नैसर्गिक सौंदर्यात जुन्नर तालुका अग्रेसर का असावा बर?

नैसर्गिक सौंदर्यात जुन्नर तालुका अग्रेसर का असावा बर? 
वाचा
व्यापाराची राजधानी म्हणून जुन्नर तालुक्याची ओळख पुर्वी होती. ऐतिहासिक वास्तूंच्या बाबतीत म्हटले तर जगातील एकमेव तालुक्याची ओळख आहे ती येथील असलेल्या 350 च्या वर लेण्यांमुळेच. ज्या राजाने प्रशासन व जनहिताच्या बाबतीत, संक्षणार्थ किंवा आदर्श कसा असावा याची महती संपूर्ण विश्वात निर्माण केली अशा राजाचे म्हणजे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान म्हणजेच जुन्नर तालुका. जगात एकमेव प्राणी वेद बोलला त्या प्राणी रेड्याची समाधी असलेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका. संत महंत ज्यांना जगद्गुरू म्हटले जाते अशा संत तुकाराम यांना रामकृष्ण हरी मंत्र देणारे त्यांचे गुरू चैतन्य प्रभू यांची समाधी असलेला तालुका अर्थात जुन्नर तालुका होय. आणि माझ्या मायबोली मराठी भाषेचा जन्म किंवा जीला अमिजात भाषेचा मान मिळवून देणारे पुरावे असतील ते पुरावेही मिळणारे ठिकाण असेल तेही जुन्नर तालुक्यातच. अशा कितीतरी गोष्टी जुन्नर तालुक्यात पहावयास व अभ्यासावयास मिळतात.
निसर्ग सौंदर्याची उधळण या तालुक्यातच का? असा प्रश्न उपस्थित झाला असेलच. सह्याद्रीच्या सात रांगामध्ये वसलेला हा तालुका व याच तालुक्यात सर्वाधिक असलेले सात किल्ले व तेही येथेच का निर्माण केले गेले असावेत बर? या व्यतिरिक्त तालुक्यात तीन भुईकोट किल्ले, जलव्यवस्थापणाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मलिकांबर पाणी पुरवठा योजना, दोन अष्टविनायक मंदिरे तर तीन हेमाडपंती मंदिरे, कुंभमेळा, वैज्ञानिक क्षेत्रातील जागतीक महादुर्बिण, प्राणी क्षेत्रातील साखळीतील एक नंबरचा प्राणी म्हणजे बिबटे जो निसर्ग परिपूर्ण असल्याची ओळख निर्माण करून देत आहे.औषधी वनस्पतींनी परिपूर्णता. अशा अनेक गोष्टींचा विचार केला गेला म्हणून मी नैसर्गिक सौंदर्यात जुन्नर तालुका अग्रेसर का असावा बर याचे संशोधन करूनच हे टायटल दिले आहे. पावसाळ्यात येथील धबधबे तर येथील सौंदर्यास अधिकच भर घालतात व पर्यटक या ठिकाणांकडे सहाजिकच आकर्षिले जातात.
मित्रांनो हे सौंदर्य आपणासच जोपासायला हवे. मनुष्याला हे पहायला खुप आवडते परंतु जोपासायला अजिबात आवडत नाही म्हणून अशा ठिकाणांना आपला आदर्श मानून येथील पर्रावरणाचा कोणत्याही प्रकारचा -हास न होता हे वर्षेन वर्ष टिकून राहण्यासाठी फक्त येथील पाउलवाटांचाच वापर करा.
आपल्याला असलेल्या व्यसनांना करण्यासाठी खुप काही हाॅटेल्स आहेत ते तेथे बसून आपण करू शकता. परंतु या निसर्ग देवतेला अधिक फुलविण्यासाठी व तीचे सौंदर्य जपण्यासाठी आपण स्वतःहूनच पुढे यायला हवे.
जुन्नर तालुक्यातील आंबोली (दार्याघाट) चे हे निसर्ग सौंदर्य वैभव आहे. आपण येथे मनसोक्त आनंद लुटा परंतु येथील पर्रावरणाचा आनंद घेत असताना कोणत्याही स्वरूपाचा -हास होणार नाही याची पण जिम्मेदारी आपण स्वतः घ्या. काचेच्या बाटल्या फोडू नका, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या पुन्हा सोबत घेऊन जावे ही सदिच्छा.
छायाचित्र/ लेखक – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल.
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका.
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज, मोबाईल अँड्रॉइड अप व युट्यूब चाईनल.
मो. नं 8390008370