शिवाजी ट्रेलची दुर्गसंवर्धनाची मराठा सिंडिकेटला किल्ले चावंडवर नवी दिशा.

शिवाजी ट्रेलची  दुर्गसंवर्धनाची मराठा सिंडिकेटला किल्ले चावंडवर नवी दिशा.

उन्हाळा सुरू झाला की दुर्ग संवर्धकांची दुर्गसंवर्धनासाठी चातका प्रमाणे पाहीलेली वाटच होय. रखरखत्या उन्हाळ्यात ४० डिग्री सेल्सिअस तापमानात उरावर चढाई करून किल्ला सर करत छत्रपतींचा लाभलेला वारसा निस्वार्थ जपण्याची धडपड करणारी मंडळी वाहत्या घामाच्या धारांत हातात टिकाव खोरे घेऊन का बर धडपडत असतील याचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे. निव्वळ छत्रपतींच्या नावाने घोषणा देणे म्हणजे आम्हाला छत्रपतींविषयी किती जिव्हाळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. परंतु आम्हाला प्रत्यक्षात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज किती कळाले व त्यांचा वारसा आपण कितपत जपत आहोत व त्याचे अनुकरण स्वतः करत आहोत का? हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर आपले मनच आपल्याला खरे उत्तर देऊन जाते.
कालच मुंबई मधून १२० मराठा सिंडिकेटचे मावळे किल्ले चावंडवर प्रथमतःच दुर्गसंवर्धनासाठी आले होते. त्यांना दुर्गसंवर्धनासाठी “शिवाजी ट्रेलच्या श्री. विनायक खोत, श्री विजय कोल्हे, श्री. हर्षवर्धन कुर्हे व श्री. रमेश खरमाळे यांच्या वतीने किल्ले संवर्धन कसे करावे, ऐतिहासिक वास्तूंना वीजा न पोहचता काय उपाययोजना कराव्यात, पाण्याच्या टाक्यांतील काढलेली माती एका जागी का स्टोर करावी व ती खोदत असताना कोणती काळजी घ्यावी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून संवर्धनास श्री. अर्जुन म्हसे पाटील (उपवनसंरक्षक जुन्नर) यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तसेच जिवनात जैवविविधतेला असलेले महत्व हे मार्गदर्शन त्यांनी केले व संवर्धनास प्रारंभ करण्यात आला.
किल्ले चावंडवर असलेल्या पुष्करणीची स्वच्छता व त्यामधील गाळ काढण्यात आला तर पिण्याच्या पाण्याची वर्षेभर पर्यटकांची सोय व्हावी म्हणून खांब टाक्याकडे जाणारी वाट निर्माण करून टाक्याची स्वच्छता करण्यात आली तसेच गडावर पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक यांना गड परिसरातुन मुक्त करण्यात आले. गेली पाच वर्षे शिवाजी ट्रेल या किल्ले चावंडवर संवर्धन करत असून अनेक विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या संवर्धनातुन उदयास आणत आहे. ही निस्वार्थ सेवा प्रत्येकाच्या हातुन घडावी हाच शिवाजी ट्रेलचा मानस आहे. ऐतिहासिक वारसा पिढ्यानपिढ्या सतत टिकून रहावा व याच माध्यमातून श्री शिवछत्रपती शिवराय व त्यांचे विचार अजरामर व्हावेत हीच सदिच्छा शिवाजी ट्रेल उदराशी ही छोटीशी आशा घेऊन हे संवर्धन कार्य करत आहे. मराठा सिंडिकेट व परिवाराचे या कार्यासाठी विषेश आभार.
Iiजय शिवराय iI
श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल