सातवाहनांची पहिली राजधानी अर्थात जुन्नर तालुका.

सातवाहनांची पहिली राजधानी अर्थात जुन्नर तालुका.

मित्रांनो आपल्या जुन्नर तालुक्याला लाभलेला अलौकिक इतिहास व निसर्ग म्हणावा तितका लौकिकास का आला नाही? हा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो व निश्चितच चेहर्‍यावर त्याचे पडसाद दिसू लागतात. जातियतेच्या वादापोटी जवळपास 90 टक्के खरा इतिहास काय होता व कसा होता हे सत्य कधी समजू शकले नाही. कदाचित जातियताच नसती तर? आज 99 टक्के खरा इतिहास आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध असता. असो
रोज दिवसातुन एकदा तरी तालुक्यात फिरत असताना कुणाच्यातरी तोंडून सातवाहन, नाणेघाट व कोरीव लेणी हा शब्द ऐकावयास मिळत असतो. मग सातवाहन म्हणजे नेमके काय हा प्रश्न समोर उभा राहतो. हे सातवाहन कोण होते. ते आपण प्रचलित दंत कथेतून पाहुया.
कथेत सांगितले जाते की एक नागवंशिय राजा असतो. तो एके दिवशी पैठण मधील नदिकिनारी सांजवेळी फिरत असताना त्याला एक ब्राह्मण विधवा कन्या दृष्टीस पडते व तो तिच्या लावण्यावर फिदा होऊन तिच्यावर जबरदस्ती करतो. त्यातुनच ती विधवा एका बाळाला जन्म देते. पुढे ते बाळ पैठणच्या एका कुंभाराच्या घरी अनाथ म्हणुन आश्रयाला राहते. त्या बालकाला कुंभाराच्या घरी असल्याने मातीचे हत्ती, घोडे ,ऊंट,अश्व,व चतुरंग लष्कर तयार करण्याचा मोठा शौक जडतो. तो चतुर व शरीर यष्ठीने पण तितकाच मजबूत असतो. एकदा पैठणवर उत्तरेच्या सम्राटाचा हल्ला होतो व तेव्हा हे बालक त्या सैनिकांत प्राण ओतून हा झालेला हल्ला यशस्वीपणे परतुन लावतो व फलस्वरूप तो पैठणचा राजा होतो.बलत्कारीत ब्राम्हण विधवेचा पुत्र असल्यामूळे तो ब्राह्मण होता अशी ही कथा सांगितली जाते व हाच तो पहिला सातवाहन राजा होय. ही कथा पुराणात आहे असा दावा स. आ. जोगळेकर यांनी गाथा सप्तशतीचे समिक्षण केलेल्या ग्रंथात केला आहे.
नाणेघाट लेणीच्या शिलालेखात “एका ब्राम्हणास ” असा उल्लेख आला आहे. त्यांनी खुप यज्ञ केले व ब्राम्हणांना धन,गायी दानातुन विपुल प्रमाणात दिले. असा अर्थ डाॅ.वि.वा मिराशी सांगतात. तेव्हा पासून सातवाहन ब्राम्हण असल्याचे बोलले जाते.
मौर्यानंतर इ.स.पुर्व.184 नंतर ते इ.स 250 पर्यंत नर्मदेच्या खालचा संपूर्ण प्रदेश सातवाहनांनी समृद्ध व भरभराटीला आणला होता. देशविदेशात व्यापार समृध्द केला तो याच सातवाहनांनी. म्हणूनच सातवाहनांची नाणी क्विंटलच्या प्रमाणात मिळतात.
जेव्हा मौर्यांचे प्रांताधिकारी होते तेव्हा पासूनच सातवाहन जुन्नरला राहत होते. मौर्यानंतर त्यांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. महाराष्ट्रात 30 सातवाहन राजे होऊन गेले. व यांनीच जवळपास सर्वच लेण्या कोरल्या आहेत. सादवाह, सातवाहन व सप्तकर्णी ही त्यांचीच नावे होय. त्यांची दानपत्रे,नाणी,ग्रंथ व शिलालेख त्यांनी ब्राम्ही , पाली प्राकृत लिपीत लिहिले आहे.
सातवाहन काळ अन्न, वस्र, निवारा, धार्मिक संकल्पना, साहित्य, देश-विदेश व्यापार व लोकजीवनाच्या दृष्टीने खुपच महत्वपूर्ण आहे.
भुतलेणी (खोरेवस्ती) प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन स्तुपाच्या मधोमध दोन व्यक्ती कोरलेल्या आपणास दिसून येतात. त्यातील एक व्यक्ती गरूड वंशीय तर एक नागवंशिय आहे. गरूडाचे आणि नागाचे वैरभाव किती प्रसिद्ध आहे हे आपणास ठाऊक आहे. परंतु या काळात हे दोन्ही वैरभाव असलेल्या व्यक्ती एकमेकांना किती आदराने जवळ होत्या की तेव्हा वैरत्वाला विसर पाडणारे तत्वज्ञान शिकविले जात होते असा सांस्कृतिक वारसा जपुन ठेवणार जुन्नर हे ऐतिहासिक शहर होत.
आंध्रप्रदेश येथील अमरावती स्तुप व मध्यप्रदेश सतना जिल्यातील भरहूत स्तुप येथे महामाया सिद्धार्थ गौतमाची आईचे ही स्तुपरूपात स्वप्नशिल्पे कोरलेली आहेत. आणि याच शिल्पांना सातवाहनांनी आपली मातृदेवता मानली आहे. खामगाव, निरगुडे मारूती मंदिर, किल्ले निमगीरी, किल्ले जिवधन व नाणेघाट जवळ या पाच ठिकाणी आपणास ही शिल्पे पहावयास मिळतात. लोक या शिल्पाला लक्ष्मी, गजलक्ष्मी व गजान्तलक्ष्मी नावाने संबोधतात. परंतु भरहूत स्तुपावर इ.स.पू 275 मध्ये ब्राम्ही लिपीत “महामाया देवी” असे कोरलेले नाव मिळाले आहे.
जुन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणी केलेल्या उत्खननात वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या वापरातील वस्तू मिळाल्याचे पण वाचनात आले आहे. व त्यावेळी त्यांच्या वापरात पाटा आणि जात सुध्दा होत. परंतु आज आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने त्यांचे महत्व शुन्य झाले व ते लुप्त झाले. सातवाहन काळात सर्व धान्य रात्री भिजत घालायचे व सकाळी वरवंटा पाट्यावर घसरा देऊन बारीक करुन त्याचा गोळा करून त्याला थोडे दाबुन मातीच्या तव्यावर भाजत असत. याचा वापर प्रत्येक घरामध्ये केला जात असे. या पाट्यावर तीन पवित्र चिन्ह कोरली जायची. एक त्रिरत्न,एक सुटले स्वस्तिक व एक उलटे स्वस्तिक.
आपणास या गरजेतून शक्ती मिळते, आपण जीवंत राहतो व आपले पोषण होते त्यामुळे अन्न हे पवित्र आहे असे ते मानत.
मला आठवतय की अगदी अलिकडच्या काळातील शेतकरी बैलाला जुंपत असलेल्या लोखंडी नांगराचे नाव पण स्वस्तिक होते व त्यावर पण स्वस्तिक चिन्हच असे. जेव्हा आडवा दांडा घालुन दोन महीला दगडी जात्यावर दळु लागल्या तेव्हा भाकरीचा खर्या अर्थाने जन्म झाला. व नंतर एकहाती जाते निर्माण झाले. असो
समुद्र मार्गाने जहाजाने बंदरावर येणारा व्यापारी माल आणण्यासाठी सातवाहनांनी नाणेघाट कोरला. नालासोपारा बंदरातील माल जुन्नरला आणण्यासाठी हा नाणेघाट मार्ग अतिशय उपयुक्त होता.त्यामुळे जुन्नर नाणेघाट – कल्याण हा प्राचीन व्यापारी मार्ग प्रसिद्ध होता.ही घाटापर्यंतची वाहतुक बैलगाडीने बजारा ,जिप्सी आणि अरबी लोक करत असत.देश – विदेशातील व्यापार भरभराटीला आला होता. जेव्हा व्यापारी बैलगाडीचे तांडव जेव्हा घेऊन येत असत तेव्हा जकात आकारली जायची.लेण्यांच्या देखरेखीसाठी, दिवाबत्तीसाठी आणि तेथील भिक्षुखांसाठी ही जकात खर्च केली जात असे. विशेष म्हणजे ही जकात कोणत्याही कर्मचारी बगैर गोळा न करता ती रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी रांजणात प्रत्येक व्यापारी स्वतः टाकत असे. येथे आपणास शुध्द प्रामाणिक तत्व आणि तेही व्यापारी दृष्टीने पहावयास मिळते. स्वतःच्या राजपरिवारांची ओळख व्हावी म्हणून सातवाहनांनी या मार्गावरील चढण संपत आलेल्याठिकाणी दोन लेण्या व त्यामध्ये आठ प्रतीमा कोरल्या. प्रत्येक प्रतिमेच्या डोक्यावर त्यांची ब्राम्ही लिपीत नावे कोरली. या व्यतिरिक्त उत्तर, पूर्व व दक्षिण या आतिल भिंतीवर सातवाहनांच्या कार्याचा उल्लेख केलेले शिलालेख कोरले. या सात प्रतिमा
1)राजा सिमुक सातवाहन(राणी नागनिकेचा सासरा आहे)
2) राणी नागनिका
3) राजा सिरी सातवाहन
4) कुमार भाय(लहान)
5) येथील नाव वाचता येत नाही परंतु ते नाव वेदश्रीचे असावे असे अभ्यासकांचे मत आहे.
6) कोल्हापूरचे राजे महारथी त्रणकवीर (राणी नागणिकाचे पीता)
7) कुमार हकिसिरी
8) कुमार सातवाहन.
सासरे, स्वतः राणी,पती,मोठा मुलगा,पिता व लहान पुत्र असा परिवार येथे ह्या लेण्यांची नायिका राणी नागणिकेने साकारलेला आहे. याचा अर्थ येथे एकत्र कुटुंब पद्धती असल्याचे लक्षात येते.व ही मातृसत्ताक परंपरा ही नागवंशीय परंपरा आहे.
इतिहासातील सर्वात प्रथम राणी म्हणजेच राणी नागनिकाच होय व तीचे ऐतिहासिकत्व सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राची मातृसत्ताक परंपरा सातवाहनांनी कायम ठेवली होती व तीच्या पुत्रांची ओळख देखील आईच्याच नावाने होते हे विसरून कसे चालेल. ही लेणी मातृदेवी राणी नागणिकेच्या गौरवासाठीच कोरली असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
येथील लेणी व शिलालेख पहाता जुन्नर तालुका हा सातवाहनांची प्रथम राजधानी का होती हे आपण वाचलेल्या लेखातून नक्कीच समजले असेलच. कदाचित या लेखापासून अनेक विरोधाभास तयार होतील ते आपण कमेंट्स द्वारे कळविण्यास विसरू नका. की ज्यामुळे मला वाचकांपासून पण शिकण्याचा आनंद घेता येईल. हा लेख लिहिताना मला लेखक. महेंद्र शेगावकर यांची खुप मदत झाली मी त्यांचा खुप खुप ऋणी आहे.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका

nanaeghat nanaeghat5 nanaeghat4 nanaeghat6 nanaeghat7 nanaeghat8