हजारो परदेशी पाहुण्यांना शिवजन्मभुमीची ओढ

हजारो परदेशी पाहुण्यांना शिवजन्मभुमीची ओढ

श्रावण म्हटले की हर्ष उल्हास आणि आनंद आलाच. येथील ओल्याचिंब परीसरात दव स्वरूपात उधळण करणार्‍या त्या हलक्या सरी आपल्या शरीरावरील कपडे ओले कधी करून जातात हे सुद्धा मग लक्षात येत नाही. या ऋतुत दुचाकी प्रवास म्हटले की दुचाकीच्या टायरखालुन उडणारे गढूळपाण्याचे फवारे लांबुन पाहणार्‍याच्या आनंदात भर घालतात. आणि जर का तो रस्ता कच्च्या माळराणावरील वाट असेल तर त्या रस्त्यावर पसरलेल्या व पावसाने तयार झालेल्या राढ्यारोड्यातुन दुचाकी चालवताना आपल्या कपड्यांना कधी नैसर्गिक रंग लागुन जातो हे कळत सुध्दा नाही.
याच मौजमस्तीचा आनंद घेण्यासाठी व परदेशी पाहुण्याची भेट घेण्यासाठी जुन्नरहुन गणेशखिंड, मढ व खुबीफाट्यावरून खिरेश्वर परिसरात पोहचलो. हे परदेशी पाहुणे न चुकता ऑगस्ट महिन्यात भारताचा स्वातंत्र दिन साजरा करण्यासाठी जुन्नर तालुक्यात अगदी आनंदाने व उत्साहाने हजर राहतात. ते मुद्दामहुन पारतंत्र्यातील आमच्या स्वाधीन असलेला भारत व स्वातंत्र काळातील आजचा भारत भ्रमण करत करत व पाहत पाहत जुन्नरमध्ये मुक्कामासाठी पोहचतात. कारण त्यांना येथील व्यापारी(नाणेघाट) मार्गाचा अजुनही विसर पडलेला नाही. येथील सात किल्यांच्या पराक्रमाचा व त्यांनीच सुरूंग लावून उध्वस्त केलेल्या किल्यांचा तसेच श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीचा भला कसा विसर पडेल. त्यांना येथील असलेल्या 350 पेक्षा जास्त लेण्यांच अद्याप न सुटलेल कोड ते आजही सोडवण्याठी तर येथे येत नसावेत ना? येथील एक मावळा त्यांच्या शंभरांच्या बरोबर का होता याचे संशोधन करण्यासाठी तर ते येथे येत नसावेत ना? नकळत त्यांना पाहून प्रश्न पडतो.
याच पाहुण्यांना आपण मराठीत “रोहीत” किंवा “अग्निपंख , हिंदीत ” राजहंस” तर इंग्रजीत “फ्लेमिंगो” म्हणतो. इंग्रज पहायला सध्या भारतात कुठे मिळतात? म्हणून ते कसे होते त्यांची अनुभूती हे पक्षी पाहताना होते. पांढर्‍या शुभ्र पंखांनी झाकलेले शरिर, परंतु त्याच पंखांच्या आतिल लाल मखमली गालीच्या सारखे दिसणारे लाल गलाबी, काळे व सफेद पंख. यांचे गुलाबी पंख सुर्याच्या सकाळच्या कोवळ्या किरणांची आठवण करून देतात. तर तो आकाशात झेपावताना त्यांचे पंख आग्निच्या ज्वालांप्रमाणे भासतात म्हणुन तर त्यांचा उल्लेख अग्निपंख म्हणुन करतात. त्याचे गुलाबी उंच पाय, सापासारखी सहज नागमोडी वळणारी लांब मान तर आकाशाला गवसणी घालते कि काय याची नकळत भिती वाटते, पिवळे छोटे परंतु आकर्षक व तेजोमय डोळे तर सुर्यास्ताच्या सुंदर दृष्याचे दर्शन घडवतात. तर त्याची टोकाला दुरून काळी व गुलाबी चोच बळीराज्याच्या शेतातील लाकडी नांगराच्या औजारासारखीच दिसते.
अतिशय सुंदर पाण पक्षी म्हणून याची गणना तर आहेच व तो कितीतरी वेळ खाली वाकून पाण्यातील भक्ष पकडण्यात तल्लीन झालेला दिसतो. त्याची ती संथ चाल व एका पायावर उभे राहून करत असलेली तपस्या पाहून खुप आनंद वाटतो. अशा या परदेशी पाहुन्यांना आपल्या मायभुमीची आठवण ऑक्टोबर महिन्यात होते. हजारोंचा त्यांचा उडणारा थवा जेव्हा मायदेशाकडे उंच भरारी घेताना झेपावतो तेंव्हा गगनाचाही हे दृश्य पाहून आनंद गगनात मावेनासा होतो.
असा हा रोहित म्हणजे कुटुंबाची काळजी घेणारा व प्रगती करणारा अश्या विविध रूपांनी स्वतःच सौंदर्य खुलवणारा आणि पर्यटकांना आकर्षित करणार्या पक्षाच दर्शन घ्यायचे झालेच तर अगदी आनंदाने जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील परीसराला भेट द्यायला विसरू नका. परंतु एक गोष्ट सांगाविशी वाटते की या पाहुन्यांना आपला उपद्रवी उपक्रम चुकूनही दाखवू नये ही सदिच्छा.
लेखक /चित्रांकन – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
निसर्ग रम्य जुन्नर तालुका
8390008370

14141771_1739283129659791_6535942532582450694_n 14045529_1739283596326411_4901147038920609747_n 14045996_1739283726326398_6830727754416622679_n 14054218_1739283089659795_6969707593774971972_n 14067597_1739283196326451_429445480253483652_n