आषाढी एकादशी ला येथे का येतात दिड लाख भाविक

आषाढी एकादशी ला येथे का येतात दिड लाख भाविक
बेल्हे गावच्या उत्तरेस ६ कि.मी अंतरावर असलेल्या बांधुडा, कुरूंदा, दुधवडी व बाळेश्वर या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगामध्ये वसलेले छोटस परंतु निसर्ग सौंदर्याने चहु बाजुने वेढलेले गाव म्हणजेच जुन्नर तालुक्यातील पुर्व दिशेच्या उत्तर कोपर्‍यातील “बांगरवाडी”. या गावचा इतिहास सिताफळ विक्री साठी अगदी जगप्रसिद्ध मानला जातो.येथील सिताफळ पिक अग्रेसर असून उत्पादन काढून लाखो रूपयांची उलाढाल करणार हे गाव.
९६ वर्षा पुर्वी बेल्हे गावातून दिवसा बांगरवाडीत जायचे म्हटले तर भिती वाटायची एवढी किर्र झाडेझुडपी असायची. त्या वेळेस या गावात व्यापार उद्योग म्हटले तर फक्त आणि फक्त गुराखी असाच होता. त्याच कालखंडात अनेक गुराखी या सह्याद्री पर्वत रांगांच्या अंगा खांद्यावर गुरे चारण्याकरीता फिरत असत. १९१७  साली श्री.स्वयंभू गुप्त विठोबा पांडूरंगाने म्हणे येथील गुराख्याला दृष्टांत दिला, की हे भक्ता माझा डोंगराच्या कडेला असलेल्या एका गाडलेल्या गुफेत जीव गुदमरतो आहे. आपण त्या गुहेला उकरून येथील जनतेच्या दर्शनासाठी ही गुहा उकरून मला मोकळे करा. एका सपाट खडकावर कोरलेल्या परंतु संपूर्ण गाडलेल्या ठिकाणी उत्खनन करण्याचा मुहुर्त गुळुंचवाडी व बांगरवाडी ग्रामस्थांनी ठरविला.रेखांश व अक्षांस – N-19 09’18.8 E- 074 11’33.7 या ठिकाणी उत्खनन करण्यास प्रारंभ झाला. इतरत्र त्या ठिकाणी संपूर्ण पक्का खडक होता. गुहेच्या तोंडाशी संपूर्ण तोंडभरून असलेली माती काढण्याचे कार्य सुरु झाले. काम करण्यार्यांपेक्षा आज बघणारांची गर्दी झाली होती. एकाच वेळी एकच व्यक्ती त्या ठिकाणी काम करू शकेल एवढीच जागा तेथे त्या गुहेच्या तोंडाची होती. माती खाली घमेल्यात भरली जाऊन बाहेर काढली जात होती. उत्सुकता एवढी वाढलेली होती की आज नक्कीच काहीतरी घबाड भेटणार अशी कुजबूज बघे करत होते. एक, दोन, तीन अशा नऊ पायर्‍या उकरण्यात आल्या. किती खोली असेल याची? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. शेवटी येथेच पायरीमार्ग संपला वगाभार्रातील तळाच्या सपाट भु-भागावर असलेल्या मातीचे उत्खनन सुरू झाले. गुफेत असलेले उभे तीन खांब दिसु लागले. १० बाय १५ फुटाची गुफा अनेक ट्रक भरेल एवढी माती आतुन बाहेर काढून स्वच्छ करण्यात आली. परंतु आजुन एक छोटी खोली असल्याचे लक्षात आले. तेथील माती काढण्याचे काम सुरू झाले साधारण चार बाय चार फुटाची ही खोली भरलेल्या माती पासून खाली करण्यात आली व याच खोलीत सापडला तो मोठा खजिना. कि जो तो प्रत्येक जण याच शोधात होता. दृष्टांत खरा आहे की खोटा हे येथेच सिध्द झाले होते.याच ठिकाणी आढळून आली ती श्री.स्वयंभू विठ्ठल रूक्मीणीची काळ्या बुक्याची मुर्ती. परंतु ही मुर्ती खराब झाली होती. याच खोलीच्या शेजारीच उत्तरेला अजुन एक भुयार होते. परंतु ते उत्खनन न करण्याचा गावकर्यांनी निर्णय घेतला.
चार वर्षे ४ × ४फुट खोलीत श्री.स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीची ती जुनी मुर्ती ग्रामस्थांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. पुढे सन १९२१ साली प्रसिद्ध मुर्तिकार कै. कृष्णा भागवत यांनी ग्रामस्थ व भाविकांच्या सहकारातुन मुर्तीची प्रतिस्थापना केली.
याच गुहेच्या वर एक मंदिर असावे म्हणुन १९५२ साली मंदिराचे काम सुरू केले परंतु अनेक अडी- अडचणी आल्याने हे अर्धवट काम बंद पडले. ते अर्धवट काम १९६४ सिद्ध मुर्तिकार व शिल्पकार श्री. शामाकांत भागवत यांच्या अथक सहकार्याने पुर्ण करून त्या वरील मंदिरात देखील मुर्तीची स्थापन करण्यात आली. सध्या गुहा आणि गुहेवर असलेले नविन मंदिर या दोन्ही ठिकाणी मुर्ती आहेत. आषाढी कार्तिकी एकादशीला ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य अशी यात्रा येथे साजरी केली जाते. या यात्रेस पुणे,नगर,मुंबई, ठाणे येथील जवळपास दोन लाखापर्यंत भाविक पंढरपूरला न जाऊ शकल्याने प्रति पंढरपूर म्हणुन येथे दर्शनासाठी रांगा लावत असतात. यात्रेकरूंची जेवणाची किंवा उपवासाची गैर सोय होऊ नये म्हणून येथे या दिवशी 3 टन खिचडी अन्नदान व प्रसाद म्हणून भाविकांना दिली जाते.
आज बांगरवाडी गाव व मंदिर परिसर धार्मिक व निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ म्हणून उदयास येत आहे.व ते जमीनीच्या आत कोरलेल्या पांडवकालीन लेणीत वसलेले आहे. गुप्त विठोबा मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. येथील परिसराची भेट घ्यायची झालीच तर आपणाकडे दोन दिवस वेळ असायला हवा. कारण जवळपास असलेली बेल्हे गावची नवाब गढी, संत ज्ञानेश्वर वेद प्रणित रेडा समाधी, जगातील एकोणीस पैकी असलेला आणे घाटातील नैसर्गिक पुल, आणे गावातील संत रंगदास स्वामी समाधी, तसेच नळावणे गावातील विविध ऐतिहासिक व निसर्ग संपदेच आपणास मुक्तपणे दर्शन घेण अगदीच सोपे जाते.
आज आधुनिक युगात येथे एक चांगलाच औद्योगिक विकास झालेला पहावयास मिळतो.त्यामुळे येणारा पर्यटक येथे आनंदाने सुखावलेला पहावयास मिळतो. आपणही एकदा एक ऐतिहासिक वारसा म्हणून भेट द्याल ना?

लेखक/ छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
संस्थापक- निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज, अँड्रॉइड अॅप, युट्यूब चायनल. मो.नं – 8390008370