त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहे. 

त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहे
जुन्नर तालुक्यात भटकंती करताना अनेकांच्या समस्या नेहमीच समोर येत असतात. कथा आणि व्यथा स्थानिकांकडून ऐकताना तर कधी अंगावर शहारे येतात तर कधी डोळ्यांच्या कडा पण पाझरू लागतात. मग एक प्रश्न काळजाला भिडतो तो म्हणजे खरोखरच हि “शिवरायांची” जन्मभुमी आहे का? प्रत्येक जण आपापल्या परीने लढा देतो व आपल्या समस्या सोडविण्याची धडपड करताना दिसतो व त्या पुर्ण पण होतात. परंतु ज्यांच्यामध्ये धडपड करण्याची क्षमताच नाही त्यांनी जावे कुठे? हा पण मोठा प्रश्न आहे.
जुन्नर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून चार गावांचा उल्लेख नेहमीच ऐकावयास मिळतो ती गावे म्हणजे दक्षिणेकडील सुकाळवेढे व हातविज तर उत्तरेकडील कोपरे व मांडवे. या ठिकाणी एस. टी सुविधा गावात पोहचल्या ही आनंदाची बाब निश्चितच आहे. व त्यातुन त्यांना दिलासा पण मोठ्या प्रमाणात मिळाला. आता अपेक्षा आहे ती चांगल्या प्रकारे रस्ते होण्याची.
जुन्नर तालुक्यातील दुर्गम भागातील गाव म्हणजे #देवळे. या गावात सुविधा मिळाली खरी पण त्याच गावातील 40 कुटूंबातील जवळपास 250 लोकवस्ती असलेली #दरेवाडी मात्र शासन सुविधांपासून वंचित असलेली पहावयास मिळते.
अक्षांस – N 19*18’16.4 रेखांश – 073*44’18.3 वर वसलेल्या या दरेवाडीचा अंधार मिटला तो सन 2013 मध्ये तो पण एकल विद्यालयाच्या व गावच्या तरूणांच्या मदतीने. मुळात जर्मनीची असलेली #बाॅश्च (Bosch) कंपनीला एकल विद्यालयाने या दरेवाडीची माहीती दिली कि त्यांना हा प्रकल्प राबविण्यासाठी दुर्गम भागातील 30/40 घरांची अवश्यकता होती. कंपनीने सोलर प्रोजेक्ट येथे उभा केला व दरेवाडीला स्वातंत्र्यानंतर 65 वर्षांनी उजेड मिळाला.
या कंपनीने जवळपास 40 घरांमध्ये मिटर बसवलेले असून प्रत्येक घराघरामध्ये लाईट पुरवली जाते. एक इनव्हायटर रूममध्ये 6 बॅटरी संचात सोलरच्या माध्यमातून वीज सेव केली जाते व तीचा वापर टिव्ही, बल्प व वाडीच्या पाणीपुरवठा पंपासाठी केला जातो. मुलांचा अभ्यास, माता भगिनींचा स्वयंपाक याच प्रकाशात केला जातो. राॅकेल वर चालणारे दिवे नष्ट झाले व आरोग्यदायी यांचे जीवन ठरले. यासाठी प्रकल्पासाठी जागा दिली ती श्री. नामदेव सिताराम बुळे यांनी. या बदल्यात त्यांना घरात मोफत वीज देण्याचा निर्णय कमेटीने घेतला.
प्रत्येकी मिटर प्रमाणे रू 90/- आकारले जातात व त्याचा विनियोग या प्रोजेक्टच्या मेंटनससाठी केला जातो व याचे ताळेबंद ठेवण्यासाठी वाडीतील सात सदस्यांची वनदेवी कमेटी स्थापण्यात आली आहे. गेली पाच वर्षे हा वीज पुरवठा आमच्यासाठी उजेड घेऊन आल्याचा आनंद येथील ग्रामस्थ सांगतात. परंतु काही समस्या विचारले असता त्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालेल्या पहावयास मिळाल्या.
ते सांगतात घरात लाईट आली परंतु वाडीत यायला रस्ता नाही. एखादी बाळंतपणात आडलेली महीला किंवा आजारी पडलेल्या व्यक्तींना येथुन तीन कि.मी अंतरावर स्ट्रेचरवर घेऊन जावे लागते. तीन महिने येथे एवढा पाऊस पडतो की आमचा इतर सर्वांशी संपर्क तुटतो. कारण दोन मोठ्या ओढ्यांनी व डोंगरांनी वेढलेल्या भागावर ही वाडी असल्याने पुर्ण पाण्याचा वेढा आम्हाला पडतो व मुख्य रस्त्यावर येणेही शक्य होत नाही. आरोग्य सेवा मिळणेही कठीण होत. राशनपाणी याचा साठा करून ठेवावा लागतो. आम्हाला सर्वांना महत्वाची गरज आहे ती हा पावसाळा सुरू होण्याआधी येथील रस्त्याची, असे ग्रामस्थ केविलवाणे सांगतात.
मी “निसर्गरम्य जुन्नर तालुका” पेज परिवार तर्फे मा. आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करेल की आपण दरेवाडीच्या समस्येवर लवकरच निर्णय घेऊन येथील जणतेच्या समस्या लक्षात घेता त्यांच्या निश्चितच अडचणी दुर कराल. कारण त्यांचा अंधार संपलाय पण समस्या कायम आहेत.
ही दरेवाडी म्हणजे निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असून जुन्नर तालुक्यात पर्यटनासाठी निश्चितच ट्रम्पकार्ड म्हणुन उदयास येईल यात शंकाच नाही. परंतु येथील सुखसुविधांसाठी उच्च पावले उचलली जाणे गरजेचे आहे.
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .