खुटादरा एक थरारक ट्रेक

 खुटादरा एक थरारक ट्रेक

2013 पासून जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्यात भटकंती करण्याचा अनेक वेळा योग जुळून आला. त्यात हरिश्चंद्र गड ते भिमाशंकर दरम्यान पसरलेल्या अथांग सह्याद्री दर्शनाने तर मला कधी प्रेमात पाडले समजलेच नाही. एकदा का भटक्यांना या सह्याद्रीत फिरण्याची चटक लागली की बस त्याला दुसरे काहीच दिसत नाही. टोलार खिंड, जुन्नर दरवाजा, इतिहास कालिन माळशेज घाट श्री छत्रपती शिवाजी महाराज #पावणखिंड#भोरदार्या#भोरांड्याची_नाळ#नाणेघाट#दार्याघाट#खुटादरा#डोणीदरा अशा विविध कोकणकड्याच्या पायवाटा तुडवत कोकणदर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्ष सह्याद्रीने घातलेल्या सादेस प्रतिसाद देताना होणारा आनंद गगणात मावेनासा होतो. प्रत्येक वाटेची एक वेगळीच कथा, विशेषता व सुंदरता. त्याच पैकी असलेला हा खुटादरा.
खुटादरा हे नाव ऐकण्यात तसे विचित्रच वाटते नाही का? परंतु जेव्हा आपण या वाटेने प्रवास करतो तेव्हा समजते की हे नाव दिले गेले ते काही चुकीचे नव्हते. या वाटेचा उतार एका नाळीतुन नसुन अतिशय थरारक उतरणीतुन करावा लागतो. व उतरताना मागे वळून पाहिले की आपण ते दृष्य पाहून थक्क होतो. अगदीच नव्वद डिग्री उंचावरून आपण खाली उतरतानाचे ते दृष्य दृष्टीस पडते व ते दृष्य एका खुंट्यासारखेच दिसते.
स्थानिक येथील कथा अतिशय थरारक सांगतात व ऐकणारा या ठिकाणी यावे की नाही असा विचार करतो. कारण हा संपूर्ण परिसर पाहीला तर तो निर्मनुष्य आहे, त्यामुळे मुंबई मधील कुख्यात गुन्हेगार पुर्वी याच भागात आपला तळ ठोकून असत.कारण येथे अथांग पसरलेल्या जंगलातून हीच एक “खुटादरा” वाट जुन्नर तालुक्यातील दुर्गादेवी व ढाकोबा परिसराला ठाणे जिल्ह्यातून जोडते. परंतु आज हे चित्र मात्र संपूर्ण बदललेल दिसते.
याच वाटेने उतरताना आपणास ठाणे जिल्ह्यातील आदिवासी रामपूर हे गाव लागते. व येथुन पुढे आपणास जीभ ने प्रवास करून धसई व सरळगाव असा प्रवास करता येतो. परंतु ही वाट उतरताना विशेष काळजी घेणे खुपच गरजेचे आहे. कारण आपली छोटीशी झालेली चुक मृत्यूच्या दारीत घेऊन जाऊ शकते.
शक्यतो या वाटेचा उपयोग करताना सोबत स्थानिक गाईड घेऊन जाणे गरजेचे आहे. कारण जंगलात पुढे अनेक आडवळणी वाटांना आपणास तोंड देत रामपुरला पोहचावे लागते. शक्यतो ही वाट स्थानिक कुणाला सांगत नाहीत परंतु आपण एक नियमित ट्रेकर असाल व आपणास एक लांब ट्रेक करायचा असेल तर खालील GPS रिडिंग च्या अधारे वाटेची सुरूवात भेटू शकते.
N19 13 31.2 E73 38 53.7
N19 13 30.2 E73 38 51.4
वरील वाटेची सुरूवात ही दुर्गादेवी मंदिराच्या उत्तरेकडे कोकणकड्याने साधारण एक कि.मी अंतरावर चालत गेलात की मिळते. परंतु एक लक्षात असू द्या की आपणास मध्यंतरी पिण्याच्या पाण्याची व जेवणाची कोठेही सोय होत नाही त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी स्वतः घेऊनच जावे. शक्य असल्यास गाईड म्हणून गुराखी हेमा पारधी (दुर्गवाडी) यांची आपणास मदत होऊ शकते.
आमचा युट्यूब चायनल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/3usx1G
व युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.

लेख/छायाचित्र श्री. खरमाळे रमेश गणपत
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनविभाग जुन्नर
“शिवाजी ट्रेल”
मा.सैनिक संघ जुन्नर.