नरसिंह देवस्थान रांजणी (आंबेगाव)

नरसिंह देवस्थान रांजणी (आंबेगाव)

पुणे जिल्ह्य़ात एकमेव असलेले आंबेगाव तालुक्यातील नरसिंह मंदिर हे असून येथे पुण्याहून नाशिक महामार्गावर मंचर येथून रांजणी येथे जाण्यासाठी फाटा आहे. साधारण मंचर येथुन चांडोली, थोरांदळे, कारफाटा व रांजणी असे 14 किमी अंतर कापत रांजणी या गाव पोहचावे. हे गाव आंबेगाव तालुक्यातील पुर्व पट्यात असल्याने सपाट भू-भागाने व्याप्त असल्याने येथे जाण्यासाठी चांगले रस्ते असून हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे. या गावाला व मंदिराला मिना नदिचा किनारा लाभल्याने येथील शेतकरी प्रगतशील असून विविध प्रकारचा शेतीव्यवसाय येथे पहावयास मिळतो. गावातील ग्रामस्थांच्या ऐक्याने येथील परिसराला नवलाईचा शालू नेसवलेला आपल्या दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही. अशा या नैसर्गिक वातावरणात गावच्या पश्चिमेस प्रचंड सुंदरतेने नटलेले व भक्त प्रल्हादाच्या भक्तीने मोहून टाकण्या-या व आपल्या वेगळ्याच रूपात प्रकट होऊन भक्ताच्या मदतीला धावून आलेल्या भगवान नरसिंहाचे सुंदर मंदिराचे व देवाचे दर्शन घडते. गावक-यांनी जुनं ते सोन या म्हणीला येथे प्रत्यक्षात साकार करत या मंदिराला आहे त्या स्थितीत संवर्धित करून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. म्हणूनच आपणास सभा मंडपातील असलेले लाकडी नक्षीकाम कारागिराने किती चातुर्याने केले होते तो पुरावा पहावयास मिळतो. बाह्य मंदिराला केलेल्या रंगरंगोटी व लेपामुळे या मंदिराची पौराणिकता लुप्त झाली आहे.साधारण सतराव्या शतकात नाना फडणविसांनी हेमाडपंती बांधणीच्या पद्धतीचा अवलंब करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला व नदीच्या घाटाचीही बांधणी केली, असे सांगितले जाते. या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश निषेध असल्याने गाभाऱ्यात केलेल्या दगडी शिल्पांचे वर्णन आपणास सांगू शकलो नाही या बद्दल खेद व्यक्त करतो. परंतु गाभार्‍याच्या प्रेवशव्दारावर जिर्ण झालेले गणपती शिल्प या मंदिराचा पुरातण इतिहास जागवताना दिसतो. ग्रामस्थ हे मंदिर पेशवे कालखंडाच्या आधीचे मंदिर असा उल्लेख करतात. याच मंदिरात भगवान मारूतीचे मंदिर असून कातळकोरीव मारूती मुर्ती सेंदुराने रंगवलेली असल्याने कोणत्या कालखंडात निर्माण केली गेली असावी हा तर्क करता येत नाही.

रांजणी येथे नरसिंह मंदिर निर्माण झाले तो इतिहास

रांजणी येथील रहिवासी लखोजी हे नरसिंह भक्तीत नियमित तल्लीन असत.भगवान भक्ती ने त्यांची तहान भूक हरपल्याने ते पायी चालत चालत नेहमी सोलापूर येथील टेंभुर्णी फाट्यावरून आत नीरा नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिरात देवसेवा घडावी, देवाचे दर्शन व्हावे व हा मानव जन्म सार्थ व्हावा हीच त्यांची विचारधारा होती. त्यांच्या भक्तीकडे पाहून गावकरी त्यांना आवडिने महाराज म्हणत.
परंतु आता लखोजीचे पाय थकले होते. लखोजी नियमित चिंता सतावू लागली की यापुढे ही वारी आपणास वृद्धापकाळामुळे करता येणार नाही. माझे देवदर्शन होणार नाही. भगवंत माझ्यावर रागवणार तर नाही ना? अशा अनेक शंका कुशंकांनी त्यांच्या डोक्यात थैमान घातले होते. काय करू ? कसे दर्शन घडणार माझ्या भगवंताचे? या विचाराने महाराज हवालदिल होऊन झोपी जात. आता तर त्यांचे डोळे खोल गेल्याचे स्पष्ट जानवत होते. खुपच थकलेले व अशक्त झालेले दिसत होते. आजही ते भगवंत दर्शनाचाच विचार कथा-कीर्तनात करत होते.कशातच त्यांचे मन रमत नव्हते. परंतु चेहर्‍यावर असलेले तेज आज जास्तच झळकत होते. त्यांना झोपेतही नृसिंहाचाच ध्यास लागला होता. त्यांचे दोन्ही डोळे बंद झाले होते. त्यांच्या निरोगी शरीरातून फक्त आणि फक्त श्वासाची होत असलेली हालचालच जानवत होती. ते अचानक दचकले मध्यरात्रीचा तो प्रसंग असावा बहूतेक तेव्हा लखलखाट झाला त्यांचे शरिर तेजोमय झाले व त्यांच्या आत्म्यास नरसिंहाने दृष्टांत दिला. भगवंत त्यांच्या आत्म्याशी बोलू लागले “तू आता नरसिंहपूरला येऊ नकोस. मी तुझी या त्रासातून सूटका करणार आहे. मी तुझ्या भक्तीवर एवढा प्रसन्न झालो आहे की मी तुझ्या सहवासात रांजणी गावी येत आहे.असे अभिवचन दिले.झोपलेल्या लखोजींच्या चेहर्‍यावर प्रसन्नता साफ झळकत होती.
आज लवकरच लखोजी उठले.नरसिंह भगवंताची पुजा अर्चना करत रांजणी गावची वाट धरली. शरिरात असलेला थकवा दूर पळाला होता. लखोजी १८ वर्षेच्या तरूणासारखे आनंदाने झपझप चालू लागले होते. त्यांना आज स्वतः वृध्द आहे हे पण आठवत नव्हते. रस्त्यात भेटणारी माणसे लखोजींकडे पाहून जगातील आश्चर्यकडे पहावे अगदी तसेच पहात होते. लखोजींचे लक्ष फक्त रात्री भगवंताने दिलेल्या दृष्टांताकडेच होते.चालून चालून आता रात्र झाली होती. लखोजींना कोठेही नाही थांबता रांजणी गावी पोहचायचे होते. संपूर्ण रात्र त्यांनी चालून पायाखाली घातली परंतु स्वारीला आपण दिवसा चाललोय कि रात्री काहीच माहित नव्हते. जेवण,पाणी सर्व काही विसरून गेले होते. आता सकाळचे तिन वाजले असावेत लखोजींनी रांजणी गाव हद्दीत प्रवेश केला होता. चार वाजता ते गावात पोहचले. गावच्या उत्तरेला असलेल्या मीना नदी पात्रात ते स्नानासाठी पायर्‍या उतरू लागले. गावातील इतर मंडळी तेथे स्नान करत होती. त्यांना बाजूला करत लखोजी उद्गरले बाजूला व्हा माझे भगवंत तेथे स्नान करत आहेत. काही क्षण गावकरी चिंताजनक नजरेने लखोजींकडे पाहू लागले. ते बाजूला झाले. लखोजींनी प्रथम स्नान केले. जवळच असलेल्या दोन गावकर्यांना जवळ बोलावले. शेजारीच पाण्यात गवताच्या अर्धवट जळत्या पेंढ्या पडल्या होत्या त्या बाजूला केल्या तर सर्वजण आश्चर्य चकित झाले. सर्वजण डोळे फाडून पाहू लागले की त्या ठिकाणी नृसिंहाची मूर्ती होती. लखोजींना दिलेला दृष्टांत खरा ठरला होता. त्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, व लखोजी रोज नित्य नियमाने त्या मुर्तीची पुजा शरिरात प्राण असे पर्यंत करत राहिले. अशी अख्यायिका सांगितली जाते. मी जवळच खोडदगावचा रहिवासी असल्याने व माझी 12 वी शिक्षण येथेच नृसिंह विद्यालय व वाणिज्य काॅलेज रांजणी झाल्याने व घरचा दुग्ध व्यवसाय असल्याने नियमित नरसिंहाचे दर्शन येथे घडत होते.

नरसिंहाची सुंदर बोलकी मूर्ती

उभ्या असलेल्या सिंहाच्या रूपातील ही मूर्ती अतिशय रेखीव असून पुढचे दोन पाय भू मातेवर टेकवून जणू भक्तांना आशिर्वादच देत आहेत व सांगत आहेत की मी तुमचा पाठीराखा आहे. मी सदैव भक्ताच्या संकटी धावून येण्यासाठी तयारच आहे. दगडी आयाळ शक्ती , लांब टोकदार दात शत्रुंचा काळ व लोंबणारी जीभ भक्तांना आशिर्वादच देत आहे असे वाटते. डोळे व नाकावर सोन्याचा पत्रा असल्याने चेहर्‍यावर चमक दिसते , तर भुवयांना मढवलेला चांदीचा पत्रा भक्तांसाठी प्रेमभाव दर्शवित आहे. मूर्तीच्या मागील बाजूला असलेल्या महिरपीवर सुंदर कोरीवकाम केलेले दिसते. त्यावर डाव्या बाजूस मोराची सुंदर प्रतिकृती असून, मध्यभागी नागाची व सिंहाच्या चेहऱ्याची शत्रुंचा नायनाट करण्यासाठी साकारलेली कोरीव प्रतिमा दिसते.

नरसिंह मंदिराची रचना

मुख्य सभागृहात लाकडी खांब असून, एक मंजिल लाकडाचा वापर करून बांधलेला आहे. तेथेच नगारावादन केले जाते. मंदिरातच उजव्या बाजूस मारुतीची मूर्ती बसवलेली दिसते. मंदिराच्या पुढे मोठा सभामंडप असून, डाव्या बाजूला शंकराचे मंदिर आहे. अंगणात तुळशी वृंदावन आहे. मंदिरासभोवतीचा परिसर व समोरच घाटा शेजारी उभे असलेले चिंचेचे झाड आपल्या १५०  ते २०० वर्षे वृध्दत्वाची आठवण करत उन्हाळ्यात यात्रेकरूना थंडावा देत आहे. मीना माईच्या कृपाशिर्वादाने बाजूच्या परिसरात थंडावा निर्माण करत तो हिरव्यागार वनश्रीने नटलेला आहे.
मंदिराची व्यवस्था, पूजा-अर्चा, अभिषेक इत्यादी कामे मंदिर ट्रस्ट व बह्मणवृंद करतात. नरसिंह जयंतीच्या वेळी (नरसिंहाचे नवरात्र) येथे मोठा उत्सव असतो. कथा-कीर्तन, वाचन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अभिषेक व दर्शनासाठी येथे भाविकांची गर्दी असते.
आज पर्यंत येथील एक आश्चर्य म्हणजे नरसिंह जयंतीला वरूणराजा गडगडाट करतच येथे बरसतो, पवनराजा वेगाने धावू लागतो, मोठ मोठाले वृक्ष आनंदाने हवेत डोलू लागतात व अशा या वातावरणातच नरसिंहाचा हजारो भक्तांच्या साक्षिणे जन्म होतो. हजारो फुले पाकळ्या उधळल्या जातात. वातावरण या पाकळ्यांच्या फुलांच्या सुगंधाने सुगंधित होऊन जाते.
दि. ०९ मे २०१७रोजी  नरसिंह जयंती. आपण या नरसिंह अवतार जन्मासाठी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवाल हिच सदिच्छा.
रांजणी गावी माझे १२ वीचे शिक्षण झाले व मला येथे खुप काही ज्ञान प्राप्त झाले व या गावचा इतिहास जागवण्याचे श्रेय प्राप्त झाले ते नरसिंह विद्यालय व वाणिज्य काॅलेज रांजणी येथील मला शिक्षण दिलेल्या शिक्षकांच्या परिश्रमाने. भरभरून प्रेम दिले ते राजणींकर ग्रामवासियांनी त्यामुळे मी हा संपूर्ण लेख या माझ्या गुरूजनांना व प्रियजण रांजणिकरांना अर्पण करतो. लेखात काही त्रुटी असल्यास ती माझी वैयक्तीक चुक असेल व त्याबद्दल आपण क्षमा कराल ही सदिच्छा व्यक्त करतो.

लेखक / छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश गणपत
(माजी सैनिक खोडद)
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका ” फेसबुक पेज
मो. नं 8390008370