नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.

नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.

ऐंशी वर्षे वयाचा नवतरूण अवलीया गाईड.

आज मला नाणेघाटच्या दक्षिणेला असलेल्या किल्ले जिवधन ते दा-याघाट या अफाट व ह्रदयात धडकी भरविणा-या बालाघाट रांगेच्या माथ्यावरून फिरायचे होते. दुपारचे एक वाजले होते. उन्हाचा तडाखा शरिराला चटके बसत असल्याने जाणवत होता. पत्नी स्वातीला बोललो मी फिरून येतोय. तीने पण होकार दर्शविला पण एक अट घातली कुणाला तरी सोबत घेऊन जा.मी हो म्हणत व बॅगेत पाण्याच्या दोन बाटल्या, ओल्या भुईमूगाच्या शेंगा ठेवत स्वारी जाण्यासाठी तयार झालो.
कार ड्राईव्ह करत करत एकच विचार मनात घर करत होता. सुरूवात कुकडेश्वराच्या पाठीमागील डोंगरमाथ्यावरून करावी. पण स्थानिक गाईड मिळेल का? हा मोठा प्रश्न होता. मनातील विचार दाबत ठेवून आपटाळे रोडणे उजविकडे वळण घेतले. तेथे बसथांब्यावर चार जण चावंड, कुकडेश्वर, खडकुंबे व फांगुळगव्हाणचे बस प्रवासी बसले होते. मी गाडी थांबवत त्यांना आवाज दिला. कुणाला यायचय का? मी नाणेघाटला चाललोय. चौघेही गाडीत बसले. मीच विषय काढला. मला या कुकडेश्वराच्या डोंगरावरून नाणेघाट व दा-याघाट यांचे दृश्य पाहता येईल का? कुकडेश्वराचे प्रवासी बोलले नाही. फांगुळगव्हाणचे प्रवाशी बोलले हो आमच्या लिंगीच्या डोंगरावरून करता येईल. मी प्रवासी त्यांच्या थांब्यावर सोडत सोडत फांगुळगव्हाणला पोहचलो. फांगुळगव्हाण बस थांब्यावर चारचाकी थांबवत कुणी गाईड मिळेल का विचारणा करू लागलो. परंतु भातकापणीची कामे असल्याने व तेथील नवतरूणांना वर लिंगी डोंगरावर जाण्याची वाट माहित नसल्याने कुणी यायला तयारच होईना. मी खुप नाराज झालो. एकटे जाणे सोपे नव्हते. परंतु प्रयत्न करूया म्हणुन ओढ्यात म्हशी धुत असलेल्या गृहस्थाला विचारले. त्या गृहस्थाने सोबत येण्यास मनाई केली.त्यांच्या शेजारी एक खुपच वयस्कर बाबा होते.तेवढ्यात ते बाबा बोलले मी येतो.
मला त्या बाबां बरोबर एवढे वर जाणे योग्य वाटत नव्हते. कारण खुपच वय झाले होते त्यांचे,व एवढी जीवघेणी चढाई चढतील का? यांना काही समस्या निर्माण झाली तर ते पण खुप अवघड होईल. मी काहीच बोललो नाही. शेजारच्या व्यक्ती बोलल्या घेऊन जा यांना ते वाट दाखवतील. मी माझा कॅमेरा, ट्रायपॉड, स्टीक व न्याहरीची बॅग बगलेत अडकुन चालु लागलो. बाबा पुढे व मी पाठीमागे प्रवास लिंगी डोंगराच्या दिशेने चालु झाला.
बाबा सांगू लागले. एकच मुलगा होता. भजन खुप छान म्हणायचा व लोकांची सेवा करायची त्याला खुप आवड होती. व्यसन काय हे त्याला माहीत नव्हते. दूर दूरची लोक त्याला भजनासाठी न्यायला यायची. परंतु परमेश्वरास पहावल नाही. त्याला आजाराने ग्रासले होते. पुण्यात ऑपरेशन केले व पोटातून एक किलोचा गोळा बाहेर काढला. त्याला घरी आणले परंतु नियतीला त्याने या जगात रहावे मंजूर नव्हते. शेवटी तो मला दहा वर्षापुरवी सोडून गेला. आज मी तुमच्यात त्याला पाहीले व दहावर्षानंतर प्रथमच बाहेर पडलोय. मी खुप खचून गेलो होतो. घर सोडून निघून जाण्यासाठी निघालो होतो. परंतु एका नातेवाईकाने थांबविले. व नातवांचा सांभाळ कर म्हणजे तुला तुझ्या मुलाचे समाधान मिळेल म्हणून थांबलो.
चालता चालता बाबांच्या गालावरून टप टप ओघळणारे अश्रु पाहून मला पण गहीवरून आल होते. माझ्या डोळ्यांच्या कडा पण ओल्या झाल्या होत्या. मीच विषय हुंदके देत बदली केला. बाबा तुमचे नाव काय हो. खेमा बुळे म्हणुन सांगितले व शिक्षण विचारले तर चक्क अंगठा बहादुर म्हणुन सहज सांगून गेले. शाळा का शिकले नाही? प्रश्न केला तर बोलले येथे त्या काळी शाळाच जवळपास अस्तित्वात नव्हत्या. अफाट जंगले येथे पसरलेली होती. वाघ प्राण्यांचा तर येथे सुळसुळाट असे.त्यामुळे कोठे जायचे म्हटले तर खुप भीती.
सपाट जंगलवाट सोडून आम्ही चढाईला लागलो होतो. बाबांचे पाय त्या सरळ चढाईला पण झपझप पुढे पडत होते. घामांच्या धारा शरिरातुन फुटू लागल्या होत्या. बाबा सांगतात की याच डोंगरावरून आम्ही पुर्वी दोन ओझे गवत कापुन आनायचो. आजची पिढी तर आपण आलोय इथपर्यंत सुध्दा यायला तयार होत नाही. वाळलेल्या व संपूर्ण बुजलेल्या पाय वाटेचा अंदाज घेत कारव्यांची लाकडे बाजुला सारत त्या चढाईवर आम्ही चाललो होतो.
एवढ्या गरमीत बाबांच्या डोक्यात जी टोपी होती ती त्यांनी काढलेली नव्हती. मध्येच बाबा घसरून खाली यायचे व तेवढ्याच जिद्दीने पुन्हा ते वर चढायचे त्यांच्या जिद्दीला मी मनोमन सलाम केला. लगातार दोन तास चालून सुद्धा बाबा थांबायचे नाव घेत नव्हते. माझी मात्र बाबांनी संपूर्ण हवा काढून घेतली होती. मला खुप गर्व वाटायचा की माझ्या एवढे कुणी चालू शकणार नाही. परंतु आज माझे गर्वहरण झाले होते. एक म्हण मला आठवली “दिसत तसे नसत” कारण बाबा चालतील का? या प्रश्नाचे उत्तर माझ्या समोरच मला मिळाले होते. आता उलट प्रश्न हा होता की मी चालेल का?
माझे वय एक्केचाळीस तर बाबांचे ऐंशी. लाजकाज मान खाली घालून बाबांच्या मागे मी चालत राहीलो. वानरलिंगी पाशी खराळ गेलेल्या अवघड भागातुन वर चढलो व लाजेने मी बाबांना बोललो बाबा थकला अशाल थांबा पाण्याचे दोन घोट घ्या. खरेतर मीच थकलो होतो. कोणत्या तोंडाने त्यांना मी सांगणार होतो की बाबा थांबा मी थकलोय. कारण निघताना मी त्यांना बोललो होतो तुम्ही चालशाल ना?
बाबांचे चित्रिकरण व गप्पागोष्टी कॅमेरात मी चित्रित करतच चाललो होतो. हे व्हिडिओ मी आपणास आमच्या या https://www.youtube.com/c/NisargramyaJunnarTaluka…youtube चायनलवर दाखवणार आहेच. आपण पहाल तर निश्चितच थक्क होशाल यात शंकाच नाही. पाण्याचे घोट घेत आम्ही त्या जिवघेण्या चढाईतुन खिंडीत पोहचलो. तेथून पुन्हा उजव्या बाजूने वर चढत पठारावर चढलो. समोरील दृश्य पाहून मी बेधुंद होऊन गेलो. त्या कड्याकडे पळतच सुटलो. बाबा तर जागेवरच थांबले. निश्चितच म्हटले असतील एका वेड्यासोबत मी आज वर आलोय. किल्ले जीवधन, वर्डीहा डोंगर व घाटघरचे दृष्य टिपत पुन्हा बाबांजवळ पोहचलो. बाबा नानेघाट येथून दिसत नाही हो प्रश्न केला. बाबा बोलले तीन कडे पार करून त्या समोरच्या कड्यावर गेल्यावर दिसेल. आता मात्र सपाट पठारावरून जायचे होते. त्यामुळे काहीच चिंता नव्हती. बाबा सांगतात या पठारावर पाच सहा फुट उंच गवत येथे असायचे. परंतु सर्वकाही नष्ट झालय. मनुष्याने आग लावूनच हे सर्व संपवले. मला वाटत होत की उंच उंच वाढलेले गवत मला पुन्हा दहा वर्षांनी पहायला मिळेल परंतु सर्व काही नाश पावलेल दिसतय.
एका कड्याच्या ठिकाणी वाढलेल्या वृक्षाखाली आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी आम्ही विसावलो घड्याळाकडे लक्ष टाकले तर पावणेपाच वाजले होते. तीनही कड्यावरून दिसणारी दृश्य टिपत व तेथील वातावरण व निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही परतीला लागलो. उतरणीला खरा कस लागणार होता. क्षणोक्षणी पाय घसरणार होते. बाबांची काळजी वाटत होती. उतरताना बोलू लागले. डोळ्यांचे ऑपरेशन झालय माझ्या. दिसायला कमी झालय. एकमेकांना आधार देणपण शक्य नव्हते. बाबांचे पाय घसरले की माझ्या छातीत धस्स व्हायचे. त्या उतरणीतुन पडतझडत उतरत होतो. अचानकच तीव्र उतारावरील मोकळ्या दगडावर माझा पाय पडला व मी घसरलो. क्षणात डाव्या हातातील घड्याळात त्या साईडच्या कातळभिंतीत हात आदळला व मनगटी घड्याळ तुटले. बाबा बोलले हळुहळु उतरा. डाव्या हाताला दगडाने खरचटले होते. रक्तश्राव होऊ लागला. ते सर्व तसेच दाबत मी उतरू लागलो. बाबांना याबाबत थोडीशी कल्पना सुद्धा येऊ दिली नाही. शेवटी आम्ही बाबांच्या घरी व माझ्या चारचाकी पाशी पोहचलो. बाबांच्या पायाशी लोटांगनच घालून बाबांना दंडवत घातला. माझ्या आयुष्यात प्रथमच मला सोबत लाभलेला ऐंशी वर्षांचा हा नवतरूण अवलिया गाईड होता. बाबांना त्यांचा मोबदला देत. मी चारचाकी सुरू करत जुन्नर शहराच्या दिशेने बाबांना सॅल्युट करत परतीला लागलो.
मी टिपलेली सर्व छायाचित्रे ही बाबांच्या चरणी अर्पण करतो. कारण त्यांचा सहवास लाभला नसता तर कदाचित ही छायाचित्रे मी आपणपर्यंत दर्शनासाठी पोहचू शकलो नसतो.
बाबांच्या शक्तीचा एक चमत्कार मला पहायला मिळाला. बाबांच्या या शक्तीचा चमत्कार समाजासमोर पोहचावा म्हणुन पोष्ट शेर करायला विसरू नका.
लेखक/छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश 
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

 

 

 

 

 

2 thoughts on “नाणेघाट व किल्ले जिवधनचे आगळे वेगळे रूप.

 1. खुप छान फोटो आहेत सर. . . .

  मी व माझा भाऊ विनोद असे दोघेजन जीवधन किल्ल्यवेर काही एक महित नसताना गेलो होतो.
  सायं 04. 30 ला किल्ला चढायला सुरुवात केलि. खुप थरारक वेल होति ति जेव्हा आम्हि किल्ला चे अरधवेर गेलो आणि अंधार पडू लागला त्या वेली.
  पायत्याचे गावातील एक मुलगा भेटला त्याचे मदतिने किल्ला उतरलो. पायत्याला आल्यावर दिर्घ श्वास सोडला. .
  पायत्यला 500 रू नोटः मिलाली . .
  एक अविस्मरनिय अनुभव कहि तास होते ते. . कहि वेल खरच खुप घाबरुन गेलो होतो. . .
  आपले फोटो पाहुन ते क्षण आठवल. . .

Comments are closed.