भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह

भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह
दुपारचे दिड जुन्नरमध्येच वाजले होते. कुठेतरी फिरून याव व मनावरील तान कमी करावा असा विचार मनात भिनभिनत होता. दिपकला फोन लावला दिप्या येतोस का फिरायला ? असा प्रश्न केला.
लागलीच त्याने होकार दिला.
पण सर कुठे जायच? त्याने प्रश्न केला.
मी तुरंत विनोदी वृत्तिने “म्हसनात” असे उत्तरलो.
तो हसला व बोलला सर पंधरा मिनिटांत आलोच.
दिप्याचा फोन कट झाला व पाठीमागे उभ्या असलेल्या माझ्या सौ उत्तरल्या मी पण येऊ का?
मी नकार दर्शविला. मग काय झाले असेल? समजून घ्या.
दिप्या वेळेवर पोहचला. मी तयारच होतो. पत्नीचा पडलेला चेहरा पाण्याची बाटली भरून देताना पाहिला. दिप्याला बोललो अरे सुशांत येतोय का फोन कर? त्यास फोन केला तर तो जुन्नरमध्येच होता. दोन दुचाकी होत्याच.सुशांतपण आला. सौ ला बोललो चल तु पण. तशीही घरी राहून बोटे मोडत बसशील न नेल्यामुळे माझ्या नावाने असा मनात प्रश्न उपस्थित झाला. तिचा प्रसन्न चेहरा पाहून माझ्या शरीरात कॅलरीचा संचार झाला.त्यामुळे जायचे होते एका ठिकाणी परंतु निघालो दुसर्‍याच ठिकाणी.
जुन्नर – मढ – माळशेजघाट प्रवास करत रस्त्यावर रानमेवा विकत असलेल्या गरीबांकडून जांभळे, करवंदे व आवळे विकत घेत स्वाद चाखत मोरूशी मधील आश्रमशाळेपाशी उभे राहिलो. रोडच्या डाव्या बाजूला एक वृद्ध चेहरा दृष्टीस पडला. फाटलेली बनियान, डोईवर गांधी सफेद टोपी व फाटलेली अंडरप्यांट असा परिधान त्यांनी केला होता. परंतु त्यांच्या चेहर्‍यावरील तेज पाहण्यासारखे होते. त्यांना आवाज दिला. धावतच गेट जवळ आले. बाबा आम्हाला भैरवगडावर जायचय? प्रश्न केला. गरिबीच्या झळा सहन करणाऱ्या बाबांच्या जबड्याच्या हाडाच्या साफळ्याने हालचाल केली व उत्तरले पुढे मोरूशी वरून जा. क्षणिक मी विचार केला. बाबांना काहीतरी मदत करायचीच. परंतु त्यांच्या भावनांना कुठेही ठेच न लागता. म्हणून मी पुन्हा प्रश्न केला. बाबा या तुमच्या घराच्या अंगणात गाड्या पार्क केल्या तर चालतील का? व आम्हाला येथुन गडावर जाता येईल का? ते थोडे थांबले उत्तरले ठिक आहे. मी ओळखले की हे घर नक्कीच बाबांचे नाही. परंतु घड्याळातील काटे 2:45 ची वेळ दाखवत होते. जास्त काही न बोलता गाड्या पार्क केल्या व गडावर पोहचण्याचा मार्ग त्यांना विचारला. त्यांनी हातवारे करतच मार्ग दाखविला.
आम्ही झपझप गडाच्या दिशेने चालू लागलो. पाठीमागून छोटी मुले ओरडण्याचा आवाज आला. तिकडून न जाता इकडून जा असे ते ओरडत होते. थोडे थांबलो. त्यांना जवळ बोलावले तर ते पळून गेली. परंतु त्यांच्या पाठीमागून एक तरूण येताना दिसला. ती बच्चे कंपनी त्याला पाहून आमच्याकडे पळत सुटली. तो तरुण जवळ आला. चल येतोस का आमच्या बरोबर? तो नाही म्हटला. अरे तुझा काय चार्ज आहे तो देतो की?
नाही मला काम आहे बोलला.
तुम्हाला मी मुख्य वाट दाखवून मागे येतो बोलला.
त्याला नाव विचारले तर योगेश म्हणुन सांगितले. तेथेच आश्रमशाळेत अकरावीचे शिक्षण घेत होता.
आम्हास पायवाट दाखवून तो माघारी फिरला. जाता जाता सहज विचारले भैरवगडावर पोहचण्यास किती वेळ लागेल? तो बोलला चार तास. घड्याळात वेळ 3:15 झाली होती. डोईवर ढगांनी जमण्यास सुरूवात केली होती. क्षणिक विचार केला काय करावे? परंतु चालतच राहिलो.
वाटेवर पडलेला पिकलेला आंबा दिप्याने आंब्याच्या झाडाखालून उचलला. त्याचा आस्वाद घेत दिप्या बोलला गोटी अंबा खुपच गोड आहे सर. तेथूनच चढाईला सुरूवात झाली होती. पिकलेल्या करवंदाच्या जाळ्या फुकटचे आमंत्रण देत होत्या. परंतु वेळेचे भान त्याकडे कानाडोळा करण्यास भाग पाडत होते. विविध पक्षांच्या गितांचे स्वर आमच्या चालण्याची गती वाढवत होते. पहीला टेकडी टप्पा पार केला. वाटेवरील बाण आमचे सोबत वाटाड्या म्हणुन करत होते तर झाडाला लावलेला सफेद चूना हरवलेली वाट शोधण्यास मदत करत होते.
पत्नी स्वातीची चालण्याची गती दुसर्‍या टप्याला कमी झाली होती. माझ्या कपाळावरील रेषा मात्र स्पष्ट होत चालल्या होत्या. कारण प्रवासामध्ये ही अडथळा निर्माण करतेय की काय? असे वाटत होते. परंतु काही न बोलताच पुढे जाणे योग्य वाटत होते. तसेच केले कारण तिला बोलणे म्हणजे तिचे खच्चीकरण करणे वाटत होते. मी त्यांना फोटो काढायचे म्हणुन पुढे झालो. मी उचलती पावले घेत चालू लागलो. घामाच्या धारा अंगातुन वाहू लागल्या होत्या. हवा आज जणू वाहण्याचे विसरूनच गेली होती. वातावरण ढगांमुळे थोडे अंधारमय वाटत होते.
दुसर्‍या टप्प्यात मी जसा पोहचलो तसा सुसाट वाहणाऱ्या वा-याने शरिर थंड करण्यास सुरुवात केली.
मी तिसरा टप्पा चढून मध्यभागी गेलो. व खाली या तिघांना आवाज दिला. परंतु हवेच्या झोतात माझा आवाज त्यांच्यापर्यंत कदाचित पोहचत नसावा या उद्देशाने पुन्हा खाली उतरून आलो.आता मला ते दिसू लागले पुन्हा मी पुढे चालू लागलो. स्वातीची चालण्याची गती खुपच कमी झाली होती. घड्याळात 4:15 झाले होते. वरून खाली उतरताना तेथील दोन ग्रामस्थ मला भेटले खालुन येणाऱ्या तिघांची प्रतिक्षा करत मी त्यांच्याशी गप्पा मारत उभा राहीलो. तिघे जवळ पोहचले होते. ग्रामस्थ सांगत होते येथुन गडमाथ्यावर पोहचण्यास तीन तास लागतील. हे बोलताना सहज स्वातीच्या चेहर्‍याकडे लक्ष गेले. तिच्या कपाळावर आठ्या पडताना दिसल्या. खुप थकलेली जाणवत होती. तिच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेणे जरूरीचे होते. आयुष्यात खुप मोठा आधार आणि मला तिने जगाला न दिसणारे बळ दिले होते. माझ्या प्रत्येक गोष्टींत तिचा नक्कीच सिंहाचा वाटा असतो. त्यामुळेच तर मी काही मिळवू शकलोय हे विसरून कसे चालेल. मीच बोललो सुशांत आणि दिप्या दोघांपैकी एक जण हिच्या
सोबत या व एकजण माझ्या सोबत पुढे चला. नाहीतर मी थांबतो तुम्ही दोघे पुढे जा. परंतु अनुभव व अनोळखी जंगल भाग असल्याने ते पुढे जाऊ शकत नव्हते. दिप्या अनेक वेळा माझ्या बरोबर असल्याने त्याच्या भटकंतीचा अनुभव मला होताच. लेण्याद्री टाॅपवर एका राॅकपॅच चढाईला थरथर कापणार दिप्या आता बदलला होता. त्याच्यामध्ये धाडस निर्माण झाले होते. परंतु फक्त मला दाखवण्यासाठीच म्हणुनच तर मला म्हटला मी येतो सर तुमच्या सोबत.
सुशांत आणि स्वाती हळुहळु भैरवगडाच्या सपाट भुभागाच्या पाचव्या टप्प्यावर जेथे कातळाने घेराव घातला होता. तेथेच येऊन थांबणार होते. मी निश्चिंत होऊन पटपट चालू लागलो होतो. सुर्य अस्ताकडे चालला होता. भैरवगडाच्या बालेकिल्ल्यावर पोहचायचेच हे स्वप्न मी दिवसा चालत चालत पाहत होतो. दिप्याची चालताना झालेली दमछाक मी तिरप्या नजरेने पहात होतो. परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याकडे मी कानाडोळा करत होतो. पाचवा टप्पा पार केला व आनंद गगनात मावेणासा झाला. कधी झाडीच्या तर कधी टेकड्यांच्या आडून लपाछपीचा खेळ खेळणारा भैरवगड चक्क उंच टेकडीवर उभा राहताना दिसत होता. जणू काय एखाद्या ट्राॅफीला काचेचे बाॅक्स जसे बनवतात कि ज्याच्या दोन बाजु रूंद व दोन बाजू अरूंद असतात व खाली लाकडी बेसवर त्या मिळालेल्या असतात अगदी तसेच दर्शन घडले. व पाठीमागे उभा असलेला माळशेज घाट डोंगर डोक्यात टोकदार मुकूट घालून ती ट्राॅफी हातात धरून निसर्ग देवतेने या निसर्गरम्य सह्याद्रीला बहालतर केली नाही ना? असे ते दृष्य दिसत होते. त्याच्या त्या नयनरम्य रूपाचे दोन छायाचित्रे टिपत पुढे जंगलात प्रवेश केला. गर्द झाडीत येथील वाट हरवलेली दिसून येते. निरिक्षण करतच त्या वाटेने चालत राहीलो. त्या जंगलातूनच ख-या चढाईला सुरूवात होते. अतिशय खडी चढाई वाळलेल्या कारव्यांना धरूनच करावी लागते. खुप दमछाक होते. रस्त्यावर येणारे पाण्याचे खांब टाके येथील पर्यटकांची तृष्णा भागविण्याचे काम करते. परंतु यासाठी कातळावर चढून गेल्यावरच ते पाणी काढता येते.
आता आपणास भैरवगडाच्या पुर्वेकडून शेवटचा टप्पा जीव मुठीत धरून पार करावा लागतो. हे दृष्य मी दिप्याकडे पाहून अनुभवत होतो. वर पुन्हा भैरवगडाच्या पुर्व कातळभिंतीत एक टाके निदर्शनास पडते. पुन्हा येथुन थोडे खाली उतरून दक्षिणेकडे जावे लागते ते पण एका तिव्र उतारावरूनच. येथेच मी थरथरकापणारा दिप्या पहात होतो. हे त्यालासुध्दा माहीत नव्हते. कारण येथुन जर एकदा कुणी सटकला कि त्याची भेट वैकुंठातच समजावी. दिप्याकडे मी दर्लक्ष करत आम्ही खिंडीत पोहोचलो. मला व दिप्या ला या दोन्ही कातळ भिंतींनी आपल्या पोटाशी आवळूनच धरले की काय असा भास झाला.भैरवगडाच्या दक्षिण काळभिंतीवर कटाक्ष टाकला तर प्रत्यक्ष गोष्टीतला मला काळभैरवच आठवला. 90 डिग्री अंशात उभ्या असलेल्या कातळ भिंतीत झीकझाक पध्दतीने कोरलेल्या त्या पायर्‍या पाहून तर बोबडीच झाली दिप्याची. चल दिप्या मला व्हिडिओ शूट करायचा आहे. तु वर चढ. हो सर त्याचा शब्द मला तुटताना ऐकू आला खरा परंतु तो चढू लागला. चार जिने चढून तो गेला व थांबलाच.
मी झपझप चार जिने चढलो. घड्याळात 5:15 झाले होते. येथून पुढे किती वेळ लागेल माहीत नव्हते.तोडलेल कातळ कोरीव पाण्याच्या टाकीला पाठीमागे टाकत मी पुढे झालो. दिप्या उभा असलेल्या ठिकाणी तुटलेल्या पायर्‍या होत्या. खांद्याच्या लेवलवर फ्रिहॅण्ड चढाई करायची होती. दिप्याची अवस्था व चेहरा पाहण्यासारखा होता. दिप्या तुला येथे चढाई करायचीच आहे, मी उद्गारलो. थांब प्रथम मी कसा चढतो ते पहा मग चढाई कर असा बोलत दिप्याला धीर दिला. मी तो टप्पा सहज पार केला. सपाट उंच त्या कातळ भिंतीवरून डोकावले तरी थरकाप होत होता. मग दिप्याचे खाली पाहून काय झाले असावे बर? तरीपण मी त्यास जोर दिला व सोबत दोघांच्या हाताची मनगटे लाॅक करत दिप्यास वर घेतले. अतिशय अरूंद पायर्‍या व त्यांस गेलेले तडे पाहून दिप्या जागिच थांबला. मला पुढे येणे शक्य होणार नाही बोलू लागला. मी त्याची मागणी मी येईपर्यंत तु येथेच थांबून राहात असेल तरच मान्य करेल.तो चालेल म्हटला व मी एकटाच पुढे निघालो.आता मी दिप्याला त्या कातळ भिंत व पायर्‍यांच्या हवाली करत एकटाच वर जाणार होतो. मनातील सर्व शंकांना झटका देत त्या भिंतीवरून त्यांचा कडेलोट केला होता. दोन जिने चालून गेलो तर पुढील दृश्य पाहून मी जाग्यावरच थबकलो. पुढील वळणाच्या पायर्‍या नष्ट केल्या होत्या. व येथुन पुढे पुढील जिन्याकडे वळण घ्यायचे होते. परंतु त्या कोपर्‍यातून वर फ्रिहॅण्ड चढणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूलाच कवटाळने होते. त्या वरील पायरीच्या मधोमध एक हालता मोकळा दगड ठेवण्यात आला आहे. तो तर मला यमराजासारखाच भासत होता. परंतु तो दगड असा काही बसविण्यात आला होता की त्यावर एक टन वजन ठेवले तरी तो जागा सोडणार नव्हता. हे मला वर चढल्यावर समजले. येथील चढाई म्हणजे पुर्ण शरीर 150 फुट खोल दरित लोंबकळत ठेवून वर चढायचे होते. तेथे दोर लावून चढण्यासाठी लावण्यात आलेल्या हुकाचा आधार घेत व शरिर मोकळे सोडत बाजुच्या कातळभिंतिवर पाय ठेवून पाय पुश करत मी तो टप्पा पार केला. व वर चढलो (अनोळखी पर्यटकांनी येथे रोप शिवाय वर चढू नये) मी तो पायर्‍यांचा टप्पा पार करत विडीओ घेत पुढे चालत राहीलो. पुन्हा येथे पाण्याचे टाके लागते. एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे पाण्याचे टाके अशा या छोट्या मार्गाचा वापर करून पुढे जायचे होते. हे दृष्य डोंबार्याच्या खेळातील दोरावरू चालण्यासारखेच होत. येथे संगीत द्यायला या सह्याद्रीत वाहणारा सुसाट वारा व त्याचा गुंजणारा नाद, विविध पक्षांचे ऐकू येणारे मधूर अवाज व ह्रदयातुन निघणारे ढोलरूपी ठोके होतेच. ती भिंत मी याच मधूर संगितात पार करत पुढे झालो.
आता सुंदर आखीव, रेखीव व कोरीव पायर्‍यांचे दर्शन घेत त्यावरून मी चाललो होतो. मी वरती भैरवगडावर काय असेल हे विचार माझ्या सोबत होतो. आता ती वेळ आली होती. अतिशय निसर्ग रम्य व सुंदरतेने बहरलेल्या निसर्ग देवतेच्या सन्मान चिन्हांच्या डोईवर मी पोहचलो होतो. समोरच हरिश्चंद्रगड डोंगररांगा माझ्या स्वागतास उभ्या होत्या. पवनराजांच्या वायु लहरींनी थकलेल्या शरिरावर मसाज करायला सुरूवात केली होती. पाठीमागे असलेली कोकण दर्शन रांग जणू माझा उत्साह द्विगुणित करण्यासाठीच पाठीशी होती. पश्चिमेस पसरलेल्या ठाणे जिल्ह्याचे अतिविलोभनिय विहंगम दृश्य जणू मला सादच घालत होते. एवढे असूनही माझी नजर बहीरा ससाण्याप्रमाणे तेथील पौराणिक ठेव्यांणा शोधत बसली होती. मी पुढे चालू लागलो. भैरवाच्या उत्तरेस असलेली व गतप्राण झालेली मोठी पाण्याची टाकी निदर्शनास पडली. येथुन पुन्हा पाठीमागे निघालो तो भैरवाच्या कुशीमध्ये दडलय काय ते पाहण्यासाठी.
आता भैरवाच्या बालेकिल्ल्यावर चढाईचा शेवटचा टप्पा होता. त्यासाठी दक्षिण दिशेकडून पाऊलवाटेचा वापर करत चढू लागलो. या पण वाटेत पाण्याचे टाके कोरण्यात आले असून थोडासा दगडी चौथरा दिसून येत होता. बालेकिल्ल्यावर वरून पश्चिमेकडे जाताना आनंद काही वेगळाच होतो. उत्तर, दक्षिणेला खोल
द-या निदर्शनास पडतात तर सामने साबरकांडांनी वेढलेल्या वाटेतुन पश्चिम टोकाकडे पोहचावे लागते.
समोर अथांग पसरलेल्या निसर्ग माईच्या नटलेल्या रूपाचे लावण्य न्याहाळतच बसावे वाटते. याच लावण्यात माझी सौ कुठे असेल हे मी शोधत होतो. तीचा हासरा चेहरा दिसावा म्हणून मी कॅमेरा झुम करून पाहू लागलो. मुंगी एवढी दिसणारी सौ आता तिच्या मुळरूपात झुम करून पहात होतो. तीला ओरडून आवाज देत होतो सखी मी पोहचलोय. मी जिंकलोय. या सह्याद्रीचे रूप पहाण्यासाठी. कसा आहे हा भैरव मी तुला आता प्रत्यक्ष सांगू शकेल. जरी तु व सोबतचे मित्र पोहचू शकले नाही तरी मी त्याचे रूप वर्णन सांगू शकेल. याचे नाव भैरव का ठेवण्यात आले याचे उत्तर मी शोधलय. तु ऐकशील ना?
आता काळ्या ढगांनी खुप गर्दी केली होती. कॅमेरा तील वायफाय बटन क्लिक करत कॅमेराचे रिमोट मोबाईल वर घेऊन त्या निसर्ग सौंदर्यात मी कसा दिसतो हे फोटो टिपले. मेघ राजाने मला आरोळी दिली. निसर्ग मित्रा आता तु या निसर्ग मोहपाशातुन बाहेर ये. तुला खाली उतरायचे आहे. माझे आगमन झाले तर तुम्ही सर्वजण धोक्यात सापडाल. या निसर्गाची सेवा तुझ्या लेखणीतून खुप काही लिहायची बाकी आहे. हे सौंदर्य तुला जगासमोर मांडायचय. ही सेवा तुच करू जाणे. म्हणूनच मी तुला सांगतोय. आता तु खाली उतर. दोनचार थेंबांची उधळण वरूण राजाने अंगावर केली. घाबरून माझी धावपळ सुरू झाली. मी अतिशय वेगाने गड उतरणीला सुरूवात केली ती पण एक विचार मनी बाळगून कि खरच हा किल्ला टेहाळणी करण्यासाठीच बांधण्यात आला असावा का? का या पाठीमागचा हेतु अन्य काही वेगळाच असावा? उत्तर सापडत नव्हते. मी मात्र जीव मुठीत धरून खाली उतरत होतो. पुन्हा त्या अवघड उतरणीला पोहचलो. कसाबसा तेथुन खाली उतरलो. पुढे दिप्याला आवाज दिला. परंतु त्याचा आवाज आला नाही. मनात काही वेगळीच शंका घर करून गेली. पुन्हा आवाज केला व शिळ घातली तेव्हा मात्र दिप्याने गडाच्या पुर्वेकडून आवाज दिला. तो या भैरवगडाचे अक्राळ विक्राळ रूप पाहून घाबरून खाली उतरून गेला होता. मी खाली उतरलो. दिप्यास सोबत घेऊन झपझप उतरू लागलो. गडाच्या मध्य कातळ उत्तर किणा-याने मी पश्चिमेकडे चालू लागलो. गडावर येणारी वाट सोडली होती. पश्चिमेस उतरत गेलेल्या डोंगर रांगेने उतरू लागलो. सौ ओरडून सांगत होती इकडून येऊ नका. पुढे दरी आहे. परंतु तो आवाज कानी येत नव्हता. मी व दिप्या पांघरून घातलेल्या मेघ राजाच्या गडगडाटात खाली उतरत होतो. वरूणराजा कोणत्या क्षणी भेटीस येईल सांगणे कठीण होते. त्या तिव्र उताराणे आम्ही उतरू लागलो. शेवटी सौ उभ्या असलेल्या ठिकाणी पोहचलो तेव्हा घड्याळात 6:45 झाले होते. तेथूनच या भैरवास खाली लोटांगण घालत संपूर्ण दंडवत ठोकला. कोकिळ आणि पावश्या हे दोनच पक्षी आमच्या उतरणीला त्यांच्या मधूर आवाजात आम्हाला उत्साहीत करत होते. त्यांची साद व त्याचे प्रतिसाद या पसरलेल्या सह्याद्रीत पुन्हा ऐकू येत होते. अतिशय वेगाने आम्ही 7:30 ला गाड्या पार्क केल्या त्या ठिकाणी पोहचलो. बाबा आमची वाट पाहत होते. त्यांना विचारले बाबा आपण काय करता? त्यांनी उत्तर दिले की येथे या वास्तुचा गेली तीन वर्षे झाली सांभाळ करत आहे. समोरच आश्रम शाळेत नातवंडे शाळा शिकतात. मला त्यांनी विचारले तुम्ही कुठले म्हणाव? आम्ही उत्तर दिले जुन्नरचे. त्यांच्या चेहर्‍यावर आनंदाचे काहुर माजताना दिसले. बोलले मी नऊ वर्षे खामगाव मधील जाधवांकडे लहानाचा मोठा झालो. वेळ खुप कमी होती. संपूर्ण माळशेज चढून वर यायचे होते. खिशातून 100 रू. काढले व बाबांना देत बोललो. आपण आमच्या गाड्यांचा सांभाळ केला म्हणून ठेवा. त्या माउलिच्या डोळ्यांत पाणी आले. ते 100 रू माघे करू लागले. मला पैसे नकोत म्हणू लागले. मी पण मनी बोललो यालाच म्हणतात आपुलकी. गरिबीत राहील पण ताठ मानेने जगेल हा बोध मला बाबांकडून जाणवला. मी काही काम केलेच नाही तर पैसे कशे घेऊ बोलले. आज तीन वर्षे झाली माझा मालक परदेशात आहे. कामाचे पैसे अद्याप मिळालेले नाही. बोलले. खुप वाईट वाटले. ती नोट पुढे करत होते. माझ्या सौ स्वातीला रहावले नाही ती बोलली बाबा नातवंडांना खाऊसाठी हे पैसे दिलेत घरी जाताना खाऊ न्या त्यांना.
बाबांच्या डोळ्यांतून ओघळणारे पाणी दिसत होते. मी मात्र दुचाकी चालू केली होती. बाबांचा निरोप त्या पडलेल्या सांजप्रकाशात घेतला. बाईकची मुट रेस करत परतीला लागलो. पावसाची रिमझिम सुरू झाली होती. बोचरी थंडी अंगाला जाणवू लागली होती. शरिर हळुहळु थंड होऊ लागले होते. अनेक वेडीवाकडी वळणे घेत माळशेजघाट चढून वर आलो. चहाची चुस्की घ्यावी म्हणून थोडावेळ एका हाॅटेलात थांबलो. पुन्हा प्रवास जुन्नरच्या दिशेने सुरू केला. तो सर्व आज घडलेल्या घडामोडींचा विचार मनी घेऊनच.

लेखक /छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संस्थापक – निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज / अॅड्राईड अॅप व युट्यूब चायनल.

 

 

 

3 thoughts on “भैरवगड (मोरूशी) निसर्ग देवतेने सह्याद्रीला दिलेले सन्मान चिन्ह

  1. किल्ल्याची चढाई हे वर्णन खूपच सुंदर केल आहे .जसं आम्ही किल्ला चढत आहे असे वाचन करताना वाटत होते .खुपच छान सर .धन्यवाद सर !

  2. वर्णन खुप सुंदर आहे, आम्हासही कधीतरी सवडीने निसर्गात रममान करण्यास प्रोस्ताहित करावे ही विनंती.
    कदम.

  3. वर्णन खुप सुंदर आहे, आम्हासही कधीतरी सवडीने निसर्गात रममान करण्यास प्रोस्ताहित करावे ही विनंती.
    कदम.

Comments are closed.