जुन्नर ते जालना प्रवासातील सुखद अनुभव.
आज जुन्नर येथुन प्रथमतःच जालना येथे वनरक्षक प्रशिक्षण विद्यालयामध्ये सहा महिन्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाण्याचा योग आला. जुन्नर मधील सह्याद्रीच्या सोबतीत घालवलेले चार वर्षांचे भटकंतीचे चक्र डोळ्यासमोर फिरू लागले. या सह्याद्री मित्रापासुन मी सहा महिने दुरावलो जाणार होतो याच्या विरहाचा भास क्षणोक्षणी मला आठवण करून देणार हे ही तितकेच खरे होते. परंतु ज्या मातेच्या पोटी रयतेच्या राजाने किल्ले शिवनेरीवर जन्म घेतला त्या छ्त्रपती शिवरायांच्या मातोश्री माता जिजाऊंच्या गावी त्या मातीचा सुगंध घेण्यासाठी, त्या मातीचा टिळा कपाळी लावण्यासाठी व त्या धरणीमातेला दंडवत करण्यासाठी मला तेथे जाता येईल म्हणून खुप आनंदी झालो होतो.
सकाळची ती सव्वा सातची वेळ जुन्नर एस टी स्टॅन्डवर उभ्या असलेल्या जुन्नर -औरंगाबाद एस.टी मध्ये मुलगा,मुलगी व पत्नीचा निरोप घेऊन जड अंतःकरणाने बसलो. ड्रायव्हरने आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जी नोकरी स्वीकारली होती ती निभावन्यासाठी एस.टी चा स्टाटर मारला. गियर बदलत एस.टी पुर्वेकडे तोंड करून खडखड आवाज करत धावू लागली. मी सह्याद्रीच्या उत्तर रांगाचे लांबून निरखुन रूप पाहू लागलो. माझ्या मनातील उठलेल वादळ त्या सह्याद्री मित्राने कदाचीत हेरले असल्याचा भास मला जाणवला. तो ओरडून सांगत होता तु माझ्यापासून दुरावला जात नाहीस. तु जेथे चालला आहेस. ते ठिकाण म्हणजे माझ्या कुशीत लपलेला खजिना तुला शोधून देण्यारा एक जीन तुला तेथे भेटणार आहे. की ज्याचा फायदा तुझ्या व माझ्या मैत्रीत एक महत्त्वाची भर घालणार आहे. मी पहात होतो तो सह्याद्री मित्र अगदी डोळ्यांसमोर ओझल होईपर्यंत एकाच जागेवर न हालता उभा होता. कदाचित त्यालाही माझा विरह सहन होणार नव्हता कि काय न कळे.
अनेक झाडेझुडपे मी विरूद्ध दिशेने पळताना बाहेर एकटक पाहत होतो. निसर्गाच्या बदलाची प्रचीती काही कि.मी अंतर एस.टी ने कापल्यानंतर येत होती. अनेक घरे, गावे व शहरे मागे टाकत एस.टी वेगाने धावत होती. विचारांच्या विळख्यात मी धुंद झाल्याने सोबत बसलेल्या वनरक्षक गायकवाड यांनी माझे लक्ष आणे घाटतील नैसर्गिक पुलाकडे आकर्षित केले होते. अनेक वेळा मी या पुलाच्या अंगाखांद्यावर खेळलो होतो. त्याच्या सुंदर रूपाची अनेक छायाचित्रे टिपून ती दुनिये समोर “निसर्ग रम्य जुन्नर तालुका ” या फेसबुक पेजच्या माध्यमातून मांडलेली आहेत. त्याचे आजचे खुललेल सौंदर्य तर लाजवाबच होते. तो मला भेटीसाठी खुनावत होता परंतु एस.टी महामंडळाच्या या फिरत्या प्रवासी कैद खाण्यात मी बंद असल्याने भेटीस जाऊ शकत नव्हतो. परंतु त्याचे पावसाळ्यात सजलेले व हिरवाईने नटलेल रूप पाहून मी प्रसन्न झालो. गणेशाच्या आगमनाची तयारी गावोगावी शेड उभारून करताना दिसत होती. रानामध्ये बैलपोळा सणा निमित्ताने विविध रंगाने सजवलेली जनावरे चरतानाचे दृश्य पाहून आज नवीन प्राणी या भुतलावर अवतरलेत की काय असा भास होत होता.
हे चित्र अहमदनगरच्या हद्दीत तर अजुनच विलोभनीय दर्शन देत होत. आता भाळवणी पाठीमागे सोडत पत्नीने प्रेमाणे बनवून दिलेला पोह्यांचा नाष्टा प्रवासातच सुरू केला होता. एस.टी च्या खिडकीतून बाहेरील दृश्य न्याहाळत एक एक घास घेऊन पाहत होतो.
नगर एस.टी स्टॅन्ड मधुन औरंगाबादच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. वातावरणातील झालेला बदल जाणवत होता. ठिकठिकाणी आदल्या दिवशी पडलेल्या पावसाने लावलेल्या हजेरीचे चित्र दिसत होते. दुरून कानावर ढोल ताश्यांचे आवाज कानी येत होते व पुढे पुढे जाताच ते विरून जात होते. धरती मातेच्या विविध सुंदर अंगाचे सजवलेले मावननिर्मित शेतीरूपातिल रूप तेथील निसर्गाशी स्वतःच स्पर्धा करताना दिसून येत होते.
अशा या दर्शनाचा लुप्त घेतच औरंगाबाद केव्हा जवळ आले समजलेच नाही. येथे एस.टी बदली करत जालनाला जाणार्या एस.टी ने प्रवास करायचा होता परंतु ती सिडको बसस्थानकात मिळणार होती. तेथपर्यंतचा प्रवास ऑटोने केला. आता एकतासाचा जालनाचा प्रवास शिल्लक होता. ऑटोतुन उतरताच जालना एस.टीच्या डाव्या कोपर्यावर लावलेला बोर्ड दृष्टीस पडला व लागलीच एस.टी मध्ये बसलो. थोड्याच वेळात बस जालनाच्या दिशेने धाऊ लागली. पोटात कावळे ओरडत असल्याचे आता प्रकर्षाने जाणवू लागले होते. पत्नीने बांधून दिलेली न्याहरीच शिदोरी सोडून ती व मित्र खाऊ लागलो. घरच्या भेंडीची चव पुन्हा चार महीन्याने चाखायला मिळणार नव्हती म्हणून हळुहळु चाऊन खाऊ लागलो.
जेवण उरकताच पाण्याचे घोट घेतले व मिलेट्री जीवन प्रवासाची चित्रफीत डोळ्यांसमोर नाचू लागली. जीवनसंगीनीने माझ्या विरहात किती दुखःद यातना सहन केल्या असतील याची हल्की परंतु ह्रदय स्पर्श झुळुक मनाला संवेदना देऊन गेली. डोळ्यांच्या कडा मुलांच्या आठवणीने कधी ओल्या झाल्या तेच समजले नाही. पुन्हा विचारचक्र सुरू झाले. यालाच जीवन म्हणतात का? हा प्रश्न
स्वतःनेच स्वतःला केला. ह्रदयाच्या एका छोट्याश्या कोपर्यातुन आवाज आला हो, हेच ते जीवन. समोरून येणाऱ्या बैलांच्या मिरवणूकीने पुन्हा विचारभंग केला. येथील वातावरणाशी सोयरीक करणेच योग्य आहे हाच ठाम विश्वास झाला. एस.टी कर्रररर आवाज करत व झटका देत जाग्यावर उभी राहिली. कन्डाक्टरने आवाज दिला. जालना वाले येथे उतरून घ्या. एक एक करत सर्व प्रवासी एस.टी स्टॅन्डवर उतरलो.मनगटावरील घड्याळ संध्याकाळचे चार वाजल्याचे संकेत देत होते.
स्टॅन्ड मधुन बाहेर पडलो. चहाची तलफ भागावी म्हणून कोपर्यात असलेल्या एका हाॅटेलात शिरलो. शुन्यात नजर ठेवून चहाची चुस्की घेऊ लागलो. चहा गोड होता की कडू, गरम होता की थंड काहीच माहित नाही परंतु चहा पिऊन संपला आहे एवढेच लक्षात आले.
बालपणातील मराठी शाळा त्याहुन थोडा मोठा झाल्यावर हायस्कूल त्यानंतर तरूण पणातील पदार्पणातील काॅलेज आणि आता उतारतीला शिक्षणासाठी वनरक्षक प्रशिक्षण विद्यालय जालना येथील पदार्पण काही वेगळेपण देणारे वाटत होते. हाच विचार करत करत कन्हैयानगरीतुन प्रवास करत प्रशिक्षण विद्यालयात प्रवेश केला.
येथील परीसर पाहून खुप प्रसन्नता वाटली. येथे काहीतरी नवलाईचे नवेपण मला संशोधन करण्यास मिळेल हा ठाम विश्वास वाटला. याच आनंदात मी येथील विद्यालयात अगदी उत्साहाने अॅडमीशन केले. तो एकच मनी विचार बाळगुन की जेवढे दिवस येथे घालवील ते येथील निसर्गाच्या सानिध्यात व फक्त आणि फक्त हसतमुखाने व आनंदात तेही दुखः बाजुला सारून.
श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक )
वनरक्षक प्रशिक्षण विद्यालय जालना