अतिरम्य मनोरंजक धबधब्यांचा जुन्नर तालुका

अतिरम्य मनोरंजक धबधब्यांचा जुन्नर तालुका 

चातकासारखी वाट बघत बसतो ती आपण पावसाळ्याची. मग तो बळीराजा असो अथवा पर्यटक.कुणाला नको असते ती हिरवाईचा शालू नेसलेली सजिवसृष्टी. ओल्याचिंब पावसात भिजताना नकळतच शाळेतील जुन्या आठवणी जाग्या होतात.
मग वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे.श्रावणातील रिमझिम बरसलेल्या पावसामुळे शहरातील नोकरी कामात दमछाक झालेला पर्यटक मान्सून पिकनिकची तयारी करू लागतो. छान छान उंच फुटांच्या डोंगरावरून फेसाळत येणारे पाणी पाहून तो आनंदून जातो. ते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, खिरेश्वर, खुबीफाटा,लेण्याद्री, नाणेघाट, आंबोली यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं तो जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू करतो ते निसर्गाच्या सानिध्यात सुख व आनंद शोधण्यासाठी आणि ते पण कुटूंबातील सदस्यांना बरोबर घेऊनच. मग लागा तयारीला निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज आपणास या ठिकाणी अगदी माहीती व फोटोसहित घेऊन जाणार आहे. मग येताय ना?

आंबोली
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण. तिन्ही बाजुने सह्याद्रीने वेढलेले.अनेक धबधब्यांची विविध रूपे पहायला मिळतात. जुन्नर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जुन्नर व आपटाळे येथे हॉटेल्स आहेत.आंबोली मधील गावकऱ्यांना सांगितल्यास ते जेवणाची सोय ते राणभाज्यांच्या स्वादातुन करतात.

नाणेघाट
या ठिकाणास कोण ओळखत नाही. मुंबईकरांचे तर हे महाबळेश्वरच. येथील परिसर नेहमीच धुक्यासोबत लपाछपी खेळत असतो. येथील रिव्हर्स ऑटरफाॅल पहाताना स्वर्ग पृथ्वीवरच अवतरला की काय असा भास होतो. काही मुंबईकर माळशेज मार्गाने येथे येतात तर निसर्ग वेडे माळशेज घाट चढण्याआधी नाणेघाट फाट्यावरून निसर्ग यात्रा करत येथे पोहचतात. नाणेघाट परिसरात हाॅटेल्स सुविधा उपलब्ध असून आपणस तेथे जेवण व राहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

माळशेज घाट 
येथे काळू नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर काळू ऑटर फाॅल आहे. परंतु धबधब्यांच्या रांगाच रांगा पहावयाच्या झाल्या तर आपणास घाटमार्ग चढावा लागतो.पर्यटकांसाठी घाटात कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही. घाट चढून आल्यावर एम. टी.डी.सी तसेच पुढे अनेक विविध व्हाॅटेल्स सुविधा उपलब्ध आहेत.

सोनावळे धबधबे
सह्याद्रीच्या पर्वतरांगात अतिशय वेगात वाहत येणारे पाणी या ठिकाणी दोन भागात दुभागलेले दिसते. व ते उंचावरून खाली कोसळताना पाहून तर डोळ्यांचे पारणे फिटले. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. आपटाळे पासून दक्षिण डोंगरांगेत सोनावळे गावातील हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय नसली तरी आपटाळे येथे जेवणाची व्यवस्था होते.

हिवरे मिन्हेर घाट धबधबा
राळेगण गावातून हिवरे मिन्हेर या घाटाने वर जाताना डाव्या बाजूला या हिरव्या गार वनराईने व्याप्त भागात या धबधब्याचे रमनिय दृश्य पहावयास मिळते. सोनावळे, राळेगण एकच सलग्न डोंगर रांग असून तेथेही आपण स्वतःच गाडीने जावे लागते.

देवळे धबधबा
धबधब्यांची विविध रूपे, येथील क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, धुक्यात लपलेली वनराई असा त्रिवेणी संगम पहायचा असेल व अनुभवयाचा असेल तर आपल्या शक्तीचे प्रदर्शन करूनच येथे पायपीट करून पोहचावे लागते. स्वतःची गाडी व जेवणाची सोय स्वतःलाच करावी लागते.
या व्यतिरिक्त अनेक धबधब्यांचा भरपूर आनंद आपणास येथे अनुभवता येतो. मग येताय ना? निसर्ग रम्य जुन्नर तालुक्यात निसर्ग देवतेचे फेसाळलेले नवरूप पहायला.

लेखक/ छायाचित्र श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनरक्षक – जुन्नर
उपाध्यक्ष- शिवाजी ट्रेल
मो.नं 8390008370