श्री. क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान – नागापूर

श्री. क्षेत्र थापलिंग खंडोबा देवस्थान – नागापूर 

लहानपणी अनवाणी नऊ कि.मी अंतर चालत चालत खोडदवरून या थापलिंग दर्शनासाठी यायचो. पंचक्रोशीतील सर्वच कुटुंबियांच कुलदैवत म्हणजे थापलिंगचा खंडोबा. जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याचे श्रद्धास्थान म्हणुन नावलौकिक असलेल्या या खंडेरायावर जीवापाड प्रेम करणारे येथील भक्तगण जानेवारी महिन्यातील पौर्णिमेस मात्र दरवर्षी कुटूंबानिशी यात्रेत न चुकता भंडार खोबरे उधळण्यासाठी हजर असल्याने या परिसरास कुंभ मेळ्याचेच स्वरूप प्राप्त होते व हा परिसर भंडारा उधळल्याने सोनेरी रूपात दर्शन देऊन जातो. आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावास लौकिक प्राप्त झाला तो या खंडेरायाच्या पाऊल स्पर्शाने व वास्तव्याने. घोड नदिच्या उत्तर किना-यावर वसलेले हे छोटे परंतू शेतीप्रधान परिपूर्ण गाव. या गावच्या दक्षिणेस अगदी अर्ध्या कि.मी अंतरावर एक छोट्याश्या डोंगरावर या खंडेरायांच जागृत देवस्थान अगदी सहज निदर्शनास पडत. पावसाळ्यात तर ही डोंगरांग जेव्हा हिरवाईचा शालू नेसते तेव्हा म्हाळसा जणू खंडेरायास नटून थटून भेटण्यासाठीच आली आहे की काय असा भास होतो.
बैलगाडा शर्यत म्हणजे येथील सर्व भाविकांचा जीव कि प्राण होता. बैलगाड्यांवर आलेली बंदीने येथील यात्रेचे स्वरूपच बदलून गेले. बैल प्राण्यांवर मायेचे हाथ व थाप बळिराजा हमखास आपल्या गाड्याच्या बैलांवर टाकताना दिसत असे. खरेदी विक्री त बैल चांगला व तरबेज असला की बळीराजाला आर्थिक परिस्थिती बदलण्यास मदतगार साबित होत असे. एकच बैल पाळायचा व तोंडातला घास आजोबा त्याला देताना मी पाहीले आहे. अनेकदा त्याची विक्री करताना त्याच्या कुटूंबाच्या डोळ्यात पाणी येताना पण अनुभवल होत. त्याला विकुन मिळालेल्या पैशातून बळीराजाच्या कुटूंबाच्या पोरीच लग्न, ऑपरेशन, शाळा अशा अनेक अडचणी हा जीवापाड जपलेल्या बैल विकुन या मंडळीना सहारा मिळत असे. परंतु आज जेव्हा या बैल घाटावर मी गेलो तेथे फक्त एकच शब्द काणी येत होता भिर्र… झाली……. परंतु प्रत्यक्ष मात्र तो घाट पुन्हा येथे हा परीसर बैलांनी सजेल का या प्रतिक्षेची वाट पहाताना दिसला. येथील यात्रेचा मुख्य कणा म्हणजे येथील बैलगाडा शर्यतच होती व आज मोडल्याने येथील स्वरूप बदलले आहे.
जुन्या बांधनिचे हे मंदिर असून खंडोबा व म्हाळसाच्या गाभार्‍यातील मुर्ती भक्तांना आशिर्वाद देताना दिसतात. जेजुरीच्या खंडेरायाला ज्या भाविकांना जाणे शक्य होत नाही तेव्हा तेच दर्शन येथे घडते. बाहेर उभी असलेली दिपमाळ येथील पौराणिक इतिहासाची आठवण करून देते. यात्रेतील दुकानांसाठी बांधलेले ओटे, भक्त निवास व टोलेजंग मंदिर वेस येथील सुंदरतेत अजूनच भर घालते. नागापूर ग्रामस्थांनी येथील निसर्ग देवतेला फुलवण्यासाठी सोनचाफा आदि वृक्षलागवड गडावर केल्याने अभिमान वाटतो कारण कोणत्याही देवस्थानापाशी आपण जातो तेथे देवराई ही हमखास असायची परंतु ती या वर्षी निर्माण करण्याचे काम हाती घेतल्याचे जानवले.
गडाच्या पुर्वेला जवळच भिमाशंकर सहकारी साखर कारखाना येथील परिसरास गोडी निर्माण करत असून गडाच्या पश्चिमेस पायथ्याशी जागतीक महादुर्बिण विज्ञानात मानवाच्या प्रगतीचे पुरावे दर्शवित आहे. अशा या नयनरम्य वातावरणात एक फेफटका व देवदर्शन घेताना सुखाचा झरा ह्रदयातून वाहू लागतो. यासाठी थोडा वेळ काढा व कुटूंबातील सर्वांना येथील भुमीचे दर्शनासाठी घेऊन जा.
बोला येळकोट येळकोट जय मल्हार.
सदा आनंदाचा येळकोट
लेखक/ छायाचित्र
श्री.खरमाळे रमेश 
(माजी सैनिक खोडद)
वनरक्षक – जुन्नर
उपाध्यक्ष- शिवाजी ट्रेल
मो.नं 8390008370