Category Archives: निसर्ग खजिना

पडीलिंगी नेढ घाटघर

पडीलिंगी नेढ घाटघर

विषय तसा गमतीदार आहे. वाचक मित्रांनी वाचला असेलही किंवा ऐकण्यात तरी असेल. वानरलिंगि शब्द तर नक्कीच ऐकून असाल यात शंकाच नाही. वानर आणि लिंगी असे दोन शब्द जोडून वानरलिंगि शब्द तयार करण्यात आला आहे. का बर हा शब्दप्रयोग केला असेल? कदाचित वाचताना किंवा ऐकताना आपल्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असेलच. या बाबत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, जमीनीवर 90 डिग्री उभा असा कातळाचा गोलाकार भाग कि ज्याचा आकार वानराच्या लिंगासारखा आसमंतात दृष्टिस पडतो, की ज्यास फक्त वानर सर करू शकतात व ज्याच्या सर्व दिशांना खोल दरी दृष्टीस पडते त्याचे नाव देण्यात आले ते वानरलिंगि. उदाहरणार्थ जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्याच्या दक्षिणेला जो उभा गोल कातळ दिसतो त्यास वानरलिंगि किंवा खडापारशी या नावाने संबोधले जाते. आता याच लिंगाच्या आकाराचा एक रेललेला भाग डोंगराच्या कुशीत कातळावर टेकलेला दिसून येत असून डोंगर आणि या लिंगीच्या रेललेल्या भागातून आपणास आरपार दोन दिशांना जाता येते त्यास नेढ असे म्हणतात. म्हणून या नेढ्याचे नाव पडीलिंगी नेढ असे देण्यात आले आहे. अशेच एक नेढ घाटघरच्या डोंगरात दिसून येते म्हणून त्याचे नाव घाटघरचे पडीलिंगी नेढ अस देण्यात आले.
दोन वर्षे माझी नाणेघाट परीसरात अनेक वेळा परीक्रमा झाली. एक दिवस किरण आणि मी नाणेघाट कडे जात असताना घाटघर येथून दृष्टीस पडणा-या नेढ्यात जाण्याची बोलनी झाली होती. अनेक वेळा या ठिकाणी जायचे म्हटले की निश्चितच व्यत्यय यायचा. आज तो दिवस उजाडला होता. किरण बाणखेले व विवेक पिंगळे माझ्याकडे येतानाच पिकलेले आंबे घेऊन आले होते. कारण त्यांच्या बॅगमधून आमरस (आंब्याचा ज्युस) जमिनीवर टपकताना दिसत होता. मिसेसचा व माझा बाहेर जाण्याचा बेत अचानकपणे त्यांच्यासोबत जाण्यामुळे रद्द झाल्याने काय झाले असेल हे आपणास ठाऊकच असेल. फुटलेले आंबे घरात देऊन आम्ही तीरकुट दुचाकीवर नाणेघाटच्या दिशेला निघालो. बेजवाट, सुराळे, आपटाळे, चावंड, खडकुंबे, फांगुळगव्हाण मागे टाकत आम्ही घाटघरला पोहचलो. मध्यंतरी फांगुळगव्हाण मधून लिंगिच्या डोंगरावर चढाई करून या नेढ्याकडे पोहचण्याचा आमचा विचार होता पण तो सार्थ ठरेल असे वाटत नव्हते त्यामुळे तो विचार त्यागून मदतीसाठी घाटघरच्या साबळे मामांच्या घरी पोहचलो.
येथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगाविशी वाटते कि ती अद्याप आपल्या ऐकण्यात नसावी. फांगुळगव्हाण च्या पश्चिमेला असलेला डोंगर अर्थात लिंगिचा डोंगर. या डोंगराच्या पुर्वेला मध्यभागी जवळपास 50 फुट उंच असलेली एक लिंगी निदर्शनास पडते तर याच लिंगिच्या पश्चिमेस हि पडीलिंगी अर्थात नेढ आढळून येते तर येथुन पश्चिमेला असलेल्या किल्ले जीवधनची वानरलिंगि आहे. या तिन्ही गोष्टी जवळपास एका रेषेत निर्माण कशा झाल्या असाव्यात? हा प्रश्न पडतो. असो.
साबळेमामा मार्ग दाखविण्यासाठी आले होते. झपझप आम्ही नेढ्याच्या दिशेने चालू लागलो. उजव्या बाजूला जीवधन तर डावीकडे लिंगिचा डोंगर होता. आता एका ओढ्यातून आम्ही पुर्वेकडे चढाई चढू लागलो. हिरव्यागार झाडीतून प्रवास सुरू झाला होता. साबळेमामांनी एका गुराख्यास मार्ग दाखवण्यास सांगुन माघारी परतले होते. गुराखी त्या गर्द वाढलेल्या जंगलातून मार्ग काढत पुढे चालले होते. जंगलातील ते वाढलेले मोठे मोठे वृक्ष जवळपास 150 ते 200 वय असल्याचे सांगत होते. वानर याच झाडांच्या फांद्यावर खेळ खेळताना दिसत होते. पक्षांना आमची चाहूल लागताच किलबिलाट सूरू केली होती. मध्येच पावश्या पक्षाचे मधूर स्वर कानी पडत होते. याच गर्द झाडीत वानरांची हुप हुप कानी येऊन जणू ते सांगत होते अरे मानवा झाडे लावा खुप खुपचा संदेश देत होते. एका मोठ्या उंच दगडापाशी की जो डोंगरावरून घरंगळत खाली आलेला होता तेथे गुराखी थांबला व गमतीने सांगून गेला की या बोचा नाळेने वर चढाई मार्ग आहे. मी आता माघारी फिरतोय. त्याला आम्ही धन्यवाद दिला खरा परंतु “बोचा नाळ” हा शब्द काही विचित्रच वाटला. हात टेकवत आम्ही नाळेने वर चढू लागलो. समोरच पडीलिंगी नेढ होत.90 डिग्री कातळात हे जवळपास 30 फुट लांब व 3 फुट रुंद नेढ खास आकर्षित करत होत. नाळेची कसरत करत वर चढून उजवीकडे वळून पुन्हा चालू लागलो.
थोडी विश्रांती व सोबत आणलेल्या बियांचे रोपणाचा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यास वरूणराजा पण धाऊन आला होता. आम्ही बिया लावत होतो तर वरूणराजा या बियांना पाणी घालत होता. पुन्हा आम्ही कार्यक्रम पुरा करत चालू लागलो.बहुतेक हा ट्रेक करणारे आम्ही प्रथमच असावेत. कारण गुराखी सांगत होते इकडे कुणीच जात नाही. तुम्ही कशाला जाताय? नेढ्याकडे दृष्टी टाकली तर येथे पोहचणे खुप अवघड वाटत होते. सोबत साहीत्य होतेच.
चढाईवर मात करून आम्ही या नेढ्यात शेवटी पोहचलो. येथे पोहचताच आनंद गगनात मावेनासा झाला होता. जवळपास 30 फुट लांब व 3 फुट रूंद असलेल्या नेढ्यात आम्ही पोहचलो होतो.
जुन्नर तालुक्यातील खिरेश्वरचे नेढ, आणेघाटचा मळगंगेचा नैसर्गिक पुल व हटकेश्वरचा नैसर्गिक पुल पार करण्याचे स्वप्न या आधिच पुर्ण झाले होते. त्यात या चौथ्या पडीलिंगी नेढ्यापर्यंत पोहचण्याचेही स्वप्न साकार झाले होते. येथे आनंद घेत आम्ही उतरणीला लागलो. पुन्हा प्रवास नाळेतून सुरू झाला. तीव्र उतार असल्याने बसून पुढे सरकत उतरणे बरे असे वाटत होते. आम्ही बसून उतरू लागलो. व आचानकच त्या गुराख्याचा शब्द आठवला “बोचा नाळ” अरे विवेक, किरण बोचा नाळेचा अर्थ उलगडला बघ. काय काय? अरे हो आपण खाली उतरताना कशावर घसरत पुढे सरकत आहे बघा व या नाळेचे नाव आठवा काय सांगितले सांगा. अचानकच त्या उतरणीत आमचे हास्य गुंजू लागले.
जंगलात प्रवेश केला होता. विविध वृक्षांबरोबर फोटो काढत आम्ही नांगरलेलेल्या शेतात आलो होतो. आता त्या नांगरलेलेल्या शेताच्या मध्यभागी मी पोहचलोच असेल तेवढ्यात एका सात आठ फुट लांब असलेल्या सापाने माझ्यावर झडप घातली. मी उडी मारत पाय फाकवले तेवढ्यात तो दोन्ही पायाच्या मधुन पाठीकडे गेला. मी तुरंत वळून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला कारण पाठीमागे किरण व विवेक होता. किरण खुप घाबरला. विवेक सर्पमित्र असल्याने त्यास काही वाटले नाही. तो साप पुन्हा दुसर्‍या सापापाशी गेला तो साप होता धामणसाप. दोन्ही साप तेथील होलात शिरले व तोच विषय काढत काढत आम्ही दुचाकी घेऊन जुन्नरच्या दिशेने वापशी प्रवास सुरू केला.
मित्रांनो या नेढ्याचा थरार पाहण्यासाठी आमचा YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G

लेख व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे
शिवनेरी भुषण
माजी सैनिक
८३९०००८३७०

नांगरदरा ट्रेक एक वेगळीच पर्वणी.

नांगरदरा ट्रेक एक वेगळीच पर्वणी.

घाटवाटा म्हटले कि या घाटवाटांनी फिरताना भटक्यांचा आनंद गगणात मावेनासा होतो. गेली तीन वर्षे “निसर्गरम्य जुन्नर तालुका” पेजवर नांगदराची माहीती अपलोड करा म्हणुन पर्यटकांचे सतत मेसेजेस येत होते. त्यांची इच्छा आज या लेखाच्या माध्यमातून निश्चितच मी पुर्ण करतोय .
नांगरदरा नाव ऐकायला थोड विचित्र वाटते नाही का? अस काय आहे की ज्यामुळे या ठिकाणास नांगरदरा असे नाव पडले? निश्चितच मी आपणास ही माहिती अवगत करून देण्याचा प्रयत्न करतोय. याच सोबत एक नवीन माहिती पण आपणासमोर मांडतोय की जी कदाचित जुन्नरच्या इतिहासात आपण वाचली नसावी. जुन्नर आणि आस्वल असा उल्लेख तरी मी अद्याप कुठे ऐकला नाही. परंतु या घाटवाटेच्या शोधात मला अस्वलाचा उल्लेख स्थानिकांच्या तोंडून ऐकायला मिळाला व खुप अत्यानंद झाला.
खुप सा-या पर्यटकांनी नांगरदराचा संपर्क थेट दिवाणपाड्याशी जोडला व हे सत्य शोधण्यासाठी मी 28 कि.मी ची पायपीट करत समुद्रसपाटीपासुन 1146 मीटर उंच अशा अक्षांस- 19*19’25.6 रेखांश – 073*44’43.1 येथे अंजणावळ्याचा व-हाडी डोंगर व दौंड्या डोंगर यांच्या मध्यावर पोहचलो. ही पायपीट करताना अनेक कातळकोरीव पाय-या नजरेसमोर पडल्याने मी गोंधळून गेलो. सोबतीला दोन स्थानिक मार्गदर्शक रोहीदास बो-हाडे, किरण घुटे व मित्र सुशांत कबाडी होतेच.दरेवाडीतुन उत्तरेस पसरलेल्या माळशेज घाटाच्या कोकणकड्याकडे तो पण भर उन्हात. अनेक चढउतार पार करत करत घामाने ओलेचिंब होऊन आम्ही कोकणकड्यावर पोहचलो. लक्ष्य होते ते दरेवाडीतुन दिवाणपाड्यात उतरण्याचे. तो मार्ग म्हणजे आज मृत्यूची खाईच बनला आहे. स्थानिक सांगतात की खुप वर्षा पुर्वी लोक येथून वर येत असत परंतु येथे खराळ गेल्याने हा मार्गच बंद झाला. व दिसते ती फक्त दरी.
खरेतर दिवाणपाड्याचे नाते जोडले गेले ते नाणेघाटाशी. येथील असलेल्या दिवाणपाडा ते नाणेघाट मार्गाचा इतिहास 2200 वर्ष जुना असल्याचे निदर्शनास आला तो येथील कातळ कोरीव पाय-यां पाहूनच, व तो पुरावा सत्य असल्याचे जणू स्पष्टच संकेतच मिळाले. “दिवाण” म्हटले की आपण भुतकाळाच्या गुहेत शिरतो व आपल्या समोर उभे राहतात दिवाणजी कि ज्यांच्याकडे तेथील विभागाचा लेखा जोखा ठेवण्याची जबाबदारी पुर्वी असायची. नाणेघाट बांधला गेला व येथील शेतसारा व घाटमार्गामुळे जी जकात आकारली जायची ती संपूर्ण जबाबदारी दिवाणपाड्यात वास्तव्य करणा-या दिवाणजींकडे असायची. व त्यामुळे या वस्तीचे नाव दिवाणपाडा ठेवण्यात आले. या वस्तीला पण संरक्षण दिले गेले होते. कारण जुन्नरच्या मध्यवर्ती ठिकाणांना जोडणारी मुख्य म्हणजे हीच घाटवाट होती. दिवाणपाड्या जवळ असलेले आंबेमाळ, सावर्णे अशी वेगवेगळी द-यांखो-यांत वसलेली गावे पहावयास मिळतात. येथून दिसणारे माळशेज घाट व वेडीवाकडी वळणे घेणारी एक काळी रेषा अर्थातच कल्याण ते अहमदनगर महामार्ग दृश्य, समोरच अंजनावळ्याचा व-हाडी डोंगररांग व याच डोंगराच्या आडून हळूच डोकाऊन पाहणारे किल्ले जीवधन व किल्ले भैरवगड यांचे अलौकिक दृश्य पहावयास मिळते.
येथील परिसराचे निरीक्षण करत आम्ही निघालो ते नांगरदरा च्या शोधात. समोरच माळशेजच्या भेटीला आलेल्या दौंड्याचे रौद्र रूप वर चढण्यासाठी आव्हान देत होत. किरण व मी त्या कड्याच्या शिखरावर चढून विजय मिळविण्याचा प्रयत्न करत होतो. कातळाचे 90 डिग्री अँगलचे दोन टप्पे फ्रि हँड क्लाईंब केले खरे परंतु पुढील टप्याचा रूद्र अवतार पाहून त्या कड्याला मुजरा ठोकत आम्ही माघार घेत उतरणीला लागलो.
आता आम्ही माळशेज घाट कोकणकडा कडा अर्धा कि.मी दुर सोडत दक्षिणेस सरकु लागलो. समोर वनदेव डोंगर शिखर दिसत होते. शिखरावर चढण्याचा सोपामार्ग दक्षिणेकडून होता. त्या ठिकाणी पोहचून माघारी पुन्हा शिखरावर यावे लागणार होते. आम्ही तसे न करता सरळ उत्तरेकडून रिस्क घेत चढाई सुरू केली. कारण पश्चिमेला सुर्यदेव आराम करण्यासाठी मार्गस्थ झाल्याचे दिसून येत होते. दिवसभर तळपत्या त्या गोळ्यामध्ये आता थंडावा जाणू लागला होता. त्यामुळे शरीराला आराम वाटत होता. तो लाल गोळा डोंगराआड झाला की आम्हाला त्रासदायक ठरणार होता. कारण अंधार पडला तर येथील दगडधोंडे तुडवणे कठीण जाणार होते. त्या कठिण चढाई प्रसंगातून आम्ही वनदेवाचे दर्शन घेत तळमाची, किल्ले निमगीरी, किल्ले सिंदोळा, उधळ्या, शिनलोप, भोरदा-या व इतर सुंदर परिसर न्याहळत नांगरद-याकडे उतरू लागलो. बहरलेला रानमेवा आम्हास मेजवानीसाठी आमंत्रित करत असूनही आम्ही त्याच्या विनंतीला मान देऊ शकत नव्हतो.
सुर्यदेवता निद्रेच्या तयारीला लागली होती. हळूहळू त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या लवू लागल्या होत्या. आमची पावले झपझप उचलली जात होती. नांगरदरातुन उतरणे सोपे नव्हते. नांगरदरा पाठीमागे सोडत अस्वलदराने दरेवाडीत जायचा आमचा प्रयत्न होता. नांगरदराचा आकार बळीराजाच्या लाकडी नांगरा सारखा असल्याने पुर्वजांनी त्याचे बारश्याला ठेवलेले नाव म्हणजेच नांगरदरा असा भास झाला. नांगरदरा व अस्वलदरा हे खरेतर एकमेकांचे सोबती. दोघांनीपण येणाऱ्या पर्यटकांना जणू तळमाचीला पोहचविण्याचा ठेकाच घेतल्याचा भास होतो. अस्वलदरा म्हणजे जुन्नर तालुक्यात फक्त येथेच अस्वले पुर्वी पहावयास मिळायची असे येथील स्थानिक सांगतात म्हणून यास अस्वलदरा असे नाव पडले.अस्वलदरातील मोठ मोठाले दगड धोंडे तुडवत उतरणीला लागलो होतो. घामामुळे शरीरातुन दुर्गंधी येऊ लागली होती.पाय व गुडघे आराम मागत होते व ते त्यांना देणे शक्य नव्हते. असमंतात पक्षी आपल्या घराकडे गुणगुणत जाताना दिसत होते. अगदी तशीच घराची ओढ आम्हास लागली होती. परंतु गुणगुण्यासाठी शरीरात त्राण शिल्लक नव्हते. दरेवाडीमध्ये 7:00 वाजता पोहचलो. येथुन 40 कि.मी प्रवास करून घरी वाट पाहत असलेल्या पिंलांच्या घरट्याकडे पोहचायचे होते. किरण व रोहीदासच्या घरच्यांनी दुरून आम्हाला पाहताच ब्लॅक टी तयारच करून ठेवला होता. चहाचे दोन घोट घेत व त्या दोघांना योग्य तो मोबदला देत व त्यांची जाण्याची परवानगी घेत आम्ही मार्गस्त झालो ते जुन्नर शहराकडे पुन्हा एकदा येथे वारंवर अभ्यास करण्यासाठी येण्याचा विचार करूनच.
मित्रांनो हे जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहराच्या पश्चिमेस 40 कि.मी अंतरावर देवळे या गावातील ठिकाण पहायला व अनुभवयाला विसरू नका. नाणेघाट मार्गाने किंवा माणिकडोह मार्गाने येथे पोहचता येते.भटकंती करताना जेवन पाणी सोबत ठेवायला विसरू नका. मग येताय ना? “निसर्गरम्य जुन्नर तालुका” भेटी आम्ही आपली वाट पाहतोय.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

जुन्नर तालुक्याचा ताजमहाल म्हणजेच हापूसबागचा हबशी घुमट.

जुन्नर तालुक्याचा ताजमहाल म्हणजेच हापूसबागचा हबशी घुमट.

#हबशी_घुमट (#सौदागर_घुमट#जुन्नर
(जुन्नर शहराच्या पूर्वेस )
नारायणगाव ते जुन्नर हायवेने जुन्नरला आलात कि याच रस्त्यावर विशाल दगडी वेस जुन्या एस.टी स्टॅन्ड जवळ बांधण्यात आली आहे. याच वेशीच्या पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले की एक आमरापुरकडे जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. याच रस्त्याने सरळ पूर्वेकडे साधारणतः सव्वा कि.मी गेलात की आपणास डावीकडे या विशाल वास्तूचे दर्शन घडते.
असे म्हटले जाते की हा सतराव्या शतकातील निजामशाही राजवटीत मुघलकालीन स्थापत्य शैलीचा एक अनोखा देखावा आहे.
निजामशाहाचा वजीर मलिकांबर यांच्याशी संबंधीत ही वास्तू आहे. जो की आफ्रिकेतील हाबसन प्रांतातून आलेल्या जुन्नर येथील हबशीबाग येथे तो वास्तव्यास होता. आज याच हबशीबागचा उल्लेख #हापुसबाग असा करण्यात येत आहे.
ऊंचच ऊंच 55 फुट रुंद व 60 फुट लांब कोरीव शिळेतील चौरसाकृती ही वास्तू लक्ष वेधून घेतल्या शिवाय राहत नाही.
साधारण 50 फुट ऊंचीच्या नक्षीदार भिंतीवरील कमानीवर 30 फुट उंच असलेला वरील घुमट अलगद तोलुन धरल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण पहावयास मिळते.
आतील भागात नऊ समाध्या असुन. येथे आपण जोरात आवाज दिलात तर त्या ध्वनिचे नऊ पडसाद पुन्हा पुन्हा त्याच वेळी ऐकू येतात.व याच आतील भिंतीवर कुराणातील आयने कोरल्याचे निदर्शनास येते.
या वास्तूचा मलिकांबरशी संबंधीत कोण्या मोठ्या असामीचे हे स्मारक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुरातत्व विभागाने आता या वास्तूचे मजबुतीकरण करूण संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले असून ते अंतिम टप्प्यात पुर्ण होत आले आहे.

लेखक /छायाचित्र – खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज

लालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.

लालखन हिवरे अर्थात हिवरे बु.|| एक ऐतिहासिक भेट.
हरिश्चंद्राची भेट घेऊन पुष्पावती माई धाकटी बहिण मांडवीला भेटायला निघते. द-याडोंगर खोरे तुडवत तुडवत व वेडीवाकडी वळणे घेत घेत ती जेव्हा जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे येते तेव्हा तीची भेट मांडवीशी होते. एकमेकींना भेटून झाल्यावर पुष्पा, मांडवीला विचारते अग तु कोठे निघालीस एवढे नटून थटून? मांडवी उत्तरते मोठ्या ताई कुकडीला भेटायला निघाले. येतीस का ताई तु पुढे? पुष्पा म्हणते अग मी मोठ्या ताईलाच भेटायला निघाले होते. म्हटले रस्त्यात तुला भेटून पुढे कुकडी ताईला भेटावे. मग काय पुष्पा व मांडवी दोघी मोठी बहीण कुकडीला भेटायला निघतात. बरेच अंतर चालत चालत त्या एका ठिकाणी कुकडीला भेटतात तेच ठिकाण म्हणजे जुन्नर तालुक्यातील लालखण हिवरे होय.
त्यांची भेट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणास आपण संगम असे म्हणतो. या ठिकाणी तीन नद्या एकत्र आल्याने येथे हेमाडपंती संगमेश्वराचे मंदिर बांधण्यात आले होते. संपूर्ण मंदिर जमीनदोस्त झाल्याने मंदिराबाहेरचे चार नंदी पहावयास मिळतात. हेमाडपंती मंदिराचे अवशेष पालथे असून फक्त एक मुर्ती निदर्शनास पडते. गणपती शिल्प जीर्ण अवस्थेत पहावयास मिळते. या ठिकाणी येण्यासाठी आज प्रथतःच कपडे उतरून छातीभर खोल पाण्यातुन 30 मीटर प्रवास करावा लागला तेव्हा कुठे येथील शिवलिंगास स्नान घालण्याचा व स्वच्छ करण्याचा योग आला.
नियमित पाण्याची सुखसुविधा उपलब्ध असल्याने येथे गाव वसले ते लालखन हिवरे.हेमाडपंती मंदिराचे जीर्ण अवशेष येथे पहावयास मिळतात. 1977 पर्यंत येथे येडगाव धरणाची निर्मीती करण्यात आली व या तीनही बहिणींचा रस्ता येथे अडविण्यात आला. व निर्माण झाले ते येडगाव धरण. त्यामुळे #संगमेश्वर_मंदिर व लालखण गाव पाण्याखाली गेले.
जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कि ज्यांनी 15 वर्षे आपली सत्ता प्रस्थापित केली ते मा. वल्लभशेठ बेनके यांचे हे गाव. धरणामुळे गाव विभागले गेले व #कैलासनगर व #हिवरे_बुllअशी दुभागणी झाली.
आता आपणास प्रश्न पडला असेलच कि लालखण हे नाव कसे? यावर भोर बाबा आख्यायिका सांगतात की खुप खुप वर्षापूर्वी अहमदनगर मधील लालखण बाबांच्या समाधीपाशी असलेले दोन अतिशय लाल व मोठे भुंगे फिरत फिरत येथे आले व मरण पावले. त्यांची समाधी लालखण म्हणुन येथे बांधण्यात आली. ते भुंगे येथे बाबाच्या रूपात आले होते म्हणून तसे नाव देण्यात आले. #लालखण_मंदिर ही वास्तु बहुतेक निजामशाही कालखंडात बांधण्यात आली असावी असे वाटते. मंदिरात एक व मंदिराच्या बाहेर पश्चिमेस लागुन एक अशी दोन पिरस्थाने पहावयास मिळतात. नुकतीच 4 तारखेला मंदिर पाण्याची पातळी कमी झाल्याने येथे यात्रा संपन्न झाली होती.
याच समाधीच्या अगदी दक्षिणेला 30 मीटर अंतरावर भारताचे सर्वप्रथम वनसंरक्षक इंग्रज अधिकारी गिब्सन येथे सरकारी बंगल्यात वास्तव्यास होते. धरण निर्माण झाल्याने त्यांचे राहते घर पाण्याखाली गेले व त्याची पडझड मोठ्या प्रमाणात झाली व आज फक्त त्या इमारतीचे अवशेष पहावयास मिळतात. येथे विविध ठिकाणी समाधीस्तल पहावयास मिळतात. आखीव व रेखीव सुंदर तुळस येथील पसरलेल्या हिरवाईमधे तल्लीन होऊन उभी असल्याचे दिसते. बौद्ध समाधी याच तुळशीच्या पुर्वेस पहावयास मिळते. परंतु ती बौद्ध समाधी नसून समाधीस्तल असावे की जीच्या छतावर चुन्यामध्ये चारही दिशांना बसलेल्या अवस्थेतील मुर्ती कोरलेल्या दिसतात.
धरणाची पातळी खाली गेली की येथील ग्रामस्थांच्या पुर्वीच्या आठवणी ताज्या होऊ लागतात. सर्व बाजुंना लाबवर हरळीच्या गवताचे साम्राज्य पसरल्याने हा परिसर हिरवाईने व सौंदर्याने नटलेला पहावयास मिळतो. एकदा का या परिसरात आलात तर येथून निघता पाय काढणे फारच कठीण. अगदी अंधार होईपर्यंत मी येथून हललो नव्हतो.
ओझरच्या विघ्नहर्त्याच दर्शन झाले की पर्यटकांनी हिवरे बुll या गावातील या ठिकाणी भेट देणे सोयीस्कर आहे. अगदीच तीन कि.मी अंतरावर हे गाव आहे. गाव परिसर संपूर्ण उस क्षेत्राने अच्छादीत असल्याने येथील रस्ते नेहमीच हिरवाईच्या छायेत असतात. येथील सौंदर्य दर्शन जर सांजवेळी घेत असाल तर अतिउत्तम कारण सुर्यमावळतीचे दृष्य तर अप्रतिमच. मग पहातायना #हिवरे_बुll परिसर?

आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

खुटादरा एक थरारक ट्रेक

 खुटादरा एक थरारक ट्रेक

2013 पासून जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्यात भटकंती करण्याचा अनेक वेळा योग जुळून आला. त्यात हरिश्चंद्र गड ते भिमाशंकर दरम्यान पसरलेल्या अथांग सह्याद्री दर्शनाने तर मला कधी प्रेमात पाडले समजलेच नाही. एकदा का भटक्यांना या सह्याद्रीत फिरण्याची चटक लागली की बस त्याला दुसरे काहीच दिसत नाही. टोलार खिंड, जुन्नर दरवाजा, इतिहास कालिन माळशेज घाट श्री छत्रपती शिवाजी महाराज #पावणखिंड#भोरदार्या#भोरांड्याची_नाळ#नाणेघाट#दार्याघाट#खुटादरा#डोणीदरा अशा विविध कोकणकड्याच्या पायवाटा तुडवत कोकणदर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्ष सह्याद्रीने घातलेल्या सादेस प्रतिसाद देताना होणारा आनंद गगणात मावेनासा होतो. प्रत्येक वाटेची एक वेगळीच कथा, विशेषता व सुंदरता. त्याच पैकी असलेला हा खुटादरा.
खुटादरा हे नाव ऐकण्यात तसे विचित्रच वाटते नाही का? परंतु जेव्हा आपण या वाटेने प्रवास करतो तेव्हा समजते की हे नाव दिले गेले ते काही चुकीचे नव्हते. या वाटेचा उतार एका नाळीतुन नसुन अतिशय थरारक उतरणीतुन करावा लागतो. व उतरताना मागे वळून पाहिले की आपण ते दृष्य पाहून थक्क होतो. अगदीच नव्वद डिग्री उंचावरून आपण खाली उतरतानाचे ते दृष्य दृष्टीस पडते व ते दृष्य एका खुंट्यासारखेच दिसते.
स्थानिक येथील कथा अतिशय थरारक सांगतात व ऐकणारा या ठिकाणी यावे की नाही असा विचार करतो. कारण हा संपूर्ण परिसर पाहीला तर तो निर्मनुष्य आहे, त्यामुळे मुंबई मधील कुख्यात गुन्हेगार पुर्वी याच भागात आपला तळ ठोकून असत.कारण येथे अथांग पसरलेल्या जंगलातून हीच एक “खुटादरा” वाट जुन्नर तालुक्यातील दुर्गादेवी व ढाकोबा परिसराला ठाणे जिल्ह्यातून जोडते. परंतु आज हे चित्र मात्र संपूर्ण बदललेल दिसते.
याच वाटेने उतरताना आपणास ठाणे जिल्ह्यातील आदिवासी रामपूर हे गाव लागते. व येथुन पुढे आपणास जीभ ने प्रवास करून धसई व सरळगाव असा प्रवास करता येतो. परंतु ही वाट उतरताना विशेष काळजी घेणे खुपच गरजेचे आहे. कारण आपली छोटीशी झालेली चुक मृत्यूच्या दारीत घेऊन जाऊ शकते.
शक्यतो या वाटेचा उपयोग करताना सोबत स्थानिक गाईड घेऊन जाणे गरजेचे आहे. कारण जंगलात पुढे अनेक आडवळणी वाटांना आपणास तोंड देत रामपुरला पोहचावे लागते. शक्यतो ही वाट स्थानिक कुणाला सांगत नाहीत परंतु आपण एक नियमित ट्रेकर असाल व आपणास एक लांब ट्रेक करायचा असेल तर खालील GPS रिडिंग च्या अधारे वाटेची सुरूवात भेटू शकते.
N19 13 31.2 E73 38 53.7
N19 13 30.2 E73 38 51.4
वरील वाटेची सुरूवात ही दुर्गादेवी मंदिराच्या उत्तरेकडे कोकणकड्याने साधारण एक कि.मी अंतरावर चालत गेलात की मिळते. परंतु एक लक्षात असू द्या की आपणास मध्यंतरी पिण्याच्या पाण्याची व जेवणाची कोठेही सोय होत नाही त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी स्वतः घेऊनच जावे. शक्य असल्यास गाईड म्हणून गुराखी हेमा पारधी (दुर्गवाडी) यांची आपणास मदत होऊ शकते.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री. खरमाळे रमेश गणपत
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
मा.सैनिक संघ जुन्नर.

भोरांड्याचे दार नाणेघाट

#भोरांड्याचे_दार (नाणेघाट)
आपण या भोरांड्यातुन प्रवास केला असेलच. भैरवगडाकडे नाणेघाटातुन जायचे झाले तर याच मार्गाचा अवलंब केला जातो. किंवा मोरूशीला जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे हेच ते भोरांड्याचे दार.
एक उत्तम व लाॅगरूट ट्रेक करावयाचा झालाच तर आपण नाणेघाट उतरून पुन्हा या भोरांड्यातुन पुन्हा घाटघरला येऊ शकता. चढण व उतरण सोपी असल्याने प्रवास जीवघेणा ठरत नाही. मग येतायना मोरूशी मार्गे घाटघरला जोडणाऱ्या या भोरांड्यातुन वर. येथे उतरणीला भोईरवाडी असल्याने यास भोरांड्याचे दार असे नाव दिले गेले असावे.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री. खरमाळे रमेश गणपत
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
मा.सैनिक संघ जुन्नर.

अविस्मरणीय दौरा प्र के घाणेकर आणि आशुतोष बापट

अविस्मरणीय दौरा.
दोन दिवस दौऱ्यावर जाण्याचा योग मनोज सरांमुळे नुकताच जुळुन आला. हा दौरा जीवनातील विविध ठिकाणच्या पैलुंवर प्रकाश टाकणारा ठरणार होता. कारण सोबतीला म्हणण्यापेक्षा संगत लाभणार होती ती दोन दिग्गज लेखक – प्र. के घाणेकर सर आणि अशुतोष बापट सर यांची. जुन्नर तालुक्यातील विविधता त्यांना दाखविण्याची जबाबदारी माझ्याकडे असल्याने कमी वेळात भरपूर काही त्यांना दाखविणे हे ध्येय माझे होते परंतु हे दाखवत असताना त्यांच्या संपूर्ण ज्ञानाचे सिंतोडे कानी कसे पडतील हेही माझ्या सारख्या मानसाला खुप काही शिकवून जाणारे होते.
त्यांचा प्रवास पुण्यनगरीतुन सुरू झाला तो शिवजन्मभुमीपर्यंत. मी पण खुप अतुरतेने त्यांची वाट पाहत होतो. घरी नाष्टा करून निघू त्यांना फोनवर बोललो होतो. वेळ कमी आहे म्हणून सर बोलले फक्त चहा घेऊ व नाष्टा आपण कुठेतरी वनात करू असे बोलले. सर घरी पोहचले व चहा घेऊन आम्ही निघालो. प्रथम दर्शी त्यांना त्यांना जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील “बोलके दगड” पहायचे होते. सरांची या 70 वर्षे वयातील धडपड पाहून तर मी चकीतच झालो. प्रत्येक दगड वाजतो कसा ? हे ते स्वतः पाहत होते. येथील संगिताचा लाभ घेत आम्ही दुर्गवाडीतील माता दुर्गादेवी परिसरात पोहचलो. माता दुर्गेचे दर्शन घेत डोंगरावर चढायला सुरूवात केली. डोंगर माथ्यावरील वाजणा-या दगडांच्या सुरांचा आवाज घेत व हिरवाईने नटलेला परीसर न्याहाळत पुन्हा कोकणडा दर्शन घेत दुर्गवाडीतील जंगलात भोजणाचा अस्वाद घेतला. नंतर हातवीज गावाला भेट देत पुन्हा परतीला लागलो. शिंदे गावातील माता पार्वती व शंकर मुर्ती यांचा अभ्यास करत आपटाळे येथुन उद्ध्वस्त माणकेश्वर मंदिरास भेट दिली. पुढे नाणेघाट येथील भोरांड्याच्या दारातून खाली प्रवास सुरू केला तो नाणेघाट मार्गे वर येण्यासाठी परंतु आमचा बेत वाट न मिळाल्याने फसला व पुन्हा परतीला लागलो. आता पारूंडे वैष्णवधाम मंदिर पहायचे होते. तेथे पोहचलो. आरतीची तयारी झाली होती. तेथील दगडी शिल्पे सरांच्या तोंडून बोलत होती. प्रत्येक शिल्पाची विचार विविधता दोघे दिग्गज अगदी सहज सांगत होते. सोबतीला येथे सरपंच जयेश पुंडे होते.आरती दर्शन घेत PWD रेस्ट हाऊस मध्ये सरांची विश्रांतीची व्यवस्था केली होती तेथे पोहोचलो. घरीच मासवडीच्या जेवणाचा बेत आखला होता. मग फ्रेश होऊन आम्ही गप्पा गोष्टी मारत जेवणाला आरंभ केला. सोबतीला श्री विनायक खोत सर आले होते. दुसऱ्या दिवशी फिरतीचा कार्यक्रम जेवतानाच ठरला. सकाळी 6:30 निघायचे होते. जेवण आटपून थोड्या गप्पा गोष्टी मारत सर्वजण विश्रांतीला मार्गस्थ झाले.
दिवसभर थकल्यामुळे झोप लवकरच लागली. सकाळी लवकर उठून पुन्हा प्रवास सुरू केला. सुलेमान लेणी समुह, पाताळेश्वर, मानमोडी लेणी समुह या सर्वांचा अभ्यास करत चावंडला जायचे होते. सोबतीला खोत सर,विनायक साळुंके व संकेत साळुंके येणार होते. त्यांना जुन्नरमधुन घेऊन चावंडला निघालो. 1978 चा चावंड व आत्ताचा चावंड पाहताना घाणेकर सरांना खुप काही वेगळेपण जाणवले. दोघांनाही येथील हा चावंड वेगळ्याच रूपात दिसला. येथील सर्व काही वेगळेच आहे असे सर सांगत होते. तर बापट सर बोलत होते की चावंड हा पुर्वीचा किल्ला नसून खुप मोठे तीर्थक्षेत्र असावे असे सांगत होते. नंतर त्याचा वापर किल्ला म्हणून केला गेला असावा.
दुपारचे जेवण आता पाच वाचता घरी होणार होते. आम्ही परतीला लागलो होतो. परंतु चावंड या दोन दिग्गजांच्या मनात काही वेगळेच घर करून गेला होता. घरी पोहोचलो. हुलग्याच्या बनवलेल्या शिंगोळी जेवनाचा आस्वाद घेत सर पुन्हा पुन्यनगरीकडे रवाना झाले. सर बोलत होते. आज पाय चेपून घ्यायला हवेत तर बापट सरांना विनोदाने सांगत होते तुझा पण बोलुन बोलून घसा दुखत असेल तर संध्याकाळी झोपताना गळा चेपून घे रे बाबा….
हा दौरा माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय होता. कारण खुप काही शिकायला मिळाले. सरांच्या माध्यमातून जुन्नरचा इतिहास पुस्तक रूपाने जगासमोर निश्चितच येईल यात शंकाच नाही.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री.रमेश गणपत खरमाळे
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
माजी सैनिक संघ जुन्नर. 

मानमोडी लेणी गटातील अंबा अंबिका लेणी समुह जुन्नर

मानमोडी लेणी गटातील अंबा अंबिका लेणी समुह जुन्नर

जुन्नर शहराच्या दक्षिणेला व खोरे वस्तीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या धामणखेल खंडोबा डोंगरात मोठा लेणीसमूह दिसतो तो म्हणजे “मानमोडी लेणी” समूह. हा समुह तीन भागात व्यापलेला असून पुर्वेकडील भागाला “#भिमाशंकर_लेणी” समुहाने ओळखले जाते. मध्यंतरी असलेला लेणी समूह “#अंबा_अंबिका_लेणी” समुहाने ओळखला जातो तर पश्चिमेला असलेल्या लेणी समुहास “#भुतलेणी” म्हणुन ओळखले जाते. या तीन गटांना मिळून #माणमोडी_लेणी म्हणुन संबोधण्यात येते. विशेष म्हणजे या सर्व लेण्यांची निर्मीती ही 2200 वर्षाची असून बौद्ध कालीन आहे. त्याच पैकी एक लेणी समुह म्हणजे #अंबा_अंबिका लेणी होय. येथील लेण्यांपैकी एका लेणीत अंदाजे इ.स.च्या ६ ते ८ व्या शतकात जैनांनी आपल्या देवता कोरलेल्या दिसतात. त्यात श्री पार्श्वनाथ आणि आंब्याच्या झाडाखाली बसलेल्या देवी अंबिकाचे अंकन केलेले दिसते.
येथीलच एका लेणी समुहात पुढे एका चैत्यगृहाचे पाषाण ढेसूळ लागल्याने काम अर्धवट राहिलेले आहे. व जवळच शेजारच्या दोन छोट्या लेण्यांच्या बाहेर ब्राह्मी लिपी मधील सुबक अक्षरे असलेला शिलालेख आहे. भृगुकच्छ अर्थात भडोच इथल्या ‘बुद्धमित्र आणि बुद्धरक्षित (बुधमितस आणि बुधरखितस) नावाच्या दोन भावांनी ह्या लेणीसाठी दान दिलेले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव लिहायचे राहिले म्हणून ते मधल्या ओळीत छोट्या अक्षरात लिहिलेले आहे !!!
या लेणीचा संदर्भ काही महाभारतातील अंबा- आंबिकाशी जोडतात म्हणून त्यांचे नाव जोडले गेले असावे. त्यामुळे या ठिकाणी हिंदू, बौद्ध व जैन धर्मीय बांधवांचे दर्शनासाठी ऐक्य पहावयास मिळते.
हा संपूर्ण लेणी समूह पाहण्यासाठी एक तास पुरेसा ठरतो. पाण्याची एक बाटली सोबत ठेवावी. मध्यम चढाई असल्याने दमछाक होत नाही. सध्या परदेशी पर्यटकांना या लेण्या आकर्षित करत असून त्या महत्वपूर्ण माणल्या जात आहेत. येथे विशेष काळजी घ्यावी ती येथील असलेल्या मधमाशांपासूनच. अनेक पर्यटकांवर त्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे आपण विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
लेख लिहीताना काही चुका झाल्या असतील तर माझे स्वतःचे अपूरे ज्ञान म्हणून समजून घ्याल ही प्रार्थना. आपण माझ्या चुकांवर पांघरूण न घालता कमेंट्स मध्ये निश्चितच लिहा जेणेकरून सत्य वाचकां समोर राहील. धन्यवाद.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री. रमेश गणपत खरमाळे
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
माजी सैनिक संघ जुन्नर.

सोनतीर्थ अर्थात कुकडी नदी उगमस्थान.

सोनतीर्थ अर्थात कुकडी नदी उगमस्थान.
(व्हिडीओच्या माध्यमातून हे दृष्य पहायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा व आनंद घ्या.
https://www.youtube.com/channel/UCIYgK500Nl9uqNClaDckmUg)
अनेकदा आपण जुन्नर तालुक्यातील हेमाडपंती मंदिर #कुकडेश्वरास भेट दिलीच असेल. हे #कुकडेश्वर मंदिर कुकडी नदीच्या दक्षिण
किना-यावर सुंदर अशा आखिव व रेखिव दगडीशिल्पांच्या तोडीत बांधलेले आपणास पहावयास मिळते. विशेष म्हणजे नाशिकच्या त्रंबकेश्वरामंदिरापासून ते खेडच्या भिमाशंकर मंदिरापर्यंत पसरलेल्या अतिशय दुर्गम डोंगराळ भागातील बालाघाट रांगेत जवळपास अशी बारा महाराष्ट्रातील जोतीर्लिंगाची रचना नदी किनारी केलेली पहावयास मिळते. त्याच पैकी असलेले येथील कुकडी नदीच्या काठावरील कुकडेश्वर मंदिर आहे.
#जुन्नर -आपटाळे – चावंड – कुकडेश्वर असा येथे जवळपास 17 कि.मी प्रवास करून पोहचता येते. हे मंदिर भु- लगत असल्याने येथपर्यंत चारचाकी प्रवास करणे सहज शक्य आहे. हा परीसर चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला असल्याने येथील सुंदरतेचे वर्णन कोणत्या शब्दात व्यक्त करावे हेच कळत नाही.
याच मंदिराच्या पश्चिमेस एक दक्षिणोत्तर पसरलेली एक डोंगर रांग निदर्शनास पडते. याच डोंगराच्या मध्यभागी आपणास कुकडी नदिचे उगमस्थान असून येथे पोहचण्यासाठी पुर – शिरोलीमध्ये गाडी पार्क करून चढण्याचा सोपा मार्ग मिळतो. पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे कारण खुप दमछाक करणारी येथील जंगलवाट आहे. साधारण तासा भरात आपण येथे पोहचतो. जाताना निसर्गाच्या विविधतेचे दर्शन घडतेच. सध्या करवंदाच्या जाळ्या भरगोस फळांनी लगडलेल्या असून करवंदाच्या फुलांचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळलेला असल्याने आपणास चालताना तो गंध जाणवतो. विविध वृक्ष व वेलींणी हा परीसर व्याप्त असल्याने विविध पक्षी व प्राणी यांचा हा स्वर्गच आहे की काय असा भास होतो.
कातळकड्यात उंचीवर कोरलेली येथे लेणी असून यामध्ये बसण्यासाठी ओटे कोरलेले आहेत.दोन लहान मोठे शिवलिंग असून पश्चिम भिंतीवर कातळातच एक मुर्ती कोरलेली आहे. साधारण पाच बाय अडीच फुट लांबी व रूंदिची एक टाकी कोरलेली असून तीची खोली साधारण पाच फुट असावी. याच टाकीच्या पश्चिम व दक्षिण किना-यात डोंगरातुन पाण्याची सतत वाहत असलेली नैसर्गिक धार टाकीत पडते व ती पुढे खाली दरीत जाते. याच ठिकाणास सोनतीर्थ संबोधतात. ही सतत वाहणाऱ्या पाण्याची धार वर्षभर वाहत असल्याने कुकडी नदिचे उगमस्थान दर्शवित आहे. येथील दर्शन घेतल्यानंतर निसर्ग लावण्याचा अनुभव घेण्यासाठी आपणास खाली न उतरता आलेली वाट डोंगर माथ्यावर घेऊन जाते. आपल्याला थकवा जाणवत नसेल तर निश्चितच डोंगर माथ्यावरून ढाकोबा, किल्ले जिवधन, किल्ले चावंड, व-हाडी डोंगररांग, शंभू डोंगर, कुकडेश्वर मंदिर परीसर, माणिकडोह धरण, उच्छिलचा तलाव अशी अनेक निसर्गाने नटलेली दृश्य पहावयास मिळतात. परंतु यासाठी वेळ मात्र जास्त लागतो.
याठिकाणच्या सुंदर सोनतीर्थास कधी भेट द्यावयाची झालीच तर नक्कीच वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल अशी सदिच्छा व्यक्त करतो.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री.  रमेश गणपत खरमाळे
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
माजी सैनिक संघ जुन्नर.

खिरेश्वरच्या जुन्नर दरवाजा मार्गे हरिश्चंद्रगड दर्शनासाठी जाताना काय पहाल.