल यात शंकाच नाही.
गडकोटावर आपल्या सर्वांची साथ व मदतीचा हात आपण पुढे केलात तर भविष्यात ही आपली प्रेरणास्थाने आपणा सर्वांना खुप आनंद निर्माण करून देणारी ठरतील.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

13256530_1703871623200942_5186445061392166355_n

भैरवगड…

भैरवगड…
कल्याण ते अहमदनगर मार्गाने मोरूशी जवळपास आलो कि पुर्वेकडील समोरच दिसणारी सह्याद्रीची रांग आपले लक्ष वेधून घेत असते. ड्रायव्हर सोडून सर्वजण या सह्याद्रीच्या विलोभनीय सौंदर्याचे मुक्त कंठाने सर्वजण तारीफ करत असतात. व मध्यंतरीच सर्वांचे लक्ष विचलित करते ती एक विशाल कातळ भींत की जीचा चौरस आसमंताची बरोबरी करत आहे की काय असे वाटते. या भींतीच्या प्रेमात लाखो गिर्यारोहक पडतात व ते सर करण्याचे आव्हान स्वीकारून ते पुर्ण करतात. अशी ही महाकाय भींत म्हणजेच भैरवगड होय. खुप पर्यटक या गडाचे वैभव खालून वर न्याहाळत असतात. व त्यांना नेहमीच वाटत असेल की ही भींत म्हणजेच भैरवगड वरून कसा दिसत असेल बरे?

13265983_1707239492864155_5015097640275594066_n

13255906_1707239462864158_4729516819458621315_n

13307417_1707239416197496_837985912702811892_n

13319900_1707239402864164_7052488595392215532_n

त्या बांधवांना तो दाखवण्याचा केलेला हा निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज चा छोटासा प्रयत्न आहे. कधी तो वरून पाहण्याची इच्छा झालीच तर नक्कीच जुन्नर तालुक्यातील घाटघर मधील आडूसा या भागाला भेट द्या व निसर्गाचा आनंद घ्या.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.njunnartaluka

किल्ले हडसर बाबतचा गैरसमज…

किल्ले हडसर बाबतचा गैरसमज…
मित्रांनो 24 एप्रिल 2016 रोजी पुण्यातील पर्यटक किल्ला हडसर पाहण्यासाठी आले व ते अडकले व त्यांची सुखरूप रात्री सुटका करण्यात आली. याबाबत प्रत्येक दैनिक वृत्तपत्रात बातमी आपण वाचली असेलच. हा किल्ला खुप अवघड आहे असा काही पर्यटक मित्रांचा झालेला गैरसमज चुकिचा आहे.
आपणास या बाबत काही माहिती आपल्यातील झालेला गैरसमज दूर व्हावा म्हणून देत आहे.

13173716_1701085333479571_1014097045243511549_n
जुन्नर तालुक्यातील व जुन्नर शहरापासून पश्चिमेस 15 कि.मी अंतरावर असलेला साधारण . इ.स 1300 ते इ.स 1400 काळातील अतिशय उत्तम व सुरेख बांधणीतील हा किल्ला पाहण्यासाठी पेठेची वाडीकडुन किल्याच्या पायथ्याशी उतरावे. व पश्चिमेकडून पुर्वमुखी होऊन हा किल्ला चढाईसाठी सुरूवात करावी. हा मार्ग किल्ला चढाईसाठी अतिशय सोपा व सुंदर आहे.या मार्गाने आपण आर्ध्या तासातच किल्यावर पोहचतो. या मार्गाने आपणास चढाई करताना नाशिकच्या किल्ले हरीहरची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण या मार्गाच्या पायर्यांची रचना अतिशय सुंदर व सुरेख करण्यात आलेली आहे. ती आपण छायाचित्रांमध्ये पहावी. याच पायरीमार्गने दोन डोंगरांना एकत्र जोडण्यात आलेले असुन मध्यखिंडीत अतिशय सुरेख पध्दतीने बांधकाम केलेले आहे. हे बांधकाम आपणास तिन वेगवेगळ्या कालखंडातील असल्याचे समजते.व येथूनच आपणास डाव्या बाजूला कोरीव काताळातील कलेची उत्कृष्ठ झलक पहावयास मिळते. येथील संपूर्ण दरवाजे हे सुरेख कातळकोरीव एकाच खडकात कोरण्यात आलेले आहे. कातळातील कोरलेल्या उभ्या भिंती जणू काय करवतीनेच एका रेषेत कापल्यात कि काय असा भास होतो. दरवाजाला लागुनच आतमध्ये कोरलेली लेणी पण अतिशय सुंदर पद्धतीने कोरण्यात आलेली आहे. कातळातील कोरीव पायर्‍या आपले लक्ष वेधून घेतल्या शिवाय राहत नाही. 13177612_1701085353479569_4806587323526432097_n
13178763_1701085303479574_3749181167805943209_n 13173961_1701085276812910_9110308262346074568_n 13227118_1701085253479579_1242999103431202301_n
या मार्गचाच वापर आपण किल्ले चढण व उतरणीसाठी केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही. या मार्गाने अतिशय छोट पाच वर्षांच बाळ सहज किल्यावर चालत चढू शकते व संपुर्ण किल्ला दर्शन घेऊन उतरू शकते . संपूर्ण किल्ला पाहून झाल्यावर आपणास रात्र जरी झाली तरी विजेरीचा वापर न करता आपण सुखरूप पुन्हा याच मार्गाने उतरून पोहचू शकतो. दुसरी असलेली खिळ्याची वाट ही खुप अवघड स्वरूपाची असल्याने तीचा वापर धाडशी पर्यटकांनी फक्त दिवसाच एक थरार म्हणुन उपयोगात आणली तरी चालते.परंतु ती उपयोगात आणतेवेळी स्वयं सुरक्षेची हमी घेणे जरूरीचे व जोखमीचे आहे. कारण ही वाट म्हणजे प्रत्यक्ष यमराजालाच आमंत्रण दिल्यासारखी आहे. हिचा वापर करताना आपणाकडून झालेली छोटीशी चुक आपल्याला मृत्यूच्या दरीत घेऊन जाते. तेव्हा सर्व पर्यटक बंधुंना विनंती करू इच्छितो की शक्यतो या खिळ्याच्या वाटेने चढाई किंवा उतरणीसाठीचा मोह आपण टाळावा. आपण याबाबत निश्चितच दक्षता घ्याल ही अपेक्षा बाळगतो.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.njunnartaluka

किल्ले हडसर

 किल्ले हडसर 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. हडसर हा असाच या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंड, शिवनेरी, लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे.
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठा प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :- हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं , नळीत खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे आहेत. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते. तर दुसरी वाट डावीकडे असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जाते. दुसऱ्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडेवळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे. येथून थोडे पुढे कातळात खोदलेली प्रशस्त गुहा आहे.मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर दिसतो. समोरच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो.
जाण्याच्या वाटा :- या किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असुन खुप सोपी आहे
दुसरी वाट म्हणजेच खिळ्याची वाट होय. ही वाट अतिशय अवघड असून येथुन खाली उतरने म्हणजेच प्रत्यक्षात यमराजालाच आव्हान करण्यासारखे आहे. कारण हे कातळ 90 डिग्री व कोनात असुन यामध्ये दोन दोन फुट अंतरावर झिकझ्याक पध्दतीने लोखंडी खिळे गाडलेले आहेत. साधारण ही चढण किंवा उतरण 100 फुट असुन याच मार्गावर आपणास दोन कातळकोरीव लेणी संच पहावयास मिळतात. दिवसाच फक्त या वाटेचा उपयोग धाडसी पर्यटक चढाई किंवा उतरण्यासाठी करतात. कारण हा कडा उतरल्यावर पुन्हा हडसर गावात साधारण एक कि.मी अंतरापर्यंत अतिशय तीव्र उताराने व बुजलेल्या पाऊलवाटेने जंगलातून पोहचावे लागते व हे खुपच जिकरीचे आहे. तेव्हा शक्यतो या वाटेचा उपयोग पर्यटकांनी न करनेच योग्य आहे..कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडी यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात बुरूजापाशी पोहचता येते. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

13077069_1696370590617712_5917580773966930525_n 13095994_1696370603951044_9086573658599182215_n 13133396_1696370633951041_7681603135863590180_n