Category Archives: महत्वाची माहिती

त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहे. 

त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहे
जुन्नर तालुक्यात भटकंती करताना अनेकांच्या समस्या नेहमीच समोर येत असतात. कथा आणि व्यथा स्थानिकांकडून ऐकताना तर कधी अंगावर शहारे येतात तर कधी डोळ्यांच्या कडा पण पाझरू लागतात. मग एक प्रश्न काळजाला भिडतो तो म्हणजे खरोखरच हि “शिवरायांची” जन्मभुमी आहे का? प्रत्येक जण आपापल्या परीने लढा देतो व आपल्या समस्या सोडविण्याची धडपड करताना दिसतो व त्या पुर्ण पण होतात. परंतु ज्यांच्यामध्ये धडपड करण्याची क्षमताच नाही त्यांनी जावे कुठे? हा पण मोठा प्रश्न आहे.
जुन्नर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून चार गावांचा उल्लेख नेहमीच ऐकावयास मिळतो ती गावे म्हणजे दक्षिणेकडील सुकाळवेढे व हातविज तर उत्तरेकडील कोपरे व मांडवे. या ठिकाणी एस. टी सुविधा गावात पोहचल्या ही आनंदाची बाब निश्चितच आहे. व त्यातुन त्यांना दिलासा पण मोठ्या प्रमाणात मिळाला. आता अपेक्षा आहे ती चांगल्या प्रकारे रस्ते होण्याची.
जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील गाव म्हणजे #देवळे. या गावात सुविधा मिळाली खरी पण त्याच गावातील 40 कुटूंबातील जवळपास 250 लोकवस्ती असलेली #दरेवाडी मात्र शासन सुविधांपासून वंचित असलेली पहावयास मिळते.
अक्षांस – N 19*18’16.4 रेखांश – 073*44’18.3 वर वसलेल्या या दरेवाडीचा अंधार मिटला तो सन 2013 मध्ये तो पण एकल विद्यालयाच्या व गावच्या तरूणांच्या मदतीने. मुळात जर्मनीची असलेली #बाॅश्च (Bosch) कंपनीला एकल विद्यालयाने या दरेवाडीची माहीती दिली कि त्यांना हा प्रकल्प राबविण्यासाठी दुर्गम भागातील 30/40 घरांची अवश्यकता होती. कंपनीने सोलर प्रोजेक्ट येथे उभा केला व दरेवाडीला स्वातंत्र्यानंतर 65 वर्षांनी उजेड मिळाला.
या कंपनीने जवळपास 40 घरांमध्ये मिटर बसवलेले असून प्रत्येक घराघरामध्ये लाईट पुरवली जाते. एक इनव्हायटर रूममध्ये 6 बॅटरी संचात सोलरच्या माध्यमातून वीज सेव केली जाते व तीचा वापर टिव्ही, बल्प व वाडीच्या पाणीपुरवठा पंपासाठी केला जातो. मुलांचा अभ्यास, माता भगिनींचा स्वयंपाक याच प्रकाशात केला जातो. राॅकेल वर चालणारे दिवे नष्ट झाले व आरोग्यदायी यांचे जीवन ठरले. यासाठी प्रकल्पासाठी जागा दिली ती श्री. नामदेव सिताराम बुळे यांनी. या बदल्यात त्यांना घरात मोफत वीज देण्याचा निर्णय कमेटीने घेतला.
प्रत्येकी मिटर प्रमाणे रू 90/- आकारले जातात व त्याचा विनियोग या प्रोजेक्टच्या मेंटनससाठी केला जातो व याचे ताळेबंद ठेवण्यासाठी वाडीतील सात सदस्यांची वनदेवी कमेटी स्थापण्यात आली आहे. गेली पाच वर्षे हा वीज पुरवठा आमच्यासाठी उजेड घेऊन आल्याचा आनंद येथील ग्रामस्थ सांगतात. परंतु काही समस्या विचारले असता त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या पहावयास मिळाल्या.
ते सांगतात घरात लाईट आली परंतु वाडीत यायला रस्ता नाही. एखादी बाळंतपणात आडलेली महीला किंवा आजारी पडलेल्या व्यक्तींना येथुन तीन कि.मी अंतरावर स्ट्रेचरवर घेऊन जावे लागते. तीन महिने येथे एवढा पाऊस पडतो की आमचा इतर सर्वांशी संपर्क तुटतो. कारण दोन मोठ्या ओढ्यांनी व डोंगरांनी वेढलेल्या भागावर ही वाडी असल्याने पुर्ण पाण्याचा वेढा आम्हाला पडतो व मुख्य रस्त्यावर येणेही शक्य होत नाही. आरोग्य सेवा मिळणेही कठीण होत. राशनपाणी याचा साठा करून ठेवावा लागतो. आम्हाला सर्वांना महत्वाची गरज आहे ती हा पावसाळा सुरू होण्याआधी येथील रस्त्याची, असे ग्रामस्थ केविलवाणे सांगतात.
मी “निसर्गरम्य जुन्नर तालुका” पेज परिवार तर्फे मा. आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करेल की आपण दरेवाडीच्या समस्येवर लवकरच निर्णय घेऊन येथील जणतेच्या समस्या लक्षात घेता त्यांच्या निश्चितच अडचणी दुर कराल. कारण त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहेत.
ही दरेवाडी म्हणजे निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असून जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी निश्चितच ट्रम्पकार्ड म्हणुन उदयास येईल यात शंकाच नाही. परंतु येथील सुखसुविधांसाठी उच्च पावले उचलली जाणे गरजेचे आहे.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

लालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.

लालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.
हरिश्चंद्राची भेट घेऊन पुष्पावती माई धाकटी बहिण मांडवीला भेटायला निघते. द-याडोंगर खोरे तुडवत तुडवत व वेडीवाकडी वळणे घेत घेत ती जेव्हा जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे येते तेव्हा तीची भेट मांडवीशी होते. एकमेकींना भेटून झाल्यावर पुष्पा, मांडवीला विचारते अग तु कोठे निघालीस एवढे नटून थटून? मांडवी उत्तरते मोठ्या ताई कुकडीला भेटायला निघाले. येतीस का ताई तु पुढे? पुष्पा म्हणते अग मी मोठ्या ताईलाच भेटायला निघाले होते. म्हटले रस्त्यात तुला भेटून पुढे कुकडी ताईला भेटावे. मग काय पुष्पा व मांडवी दोघी मोठी बहीण कुकडीला भेटायला निघतात. बरेच अंतर चालत चालत त्या एका ठिकाणी कुकडीला भेटतात तेच ठिकाण म्हणजे जुन्नर तालुक्यातील लालखण हिवरे होय.
त्यांची भेट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणास आपण संगम असे म्हणतो. या ठिकाणी तीन नद्या एकत्र आल्याने येथे हेमाडपंती संगमेश्वराचे मंदिर बांधण्यात आले होते. संपूर्ण मंदिर जमीनदोस्त झाल्याने मंदिराबाहेरचे चार नंदी पहावयास मिळतात. हेमाडपंती मंदिराचे अवशेष पालथे असून फक्त एक मुर्ती निदर्शनास पडते. गणपती शिल्प जीर्ण अवस्थेत पहावयास मिळते. या ठिकाणी येण्यासाठी आज प्रथतःच कपडे उतरून छातीभर खोल पाण्यातुन 30 मीटर प्रवास करावा लागला तेव्हा कुठे येथील शिवलिंगास स्नान घालण्याचा व स्वच्छ करण्याचा योग आला.
नियमित पाण्याची सुखसुविधा उपलब्ध असल्याने येथे गाव वसले ते लालखन हिवरे.हेमाडपंती मंदिराचे जीर्ण अवशेष येथे पहावयास मिळतात. 1977 पर्यंत येथे येडगाव धरणाची निर्मीती करण्यात आली व या तीनही बहिणींचा रस्ता येथे अडविण्यात आला. व निर्माण झाले ते येडगाव धरण. त्यामुळे #संगमेश्वर_मंदिर व लालखण गाव पाण्याखाली गेले.
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कि ज्यांनी 15 वर्षे आपली सत्ता प्रस्थापित केली ते मा. वल्लभशेठ बेनके यांचे हे गाव. धरणामुळे गाव विभागले गेले व #कैलासनगर व #हिवरे_बुllअशी दुभागणी झाली.
आता आपणास प्रश्न पडला असेलच कि लालखण हे नाव कसे? यावर भोर बाबा आख्यायिका सांगतात की खुप खुप वर्षापूर्वी अहमदनगर मधील लालखण बाबांच्या समाधीपाशी असलेले दोन अतिशय लाल व मोठे भुंगे फिरत फिरत येथे आले व मरण पावले. त्यांची समाधी लालखण म्हणुन येथे बांधण्यात आली. ते भुंगे येथे बाबाच्या रूपात आले होते म्हणून तसे नाव देण्यात आले. #लालखण_मंदिर ही वास्तु बहुतेक निजामशाही कालखंडात बांधण्यात आली असावी असे वाटते. मंदिरात एक व मंदिराच्या बाहेर पश्चिमेस लागुन एक अशी दोन पिरस्थाने पहावयास मिळतात. नुकतीच 4 तारखेला मंदिर पाण्याची पातळी कमी झाल्याने येथे यात्रा संपन्न झाली होती.
याच समाधीच्या अगदी दक्षिणेला 30 मीटर अंतरावर भारताचे सर्वप्रथम वनसंरक्षक इंग्रज अधिकारी गिब्सन येथे सरकारी बंगल्यात वास्तव्यास होते. धरण निर्माण झाल्याने त्यांचे राहते घर पाण्याखाली गेले व त्याची पडझड मोठ्या प्रमाणात झाली व आज फक्त त्या इमारतीचे अवशेष पहावयास मिळतात. येथे विविध ठिकाणी समाधीस्तल पहावयास मिळतात. आखीव व रेखीव सुंदर तुळस येथील पसरलेल्या हिरवाईमधे तल्लीन होऊन उभी असल्याचे दिसते. बौद्ध समाधी याच तुळशीच्या पुर्वेस पहावयास मिळते. परंतु ती बौद्ध समाधी नसून समाधीस्तल असावे की जीच्या छतावर चुन्यामध्ये चारही दिशांना बसलेल्या अवस्थेतील मुर्ती कोरलेल्या दिसतात.
धरणाची पातळी खाली गेली की येथील ग्रामस्थांच्या पुर्वीच्या आठवणी ताज्या होऊ लागतात. सर्व बाजुंना लाबवर हरळीच्या गवताचे साम्राज्य पसरल्याने हा परिसर हिरवाईने व सौंदर्याने नटलेला पहावयास मिळतो. एकदा का या परिसरात आलात तर येथून निघता पाय काढणे फारच कठीण. अगदी अंधार होईपर्यंत मी येथून हललो नव्हतो.
ओझरच्या विघ्नहर्त्याच दर्शन झाले की पर्यटकांनी हिवरे बुll या गावातील या ठिकाणी भेट देणे सोयीस्कर आहे. अगदीच तीन कि.मी अंतरावर हे गाव आहे. गाव परिसर संपूर्ण उस क्षेत्राने अच्छादीत असल्याने येथील रस्ते नेहमीच हिरवाईच्या छायेत असतात. येथील सौंदर्य दर्शन जर सांजवेळी घेत असाल तर अतिउत्तम कारण सुर्यमावळतीचे दृष्य तर अप्रतिमच. मग पहातायना #हिवरे_बुll परिसर?

आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

डोनीदारा उर्फ त्रिगिलदारा.

डोनीदारा उर्फ त्रिगिलदारा.

घाट वाटा म्हटले की निसर्ग दर्शन आलेच नाही का? जुन्नर तालुक्यातील घाटवाटा चढण आणि उतरणीला तर अक्षरक्षः दमछाक करतात. या सर्व घाटवाटांची एक विशेषता म्हणजे यांची उतरणीची सुरुवात शिवजन्मभुमीत होते व शेवट ठाणे जिल्ह्यात होतो. पश्चिम पट्यातील अनेक गावचे ग्रामस्थ तर याच वाटांचा नियमीत वापर मुंबई, कल्याणला जाण्यासाठी करत. विविध गावच्या बाजारांसाठी ते येथुनच प्रवास करत व भेट देत. अशा सात घाट वाटा म्हणजे किल्ले सिंदोळा व उधळ्या यांच्या मधील माळशेज घाट बोगद्यापाशी उतरणारा श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पावणखिंड मार्ग, उधळ्या ते भोरद-या यांच्या मधील माळशेज घाटातील यु पाॅईन्टवर उतरणारा भोरदा-या, अंजनावळे डोंगर ते नाणेघाट यामधील भैरवगडाकडे व मोरोशिला घेऊन जाणारे भोरांड्याची नाळ, पुरातन व्यापारी मार्ग म्हणजे नाणेघाट,आंबोली ते दुर्ग ढाकोबा यांच्या मधील असणारा दा-याघाट, दुर्ग ढाकोबा ते दुर्गवाडी यामधील खुटादारा वाट आणि दुर्गादेवी ते डोणी यामधील असलेली डोनीदारा उर्फ त्रिगिलदारा या उतरताना तर यांची विविध रूपे अनुभवयास मिळतात. परंतु डोनीदारा उर्फ त्रिगिलदारा या घाटवाटेची काही सुंदरता वेगळीच. हातवीज गावातुन डोनीला जो रस्ता कोकणकड्याच्या किणा-याजवळुन पुढे अडीच कि.मी जातो याच किनाऱ्यावर ही घाटवाट खाली कोकणाकडे दोन उंचच उंच कड्यानी वेढलेली दिसते. इतर घाटवाटांच्या तुलनेत या वाटेचा उतार तीव्र स्वरूपात आढळुन येत नाही. याच उताराला दोन नद्यांच्या संगम पहावयास मिळतो. अगदी रस्त्यालगत ही घाटवाट असल्याने पर्यटकांसाठी निश्चितच पर्वनी ठरेल. येथील दोन कड्यांवर व्हॅली क्राॅसिंगसाठी एक वेगळाच थरार घेता येऊ शकतो. त्यामुळे रॅपलिंग व क्लायबिंग सारखे हे ठिकाण असल्याने याला विशेष महत्व भविष्यात प्राप्त होऊ शकतो. यासाठी हातवीज ग्रामस्थांनी प्रयत्न करायला हवेत. कारण जुन्नरचा सर्वात अतिदुर्गम भाग म्हणून हातवीजची ओळख आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी येथील ग्रामस्थांना येथे पर्यटनाच्या माध्यमातून सहज निर्माण होऊ शकतात. जवळच दुर्गादेवी सारखे अतिशय सुंदर ठिकाण असून येथील देवराईला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणाला हातवीजचे माजी सरपंच कसाळे यांच्या सोबतीत भेट देण्याचा योग आला. खुप खुप धन्यवाद सरपंच.
कधी योग आलाच तर डोनीदारा उर्फ त्रिगिलदारा या घाटवाटेचा थरार घ्यायला विसरू नका.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका. 

 

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचे हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचे हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर.
नुकतीच #जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावाला भेट देण्याचा योग आला. पुणे – नाशिक हायवेपासुन अगदीच दोन कि.मी अंतरावर पश्चिमेस वसलेले हे गाव. या गावची एक ओळख सांगायची झाली तर विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार महाराष्ट्रतुन निवडून आले ते म्हणजे मा.शरददादा सोनवणे त्यांचे गाव म्हणजेच #पिंपळवंडी गाव.
गावाला असे नाव का पडले असावे असा प्रश्न पडतो व विचारधारा सुरू होते ती या नावाच्या शोधाची. माझा प्रवास उंब्रज, काळवाडी मार्गे पिंपळवंडी असा होता. हा सर्व परिसर येडगाव धरणाच्या पाणलोटाखाली असल्याने येथील सुंदरतेला तर चार चांद लागलेले दिसतात. गावाच्या पाठीमागे पश्चिमेस एक 100 मी. अंतरावर पिंपळेश्वर ओढा लागतो. या ओढ्याच्या काठी एक हेमाडपंती मंदिर दृष्टीस पडते. येथील परिसर अनेक पिंपळ वृक्षांनी व्यापलेला दिसतो व नकळतच #काशीखंड अध्याय – 50 मधील ओव्या आठवू लागतात.
श्री गणेशाय नमः षडास्यलणे आगस्ती मुनी
त्या दक्षिणदेशी काम्यकवनी महाक्षेत्र असे पुण्यजीवनी
पापनाशनी जोदाते ll1ll
गोदावरीचे उत्तरपारी प्रतिष्ठान आसे पुण्यनगरी
तेथे लींग रछायना बरव्यापरी पिंपळेश्वरतो ll2ll
दुधचीऋषीचा कुमार पीपलाद नामे मुनेश्वर तेणे गोदातिरी
छपीलाहार त्यानाव पिंपळेश्वर ll3ll
हे आठवताच येथील अख्यायिका समोर एक चित्रपट रूपात उभी राहते. ती पुढील प्रमाणे.
स्वतःच्या हाडाची शस्त्रे इंद्रास करून दिली ते ऋषी म्हणजे दधीची ऋषी जे सप्तऋषी होऊन गेले त्यापैकी हे त्यातील एक होय. त्यांचे पुत्र पिंपलाद हे खुप मोठे शिवभक्त होते. त्यांनी काही वर्षे विश्वेश्वराची सेवा करून ते नर्मदातिरी तपचर्या परिक्रमा केली व पुन्हा ते काशिला आले. व विश्वेश्वराची भक्ती व सेवा केली. काही वर्षे निघून गेली व पिंपलाद यांना भगवंतांचा आदेश झाला की तिर्थांटन करा.ते तिर्थांटन करत करत “शिवजन्मभुमी” आज ज्या नावाने ओळखले जाते तेव्हा त्यावेळी हा भुभाग “दंडकारण्य” म्हणुन ओळखला जायचा ते या ठिकाणी पोहचले. येथील परिसरातून जात असताना त्यांना हा परीसर खुप आवडला. दक्षिणेस जवळच अंतरावर कुकडी माई संथ प्रवाहीत होत्या. घणदाट जंगल असल्याने जपासाठी त्यांना येथे सर्व काही मांगल्य वाटले व ते येथेच वाहत्या ओठ्याकाठच्या खडकावर तपश्चर्या करू लागले. परंतु त्यांचे प्रत्येक वर्षी महाशिवरात्री काशियात्रेस जाणे टळत नसे.
यात्रा संपली की येथील भुमाता पुन्हा त्यांची येथे वाट पाहत असे. पिंपलाद ऋषींचे वय होत चालले होते. तपश्चर्येच्या बळावर त्यांना अनेक सिध्दी प्राप्त झाल्या होत्या. आजुबाजुच्या परिसरातही ऋषींची ख्याती पसरत चालली होती.
पिंपलाद ऋषींचे आता खुपच वय झाले होते. महाशिवरात्रीस काशियात्रेस जाण्याची चिंता वाटू लागली होती. त्यांना त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. कारण वृद्धापकाळात यात्रा करणे शक्‍य होणार नव्हते. शेवटी त्यांनी आपल्या साधनेचा वापर केला व स्वतःचे शिर काशियात्रेस योगसाधनेने पाठवले.
पिंपलाद ऋषींच्या तपाची व श्रद्धेची भगवान शंकरांना जाणीव झाली व भगवान शंकराची व या पिंपलाद ऋषींच्या शिराची भेट #नगर जिल्ह्यातील #पारनेर तालुक्यातील #विरोलीगावात झाली. या भक्ताचे निस्सीम भक्ती पाहून या भक्ताच्या शिराची भगवान शंकरांनी प्रतिष्ठापना या #विरोली गावातच केली व ते शिर स्वतः भगवान शंकर पिंपळवंडी या गावात या पिंपलाद ऋषींच्या तपश्चर्ये ठिकाणी येऊन त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले व आता तुला काशियात्रेस येण्याची गरज नाही. मी सतत लिंग रूपात निवास करीन व मला या ठिकाणी पिंपळेश्वर या नावाने ओळखले जाईल. असे सांगून त्यांनी लिंग रूपात पिंपळेश्वराची लिंगरूपामध्ये व येथे गंगेसह स्थापना केली व भगवान शंकर अंतर्धान झाले.
मित्रांनो ही जरी अख्यायिका सांगितली जात असली तरी येथील गंगा कुंड रूपात वर्षाच्या 365 दिवस गायमुखातुन वाहताना दिसते या कुंडास आजही गंगातिर्थ व छोट्या कुंडास काशितिर्थ म्हणुन ओळखले जाते. मंदिराच्या शेजारीच पिंपलाद ऋषींची समाधी आहे. मंदिर गर्भगृहात डावीकडे पिंपलाद ऋषींची शिरविरहीत मुर्ती आहे. व समोरच एक गोल दगड ठेवला असून आपण मांडी घालून बसुन त्या दगडावर हात ठेवून मनात प्रश्न केला की त्याचे उत्तर मिळते.
पिंपलाद ऋषींच्या ख्यातीने एक एक भक्त या स्थानी राहु लागला. येथे बाजारपेठेची निर्मीती झाली व उभे राहीले एक खेडेगाव अर्थात #पिंपळवंडी.
येथे काळानुरून एक प्रचंड कोरिव व आखीव व रेखीव दगडी शिल्पांचे एक हेमाडपंती मंदिर उभे राहिले. काळ वाढू लागला व भुतकाळात लोटला जाऊ लागला. मनुष्य इतिहासाच्या पाऊलखुणा विसरू लागला. जिर्ण व पडझड झालेली मंदिरे हटवू लागला. हळूहळू पडझड झालेल्या वास्तु धरणात, गंगेत तर कधी कधी जमीनीखाली दडपून टाकू लागला. जुणी मंदिरे पाडून त्या जुन्या मंदिरांचे पुरावे नवनिर्मित मंदिराच्या पायथ्यातच गाडून त्यावर उभी राहिली ती नवीन मंदिरे. आज जेव्हा मी येथे या पाऊलखुणा शोधू लागलो तर एकच दगडी शिल्प मंदिराच्या उत्तरेला टेकवून ठेवल्याचे दिसले कदाचित ते श्री गणेशाचे शिल्प असल्याने ते ठेवण्यात आले असावे.तसेच दक्षिणेस विरघळ दिसून येते. मंदिराच्या आतील भाग पुरातन वाटतो खरा परंतु तो पुनरस्थापीत करण्यात आले असावे असे वाटते. हेमाडपंती बांधनीतील दगडांचा रिघ मंदिराच्या पुर्वेस ओढ्यात पडलेला दिसतो खरा परंतू येथील कोरीव मुर्ती पहावयास मिळत नाहीत. गावचे ग्रामस्थ श्री. विकास बाजीराव काकडे यांना हेमाडपंती बांधनीतील मुर्ती आजुबाजुला कुठे पहावयास मिळतील का? विचारले असता त्यांनी पिंपळवंडी गावतील मारूती मंदिराच्या चार दिशेला भिंतीला उभ्या केलेल्या मुर्ती दाखवल्या. त्या पाहून मन प्रसन्न झाले. व खात्री पटली कि खरोखरच येथे पिंपळेश्वराचे हेमाडपंती मंदिर होते. या मुर्ती व मंदिराच्या पायथ्याच्या भरावात गाडलेल्या मुर्ती बाहेर काढणे खुपच गरजेचे वाटले. कारण या परीसराचा व गावचा खरा पौराणिक इतिहास फक्त आणि फक्त याच मुर्तींमुळे जीवंत ठेवला जाऊ शकतो.
मी समस्त ग्रामस्थ पिंपळवंडी व मा.आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करेल की आपण हे इतिहासाचे ठोस पुरावे आपल्या गावच्या इतिहासासाठी खुप मौलिक असून त्यांचे संवर्धन करूने गरजेचे आहे. जर ते नष्ट झाले तर निश्चितच गावचा इतिहास पुसला जाईल. या ठिकाणी एक भव्य दिव्य मंदिराची निर्माण करून “पिंपळेश्वराचा” वारसा जपला पाहिजे. याच रस्त्यावर व पुढे काळवाडी व पुढे ऐतिहासिक वारसा लाभलेले उंब्रज गाव असल्यामुळे निश्चितच पर्यटनासाठी एक मोठी उपलब्धी सहज होऊन येथील रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होऊ शकतील.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

 

निसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.

निसर्ग सौंदर्याने नटलेले उंब्रज गाव.

हिंगणे दप्तर खंड तिसरा या भारत संशोधक मंडळाने जी बखर लिहीली त्या पुस्तकात ज्या गावच्या ऐतिहासिक मंदिराच्या खर्चाचा उल्लेख मिळतो ते मंदीर म्हणजे जुन्नर तालुक्यातील उब्रज गावचे महालक्ष्मी मंदिर. या गावचा ऐतिहासिक वारसा सुरू होतो ते येथील पुष्पावती व कुकडी नदीच्या संगमाने. येथील धरणात लुप्त झाले ते संगमेश्वराचे मंदिर. येथील ऐतिहासिक वारसा पाहता नवीन गावातील शनि व हनुमान मंदिराच्या समोर असलेली विरघळ लक्ष वेधते. गावकरी या वीरघळीचा उपयोग पाऊस पाडण्यासाठी करतात ऐकून नवल वाटले. ते कसे विचारले असता सांगतात, पुर्वी पासून जर दुष्काळी परिस्थिती उद्भवली की या मुर्तीला पालथे घातले की त्यावर एक वजन ठेवतात. पाऊस पडला की त्या ठेवलेल्या वजनाचा इतकी शेरणी वाटतात म्हणे. विशेष म्हणजे उब्रज गाव एकच होते परंतु येडगाव धरण बांधण्यात आले व येथील गावाचे विभाजन झाले व दोन ठिकाणी विस्तारीत झाले. म्हणून येथे उंब्रज 1 व 2 अशी गावे पहावयास मिळतात. परंतु आजही गावच्या खुना व येथील मंदिरे जशास तशी आहेत. येथील विर नावाचे दगडी शिल्प परीसरात लक्ष वेधून घेते. महालक्ष्मी मंदिर पेशवेकालीन असून खुप काही येथे अभ्यास करण्यासाठी गोष्टी पहावयास मिळतात.
याच गावातून पुर्व पट्यातील आणे व इतर 10 गावांना येथुनच पाईपलाईन द्वारा पाणी पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यातील इतर चार धरणांचे पाणी या येडगाव धरणात आणले जाते. येथील परीसर पाहता आपण बाहेर देशात आहोत की काय असा भास होतो. या परीसरात विषयी जास्त काही लिहीता फक्त छायाचित्रेच येथील सुंदरता सांगून जातात. येथील मळगंगा मंदिराच्या आवारातील वडाचे झाड जवळपास 400 वर्ष जुने असुन आजही ते सुरक्षित आहे. जो एकदा या परिसरास भेट देईल तो निश्चितच वारंवार या परीसराच्या दर्शनास गेल्या शिवाय राहणार नाही. विविध पक्षी या परीसरात विहार करत असल्याने एक विशिष्ट संगिताची धुन पक्षांच्या वानितुन ऐकावयास मिळते.
येथील गद्य गळेचा इतिहास स्थानिकांकडून ऐकून नवलच वाटले. सांगतात जर पाठीची शिर भरली असेल तर या दगडावर झोपल्यावर व्यवस्थित होते व आराम मिळतो. याच गावाला लागुन येडगाव धरणभिंत लाभली असल्याने येथील परीसर नेहमीच हिरवाईचा शालू पांघरलेला दिसतो. संपूर्ण परीसरास उसाचे अच्छादन पहावयास मिळते.
या जुन्या उंब्रज गावचा एक पर्यटन म्हणून जर विकास केला गेला तर निश्चितच येथील तरूण व तरूणींना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील फक्त गरज आहे ती एक चांगल्या प्रकारच्या पर्यटन विकासीत आराखड्याची व गावकर्यांच्या सहभागाची. की ज्यांच्या माध्यमातून साकार होईल एक विकसीत पर्यटन स्थळ. या विकासासाठी मराठाबाणा फेम अशोकजी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती भक्तभवन बांधून सुरूवात झाली आहेच.
या परिसराचा अभ्यास करण्याची संधी डाॅ.राहूल हांडे व महालक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून प्राप्त झाली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. सर्व छायाचित्रे उंब्रज ग्रामस्थांना समर्पित करतो कारण तो आपला अनमोल ठेवा आहे.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)

लेखक/ छायाचित्र :-
श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .+

 

 

एक सेल्फी असाही

एक सेल्फी असाही.
जेवण करण्यासाठी हाॅटेलमध्ये बसलो होतो. एक गृहस्थ माझ्याकडे सारखी नजर लावून पहात होते. मी व माझ्या सौ स्वाती आम्ही गप्पा मारण्यात दंग होतो. माझे तोंड त्या व्यक्तीच्या दिशेला होते जो खुपवेळ माझ्याकडे एकटक पाहत होता. माझे अधुन मधुन त्यांच्याडे लक्ष जात होते. बहुतेक माझ्याकडे त्यांचे काही काम असावे असा मला भास होत होता. मी त्याकडे नजरा नजर होऊनही दर्लक्ष करत होतो. जेवणाची आॅर्डर करत सौ आणि मी गप्पा मारू लागलो. अचानकच ती व्यक्ती जवळ आली. आपणच खरमाळे सर का? असा मला प्रश्न केला. मी हो म्हटले व त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून थोडा चक्रावलोच. कारण मी या गृहस्थाला ओळखत नव्हतो मग एवढे आनंदी होण्याच कारण काय? काहीच समजले नाही. मी पुढला विचारच करत होतो की, तेवढ्यात तेच गृहस्थ बोलले सर एक सेल्फी हवाय तुमच्या सोबत. मी म्हटले घ्या की त्यात काय? दोघे हाॅटेल बाहेर दरवाजात उभे राहीलो. जवळच्या वेटरनी आमचा फोटो टिपला वपरत आतमध्ये आलो. या महाशयांनी 500/- रू नोट काढली व मला देऊ केली.मला रहावल नाही. आहो सेल्फी फोटोचे पाचशे रूपये का? नको नको नकोत पैसे? ते बोलले मग तुम्ही जेवन करा तुमचा हाॅटेलचा बिल मी भरतो. आहो नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही का बिल भरणार? तुम्हीच बसा सोबत जेवायला मीच बिल भरतो.
ते सांगू लागले मी गणेशजी काशिद चिंचोली गावचा गृहस्थ. आपल्या “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” या पेजवर मी भरभरून प्रेम करतो. आपले कार्य व ध्यास मी नेहमीच पाहतो. आपल्यासाठी आज मला फक्त एकदा खर्च करू द्या प्लीज. मी पुन्हा नकार दिला. ते सांगत होते नोकरी निमित्ताने मी मुंबईकर झालो. त्यामुळे गावी पुन्हा परतने शक्यच झाले नाही. शिवजन्मभुमीवर त्यांच प्रचंड प्रेम त्यांच्या बोलण्यातून जानवल. ते अहमदनगरला काही कामानिमीत्ताने निघाले होते. मला अचानक पाहीले व थांबले होते.
शेवटी ती 500/- रू नोट त्यांनी केलेल्या आट्टाहासाने मला त्यांनी थोपवलीच. व बोलले आपल्या हातुन एका गरीबावर किंवा गरजुवर खर्च करा. मी त्यांच्या भावनांची इज्जत करत नाविलाजास्तव ती नोट खिशात घातली. त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर 500/- रू गेल्याचे दुःख दिसले नाही तर लाख रूपये मिळाल्याचे समाधान झळकत होते.
माझा मोबाईल नंबर त्यांनी घेतला. मी त्यांना बोललो आपला नंबर मला नक्की पाठवा व नाव पण टाका व मेसेज करा. ते नंबर घेत पाठीमागे वळाले व झपझप एस.टी स्टॅन्डच्या दिशेने चालू लागले मात्र मी आ वासून त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बसलेल्या टेबलवरून पाहतच राहीलो. माझ्या सौ तर माझ्याकडे आश्चर्याने अवाक होऊन पहातच राहील्या.
नक्कीच गणेश भाऊ आपले 500/- रू अशा गरजुंवर खर्च होतील की ज्याची आपेक्षा आपण केली नसेल. मात्र नक्कीच सांगतो की ती 500/- ची नोट जेवढ्या दिवस माझ्याकडे असेल ती जेव्हा ती गरजुकडे जाईल तीच्या व्याजासकट जाईल. आपण जे प्रेम दाखवलत त्याबद्दल आपणास माझा लाख लाख मुजरा. आपण पाठवलेला सेल्फी माझ्यासाठी नक्कीच लाखमोलाचा आहे.
जे भावले ते लिहीले. आवडले तर नक्कीच शेअर करा.
जय भवानी
जय शिवाजी.
(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G व
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)

लेखक : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

जुन्नर तालुक्यातील भोरवाडीची पेशवेकालीन अप्रतीम बारव

जुन्नर तालुक्यातील भोरवाडीची पेशवेकालीन अप्रतीम बारव.
आज श्री.रामनवमी उत्सव देशात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. याच दिवशी जुन्नर तालुक्यातील माझ्या खोडद गावचे ग्रामदैवत माता जगदंबा यात्रोत्सव असल्याने मी खोडद गावलाच होतो. वर्षातून एकदा सर्व मित्रमंडळीना एकत्र भेटण्याची नामी संधी म्हणजे ग्रामीण यात्रोत्सवच. गावातील इतरत्र नोकरी कामधंदा करणारे मित्र या दिवशी हमखास येणार व भुतकाळातील घडलेल्या घटनांना पुन्हा एकदा उजाळा याच माध्यमातून मिळत असतो.
श्री. राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला व आम्ही मित्र मंडळी नारायणगड पायथ्याशी असलेल्या भुयाराच्या शोधात निघालो मित्र सुभाष कुचिक, राजकुमार डोंगरे, मी व सोबतीला भाऊ कुचिक होतो. राजकुमारच्या घरी सरबत घेऊन निघालो. वाटेत सुभाष ने भोरवाडीची पेशवेकालीन अप्रतीम बारव पाहून जाऊया बोलला. मग काय चारचाकी थेट तेथेच उभी राहिली जेथे बारव होती.
अडचणीत शिरलो. बारव अनेक टणटणीच्या झुडपांनी वेढलेली होती. आत मध्ये जाणे कठीणच होते. तीथे साफ सफाई करत आम्ही आत शिरलो. पुरातन मार्ग गाडलेला होता त्याची स्वच्छता करत करत जवळपास 30/35 पाय-याची स्वच्छता केली. दोन वेशि पार करून विहीरीत प्रवेश केला. लिंबाच्या वृक्षामुळे पश्चिम भिंतीची जवळपास सर्वच पडझड झालेली होती. परंतु प्रवेश करणारा मार्ग जवळपास तीस फुट खोल बांधत नेला असून दोन कमांनी विटांनी कमान आकार देऊन अप्रतिम साकार केल्या आहेत.
जुन्नर तालुक्यातील एवढी सुरेख व सुंदर विहीर मला दुसरीकडे अद्याप पहावयास मिळाली नाही. मी वडगाव ग्रामस्थ बंधूंना विनंती करेल की या विहीरीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलली जावीत व आपल्या गावाला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जगासमोर एक पर्यटनाला चालना म्हणुन पुढे यावा.
(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G व
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)

लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details…

ठाकुर द्वार मधुसुदन मंदिर जुन्नर एक आगळी वेगळी कथा. 

ठाकुर द्वार मधुसुदन मंदिर जुन्नर एक आगळी वेगळी कथा
बालाजींची येथील अप्रतिम मुर्ती 
मित्रांनो चार वर्षे झाली जुन्नरची भटकंती करतोय व दिसणारा ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा “निसर्गरम्य जुन्नर तालुका ” या पेजच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता वैयक्तिक जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. खरेतर कुटूंबाच्या सहकार्यामुळेच हे शक्य होतय. फक्त जुन्नर तालुक्यातच ऐतिहासिक वारस्याचे जाळे प्रचंड मोठे असून ते सध्या अस्तव्यस्त स्वरूपात आढळुन येते. ते पुन्हा पुर्ववत माहीतीच्या स्वरूपात विनता येईल का? यासाठी माझा नियमित प्रयत्न असतो. कधीकधी एकाच ठिकाणची माहिती घ्यायची झाली तर वीस वीस दिवस लागतात. कधी कधी तर स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीने समाधान झाले नाही तर त्यासाठी विशेष तज्ञ व्यक्तींना त्रास देऊन माहिती घ्यावी लागते. अर्थात अशा तज्ञ व्यक्तिंचा अशिर्वाद नेहमीच पाठीवर असताना कोठे अडचण जाणवत नाही हे माझे मोठे भाग्यच. आज जी माहिती मिळाली ती कदाचित आपणास माहीत आहे की नाही हे सांगणे कठीण. परंतु जे काही ऐकले ते मात्र वाचताना आपल्या विचारांना कोड्यात टाकण्या सारखे निश्चितच आहे. मी तर अनेक वेळा विचार केला की हे खरोखरच सत्य असेल का? परंतु शक्यता नाकारता येत नाही हेच मला वाटले.
जुन्नर शहर एका भातखळ्या तलावाच्या किनारी व किल्ले शिवनेरीच्या दक्षिण पायथ्यालगत वसले होते. आजही त्याचे भक्कम पुरावे आपणास तेथे पहावयास मिळतात. मग प्रश्न असा पडतो की सर्वच गाव तेथून दुसरीकडे का गेले असावे? तीच कथा पुढे ऐकावयास मिळाली.
रोगराई व आकस्मिक मृत्यूचे तांडव या भातखळ्या ठिकाणी चालू झाले होते. संपूर्ण परिसर झाडाझुपांनी वेढलेला होता. जागेचा दोष म्हणून काही कुटूंबांनी येथून निघता पाय घेतला होता. जो तेथे राहील तो संकटाच्या भोव-यातच फिरत राहत असे. कुकडी माईचे पाणी येथे उपजिवीकेसाठी जवळ आहे म्हणून लोक (नविन सध्याचे जुन्नर) आहे येथेच झोपडय़ा करू लागले. एक एक करून सर्वजण तेथून नवीन जागी सध्याचे जुन्नर या ठिकाणी स्थलांतरित झाले. मग गावचा देव तेथे कसा राहणार म्हणून गावक-यांनी तो उचलून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणे ती शिळा उचललीच नाही. अथक प्रयत्न केले सर्व व्यर्थ गेले. एकदिवस एका ठाकराच्या स्वप्नात “हा बालाजी” देव गेला व त्यास दृष्टांत दिला, की मला घेऊन जायचे असेल तर नंदी असलेल्या बैलगाडीत घेऊन जा. त्यावेळी फक्त दोनच व्यक्ती मला उचलतील व गाडीत ठेवतील. ती गाडी ज्या ठिकाणी थांबेल तेथेच माझे मंदिर बांधण्यात यावे.
त्या ठाकराने घडलेला प्रकार सर्व ग्रामस्थांना सांगितला. अगदी दृष्टांताप्रमाणेच सर्व काही केले. अगदी अलगतच दोन व्यक्तींनी ती मुर्ती उचलली व बैलगाडीत ठेवली व ती गाडी न हाकता बैले चालू लागली. व बैले आज मंदिर आहे त्या ठिकाणी थांबली. व त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले तो कालखंड होता दिडशे वर्षा पुर्वीचा. ठाकराला दृष्टांत दिला म्हणून मंदिराचे नाव ठाकुरद्वार मंदिर असे देण्यात आले. आहे की नाही कथा विचार करण्यासारखी?
आज जेव्हा मी मंदिर दर्शनासाठी गेलो तर मंदिराच्या दक्षिणेस सती मंदिर, विहिर व समाधी आहे. पश्चिमेस कल्याणपेठ लेंडीनाला आहे. पुर्वेस भास्कर घाट व स्मशान तर उत्तरेस कुकडी नदी. संपूर्ण परिसर शेतीने व हिरवाईचा शालू पांघरलेला आहे. सतीमंदिरांची रचना तर खास आकर्षित करते. येथील दक्षिणेला खोदलेली विहीर फक्त आणि फक्त देवस्नानासाठीच बांधली गेली असल्याचे समजले. यावर मोट किंवा कातडी चमड्याची वस्तू वापरणे बंदी होती. अनेक समाधीस्थळे ठिकठिकाणी विखुरलेली दिसतात. संपूर्ण परिसर सध्या विटभट्यांच्या विळख्याने व्यापलेला आहे. येथील मंदिराची रचना पेशवेकालीन ओळखली जाते व कातळातील मुर्तीची रचना ही मुर्तीकाराने जेंव्हा मुर्ती साकारायला घेतली तेंव्हा त्याच्या समोर इ.स.दुसऱ्या , तिसऱ्या शतकातील लेणीमधील पद्मपाणी यांच्या मुर्त्या नजरेसमोर ठेवून बनविली असावी. अशा मुर्त्या 16 व्या 17 व्या शतकातील भगवान बालाजी ,विष्णु ,केशव ,हरी ,,म्हणूनच महाराष्ट्रात अशा मुर्त्या ओळखल्या जातात अनेक जून्या मंदिरात ह्या पाहयला मिळतात.मुर्तीच्या खालच्या हातात चक्र आणी गदा स्पष्टपणे दिसत आहेत. हीच आठ फुटाची मुर्ती बुलढाणा जिल्हातील मेहकर येथे भव्य मंदिरात आहे. मित्रांनो कधी जुन्नर मध्ये असाल तर या मंदिरास धावती भेट द्यायला विसरू नका.
या माहीती साठी मला श्री.राजेंद्र दामोदर वैष्णव (पुजारी), आशोक भिकू डोके (वैष्णव साधू संप्रदाय शितलगिरी महाराज), लेखक – महेंद्र शेगावकर ,लेखक अशुतोष बापट व लेखक प्र.के घाणेकर सर यांचे शुभाशिर्वाद लाभले त्यांचा मी खुप खुप ऋणी आहे.
(आमचा YouTube चायनल लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G व
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)

लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश ( शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details…

 

 

जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील नैसर्गिक चमत्कार. 

जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील नैसर्गिक चमत्कार
जुन्नर शहराच्या पश्चिमेला पाच कि.मी अंतरावर असलेले व माणिकडोह धरणाच्या पुर्वेला दोन कि.मी अंतरावर कुकडी नदीच्या दक्षिण किणा-यावर वसलेले एक छोटस व माणुसकी जपणार गाव म्हणजे माणिकडोह गाव. या गावातील जुन्नरकडून माणिकडोह रस्त्याने आल्यावर कुकडीनदीला दोनदा ओलांडून प्रवेश करावा लागतो ही मोठी विशेषता. प्रथम नदि ओलांडल्यानंतर जेव्हा आपण शंभर मीटर अंतरावर माणिकडोह धरणाचा मुख्य रस्त्यावरून डावीकडे वळण घेऊन दुसर्‍यांदा नदि ओलांडतो तेव्हा आपणास येथे पाऊण कि.मी अंतर लांबीची बनलेली नैसर्गिक नहर पाहून हा चमत्कार पहावयास मिळतो.
ही नहर आपणास प्रथम मानवनिर्मीत असल्याचा भास होतो. परंतु ती नैसर्गिक असल्याचे समजताच निसर्गाच्या विविध रूपांपैकी एक चमत्कार असल्याचे जाणवते. अतिशय परिपक्व खडकात ही नहर कशीकाय बनली गेली असावी? हे पाहील्यावर मात्र अभ्यासकांनाही निश्चितच कोडे पडते व ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागतात. याच नदि किनारी दक्षिणेस गावचे ग्रामदैवत मळगंगा देवस्थान या निसर्गरम्य परिसरात उठून दिसते. डोंगराने हा परिसर व्यापलेला असून धरण परिसरामुळे येथे वर्षभर हिरवळीचे साम्राज्य पसरलेले पाहून डोळयांचे पारने फिटते.
या रस्त्याने आपण धरणापासून पुढे गेलात तर किल्ले हडसर, किल्ले निमगिरी व नाणेघाट व किल्ले जीवधन अशा ऐतिहासिक व निसर्ग सौंदर्याने भरपुर नटलेल्या वास्तु पहावयास मिळतात. कधी योग आलाच तर नक्कीच एकदा भेट द्यायला विसरू नका.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री. खरमाळे रमेश गणपत (शिवनेरी भुषण)
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
मा.सैनिक संघ जुन्नर.

खुटादरा एक थरारक ट्रेक

 खुटादरा एक थरारक ट्रेक

2013 पासून जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्यात भटकंती करण्याचा अनेक वेळा योग जुळून आला. त्यात हरिश्चंद्र गड ते भिमाशंकर दरम्यान पसरलेल्या अथांग सह्याद्री दर्शनाने तर मला कधी प्रेमात पाडले समजलेच नाही. एकदा का भटक्यांना या सह्याद्रीत फिरण्याची चटक लागली की बस त्याला दुसरे काहीच दिसत नाही. टोलार खिंड, जुन्नर दरवाजा, इतिहास कालिन माळशेज घाट श्री छत्रपती शिवाजी महाराज #पावणखिंड#भोरदार्या#भोरांड्याची_नाळ#नाणेघाट#दार्याघाट#खुटादरा#डोणीदरा अशा विविध कोकणकड्याच्या पायवाटा तुडवत कोकणदर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्ष सह्याद्रीने घातलेल्या सादेस प्रतिसाद देताना होणारा आनंद गगणात मावेनासा होतो. प्रत्येक वाटेची एक वेगळीच कथा, विशेषता व सुंदरता. त्याच पैकी असलेला हा खुटादरा.
खुटादरा हे नाव ऐकण्यात तसे विचित्रच वाटते नाही का? परंतु जेव्हा आपण या वाटेने प्रवास करतो तेव्हा समजते की हे नाव दिले गेले ते काही चुकीचे नव्हते. या वाटेचा उतार एका नाळीतुन नसुन अतिशय थरारक उतरणीतुन करावा लागतो. व उतरताना मागे वळून पाहिले की आपण ते दृष्य पाहून थक्क होतो. अगदीच नव्वद डिग्री उंचावरून आपण खाली उतरतानाचे ते दृष्य दृष्टीस पडते व ते दृष्य एका खुंट्यासारखेच दिसते.
स्थानिक येथील कथा अतिशय थरारक सांगतात व ऐकणारा या ठिकाणी यावे की नाही असा विचार करतो. कारण हा संपूर्ण परिसर पाहीला तर तो निर्मनुष्य आहे, त्यामुळे मुंबई मधील कुख्यात गुन्हेगार पुर्वी याच भागात आपला तळ ठोकून असत.कारण येथे अथांग पसरलेल्या जंगलातून हीच एक “खुटादरा” वाट जुन्नर तालुक्यातील दुर्गादेवी व ढाकोबा परिसराला ठाणे जिल्ह्यातून जोडते. परंतु आज हे चित्र मात्र संपूर्ण बदललेल दिसते.
याच वाटेने उतरताना आपणास ठाणे जिल्ह्यातील आदिवासी रामपूर हे गाव लागते. व येथुन पुढे आपणास जीभ ने प्रवास करून धसई व सरळगाव असा प्रवास करता येतो. परंतु ही वाट उतरताना विशेष काळजी घेणे खुपच गरजेचे आहे. कारण आपली छोटीशी झालेली चुक मृत्यूच्या दारीत घेऊन जाऊ शकते.
शक्यतो या वाटेचा उपयोग करताना सोबत स्थानिक गाईड घेऊन जाणे गरजेचे आहे. कारण जंगलात पुढे अनेक आडवळणी वाटांना आपणास तोंड देत रामपुरला पोहचावे लागते. शक्यतो ही वाट स्थानिक कुणाला सांगत नाहीत परंतु आपण एक नियमित ट्रेकर असाल व आपणास एक लांब ट्रेक करायचा असेल तर खालील GPS रिडिंग च्या अधारे वाटेची सुरूवात भेटू शकते.
N19 13 31.2 E73 38 53.7
N19 13 30.2 E73 38 51.4
वरील वाटेची सुरूवात ही दुर्गादेवी मंदिराच्या उत्तरेकडे कोकणकड्याने साधारण एक कि.मी अंतरावर चालत गेलात की मिळते. परंतु एक लक्षात असू द्या की आपणास मध्यंतरी पिण्याच्या पाण्याची व जेवणाची कोठेही सोय होत नाही त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी स्वतः घेऊनच जावे. शक्य असल्यास गाईड म्हणून गुराखी हेमा पारधी (दुर्गवाडी) यांची आपणास मदत होऊ शकते.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री. खरमाळे रमेश गणपत
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
मा.सैनिक संघ जुन्नर.