सोनतीर्थ अर्थात कुकडी नदी उगमस्थान.

सोनतीर्थ अर्थात कुकडी नदी उगमस्थान.
(व्हिडीओच्या माध्यमातून हे दृष्य पहायचे असल्यास खालील लिंकवर क्लिक करा व आनंद घ्या.
https://www.youtube.com/channel/UCIYgK500Nl9uqNClaDckmUg)
अनेकदा आपण जुन्नर तालुक्यातील हेमाडपंती मंदिर #कुकडेश्वरास भेट दिलीच असेल. हे #कुकडेश्वर मंदिर कुकडी नदीच्या दक्षिण
किना-यावर सुंदर अशा आखिव व रेखिव दगडीशिल्पांच्या तोडीत बांधलेले आपणास पहावयास मिळते. विशेष म्हणजे नाशिकच्या त्रंबकेश्वरामंदिरापासून ते खेडच्या भिमाशंकर मंदिरापर्यंत पसरलेल्या अतिशय दुर्गम डोंगराळ भागातील बालाघाट रांगेत जवळपास अशी बारा महाराष्ट्रातील जोतीर्लिंगाची रचना नदी किनारी केलेली पहावयास मिळते. त्याच पैकी असलेले येथील कुकडी नदीच्या काठावरील कुकडेश्वर मंदिर आहे.
#जुन्नर -आपटाळे – चावंड – कुकडेश्वर असा येथे जवळपास 17 कि.मी प्रवास करून पोहचता येते. हे मंदिर भु- लगत असल्याने येथपर्यंत चारचाकी प्रवास करणे सहज शक्य आहे. हा परीसर चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला असल्याने येथील सुंदरतेचे वर्णन कोणत्या शब्दात व्यक्त करावे हेच कळत नाही.
याच मंदिराच्या पश्चिमेस एक दक्षिणोत्तर पसरलेली एक डोंगर रांग निदर्शनास पडते. याच डोंगराच्या मध्यभागी आपणास कुकडी नदिचे उगमस्थान असून येथे पोहचण्यासाठी पुर – शिरोलीमध्ये गाडी पार्क करून चढण्याचा सोपा मार्ग मिळतो. पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे कारण खुप दमछाक करणारी येथील जंगलवाट आहे. साधारण तासा भरात आपण येथे पोहचतो. जाताना निसर्गाच्या विविधतेचे दर्शन घडतेच. सध्या करवंदाच्या जाळ्या भरगोस फळांनी लगडलेल्या असून करवंदाच्या फुलांचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळलेला असल्याने आपणास चालताना तो गंध जाणवतो. विविध वृक्ष व वेलींणी हा परीसर व्याप्त असल्याने विविध पक्षी व प्राणी यांचा हा स्वर्गच आहे की काय असा भास होतो.
कातळकड्यात उंचीवर कोरलेली येथे लेणी असून यामध्ये बसण्यासाठी ओटे कोरलेले आहेत.दोन लहान मोठे शिवलिंग असून पश्चिम भिंतीवर कातळातच एक मुर्ती कोरलेली आहे. साधारण पाच बाय अडीच फुट लांबी व रूंदिची एक टाकी कोरलेली असून तीची खोली साधारण पाच फुट असावी. याच टाकीच्या पश्चिम व दक्षिण किना-यात डोंगरातुन पाण्याची सतत वाहत असलेली नैसर्गिक धार टाकीत पडते व ती पुढे खाली दरीत जाते. याच ठिकाणास सोनतीर्थ संबोधतात. ही सतत वाहणाऱ्या पाण्याची धार वर्षभर वाहत असल्याने कुकडी नदिचे उगमस्थान दर्शवित आहे. येथील दर्शन घेतल्यानंतर निसर्ग लावण्याचा अनुभव घेण्यासाठी आपणास खाली न उतरता आलेली वाट डोंगर माथ्यावर घेऊन जाते. आपल्याला थकवा जाणवत नसेल तर निश्चितच डोंगर माथ्यावरून ढाकोबा, किल्ले जिवधन, किल्ले चावंड, व-हाडी डोंगररांग, शंभू डोंगर, कुकडेश्वर मंदिर परीसर, माणिकडोह धरण, उच्छिलचा तलाव अशी अनेक निसर्गाने नटलेली दृश्य पहावयास मिळतात. परंतु यासाठी वेळ मात्र जास्त लागतो.
याठिकाणच्या सुंदर सोनतीर्थास कधी भेट द्यावयाची झालीच तर नक्कीच वरील माहिती आपणास उपयुक्त ठरेल अशी सदिच्छा व्यक्त करतो.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री.  रमेश गणपत खरमाळे
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
माजी सैनिक संघ जुन्नर.