Category Archives: ऐतिहासिक वास्तू पुरावे

किल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह

हि छायाचित्र चीन देशातील नसुन आपल्याच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहेत बरं का?

किल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह

रात्री झोपायला 11:00 वाजले होते. प्रथमच मी मित्र श्री. प्रमोद अहिरे सरांकडे नाशिकला आलो होतो. वयाची 55 वी गाठलेल्या हया ग्रहस्थांची माझी भेट जुन्नर भटकंतीत झाली होती. भटके म्हटले की लवकरच मैत्री बनते व ती सह्याद्री सारखी अफाट पसरली जाते. कारण या भटक्यांची भेट कोणत्या ना कोणत्या तरी सह्याद्री रांगेवर निश्चित होतच असते. आम्ही तीघे सकाळी 5:00 वाजता नाशिक मधुन किल्ले हरीहरकडे पावसाच्या सरींच्या स्वागतामध्ये चारचाकीतुन प्रस्थान केले होते. लवकरात लवकर किल्ले हरीहर दर्शन पुर्ण करून पुढे किल्ले ब्रम्हगीरी व किल्ले रामशेज पहायचे नियोजन होते. त्रंबकेश्वर आता मागे टाकत पुढे मुख्य रस्त्यावर उजवीकडे वळण घेत ब्रम्हगीरीला वळसा घेत जणु प्रदिक्षणा चालू केली होती. तीन कि.मी अंतरा नंतर एक घाटवाट चढण्यास आम्ही सुरूवात केली होती. नैसर्गिक सौंदर्य पाहण्यात मी आणि चिन्मय गुंग होऊन गेलो होतो. चारचाकी चढाला लागली होती. ब्रम्हगीरीच्या उत्तरेला असलेल्या तलावाचे दृश्य उंचावरून खुपच मनमोहक दिसुन येत होत. त्या हिरव्यागार गालीचा पांघरलेल्या ब्रम्हगिरीच्या रूद्र रांगा आता सजलेल्या नवरीच्या सौंदर्याला लाजवेल अशा नेत्रदीपक दिसत होत्या.

तलावाच्या पाण्यात ब्रम्हगीरीचे दिसणारे प्रतिबिंब ब्रम्हदेव तलावात स्नानासाठी उतरल्याचा भास करत होते. ते सौंदर्य न्याहाळताच मी आहिरे सरांना चारचाकी थांबविण्याची मी विनंती केली. कारण हे दृष्य एवढे विलोभनीय होते की ते मी वाचकांनीपण पहावे व आपल्या डोळ्यांसमोर ब्रम्हगीरी प्रत्यक्ष छायाचित्राद्वरे उभा रहावा म्हणून टिपले. आता आम्ही डोंगर माथ्यावरून पश्चिमेस उतरणीला लागलो होतो. वेडी वाकडी वळणे घेत आमचा प्रवास किल्ले हरिहरच्या दिशेने चालू होता. वेळ सकाळची असल्याने व जंगल परीसरातून प्रवास असल्याने जंगली प्राणी गाडीखाली येवू नये व अपघात घडू नये म्हणून सरांना गाडी हळू घ्या म्हणजे आपणास कदाचित प्राण्यांचे दर्शनही घडेल म्हणुन विनंती केली. एवढे वाक्य पुर्ण होताच क्षणी आमच्या समोर तरस प्राणी रस्त्या ओलांडताना आमच्या निदर्शनास पडला. हे लाईव्ह दृश्य आज प्रथमतःच चिन्मय व आहिरे सर पाहत होते. हे दृष्य पाहताना त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. पुढे तीन कि.मी अंतरानंतर मुख्य रस्ता सोडत आम्ही डावीकडे वळण घेतले.

समोर आडव्या पसरलेल्या डोंगररांगा अद्याप ही झोपेतून उठलेल्या दिसत नव्हत्या कारण धुक्याची चादर त्यांच्या तोंडावर अद्यापही ओढलेलीच होती. रस्त्यावरील खड्डे चुकवत आम्ही हर्षवाडीला पोहचलो. ग्रामपंचायत कळमुस्ते असलेल्या हर्षवाडीला ऐतिहासिक वारसा लाभला तो येथील किल्ले हरिहरचा. 20 घरे असलेली व सह्याद्रीच्या पोटात चारही बाजूंनी वेढलेली ही वाडी ही तर नटून थटून बसलेल्या नवरी सारखीच मला भासली. किल्ले हरीहरने रोजगाराची संधी निर्माण केलेल्या एका हाॅटेल जवळ चारचाकी पार्क करत खाली उतरलो. अंगाला सकाळची बोचरी थंडी जानवत होती. 7:00 वाजता आम्ही येथे पोहचलो होतो. आर्धी हर्षवाडी तर अद्यापही झोपेतच होती. येथेच आहिरे सर खाली थांबणार होते. सोबतीला गाईड घेऊन आम्ही किल्ले हरीहरवर चढाई करणार होतो. 80 वर्ष ओलांडलेली व्यक्ती हाॅटेलातुन बाहेर येत आमची विचारणा करू लागली. चहा मिळेल का म्हणताच हो म्हटले. व गाईड हवाय म्हटले तर समोरच्या घराकडे गेले. चहाची शेवटची चुस्की घेत गाईड सोबत आम्ही पावसात अंघोळ करत असलेल्या किल्ले हरीहरकडे चालु लागलो. अद्यापही किल्ले हरीहरचे धुक्यामुळे आम्हाला दर्शन घडले नव्हते. आज तो आमच्या सोबत लपाछपीचे खेळ खेळत होता. त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी डोळे आसुसले होते. खळखळ वाहणारा हर्ष ओढा आमचे स्वागत करताना भासत होता. किल्ले हरीहरचा इतिहास डोळ्यासमोर येत होता. हरिहर किल्ला उर्फ हर्षगड हा नाशिक जिल्ह्यातील एकेकाळी खुप महत्वाचा हा किल्ला होता. हा किल्ला सातवाहन काळातील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून हा किल्ला यादवांनी बांधून घेतलाय असा उल्लेख सरकारी कागदपत्रात असल्याचे वाचनात होते. किल्याची उंची समुद्र सपाटीपासून.११२०.४४ मीटर (३६७६ फूट) प्रकार : गिरीदुर्ग श्रेणी : सोपी ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र ,जवळचे गाव : हर्षवाडी, त्र्यंबकेश्वर डोंगर रांग : सह्याद्री हे मनोमन गिरवत चाललो होतो. किल्ले पायथ्याला लागलो होतो. पावसाच्या धारा सुरू झाल्या होत्या. जंगलातून चिखलातून पायवाट तुडवत चढाईला प्रारंभ केला होता पावलागणिक किल्याचा इतिहास आठवू लागला होता. त्याकाळी हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. श्री शहाजीराजे भोसले यांनी १६३६ साली शेजारी असलेला त्र्यंबकगडासोबत हरिहर किल्ला पण जिंकून घेतला होता. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढं १६७० मध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यानं हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला होता. नंतर ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बर खान याने हरिहर जिंकून घेतला. पुढं १७०० मध्ये मराठ्यांनी परत हरीहर घेतला. नंतर १८१८ मध्ये इंग्रजांच्या मराठेशाही बुडवूण्याच्या लढाईत इंग्रज अधिकारी कॅप्टन बेन्जामीन स्पूनर ब्रिंग्ज्स याने हरिहर जिंकून घेतला हा कॅप्टन बेन्जामीन ब्रिंग्ज्स प्रत्येक गडाच्या पायथ्याच्या पायऱ्या उद्ध्वस्त करणारा क्रुर व्यक्ती या पायऱ्या पाहून मोहीत झाला त्यामुळे त्याने ह्या सुंदर पायऱ्यांच्या वाटेला धक्काच लावला नाही. यावरून पायऱ्यांचा आकर्षकपणा किती मनमोहक आहे याचा अंदाज येतो. यामागील कार्यवाहीत त्यानं अलंग-मलंग-कुलंग गड, सिद्धगड, पदरगड, औंढा आणि गडगडा या किल्ल्यांच्या पायऱ्यांची मोडतोड केली होती. असा हा विविध प्रकारची मालिकी अनुभवनारा नाशिक जिल्ह्यातील हरिहर हा महत्वाचा किल्ला मानला जात होता. इतिहास आठवतच मी प्रथम टप्पा असलेल्या छोट्या माळरानावर पोहचलो. गाईड सोमनाथने या माळाची ओळख चिर्याची माळी म्हणुन करून दिली. या माळरानावरून आम्ही डाव्या बाजूला गेलेल्या पाऊलवाटेने चालु लागलो. अगदी जवळच एक कुंड निदर्शनास पडले. या कुंडातील भींतीत शिल्पावर कोरलेला शिलालेख होता

श्री श्री गणेशाय नम: ——तिथौशुक्ल——त: श्रीमान्नारायाणा—-गिरि—-सु—-क्त–सातशालीवाहो—-पनामा—-हरिहर—विलसद्देवता—केसुतीर्थमा—-धि-ण्यार्त–लोकश्रमनिर—हैसते—-श्रेय—-सो—-मंगलाय ll१ll

याच शिलालेख असलेल्या भिंतीच्या माथ्याच्या पाठीमागे शेजारीच थोड वर चढून गेल्यावर मारुती मंदिर निदर्शनास पडले मारूतीचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा माघारी फिरलो. आम्ही पुन्हा जेथून डावीकडे वळन घेतले होते येथुन किल्ला सर करण्यासाठी सुरूवात केली. पुन्हा आम्ही धुक्यात हरवलेल्या वाटेने चालू लागलो. हर्षवाडी ला पोहचण्याच्या वाटा गाईड सोमनाथला विचारू लागलो त्याने दोन मार्ग सुचवले.
१) नाशिक-त्रंबकरोड-मोखाडारोड-हर्षवाडी-हरिहर पायथा (४८ कि.मी.)
२) इगतपुरी-घोटी-त्रंबकरोड-कोटमपाडा-हरिहर पायथा (४८ कि.मी.) हे दोन्ही रस्ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. बोलता बोलता आम्ही उघड्यावर असलेल्या वेताळ देवस्थानापाशी पोहचलो. या ठिकाणी छोटीशी हाॅटेल आहे येथे पोहचलो. पाऊस येथे जोराचा येऊ लागला होता. पुढील दोन किल्ले पुर्ण करायचे असल्याने बसून चालणार नव्हते. आम्ही समोर चढाईला चालू लागलो. येथे मात्र पाऊसात चढाई करताना दमछाक होत होती. हवा मात्र खुपच जोराची वाहू लागली होती. पुढे पाऊल टाकताना हवा पुन्हा मागे ढकलत होती. सहज या चढाईच्या ठिकाणाचे नाव सोमनाथला विचारले तेव्हा समजले की या छोटय़ा टेकडीला “म्हातारी” म्हणतात. हे शब्द ऐकताच थोडे आश्चर्य वाटले परंतु हे नाव का देण्यात आले असावे याचा अर्थ उलगडून गेला. कारण हवेचा दबाव या ठिकाणी शरीरावर एवढ्या जोरात असतो की मनुष्य प्रयत्न करून सुध्दा झप झप न चालता अगदी म्हातारी जशी लटपटत चालते अगदी तसाच चालतो.
धुक्यांच्या लाटातुन समोरच्या पाय-यांचे दृश्य अस्पष्ट दिसून येत होते. आम्ही आता पाय-यांच्या खालच्या टप्यावर पोहचलो होतो. पायरीमार्ग कधी पाहिल असे झाले होते. खालच्या हाॅटेल टपरीपासून आम्ही झपझप वर चढून आलो व समोरचे दृश्य पाहून आपोआप ओठ हालले व कंठातून शब्द बाहेर फेकले गेले होते ते इंग्रज अधिकारी कॅप्टन बेन्जामीन स्पूनर ब्रिंग्ज्स यांच्या भाषेतच wow. हा इंग्रज ब्रिंग्ज्स या पाय-यांच्या प्रेमात खरच पडला असेल का? या प्रश्नांचे उत्तर समोरच होत. 45 मिनीटे जवळपास छायाचित्रे टिपण्यासाठी आम्ही त्या तेज वाहणाऱ्या व पडत असलेल्या पावसाचा सामना करत उभे होतो. धुक्याच्या गर्द अशा लाटेमुळे छायाचित्रे काढणे कठीण वाटत होते. शेवटी अट्टाहास सोडत जशी छायाचित्रे जमतील तशी घेत पा-यांवरच्या वाहणाऱ्या पाण्यात आमचा किल्ला सर करायचा प्रयत्न सुरू झाला. प्रथम पायरीवर पाय ठेवत आम्ही पाय-यांच्या पृष्ठभागावर दोन्ही बाजूला कोरलेल्या खोबण्यात हाताची बोटे खुपसत वर चढू लागलो. प्रचंड वेगाने वाहणारा वारा जणू आम्हाला त्या खोल खाईत लोटतो की काय असे वाटत होते. हा विचार करत असतानाच त्या वा-याची साथ देण्यासाठी धो धो पाऊस कोसळू लागला होता. क्षणात दिसणा-या पाय-यांनी तेज पाण्याने भरून वाहण-या ओढ्याचे रूप धारण केले होते, तरीही आम्ही न डगमगता त्या प्रसंगाला तोंड देत चढाई करत होतो. तोंडात ते वाहते पाणी जात होते. 90 डिग्री मध्ये कोरलेल्या त्या पायर्‍या चढताना यमदूत भासू लागल्या होत्या. आतातर कहरच झाला होता धुक्याने संपूर्ण सफेद चादर ओढण्यास सुरुवात केली होती. जवळ असलेल्या दोन तीन पाय-याच फक्त त्या धुक्यात दिसत होत्या. आम्ही किती उंचावर आहोत हे मात्र धुक्यामुळे समजत नव्हते. किल्ला हरीहर पाहण्याचे स्वप्न पूर्ण होणार ही आशा आमच्या प्रोत्साहनात भर घालत दिलासा देत होती. शेवटी सह्याद्री रांगा व गडकोट यांच्याशी जडलेली घनिष्ठ मैत्रीचा विजय झाला व आम्ही किल्ले हरीहरच्या भगव्या रंगाने सजवलेल्या प्रवेद्वारापाशी पोहचलो. देशासाठी सुवर्णपदक पटकाविलेल्या खेळाडूच्या ह्रदयातुन जसे आनंदाचे फवारे उफाळून येतात तसाच आनंद आमच्या ह्रदयातुन उफाळून आला होता.

पाऊस थांबला होता पाय-यांचे चित्र व ती खाई स्पष्ट दिसत होती. यावेळी समोर कातळातून (खडकातून) कोरलेल्या पायऱ्यांचे या गडाचे विषेश आकर्षण का आहे हे दिसत होते. जवळपास एक पायरी २.४ फूट असावी. अशा या पायऱ्यांची लांबी सुमारे ६०.९६ मीटर म्हणजे २०० फूट चढण्यासाठी व उतरण्यासाठी होती. चढाई सोपी व्हावी व भक्कम आधार मिळावा म्हणून प्रत्येक पायरीवर खोबणी (खाचे) बनवले गेले आहेत. चढाई करून गेल्यावर गडाचा पहिला मुख्य दरवाजा की ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो तो आपल्या मजबूतीची साक्ष देत आजही तगधरुन उभा होता. जणूकाही तो आमचे व येणाऱ्या पर्यटकांचे स्वागतच करण्यासाठी टिकून आहे की काय? असा भास होतो. थोडा वेळ ते सौंदर्य न्याहाळत आम्ही पुन्हा चढाईला लागलो. समोर पुढं ७० ते ८० फूट कातळातून सपाट कोरलेली वाट आहे या काळाच्या डाव्याबाजूचे परीसर दृश्य पाहून पर्यटक थक्क होत असावेत अस वाटत. हे दृश्य धुक्यामुळे पाहता न येणे हेच आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. सपाट भाग संपताच पुन्हा कातळात कोरलेल्या जागिचवर भुयारी मार्ग पाय-या दिसतात व तिथंच किल्याचा दुसरा दरवाजा नजरेत पडतो. पुढं खडकातून कोरलेल्या पाय-या नागमोडी वळणे घेत तिसऱ्या दरवाजा पाशी येतात. दरवाजाचं बांधकाम जरा ढासळलेले निदर्शनास पडते. याच दरवाजा शेजारीच एक गुहा निदर्शनास पडते. त्यात उतरण्यासाठी दोरी असली पाहिजे. व पावसाळ्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये. हा दरवाजा पार केल्यावर आपण थेट किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. पठाराचा आकार त्रिकोणी असल्याचे वाचनात होत परंतु तो आकार धुक्यामुळे पाहता येन शक्य नव्हते. पठारावर खडकात कोरलेली पाच पाण्याची टाके, एक मोठा तलाव आहे त्यासमोर हनुमान मंदिर आहे. थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे दारूचे कोठार आहे आजही छप्परसह सुस्थितीत असल्याचे दिसून येते खरे परंतु काही निर्लज्ज पर्यटकांनी बापाची जहागिरदारी समजून त्या भिंतीवर नावे टाकून त्याचे विद्पीकरण केल्याचे दिसते. डाव्याबाजूला छोटं तळं आहे. या गडाच्या बालेकिल्यावरून वैतरणा धरण, त्र्यंबकगड, फणाडोंगर, भास्करगड, कावनई, त्रिंगलवाडी हे गडकिल्ले फार आकर्षक दिसतात अस वाचनात होते परंतु धुक्याने आम्हाला ते दर्शन घेता आले नाही. हा गड सर करण्यासाठी आमचा कालावधी :
हर्षवाडी पासून 3 तास पावसाळ्यात लागतो तर इतर वेळी हा किल्ला सहज 1:30 किंवा 2 तासात सर होऊ शकतो. किल्यावर राहण्याचीसोय : फक्त दारूच्या कोठारातच होऊ शकते. वर किल्यावर जेवणाचीसोय नसल्याने भाकर बांधून न्यावी. सोबत पाणी ठेवले तर उत्तमच नसेल तर गडावरील टाके व तळे आहेतच. कडक उन्हाळ्यात पाणी सोबत न्यावे लागत असावे असे वाटते.

आम्ही सर्व गोष्टींचा साठा डोक्यात साठवून पुन्हा उतरणीला लागलो होतो. पावसाने पुन्हा हजेरी लावली होती. नंबर 3 दरवाजातून उतरताना पाय-या वरून पुन्हा पाण्याच्या लोटांचा सामना करत आम्ही दोन नंबर दरवाजापाशी पोहचलो. तेथून पुन्हा एक नंबर दरवाजा पाशी येऊन थांबलो होतो. पाय-यांवरून पाण्यात उतरने धोक्याचे होते म्हणून वेट करत थांबलो. परतीला पुन्हा दोन किल्ले पहायचे होते. धोका टळला होता. किल्याच्या आठवणींना उजाळा देत आम्ही झपझप उतरत केव्हा हर्षवाडीत पोहचलो समजलेच नाही. घड्याळ 11:00 ची वेळ दाखवत होते. चारचाकीत बसत आम्ही ब्रम्हगीरीकडे प्रस्थान केले ते या किल्ले हरीहरच्या दर्शनाच्या आठवणीतच. एक निश्चित सल्ला द्यावासा वाटतो की भर पावसात हा किल्ला सर करणे धोक्याचे आहे.

हे वैभव आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढील आमचा चायनलवर पाहु शकता. YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्र – श्री खरमाळे रमेश 
शिवनेरी भुषण
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – वनविभाग जुन्नर
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
सदस्य :- रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details…

पौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

पौराणिक गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

जुन्नर शहरातून नाशिकला जाण्यासाठी 1:45 वा निघालो होतो. विषय होता आयुर्वेदिक औषध नाशिकला जाऊन आणण्याचा. आम्ही जयहिंद काॅलेज मागे टाकत भरघाव वेगाने नारायणगावच्या दिशेने आमची चारचाकी जात असताना अचानक मोबाईल घरीच जुन्नरला विसरल्याचे लक्षात आले. सोबत चिन्मय होता. त्याच्या मोबाईल माझा नंबर डायल केला तर तो पत्नीने घरी रिसिव केला व बोलली फोन विसरलात. जुन्नरहून सासरे बोरी शिरोलीला जायला निघाले होते त्यांच्याकडे मोबाईल पाठवून देते व तुम्ही तेथेच थांबा म्हणुन पत्नी बोलली व संभाषण कट झाले. विसाव्या मिनीटातच मला मोबाईल मिळाला. हायबाय करत आम्ही निघालो. नारायणगाव, आळेफाटा,संगमनेर मागे टाकत आता सिन्नरच्या पौराणिक गोंदेश्वर मंदिराचे दर्शन घ्यावे म्हणुन थांबलो. वेळ थोडा होता व त्याच वेळेत परिपूर्ण छायाचित्रांसह दर्शन व्हावे हा उद्देश होता. चारचाकी पार्क करत कॅमेरा सोबत घेत बाहेर पडलो. मंदिराच्या बाह्यांगाचे छायाचित्र घ्यावे म्हणुन कॅमेरा ऑन केला व प्रथम क्लिक केला. तेव्हा समजले की कॅमेरा मेमरीकार्ड घरीच लेप्टाॅपमध्ये राहीले. मग काय पुन्हा सिन्नर शहराकडे कार्ड शोधन्यासाठी धाव घेतली. 30 मिनीटांत कार्ड मिळाले व मंदिर दर्शन सुरू झाले.
पुणे नाशिक व मुंबई – शिर्डी मार्गावर सिन्नर नावाच गाव आहे. या गावात रस्त्यालगतच तहसीलदार कार्यलयाच्या उत्तरेला अगदी 300 मीटर अंतरावर हे गोंदेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर केव्हा व कोणी बांधल याचा उल्लेख व शिलालेख मिळत नाही. यादवांच्या राजवटीत १२ व्या शतकात हे मंदिर बांधले असावे असा तर्क या मंदिराच्या रचनेतुन निदर्शनास येतो. या गोंदेश्वर मंदिरा भोवती ५ फूट उंच तटबंदी असुन पुर्वेकडील भिंत बाहेरून ढासळलेली आहे.या तटबंदीत असलेल्या दोन दरवाजातून म्हणजे पश्चिम आणि दक्षिण दिशेकडून मंदिराच्या परीसरात प्रवेश केल्यावर समोर ५ फूटी उंच चौथर्‍यावर (अधिष्ठाण) मध्यभागी गोंदेश्वराचे उंच मंदिर व त्याच्या चार बाजूला असलेली चार छोटी कलाकुसरींनी युक्त मंदिर आपले लक्ष वेधून घेतात.
गोंदेश्वराचे मंदिर संकुलात ५ मंदिर आहेत. हे शिव पंचायतन असून यात मुख्य मंदिर शिवाचे असून चार बाजूला पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णूचे मंदिर आहे. या शिवाय शिव मंदिरा समोर नंदिचा मंडप आहे. शिव मंदिराचे सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. मध्यभागी कासव कोरलेले असून खांबांवर व छ्तावर नक्षी कोरलेली आहे. खांबाबर काही शिल्पपट व मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शंकराची पिंड आहे. मंदिराच्या सभामंडपाला पूर्वेकडे असून मंदिराचे मुख्य दार दक्षिणेकडून आहे. मंदिराच्या दरवाजा समोर नंदिचा मंडप आहे. मंदिराचे शिखर भूमिजा पध्दतीचे आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूसही पायापासून छतापर्यंत कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे. सर्वात खालच्या बाजूच्या शिल्पपट्टीवर हत्ती कोरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या बाजूला असलेल्या मंदिरांवरही कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे.
मंदीर सध्या संवर्धित होणे गरजेचे असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा लवकरच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. पर्यटकांना येथील आवारात क्रिकेट खेळणा-या मुलांकडून अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सिन्नर ग्रामस्थ व पुरातत्व विभाग यांनी विशेष लक्ष देत संवर्धन केले तर भविष्यात हेच मंदिर सिन्नरकरांचे मुख्य पर्यटन आकर्षण ठरले जाऊन अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात मुख्य भुमिका निभावेल असे वाटते. …. येथील छायाचित्र व माहीती घेत आम्ही पुढे गारगोटी मुझीयम पाहण्यासाठी निघालो. वेळ झाली होती 4:00 ची. … क्रमशः पुढे पाहू गारगोटी मुझीयम. ..
हे वैभव आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढील आमचा चायनलवर पाहु शकता. YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्र – श्री खरमाळे रमेश 
शिवनेरी भुषण
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – वनविभाग जुन्नर
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
सदस्य :- रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details…

एक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.

एक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.

मित्रांनो गडकोट, सह्याद्री व निसर्ग भटकंती हे आता तर नियमितचेच सोबती झाले आहेत. त्यात गडकोट म्हणजे प्रत्येक वेळी नवनवीन अविष्कार दाखवणारा जादूगारच आहे असे वाटते. कारण खुप काही शिकायला व अनुभवायला येथे गेल्यावर मिळाले. परंतु यासाठी आपणाकडे वेळ असायला हवा. जुन्नर तालुक्यातील असलेल्या सात किल्यांवर जवळपास चार वर्षे अनेक वेळा निरीक्षणे करण्याची संधी मिळाली व त्याबाबतीत लिहिण्याचा व मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या दृष्टिकोणातून केला. यावर अनेक वाचक मित्रांनी चांगल्या प्रतीक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून नोंदविल्याने एक प्रकारे मला आपण प्रोत्साहीत करून पुन्हा पुन्हा लिहिण्यासाठी निश्चितच बळ दिले. वाचक मित्रांनो आपल्याच माध्यमातून अनेक विविध पैलूंवर मला अभ्यास करण्याचा व जोपासण्याचा छंद जडला. आता कालचेच उदाहरण द्यायचे झाले तर संध्याकाळी 4:30 वाजता एक व्यक्ति घरी आली. भटकंती बाबत अनेक विषयावर चर्चा झाली. याच चर्चेत एक विषय निघाला किल्ले चावंडच्या बाबतीत. चावंडवर तसा मी अनेक वेळा गेलो व त्यावर वेळोवेळी लिहिले पण परंतु विषय होता तो किल्ले चावंडवर असलेल्या भुयाराबाबत. दोन वेळा येथे जाण्याचा योग पण आला परंतु या भुयारात पाणी असल्याने हे नक्की काय असेल हे सांगणे कठीण होते. आमच्या गप्पा चालू होत्या. संध्याकाळचे रमेश बरोबर गप्पा मारत मारत 5:30 कधी झाले समजलेच नाही. रमेशला सहज प्रश्न केला जाऊयात का आता चावंडला भुयारात शिरण्यासाठी? तो पण हो म्हटला. मग काय? वेळ, काळ याकडे आम्ही थोडेच लक्ष देणार होतो. दूचाकी घेऊन आम्ही निघालो चावंडच्या दिशेने. आकाशात पावसाच्या ढगांनी खुप गर्दी केली होती. कुठल्याही क्षणी मेघराज्याचे आगमन होणार होते. मेघराज्या कितपत साथ देईल सांगणे कठीण होते. 30 मिनिटांत किल्ले चावंडच्या उत्तर पायथ्याशी पोहचलो. हलकी बुंदाबांदी सुरू झाली होती. आम्ही छायाचित्रे व चित्रांकण करत झपझप किल्ला सर करू लागलो. अर्धा किल्ला सर करून कच्या पाऊलवाटेने पश्चिमेकडे धाव घेतली. कारण आता मेघराजाणे कोपण्यास सुरूवात केली होती. भीती होती ती फक्त वरून पावसामुळे स्लाईड होणाऱ्या दगडधोंड्यांची. (मित्रांनो येथे निश्चितच सांगू इच्छितो की प्रथम चांगला पाऊस सुरू झाला की सह्याद्रीची भटकंती किमान 15 ते 20 दिवस तरी थांबवावी, कारण या कालावधीत कडे कोसळण्याचा जास्तीत जास्त खतरा असतो.) झपझप पावले उचलत या भुयाराच्या निवा-याला आम्ही सुरक्षित पोहचलो. आता कितीही पाऊस झाला तरी आम्हाला कसलीच भीती नव्हती, की वरून कडा कोसळला तरी ते भुयार गाडण्याची भीती नव्हती.

बाहेर पाऊस पडत होता व आमचा भुयारात घुसण्याचा खेळ सुरू होता. साधारण 4×3 फुट उंची,रूंदी असलेल्या या भुयारात प्रवेश बसुन सरकत सुरू झाला. विजेरी सोबतच होती. आतमध्ये किती लांबवर जावे लागणार हे साधारण 25 फुट आतमध्ये गेल्यावर समजणार होते, कारण या ठिकाणाहून उजवीकडे भुयार कोरले गेले होते. जुन्नर तालुक्यातील आकरा भुयारांचे निरीक्षण पाहता हे भुयार व त्याची रचना वेगळीच दिसत होती. कारण अडीच अडीच फुटावर प्रथमतः तीन स्टेप व नंतर पुढे सपाट भाग दिसत होता. आम्ही काळजीपुर्वक पुढे सरकत होतो. भिंतीवर वेगळ्या प्रजातीची पाल निदर्शनास पडली होती. आम्ही पुढे जसजसे सरकत होतो ती पण पुढे पुढे सरकत आम्हाला रस्ता दाखवत होती. तुडुंब पाण्याने भरलेले हे भुयार कोरडे झाले होते.

विजेरीचा लांबवर केलेल्या प्रकाशात अचानकच एक ठिकाणी काहीतरी चमकत होते. काय असावे सांगणे कठीण. पुढे भयानक शांतता व गडद अंधार होता. पाठीमागून भुयाराच्या तोंडातून पडणा-या उजेडानेपण आता आमची साथ सोडली होती. गरमीच्या उकाड्याने शरीरातून घामाच्या धारा फुटू लागल्या होत्या. भुयाराच्या उजव्या वळणावर आम्ही थोडी विश्रांती म्हणुन थांबलो होतो. भुयाराचा आकार थोडा कमी झाला होता. आत मध्ये फक्त शिरताना एवढा त्रास होत होता तर हे कोरताना कोरणाराचे काय झाले असेल? त्याने कोणत्या उजेडात हे कोरले असेल? आता तर माझ्याकडे विजेरी आहे त्यावेळी भुयारात प्रदुषण होऊ नये म्हणून काय असेल? हे कोरताना उजेडासाठी व कोरण्यासाठी काय वापरले असेल? हे नक्की माणसानेच कोरले असेल का? जर माणसाने कोरले असेल तर ऑक्सिजनची आतमध्ये तरतुद असेल का? असे विविध प्रश्न या दोन मिनिटांच्या विश्रांतीत काहूर माजून गेले. पुढे काय आहे हे पाहण्याची उत्सुकता लागली होती. रमेश आणि मी काळजी घेत पुढे सरकत होतो.
आता तर पुढे आणि पाठीमागे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या काळोखात फक्त आणि फक्त आमच्या घेत व सोडत असलेल्या श्वास व उश्चवासाचाच आवाज येत होता. सरकताना होणारा आवाज छातीतून निघणा-या ठोक्यांच्या आवाजाशी जणू स्पर्धा करत आहे की काय असे वाटत होते. विजेरीत चमकणारे ती वस्तु जवळच होती. ती खुप सुरेख व सुंदर होती. ती मी आज प्रथमतःच या आकारात पाहत होतो. कदाचीत ही नवीन संशोधनाचा भाग असू शकेल असे वाटत होते. ही वस्तू म्हणजे एक बेडूक नावाचा जीव होता. त्याचा एक डोळा चमकताना दिसत होता. जवळ जाताच त्याने उडी मारली असे अनेक बेडूक आमच्या आगमनाची वाट पाहत होते. भुयारात ओलावा सुरु झाला होता. पुढे भुयाराचा तोंड बंद होते परंतु उजव्या व डाव्या बाजूला पुन्हा मार्ग कोरलेले होते. साधारण आम्ही 40 ते 45 फुट आतमध्ये होतो. उजव्या व डाव्या बाजूला हे भुयार जेथे वळण घेते त्या ठिकाणी मी सरकत सरकत पोहचलो होतो. दोन्ही बाजूंनी हा मार्ग पाण्याने तुडुंब भरलेला दिसत होता. आमचा प्रवास येथेच संपणार होता. येथून माघार घ्यावी लागणार होती ती पुढल्या वर्षी पुन्हा येथे एकदा येण्यासाठी व पुढील संशोधनासाठी.
आम्ही माघारी फिरलो होतो. एक रमेश दुसर्‍या रमेशला विचारत होता सर हे नक्की काय असेल ओ?
सोबत असलेल्या रमेशला सरकताना होणा-या त्रासापेक्षा उत्सुकतेची जास्त ओढ दिसून येत होती. तो पण कमालीचा भटक्या बहाद्दर गेली 15 वर्ष याच सह्याद्रीच्या कुशीत फिरतोय. मला तर येथे भटकंती करताना फक्त पाच वर्षे झाली परंतु या बहाद्दराने तर चालून चालून सह्याद्रीची चाळणच केलीय असे तो सांगतो.
मी म्हटलं बाहेर पडल्यावर तुला सांगतो. परतीचा भुयारातील प्रवास दहा मिनिटांतच उरकला. वरूणराजा येथील निसर्गाची भेट घेऊन निघून गेला होता. आम्ही सुरक्षित बाहेर पडलो होतो. चालता चालता मी रमेशला सांगू लागलो. हा भुयारी मार्ग सध्यातरी पाण्यासाठी कोरण्यात आला असावा असे वाटते. कारण त्यावेळी तीन गोष्टींना प्राधान्य दिले जायचे. अन्न, पाणी व निवारा. यामध्ये सर्वात महत्वाचे असे ते पाणी व स्वसुरक्षितता. जंगली श्वापदांपासून बचाव करायचा असेल तर मनुष्य डोंगर भागात अशी ठिकाणे शोधायचा की त्या ठिकाणी या वरील तीन गोष्टी सहज मिळविणे शक्य असे. भरपूर वाढलेल्या जंगलात कंदमुळे तर मोठ्या प्रमाणावर भेटून भुक भागविली जायची परंतु उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून भटकंती सुरू व्हायची व श्वापदांपासून मनुष्याची शिकार व्हायची, त्यामुळे अशी सुरक्षितता जेथे असेल त्याठिकाणी नंतर पाण्याच्या टाक्या खोदण्यात आल्या असाव्यात. नंतरच्या काळात शत्रुं पासून किल्यांवर असलेल्या पाणी साठ्यावर विषप्रयोग केला जात असे व पाणी सप्लाय बंद केली जात असे त्यावेळी या गुप्त पाणी साठ्यांचा वापर करून किल्ले अबाधित ठेवण्यास मदत मिळत असे, की पिण्याच्या पाण्याची गरज अगदी भर उन्हाळ्यात सुद्धा पुर्ण होत असे. पुन्हा पाणी आटल्यावर या भुयाराच्या इतिहासाला कलाटणी मिळेल का? हा प्रश्न भेडसावू लागला.
अंधार पडू लागला होता. अनेक शंका कुशंका मनात घेऊन आमचा परतीचा प्रवास दुचाकीवरून जुन्नरच्या दिशेने गड उतार होऊन सुरु झाला होता.
मित्रांनो या भुयारातील थरार पाहण्यासाठी आमचा YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G

लेख व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे
शिवनेरी भुषण
माजी सैनिक

पडीलिंगी नेढ घाटघर

पडीलिंगी नेढ घाटघर

विषय तसा गमतीदार आहे. वाचक मित्रांनी वाचला असेलही किंवा ऐकण्यात तरी असेल. वानरलिंगि शब्द तर नक्कीच ऐकून असाल यात शंकाच नाही. वानर आणि लिंगी असे दोन शब्द जोडून वानरलिंगि शब्द तयार करण्यात आला आहे. का बर हा शब्दप्रयोग केला असेल? कदाचित वाचताना किंवा ऐकताना आपल्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असेलच. या बाबत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जमीनीवर 90 डिग्री उभा असा कातळाचा गोलाकार भाग कि ज्याचा आकार वानराच्या लिंगासारखा आसमंतात दृष्टिस पडतो, की ज्यास फक्त वानर सर करू शकतात व ज्याच्या सर्व दिशांना खोल दरी दृष्टीस पडते त्याचे नाव देण्यात आले ते वानरलिंगि. उदाहरणार्थ जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्याच्या दक्षिणेला जो उभा गोल कातळ दिसतो त्यास वानरलिंगि किंवा खडापारशी या नावाने संबोधले जाते. आता याच लिंगाच्या आकाराचा एक रेललेला भाग डोंगराच्या कुशीत कातळावर टेकलेला दिसून येत असून डोंगर आणि या लिंगीच्या रेललेल्या भागातून आपणास आरपार दोन दिशांना जाता येते त्यास नेढ असे म्हणतात. म्हणून या नेढ्याचे नाव पडीलिंगी नेढ असे देण्यात आले आहे. अशेच एक नेढ घाटघरच्या डोंगरात दिसून येते म्हणून त्याचे नाव घाटघरचे पडीलिंगी नेढ अस देण्यात आले.
दोन वर्षे माझी नाणेघाट परीसरात अनेक वेळा परीक्रमा झाली. एक दिवस किरण आणि मी नाणेघाट कडे जात असताना घाटघर येथून दृष्टीस पडणा-या नेढ्यात जाण्याची बोलनी झाली होती. अनेक वेळा या ठिकाणी जायचे म्हटले की निश्चितच व्यत्यय यायचा. आज तो दिवस उजाडला होता. किरण बाणखेले व विवेक पिंगळे माझ्याकडे येतानाच पिकलेले आंबे घेऊन आले होते. कारण त्यांच्या बॅगमधून आमरस (आंब्याचा ज्युस) जमिनीवर टपकताना दिसत होता. मिसेसचा व माझा बाहेर जाण्याचा बेत अचानकपणे त्यांच्यासोबत जाण्यामुळे रद्द झाल्याने काय झाले असेल हे आपणास ठाऊकच असेल. फुटलेले आंबे घरात देऊन आम्ही तीरकुट दुचाकीवर नाणेघाटच्या दिशेला निघालो. बेजवाट, सुराळे, आपटाळे, चावंड, खडकुंबे, फांगुळगव्हाण मागे टाकत आम्ही घाटघरला पोहचलो. मध्यंतरी फांगुळगव्हाण मधून लिंगिच्या डोंगरावर चढाई करून या नेढ्याकडे पोहचण्याचा आमचा विचार होता पण तो सार्थ ठरेल असे वाटत नव्हते त्यामुळे तो विचार त्यागून मदतीसाठी घाटघरच्या साबळे मामांच्या घरी पोहचलो.
येथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगाविशी वाटते कि ती अद्याप आपल्या ऐकण्यात नसावी. फांगुळगव्हाण च्या पश्चिमेला असलेला डोंगर अर्थात लिंगिचा डोंगर. या डोंगराच्या पुर्वेला मध्यभागी जवळपास 50 फुट उंच असलेली एक लिंगी निदर्शनास पडते तर याच लिंगिच्या पश्चिमेस हि पडीलिंगी अर्थात नेढ आढळून येते तर येथुन पश्चिमेला असलेल्या किल्ले जीवधनची वानरलिंगि आहे. या तिन्ही गोष्टी जवळपास एका रेषेत निर्माण कशा झाल्या असाव्यात? हा प्रश्न पडतो. असो.
साबळेमामा मार्ग दाखविण्यासाठी आले होते. झपझप आम्ही नेढ्याच्या दिशेने चालू लागलो. उजव्या बाजूला जीवधन तर डावीकडे लिंगिचा डोंगर होता. आता एका ओढ्यातून आम्ही पुर्वेकडे चढाई चढू लागलो. हिरव्यागार झाडीतून प्रवास सुरू झाला होता. साबळेमामांनी एका गुराख्यास मार्ग दाखवण्यास सांगुन माघारी परतले होते. गुराखी त्या गर्द वाढलेल्या जंगलातून मार्ग काढत पुढे चालले होते. जंगलातील ते वाढलेले मोठे मोठे वृक्ष जवळपास 150 ते 200 वय असल्याचे सांगत होते. वानर याच झाडांच्या फांद्यावर खेळ खेळताना दिसत होते. पक्षांना आमची चाहूल लागताच किलबिलाट सूरू केली होती. मध्येच पावश्या पक्षाचे मधूर स्वर कानी पडत होते. याच गर्द झाडीत वानरांची हुप हुप कानी येऊन जणू ते सांगत होते अरे मानवा झाडे लावा खुप खुपचा संदेश देत होते. एका मोठ्या उंच दगडापाशी की जो डोंगरावरून घरंगळत खाली आलेला होता तेथे गुराखी थांबला व गमतीने सांगून गेला की या बोचा नाळेने वर चढाई मार्ग आहे. मी आता माघारी फिरतोय. त्याला आम्ही धन्यवाद दिला खरा परंतु “बोचा नाळ” हा शब्द काही विचित्रच वाटला. हात टेकवत आम्ही नाळेने वर चढू लागलो. समोरच पडीलिंगी नेढ होत.90 डिग्री कातळात हे जवळपास 30 फुट लांब व 3 फुट रुंद नेढ खास आकर्षित करत होत. नाळेची कसरत करत वर चढून उजवीकडे वळून पुन्हा चालू लागलो.
थोडी विश्रांती व सोबत आणलेल्या बियांचे रोपणाचा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यास वरूणराजा पण धाऊन आला होता. आम्ही बिया लावत होतो तर वरूणराजा या बियांना पाणी घालत होता. पुन्हा आम्ही कार्यक्रम पुरा करत चालू लागलो.बहुतेक हा ट्रेक करणारे आम्ही प्रथमच असावेत. कारण गुराखी सांगत होते इकडे कुणीच जात नाही. तुम्ही कशाला जाताय? नेढ्याकडे दृष्टी टाकली तर येथे पोहचणे खुप अवघड वाटत होते. सोबत साहीत्य होतेच.
चढाईवर मात करून आम्ही या नेढ्यात शेवटी पोहचलो. येथे पोहचताच आनंद गगनात मावेनासा झाला होता. जवळपास 30 फुट लांब व 3 फुट रूंद असलेल्या नेढ्यात आम्ही पोहचलो होतो.
जुन्नर तालुक्यातील खिरेश्वरचे नेढ, आणेघाटचा मळगंगेचा नैसर्गिक पुल व हटकेश्वरचा नैसर्गिक पुल पार करण्याचे स्वप्न या आधिच पुर्ण झाले होते. त्यात या चौथ्या पडीलिंगी नेढ्यापर्यंत पोहचण्याचेही स्वप्न साकार झाले होते. येथे आनंद घेत आम्ही उतरणीला लागलो. पुन्हा प्रवास नाळेतून सुरू झाला. तीव्र उतार असल्याने बसून पुढे सरकत उतरणे बरे असे वाटत होते. आम्ही बसून उतरू लागलो. व आचानकच त्या गुराख्याचा शब्द आठवला “बोचा नाळ” अरे विवेक, किरण बोचा नाळेचा अर्थ उलगडला बघ. काय काय? अरे हो आपण खाली उतरताना कशावर घसरत पुढे सरकत आहे बघा व या नाळेचे नाव आठवा काय सांगितले सांगा. अचानकच त्या उतरणीत आमचे हास्य गुंजू लागले.
जंगलात प्रवेश केला होता. विविध वृक्षांबरोबर फोटो काढत आम्ही नांगरलेलेल्या शेतात आलो होतो. आता त्या नांगरलेलेल्या शेताच्या मध्यभागी मी पोहचलोच असेल तेवढ्यात एका सात आठ फुट लांब असलेल्या सापाने माझ्यावर झडप घातली. मी उडी मारत पाय फाकवले तेवढ्यात तो दोन्ही पायाच्या मधुन पाठीकडे गेला. मी तुरंत वळून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला कारण पाठीमागे किरण व विवेक होता. किरण खुप घाबरला. विवेक सर्पमित्र असल्याने त्यास काही वाटले नाही. तो साप पुन्हा दुसर्‍या सापापाशी गेला तो साप होता धामणसाप. दोन्ही साप तेथील होलात शिरले व तोच विषय काढत काढत आम्ही दुचाकी घेऊन जुन्नरच्या दिशेने वापशी प्रवास सुरू केला.
मित्रांनो या नेढ्याचा थरार पाहण्यासाठी आमचा YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G

लेख व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे
शिवनेरी भुषण
माजी सैनिक
८३९०००८३७०

अप्रतिम पुष्करणी व ऐतिहासिक बेल्हे. 

अप्रतिम पुष्करणी व ऐतिहासिक बेल्हे
(इतिहास #जुन्नर तालुक्यातील)
श्री. छत्रपती संभाजी राजांनी सोळाव्या शतकात श्रीमंत सरकार नबाब मीर कासीम यांच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गढीवर स्वारी केली होती.

श्रीमंत सरकार मीर कासीम यांनी बांधलेल्या गढीच्या दक्षिण- पूर्व दिशेला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेली व मध्ययुगात निजामशाहीकडे जाण्यासाठी अतिशय जवळची समजली जाणारी वेस डौलदारपणे उभी असल्याचे दिसत असले तरी वापराविना ती भग्नावस्थेत झाल्याचे दिसते.
या वेसेची उभारणी महसुली कारभाराचे अधिकार क्षेत्र असलेल्या श्रीमंत सरकार नबाब मीर कासीम यांनी निजामशाहीशी जवळीक साधण्यासाठी केली होती. त्याच पद्धतीची एक वेस पश्‍चिम दिशेला आहे. पश्‍चिमेच्या वेसेतुन प्रवेश करून याच निजामशाहीकडील वेशीतून छत्रपती संभाजी राजे गढीवर स्वारी करून बाहेर पडले होते, असा उल्लेख जयपूर येथून प्रसिद्ध होणार्‍या औरंगजेबाच्या द-दरबार-इ-मुअल्ला (जयपूर) या वर्तमानपत्रात 29 डिसेंबर 1684 रोजीच्या अंकात होता. लेखिका कमल गोखले यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या पुस्तकात मराठा-मुघल संघर्षात याबद्दलचा उल्लेख आढळून येतो.
पुढे याच #बेल्हे गावच्या गढीची जहागीरदारी जुन्नरच्या नवाब मिर कासिम यास मिळाली होती. पुढे या नवाबास एक कन्यारत्न झाले व तो पुत्र प्राप्ती पासुन वंचितच राहीला. त्याने आपल्या लाडक्या कन्येचा विवाह गुजरातमधील सुरत गावच्या नवाब आलम खानशी लावून दिला. बेल्हे गावचा नवाब पुढे कालवश झाला व या गढीची जहागिरी सुरतच्या नवाबाकडे गेली.

पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेल्हे गाव वसलेले आहे. साधारण पणे १९३० च्या दशकात बेल्हे ग्रामपंचायत व बाजाराची सुरुवात झाली. सुरुवातीला बाजार हा जुन्या आळकुटी रस्त्यावरील टका वस्ती या भागात भरत होता. त्या वेळेचे त्याचे स्वरूप म्हणजे भाजी पाला किराणा सामान, कडधान्य, बाजरी, ज्वारी, गहू, असा सर्व गावरान सकस व रासायनिक खतापासून मुक्त अशा प्रकारची धान्ये मुबलक प्रमाणात मिळत असत. त्या वेळी बाजारात खरेदी विक्री करत असताना वस्तू विनिमय जास्त चालत असे. त्या वेळचे चलन म्हणजे भोकपड्या पैसा, घोडा छाप पैसा तांब्याचे चलन, कथलाचे दोन पैसे, एक आणा, पितळी दोन आणे, चांदीचे चार आणे, आठ आणे, राणी किंवा राजा छाप चांदीचा रुपया अशा प्रकारचे चलन वापरात असे. त्या वेळी बाजारात येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांची संख्या हि शंभर ते दीडशे च्या घरात असायची. सोळा आण्याच्या रुपया मानला जात असे त्या सोळा आण्याला मनभर म्हणजे चाळीस किलो धान्य मिळत असे. सोळा आण्याला चाळीस अंडी व दीड ते दोन रुपयाला गावरान कोंबडी मिळायची. दोन पैश्यांची केळी संपूर्ण घराला पुरत असत.बाजारात होणारी ये-जा हि पायीच असे. माल वाहतुकीसाठी बैलगाडी व घोडागाडी वापरली जात असे. बाजारात येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पानकोळी समाजाकडून पखाली मार्फत केली जायची. त्या नंतर बाजारातील वर्दळ वाढू लागल्याने व टका येथील जागा कमी पडू लागल्याने १९४० नंतर बाजार हा बेल्हे गावात त्या वेळेचे नबाब ह्यांच्या गढी जवळ व मारुती मंदिराच्या आसपास भरू लागला. परंतु येथेही जागा कमी पडू लागल्याने १९४५ नंतर बेल्हे बाजारचे स्थलांतर आजच्या ठिकाणी म्हणजे गावातून जाणाऱ्या कल्यान – अहमदनगर महामार्गावर लागत असणाऱ्या मोकळ्या ६-७ एकर क्षेत्रावर भरपूर झाडे असणऱ्या ठिकाणी झाले. त्या वेळी बाजारावर ग्रामपंचायत नियंत्रण असायचे. त्या मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून गावात विकास कामांना चालना मिळायची. त्यावेळेपासून सर्व शेतकरी व व्यापारी यांची जागा ठरलेली असायची. त्यात कापड दुकानदार, जुन्या कपड्याचा बाजार, अंडी व कोंबडी बाजार,सुकी मासळी बाजार, मसाले, किराणा समान, धान्याचा भुसार बाजार, चप्पलांचा व चामड्यांचा वस्तू ह्या एका बाजूला असायच्या व भाजीपाला आणि फळ फळावळ इतर गरजेच्या वस्तू ह्या एका बाजूला असायच्या आजही परंपरे नुसार तसेच दृश्य दिसते.

ह्या बाजाराचे वैशिष्ठ्य म्हणजे बैल बाजार हा बाजार एका बाजूला ४-५ एकरात भरत असयचा. ह्या बाजारात जवळपासच्या गावातील बैल व इतर जनावरे विक्री साठी यायची. तसेच प्रामुख्याने पंढरपुरी (खिलारी), गावठी, भडोशी या जातीचे बैल पंढरपूर, सातारा सांगली, इस्लामपूर, मंगळवेढे, कर्नाटकातील बेळगाव व ईंडी या ठिकाणाहून जातिवंत बैल विक्रीसाठी येत असत. या बैलांसाठीचे खरेदीदार हे परजिल्ह्यातून म्हणजे लासलगाव नाशिक, लोणी प्रवरा, जामखेड, टोकावडे, म्हसे, मुरबाड, सरळगाव, यासह इतरही ठिकाणाहून येत असत. पूर्वी आजच्या सारखी वाहतुकीची सोय नसल्याकारणाने जनावरांची वाहतूक हि पायीच केली जायची. १९४० च्या दरम्यान हा बाजार शनिवार पासूनच सुरु होऊन तो मंगळवार दुपारपर्यंत चालू असायचा. येणाऱ्या व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची जेवनाची व्यवस्था अतिशय अल्पदरात सोनाबाई शिंदे, सावित्राबाई बनकर, महादू संभेराव, बबनराव जगताप, रंगनाथ पोपळघट, कासाबाई बांगर यांच्या जेवणाच्या खानावळी होत्या. त्यात प्रामुख्याने मटकी उसळ,
पुरी, असा जेवणाचा बेत असायचा. हे जेवण फक्त काही आण्यात, व चहा दोन पैश्यात मिळत असे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भोवतालच्या तीन विहिरीमधून करण्यात यायची. विहिरीतून पाणी बदलीने ओढून व हंड्याने डोक्यावर घेऊन एक पैशाला तांब्या व एक आण्याला एक हंडा विक्री होत असे. तसेच जनावरांच्या पिण्यासाठी व्यापाऱ्यांना दोन पैशांना हंडा या प्रमाणे विक्री होत असे. तरी देखील एक महिला दिवसभरात साधारणपणे दहा ते बारा रुपयांची कमाई पाणी विक्री करून करत असे.
प्रामुख्याने येथील असलेल्या पुरातन पुष्करणीचा पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असे. आजही ही पुष्करणी अंतिम घटका जरी मोजत असली तरी तीची सुंदरता कायम आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वात सुंदर पुष्करणी म्हणुन मी तर या ऐतिहासिक वास्तूचा निश्चितच उल्लेख करेल. जवळपास 50×40 फुट लांब रूंदी असलेली ही पुष्करणी पहाताच क्षणी लक्ष वेधून घेते. पुर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूला मध्यभागी पुष्करणीत उतरण्याचे मार्ग असून या पुष्करणीच्या दक्षिण आणि उत्तरेस 3×2 उंची व रूंदिचे 5 -5 मोठे दगडी शिल्पमुर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहे तर पुर्व व पश्चिमेस 2 – 2 कोनाडे आहेत. पुष्करणीच्या एकही कोणाड्यात कोणत्याही प्रकारची मुर्ती दिसून येत नाही. त्या मुर्ती त्यानंतरच्या कालखंडात जाणिवपुर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असावा? असे वाटते. सुंदर अशा मोठ मोठ्या तोडीत पुष्करणीचे सुंदर असे बांधकाम करण्यात आले आहे.

सध्या पुष्करणीचा वापर स्थानिक ग्रामस्थ पोहण्यासाठी करत आहे. ही पुष्करणीचे बांधकाम वेगळ्याच शैलीत असल्याचे दिसून येत असल्याने तीचे संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. आजपर्यंत मी ज्या पुष्करणी पाहील्या त्यापैकी सर्वात मोठी व सुंदर असलेली ही #पुष्करणी होय. बाँम्बे गॅझिटियर मध्ये ज्या बेल्हे गावातील पुष्करणीचा उल्लेख आढळतो ती हीच पुष्करणी होय. सध्या स्थानिक या पुष्करणीला टक्याची बारव म्हणुन संबोधतात.

या पुष्करणीचे संवर्धन होणे गरजेचे असल्याने अनेक संस्थानी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक ठेव्यास पुनरर्जिवित करने गरजेचे आहे यासाठी प्रयत्न केले जावेत हीच सदिच्छा.
बेल्हे ग्रामस्थ श्री. सुधाकरजी सैद यांच्या सोबतीत या पुष्करणीस भेट देण्याचा योग आला व त्यांच्याकडून स्थानिक पातळीवरील माहीती संघटीत करून ती आपल्यासमोर मांडता आली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

#लेखक_छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
#उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
#संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
#संस्थापक – फेसबुक पेज “निसर्ग रम्य जुन्नर तालुका”
#संस्थापक – फेसबुक ग्रुप “सह्याद्रीचे सौंदर्य”
#संस्थापक – फेसबुक ग्रुप “निसर्गमय आंबेगाव तालुका”
#संस्थापक – “निसर्गरम्य जुन्नर तालुका” YouTube 
channel लिंक –https://goo.gl/3usx1G

श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा खडकी (खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव)

श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा खडकी (खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव)
मंचर मधील #पिंपळगाव फाट्यावरून जवळच सात कि.मी अंतरावर पिंपळगावला पोहचता येते. येथुन घोड नदि ओलांडली की आपण खडकी येतो. सतराव्या शतकातील पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा असलेले मोठे प्रवेशद्वार आपल्या डाव्या हाताला निदर्शनास पडते. याच वेशीतुन आपण मुख्य गावठाणात आपण प्रवेश करतो. मुळातच खडकी गाव घोड नदि माईच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले असल्याने येथील नैसर्गिक सुंदरता पाहण्यायोग्य असुन हा भु -भाग कृषी प्रधान आहे. #खडकी गावच्या ऐतिहासिक वास्तूचे कागदोपत्री पुरावे मला पहावयास मिळाले नाही परंतु दोन ठिकाणी कोरलेले शिलालेख व वाड्याच्या मुख्य प्रवेश व्दारावर कोरलेले दगडी शिल्प खुप काही सांगुन जातात. व हेच खरे येथील ऐतिहासिक वास्तूचे भक्कम पुरावे म्हणता येतील. या वाड्याच्या भिंती व प्रवेशद्वार पहाता हा निश्चितच भुईकोट किल्ला असल्याचा भास होतो. कारण या वाड्याचा विस्तार खुप मोठा असल्याच्या खुणा आपणास जागो जागी निदर्शनास येतात. येथील असलेला वाडा व नदीवर बांधण्यात आलेला जवळपास अर्धा कि.मी लांबीचा घाट आपले विशेष लक्ष वेधून घेतो. येथील इतिहास म्हणजे हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांनी आपल्या राज्यकाळात बांधला असे गावक-यांकडून सांगितले जाते.

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) व श्रीमंत गौतमाबाई होळकर यांच्या कन्या श्रीमंत उदाबाई होळकर यांचा विवाह बाबुराव मानाजी वाघमारे – पाटील यांच्याशी झाला होता. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांनी कन्या श्रीमंत उदाबाई हीस माहेरची चोळीबांगडी म्हणून हा वाडा व जमीन आई वडिलांनाई बक्षीस स्वरुपात मुलीला देऊन टाकली. त्यामुळे आज आपणास वास्तु दिसता त्या होळकर कालीन वास्तू शिलालेखाच्या माध्यमातून असल्याचे समजते.याच काळातील बांधलेले महादेव मंदिर, त्यामधील घुंगरमाळेने सजवलेला नंदी ,लक्ष्मी नारायण मंदिर ,काळ भैरनाथ मंदिर व भैरवाची जिर्ण झालेली मुर्ती, राममंदिर ,बिरोबा मंदिर कि ज्या मंदिरास नुकताच क दर्जा प्राप्त झाला आहे अशी विविध मंदिरे याच वाड्यात पहावयास मिळतात.
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांचे नातू अवचितराव वाघमारे – पाटील( श्रीमंत उदाबाई आणि बाबुराव मानाजी वाघमारे – पाटील यांचे पुत्र ) यांनी पितृ उध्दरातीर्थ बांधलेली समाधी तर आखिवरेखीव शिल्पांत उभारलेली असून हि समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुनाच असल्याचे दर्शन घडते. या समाधी नक्षी कामामध्ये मध्ये मराठा व राजपूत कलाकृती दिसून येते व तसेच या समाधी गर्भगृहा मध्ये एक महादेव पिंड असून समाधीस्थलावर होळकर कालीन शिलालेख नजरेस पडतो. छत्रीनूमा समाधीवर असलेल्या शिलालेखाचा उल्लेख पुढील प्रमाणे सहज वाचता येतो. श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे . सके १७११ सौम्य नाम संवत्सरे चौत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द ( वडील ) मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फे महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रु उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे .येथील प्रवेशद्वार वरील व बिरोबा मंदिरावरील होळकर कालीन दगडी नक्षीकाम आज हि पाहण्यासारखे आहे. येथील होळकर कालीन नदीघाट हा गावाची शोभा वाढवताना दिसतो, कि ज्याची रचना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी घोड नदीवर केलेली असून या घाटाचे सौंदर्य आपणास पिंपळगावातील उत्तरेकडील नदिकाठावरून न्याहाळता येते. या परिसरात असलेले दगडी तोडतील कोरीव मोठे मोठे तीन नंदी खास आकर्षण ठरतात.नदीघाट वेशीतुन आपणास पायरी मार्गाने एका वेशीतुन नदी पात्रता उतरता येते. याच वेशीवर होळकर कालीन भव्य शिलालेख आढळतो. हा नदीघाट खूपच भव्य दिव्य व निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.

येथील होळकर कालीन वास्तूमुळे या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला असल्याने येथील नष्ट होत चाललेल्या वास्तुंना संवर्धित करणे खुप गरजेचे आहे. खडकी ग्रामस्थ बंधूंनी वेळीच योग्य पाऊले उचलली तर निश्चितच आंबेगाव तालुक्यातील उच्च दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणुन खडकी गाव लवकरच उदयास येईल. बोटींगसाठी हा परीसर उत्तम असून खडकी आणि पिंपळगाव ग्रामस्थांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. की जेणेकरून खुप मोठ्या प्रमाणात येथे रोजगार संधी उपलब्ध होईल. येथील परिसराची भटकंती करताना मला श्री बाळासाहेब पोखरकर (निवृत्त अभियंता जिल्हा परिषद पुणे) सध्या ते रोटरी क्लब मंचर उत्तर पुणे जिल्ह्यातील उपप्रांतपाल म्हणून कार्यरत असून त्यांनी रोटरी परिवारातर्फे अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवत त्यांनी ट्रेकिंग , भटकंती , पोहणे याबाबतची प्रचंड आवड जोपासलेली असून त्यांची मला खुप मदत झाली त्याबद्दल खुप खुप आभार.आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)लिंक  https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

 

 

जुन्नर तालुक्याचा ताजमहाल म्हणजेच हापूसबागचा हबशी घुमट.

जुन्नर तालुक्याचा ताजमहाल म्हणजेच हापूसबागचा हबशी घुमट.

#हबशी_घुमट (#सौदागर_घुमट#जुन्नर
(जुन्नर शहराच्या पूर्वेस )
नारायणगाव ते जुन्नर हायवेने जुन्नरला आलात कि याच रस्त्यावर विशाल दगडी वेस जुन्या एस.टी स्टॅन्ड जवळ बांधण्यात आली आहे. याच वेशीच्या पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले की एक आमरापुरकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. याच रस्त्याने सरळ पूर्वेकडे साधारणतः सव्वा कि.मी गेलात की आपणास डावीकडे या विशाल वास्तूचे दर्शन घडते.
असे म्हटले जाते की हा सतराव्या शतकातील निजामशाही राजवटीत मुघलकालीन स्थापत्य शैलीचा एक अनोखा देखावा आहे.
निजामशाहाचा वजीर मलिकांबर यांच्याशी संबंधीत ही वास्तू आहे. जो की आफ्रिकेतील हाबसन प्रांतातून आलेल्या जुन्नर येथील हबशीबाग येथे तो वास्तव्यास होता. आज याच हबशीबागचा उल्लेख #हापुसबाग असा करण्यात येत आहे.
ऊंचच ऊंच 55 फुट रुंद व 60 फुट लांब कोरीव शिळेतील चौरसाकृती ही वास्तू लक्ष वेधून घेतल्या शिवाय राहत नाही.
साधारण 50 फुट ऊंचीच्या नक्षीदार भिंतीवरील कमानीवर 30 फुट उंच असलेला वरील घुमट अलगद तोलुन धरल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण पहावयास मिळते.
आतील भागात नऊ समाध्या असुन. येथे आपण जोरात आवाज दिलात तर त्या ध्वनिचे नऊ पडसाद पुन्हा पुन्हा त्याच वेळी ऐकू येतात.व याच आतील भिंतीवर कुराणातील आयने कोरल्याचे निदर्शनास येते.
या वास्तूचा मलिकांबरशी संबंधीत कोण्या मोठ्या असामीचे हे स्मारक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुरातत्व विभागाने आता या वास्तूचे मजबुतीकरण करूण संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले असून ते अंतिम टप्प्यात पुर्ण होत आले आहे.

लेखक /छायाचित्र – खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज

लालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.

लालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.
हरिश्चंद्राची भेट घेऊन पुष्पावती माई धाकटी बहिण मांडवीला भेटायला निघते. द-याडोंगर खोरे तुडवत तुडवत व वेडीवाकडी वळणे घेत घेत ती जेव्हा जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे येते तेव्हा तीची भेट मांडवीशी होते. एकमेकींना भेटून झाल्यावर पुष्पा, मांडवीला विचारते अग तु कोठे निघालीस एवढे नटून थटून? मांडवी उत्तरते मोठ्या ताई कुकडीला भेटायला निघाले. येतीस का ताई तु पुढे? पुष्पा म्हणते अग मी मोठ्या ताईलाच भेटायला निघाले होते. म्हटले रस्त्यात तुला भेटून पुढे कुकडी ताईला भेटावे. मग काय पुष्पा व मांडवी दोघी मोठी बहीण कुकडीला भेटायला निघतात. बरेच अंतर चालत चालत त्या एका ठिकाणी कुकडीला भेटतात तेच ठिकाण म्हणजे जुन्नर तालुक्यातील लालखण हिवरे होय.
त्यांची भेट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणास आपण संगम असे म्हणतो. या ठिकाणी तीन नद्या एकत्र आल्याने येथे हेमाडपंती संगमेश्वराचे मंदिर बांधण्यात आले होते. संपूर्ण मंदिर जमीनदोस्त झाल्याने मंदिराबाहेरचे चार नंदी पहावयास मिळतात. हेमाडपंती मंदिराचे अवशेष पालथे असून फक्त एक मुर्ती निदर्शनास पडते. गणपती शिल्प जीर्ण अवस्थेत पहावयास मिळते. या ठिकाणी येण्यासाठी आज प्रथतःच कपडे उतरून छातीभर खोल पाण्यातुन 30 मीटर प्रवास करावा लागला तेव्हा कुठे येथील शिवलिंगास स्नान घालण्याचा व स्वच्छ करण्याचा योग आला.
नियमित पाण्याची सुखसुविधा उपलब्ध असल्याने येथे गाव वसले ते लालखन हिवरे.हेमाडपंती मंदिराचे जीर्ण अवशेष येथे पहावयास मिळतात. 1977 पर्यंत येथे येडगाव धरणाची निर्मीती करण्यात आली व या तीनही बहिणींचा रस्ता येथे अडविण्यात आला. व निर्माण झाले ते येडगाव धरण. त्यामुळे #संगमेश्वर_मंदिर व लालखण गाव पाण्याखाली गेले.
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कि ज्यांनी 15 वर्षे आपली सत्ता प्रस्थापित केली ते मा. वल्लभशेठ बेनके यांचे हे गाव. धरणामुळे गाव विभागले गेले व #कैलासनगर व #हिवरे_बुllअशी दुभागणी झाली.
आता आपणास प्रश्न पडला असेलच कि लालखण हे नाव कसे? यावर भोर बाबा आख्यायिका सांगतात की खुप खुप वर्षापूर्वी अहमदनगर मधील लालखण बाबांच्या समाधीपाशी असलेले दोन अतिशय लाल व मोठे भुंगे फिरत फिरत येथे आले व मरण पावले. त्यांची समाधी लालखण म्हणुन येथे बांधण्यात आली. ते भुंगे येथे बाबाच्या रूपात आले होते म्हणून तसे नाव देण्यात आले. #लालखण_मंदिर ही वास्तु बहुतेक निजामशाही कालखंडात बांधण्यात आली असावी असे वाटते. मंदिरात एक व मंदिराच्या बाहेर पश्चिमेस लागुन एक अशी दोन पिरस्थाने पहावयास मिळतात. नुकतीच 4 तारखेला मंदिर पाण्याची पातळी कमी झाल्याने येथे यात्रा संपन्न झाली होती.
याच समाधीच्या अगदी दक्षिणेला 30 मीटर अंतरावर भारताचे सर्वप्रथम वनसंरक्षक इंग्रज अधिकारी गिब्सन येथे सरकारी बंगल्यात वास्तव्यास होते. धरण निर्माण झाल्याने त्यांचे राहते घर पाण्याखाली गेले व त्याची पडझड मोठ्या प्रमाणात झाली व आज फक्त त्या इमारतीचे अवशेष पहावयास मिळतात. येथे विविध ठिकाणी समाधीस्तल पहावयास मिळतात. आखीव व रेखीव सुंदर तुळस येथील पसरलेल्या हिरवाईमधे तल्लीन होऊन उभी असल्याचे दिसते. बौद्ध समाधी याच तुळशीच्या पुर्वेस पहावयास मिळते. परंतु ती बौद्ध समाधी नसून समाधीस्तल असावे की जीच्या छतावर चुन्यामध्ये चारही दिशांना बसलेल्या अवस्थेतील मुर्ती कोरलेल्या दिसतात.
धरणाची पातळी खाली गेली की येथील ग्रामस्थांच्या पुर्वीच्या आठवणी ताज्या होऊ लागतात. सर्व बाजुंना लाबवर हरळीच्या गवताचे साम्राज्य पसरल्याने हा परिसर हिरवाईने व सौंदर्याने नटलेला पहावयास मिळतो. एकदा का या परिसरात आलात तर येथून निघता पाय काढणे फारच कठीण. अगदी अंधार होईपर्यंत मी येथून हललो नव्हतो.
ओझरच्या विघ्नहर्त्याच दर्शन झाले की पर्यटकांनी हिवरे बुll या गावातील या ठिकाणी भेट देणे सोयीस्कर आहे. अगदीच तीन कि.मी अंतरावर हे गाव आहे. गाव परिसर संपूर्ण उस क्षेत्राने अच्छादीत असल्याने येथील रस्ते नेहमीच हिरवाईच्या छायेत असतात. येथील सौंदर्य दर्शन जर सांजवेळी घेत असाल तर अतिउत्तम कारण सुर्यमावळतीचे दृष्य तर अप्रतिमच. मग पहातायना #हिवरे_बुll परिसर?

आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचे हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचे हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर.
नुकतीच #जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावाला भेट देण्याचा योग आला. पुणे – नाशिक हायवेपासुन अगदीच दोन कि.मी अंतरावर पश्चिमेस वसलेले हे गाव. या गावची एक ओळख सांगायची झाली तर विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार महाराष्ट्रतुन निवडून आले ते म्हणजे मा.शरददादा सोनवणे त्यांचे गाव म्हणजेच #पिंपळवंडी गाव.
गावाला असे नाव का पडले असावे असा प्रश्न पडतो व विचारधारा सुरू होते ती या नावाच्या शोधाची. माझा प्रवास उंब्रज, काळवाडी मार्गे पिंपळवंडी असा होता. हा सर्व परिसर येडगाव धरणाच्या पाणलोटाखाली असल्याने येथील सुंदरतेला तर चार चांद लागलेले दिसतात. गावाच्या पाठीमागे पश्चिमेस एक 100 मी. अंतरावर पिंपळेश्वर ओढा लागतो. या ओढ्याच्या काठी एक हेमाडपंती मंदिर दृष्टीस पडते. येथील परिसर अनेक पिंपळ वृक्षांनी व्यापलेला दिसतो व नकळतच #काशीखंड अध्याय – 50 मधील ओव्या आठवू लागतात.
श्री गणेशाय नमः षडास्यलणे आगस्ती मुनी
त्या दक्षिणदेशी काम्यकवनी महाक्षेत्र असे पुण्यजीवनी
पापनाशनी जोदाते ll1ll
गोदावरीचे उत्तरपारी प्रतिष्ठान आसे पुण्यनगरी
तेथे लींग रछायना बरव्यापरी पिंपळेश्वरतो ll2ll
दुधचीऋषीचा कुमार पीपलाद नामे मुनेश्वर तेणे गोदातिरी
छपीलाहार त्यानाव पिंपळेश्वर ll3ll
हे आठवताच येथील अख्यायिका समोर एक चित्रपट रूपात उभी राहते. ती पुढील प्रमाणे.
स्वतःच्या हाडाची शस्त्रे इंद्रास करून दिली ते ऋषी म्हणजे दधीची ऋषी जे सप्तऋषी होऊन गेले त्यापैकी हे त्यातील एक होय. त्यांचे पुत्र पिंपलाद हे खुप मोठे शिवभक्त होते. त्यांनी काही वर्षे विश्वेश्वराची सेवा करून ते नर्मदातिरी तपचर्या परिक्रमा केली व पुन्हा ते काशिला आले. व विश्वेश्वराची भक्ती व सेवा केली. काही वर्षे निघून गेली व पिंपलाद यांना भगवंतांचा आदेश झाला की तिर्थांटन करा.ते तिर्थांटन करत करत “शिवजन्मभुमी” आज ज्या नावाने ओळखले जाते तेव्हा त्यावेळी हा भुभाग “दंडकारण्य” म्हणुन ओळखला जायचा ते या ठिकाणी पोहचले. येथील परिसरातून जात असताना त्यांना हा परीसर खुप आवडला. दक्षिणेस जवळच अंतरावर कुकडी माई संथ प्रवाहीत होत्या. घणदाट जंगल असल्याने जपासाठी त्यांना येथे सर्व काही मांगल्य वाटले व ते येथेच वाहत्या ओठ्याकाठच्या खडकावर तपश्चर्या करू लागले. परंतु त्यांचे प्रत्येक वर्षी महाशिवरात्री काशियात्रेस जाणे टळत नसे.
यात्रा संपली की येथील भुमाता पुन्हा त्यांची येथे वाट पाहत असे. पिंपलाद ऋषींचे वय होत चालले होते. तपश्चर्येच्या बळावर त्यांना अनेक सिध्दी प्राप्त झाल्या होत्या. आजुबाजुच्या परिसरातही ऋषींची ख्याती पसरत चालली होती.
पिंपलाद ऋषींचे आता खुपच वय झाले होते. महाशिवरात्रीस काशियात्रेस जाण्याची चिंता वाटू लागली होती. त्यांना त्यांचे मन स्वस्थ बसू देत नव्हते. कारण वृद्धापकाळात यात्रा करणे शक्‍य होणार नव्हते. शेवटी त्यांनी आपल्या साधनेचा वापर केला व स्वतःचे शिर काशियात्रेस योगसाधनेने पाठवले.
पिंपलाद ऋषींच्या तपाची व श्रद्धेची भगवान शंकरांना जाणीव झाली व भगवान शंकराची व या पिंपलाद ऋषींच्या शिराची भेट #नगर जिल्ह्यातील #पारनेर तालुक्यातील #विरोलीगावात झाली. या भक्ताचे निस्सीम भक्ती पाहून या भक्ताच्या शिराची भगवान शंकरांनी प्रतिष्ठापना या #विरोली गावातच केली व ते शिर स्वतः भगवान शंकर पिंपळवंडी या गावात या पिंपलाद ऋषींच्या तपश्चर्ये ठिकाणी येऊन त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले व आता तुला काशियात्रेस येण्याची गरज नाही. मी सतत लिंग रूपात निवास करीन व मला या ठिकाणी पिंपळेश्वर या नावाने ओळखले जाईल. असे सांगून त्यांनी लिंग रूपात पिंपळेश्वराची लिंगरूपामध्ये व येथे गंगेसह स्थापना केली व भगवान शंकर अंतर्धान झाले.
मित्रांनो ही जरी अख्यायिका सांगितली जात असली तरी येथील गंगा कुंड रूपात वर्षाच्या 365 दिवस गायमुखातुन वाहताना दिसते या कुंडास आजही गंगातिर्थ व छोट्या कुंडास काशितिर्थ म्हणुन ओळखले जाते. मंदिराच्या शेजारीच पिंपलाद ऋषींची समाधी आहे. मंदिर गर्भगृहात डावीकडे पिंपलाद ऋषींची शिरविरहीत मुर्ती आहे. व समोरच एक गोल दगड ठेवला असून आपण मांडी घालून बसुन त्या दगडावर हात ठेवून मनात प्रश्न केला की त्याचे उत्तर मिळते.
पिंपलाद ऋषींच्या ख्यातीने एक एक भक्त या स्थानी राहु लागला. येथे बाजारपेठेची निर्मीती झाली व उभे राहीले एक खेडेगाव अर्थात #पिंपळवंडी.
येथे काळानुरून एक प्रचंड कोरिव व आखीव व रेखीव दगडी शिल्पांचे एक हेमाडपंती मंदिर उभे राहिले. काळ वाढू लागला व भुतकाळात लोटला जाऊ लागला. मनुष्य इतिहासाच्या पाऊलखुणा विसरू लागला. जिर्ण व पडझड झालेली मंदिरे हटवू लागला. हळूहळू पडझड झालेल्या वास्तु धरणात, गंगेत तर कधी कधी जमीनीखाली दडपून टाकू लागला. जुणी मंदिरे पाडून त्या जुन्या मंदिरांचे पुरावे नवनिर्मित मंदिराच्या पायथ्यातच गाडून त्यावर उभी राहिली ती नवीन मंदिरे. आज जेव्हा मी येथे या पाऊलखुणा शोधू लागलो तर एकच दगडी शिल्प मंदिराच्या उत्तरेला टेकवून ठेवल्याचे दिसले कदाचित ते श्री गणेशाचे शिल्प असल्याने ते ठेवण्यात आले असावे.तसेच दक्षिणेस विरघळ दिसून येते. मंदिराच्या आतील भाग पुरातन वाटतो खरा परंतु तो पुनरस्थापीत करण्यात आले असावे असे वाटते. हेमाडपंती बांधनीतील दगडांचा रिघ मंदिराच्या पुर्वेस ओढ्यात पडलेला दिसतो खरा परंतू येथील कोरीव मुर्ती पहावयास मिळत नाहीत. गावचे ग्रामस्थ श्री. विकास बाजीराव काकडे यांना हेमाडपंती बांधनीतील मुर्ती आजुबाजुला कुठे पहावयास मिळतील का? विचारले असता त्यांनी पिंपळवंडी गावतील मारूती मंदिराच्या चार दिशेला भिंतीला उभ्या केलेल्या मुर्ती दाखवल्या. त्या पाहून मन प्रसन्न झाले. व खात्री पटली कि खरोखरच येथे पिंपळेश्वराचे हेमाडपंती मंदिर होते. या मुर्ती व मंदिराच्या पायथ्याच्या भरावात गाडलेल्या मुर्ती बाहेर काढणे खुपच गरजेचे वाटले. कारण या परीसराचा व गावचा खरा पौराणिक इतिहास फक्त आणि फक्त याच मुर्तींमुळे जीवंत ठेवला जाऊ शकतो.
मी समस्त ग्रामस्थ पिंपळवंडी व मा.आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करेल की आपण हे इतिहासाचे ठोस पुरावे आपल्या गावच्या इतिहासासाठी खुप मौलिक असून त्यांचे संवर्धन करूने गरजेचे आहे. जर ते नष्ट झाले तर निश्चितच गावचा इतिहास पुसला जाईल. या ठिकाणी एक भव्य दिव्य मंदिराची निर्माण करून “पिंपळेश्वराचा” वारसा जपला पाहिजे. याच रस्त्यावर व पुढे काळवाडी व पुढे ऐतिहासिक वारसा लाभलेले उंब्रज गाव असल्यामुळे निश्चितच पर्यटनासाठी एक मोठी उपलब्धी सहज होऊन येथील रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होऊ शकतील.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .