All posts by श्री रमेश खरमाळे (माजी सैनिक)

कळमजाई मंदिर

निसर्गाची किमयाच न्यारी अस म्हणणे वावगे ठरणार नाही. निसर्गाशी जेवढी जवळीक साधण्याचा प्रयत्न कराल तेवढे आपणास निसर्ग दिल्या शिवाय राहत नाही. मी अनेकदा नाणेघाट ला जात असताना या फांगुळगव्हाण जवळील रस्त्याच्या पश्चिमेस असलेल हे कळमजाई मंदिर या मंदिराचा जिर्नोध्दर पुर्ण न झाल्याने ते रंगरंगोटी पासुन अपुर्ण अवस्थेत दिसुन येते. परंतु जेव्हा आज मी हे मंदिर पाहिले तर आश्चर्य वाटले कारण चक्क निसर्गाने बहाल केलेली ही हिरवीगार रंगोटीने या मंदिराला एक मोठी देणगीच तर दिली की काय असे वाटले.
छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )

केदारश्वराची गुहा (हरिश्चंद्रगड )…

केदारश्वराची गुहा : (हरिश्चंद्रगड )
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.
छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )

अतिशय सुंदर ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट किटक(शिवनेरी)….

शिवनेरी किल्ल्यावर आढळून आलेला अतिशय सुंदर ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट किटक. पाहताक्षणी आपले लक्ष वेधून घेतल्या शिवाय राहत नाही.

छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )

पुष्करणी…

पुष्करणी

विहिरीतील पाण्याच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी पायऱ्या असलेली विहिर. जुन्या काळी अशा विहिरी बांधण्याची पद्धत होती.राजस्थान मधील पुष्कर या गावी अश्या प्रकारची प्रथम विहिर बांधली गेली म्हणुन हे नांव पडले.
या बाबत अजुन आपणास माहीती देण्यास आनंद वाटतो की या पुष्करणी आपणास जुन्नर तालुक्यात किल्ले चावंड व हरिश्चंद्रगड येथे पहावयास मिळतात. यामध्ये एक खास विषेशता म्हणजे या पुष्करणी च्या पुर्व,पश्चिम आणि दक्षिणेस ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तीन देवतेची कोरीव शिळेतील चौरसाकृती व अतिशय सुंदर मंदीर उभारणी करण्यात आलेली आपणास आढळून येईल. चावंड किल्यावरील पुष्करणी आपण पहाल तर बर्‍याच गोष्टी आपणास समजतील. पुष्करणी ची रचना अभ्यासताना त्यामध्ये बांधण्यात आलेले पायरी मार्ग आपणास थेट तळापर्यंत घेऊन जातो.
याचे जिवंत उदाहरण पहावयाचे झाले आंबेगाव तालुक्यातील मंचर ते रांजणी गाव रस्त्या मार्गावर चांडोली ते थोरांदळे यांच्या मधल्या भागात जंगल आहे. चांडोलीकडुन निघालात तर आपल्या उजव्या हाताला जंगलात रस्त्यालगत 25 मी.अंतरावर एक जोगा विहीर दिसते त्या भागातील प्रसिद्ध विहीर आहे. ती नक्कीच एकदा पहा. म्हणजे आपणास आपल्या प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष निदर्शनातुनच मिळतील.
या पुष्करणी बांधण्याच्या पाठीमागील उद्देश अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात आपणास ऐकावयास मिळतो. काही ठिकाणी बोलतात येथे अंतराळातून येणार्या लहरी मनुष्यांवर पाॅजिटीव व शुद्ध विचार करण्यास प्रवृत्त करतात. आणि खरोखरच याची प्रचीती मला प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली.
मित्रांनो आपणास ही हा अगळावेगळा अनुभव घ्यायचा असेल व किल्ले भटकंतीची आवड असेल तर अंधश्रध्दा म्हणुन नाही तर एक अनुभव म्हणून किल्ले चावंड ला आवश्यक एकदातरी भेट द्याल अशी वेडी आशा व्यक्त करतो व लिहिण्यात काही चुक झाली असेल तर क्षमा मागतो.

साभार व छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )

हरीश्चंद्रगड कोकणकडा न्याहाळताना…

मित्रांनो लांबून जवळच शोधायच असत. तोच थोडासा प्रयत्न केला तर हरीश्चंद्रगड कोकणकडा न्याहाळताना नजर पलीकडच्या धुकेरी चादर ओढलेल्या निसर्गमय डोंगर रांगावर अचानक खेळु लागली. पुढील रांगा वाचु लागलो तर मढ पारगाव येथील मोठ्या थाटात आपल्या शक्तीच प्रदर्शन करणारा किल्ले सिंदोळा दृष्टीस पडला तशीच नजर उजव्या बाजूला फिरवली तर माळशेज घाट रस्त्याचा पहारेकरी उधळ्या डोंगर डोळ्यांत तेल घालून उभा असलेला भासला. त्या डोंगरावरुन कोरलेल्या डांबरी रस्त्यावरुन धावत असलेल्या गाड्यांचा ध्वनी अगदी अस्पष्ट कानी येत असल्याचे समजत होत. या दृष्टीने मन अगदी प्रसन्न झाले.

छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )

तारामती शिखरावरून जन्म धारण केलेली माता मळगंगा नदी…

हिच ती हरिश्चंद्रगडाच्या तारामती शिखरावरून जन्म धारण केलेली माता मळगंगा नदी. व तीचे हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दर्शन वाटेतु गुप्त करुन कातळातून तिच्या मार्गास कोरीव दिलेल एक उत्तम कलेच उदाहरण.

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर…

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :
तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.

‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.

छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश

कपर्दिकेश्वर (ओतुर)…

आज कपर्दिकेश्वर (ओतुर) दर्शनासाठी एस.टी स्टॅन्ड जवळील रस्त्याने जाताना श्रावणातील मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उभारलेली अनेक दुकाने श्रावण संपत आल्याने काढुन घेत असतानाचे दृष्य दृष्टीस पडत होते. भाविकांनी ओसंडून वाहत असलेले रस्ते निर्जन दिसत होते. किती महती असते या श्रावणातील सोमवारची व महिन्याची नाही का? त्याचे कारण व महती एवढी का असते ? लाखो भाविक येथे दर्शनासाठी का येतात जाणुन घ्यायला हवे की नाय? तर वाचा….
पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस जुन्नर तालुक्यात कल्याण नगर राज्य महामार्ग क्र.222 वर पुण्यापासून 100कि.मी अंतरावर वसलेले ऐतिहासिक ओतूर हे गाव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध झाले,ते येथील कपर्दिकेश्वर आणि बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधी स्थळामुळे. इ.स १३४७ मध्ये महाराष्ट्रात बहमनी राज्याची स्थापना झाली.त्यावेळी ओतूर गावाचा व जुन्नर परिसराचा समावेश बहमनी राज्यात होता.बहमनी राज्याच्या विघाटनानंतर निर्माण झालेल्या पाच सत्तां पैकी ओतूर परिसरावर निजामशाहिची सत्ता होती.१० नोव्हेम्बर १५६६ रोजीच्या एका फार्सी पत्रामध्ये ओतूर गावचा उल्लेख वोतूर असा आढळतो.
अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावाच्या उत्तरेस एक कि.मी. अंतरावर झाडाझुडपातून ,डोंगरदऱ्यातून खळाळत येणाऱ्या दाक्षिण वाहिनी चंद्रकोर ष पवित्र मांडवी नदीच्या तीरावर अतिशय निसर्गरम्य परिसरात मनमोहक भव्य श्री क्षेत्र कपर्दीकेश्वराचे मंदिर वसलीले आहे. या मंदिराचे देखने रूप पाहताक्षणी भक्तांचा थकवा दूर होतो.बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज संजीवनी समाधी मंदिर व संत तुकाराम महाराज मंदिर या त्रिस्थळी पवित्र स्थानामुळे पावन झालेले हे ठिकाण हवेहवेसे वाटनारे आहे.वारकरी सांप्रदायाचा “रामकृष्णहरि” हा मंत्रघोष याच ठिकाणी प्रथम दिला गेला,म्हणून या स्थानाला धर्मिकदृष्टया अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
उत्तमापूर हे गावचे प्राचीन नाव.या नावातच ओतूर गावाची प्राचीनता लक्षात येते.उत्तमापूर चा अपभ्रंश होत ओतूर हे नाव पुढे पुढे रूढ़ झाले.फार पूर्वीपासून मांडवी नदी किनारी वसलेले समृद्ध प्राचीन नगर आणि “स्वयंभू शिवलिंगाच्या” कपर्दीकेश्वर मंदिराच्या जागृत अशा ठिकाणाचा उल्लेख पुराणकालापासून होत आलेला आहे; परंतु हे स्थान खऱ्या अर्थाने प्रकाशात आले ते शिवलिंगावरील “कलात्मक” कोरड्या तांडळाच्या पिंडीमुळे आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना त्यांचे गुरु बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज यानी स्वप्नात येऊन अनुग्रह देऊन उपदेश केल्यामुळे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तपश्चर्येसाठी उत्तम असे ठिकाण म्हणून उल्लेख केलेला आहे. संतांची तपोभूमी म्हणून या ठिकानाला खूप महत्व असूनही पंढरपूर ,आळंदी ,देहू यांच्या तुलनेत ओतूर हे तीर्थक्षेत्राचे स्थान मात्र महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिलेले आहे.
कपर्दीकेश्वर या नावाविषयी एक आख्यायिका आहे. राघव चैतन्य स्वामींचा कार्यकाल १५ व्या शतकातील आहे. त्यांनी मांडवी नदीकिनारी घनदाट अरण्यात महर्षी व्यासांचे दर्शन व्हावे म्हणून कठोर साधनेद्वारे बारा वर्षे अनुष्ठान केले. येथील मांडवी नदीच्या तीरावर वाळूचे शिवलिंग तयार करीत असताना त्यांना एक कवाडी मिळाली. (संस्कृतमध्ये कवडीला कप्रदिक असे म्हणतात.) आपल्या तपश्चर्यचे फळ म्हणजे कवडी मिळाल्यामुळे. महाराज अतिशय दुःखी झाले. त्यांनी ती कवडी फोडली. त्यात एक अतिशय तेजस्वी, सुंदर स्वयंभु शिवलिंग मिळाले. महाराजांच्या प्रेरणेने या लिंगाचे कपर्दीकेश्वर हे नामकरण करुन या ठिकाणी लोकांनी मंदिर बांधले. तसेच नवव्या शतकातील शिलाघर राजवंशातील नववा झंझ या राजाने प्राचीन शिवलिंगावर सुंदर मंदिर उभारले होते. १२व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुध्दा या तपोभूमीचा उल्लेख केला आहे. यादव राजवटीच्या अस्तानंतर अनेक लहानमोठ्या टोळ्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. यात इराणच्या मुस्लीम टोळ्यांनी या भागात धुमाकूळ घालून खुप संपत्ती लुटण्याबरोबर या ठिकाणची मंदिरे देखील जमीनदोस्त केली. त्या काळात याच मांडवी तीरावर घनदाट जंगलात या प्राचीन व जागृत शिवलिंगाची स्थापना महर्षी व्यासांनी राघव चैतन्य महाराजांच्या हस्ते करून मंदिर उभारणी केली. मांडवी नदी ऋषिवर्य मांडव्य ॠषींच्या आश्रमापासून उगम पावून आपल्या दोन्ही किनाऱ्यांच्या पारिसरला विलोभनीयरीत्या सुशोभीत करीन या तीर्थक्षेत्राजवळ येऊन दाक्षिणवाहिनी चंद्राकार घेऊन संथपणे आजही वाहत आहे. याच पवित्र ठिकाणी बाबाजी ऊर्फ केशव चैतन्य महाराजांनी गुरुवार वैशाख शु. द्वादशी इ.स.१५७१ रोजी वयाच्या ४७व्या वर्षी ओतुर येथे संजीवन समाधी घेतली. ठिकाणी संत चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश करून अनुग्रह देत ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र दिला. या मंत्राचा जप आज जगभर होताना आढळतो. चैतन्यांच्या संजीवन समाधीवर वाढलेले वारुळ हे नैसर्गिक असून, दगड किंवा विटांचा यात समावेश नसूनसुद्धा शेकडो वर्षे होऊनही या समाधीची एक कण माती सुद्धा वेगळी झाली नाही. १९५३ साली गावकऱ्यांनी एकत्र येऊन कपर्दीकेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि १९५८ साली मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. तसेच चैतन्यस्वामी समाधी स्थानावर मंदिर बंधण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम महाराजांचे भव्य असे मंदिर देहु व ओतुर या दोनच ठिकाणी आहे.

टिप – सर्व छायाचित्रे रात्री टिपलेली आहेत.

छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )

मित्रांनो ओळखलत का?

मित्रांनो ओळखलत का?
लाखो भाविक व लाखो पर्यटक तसेच लाखो क्लायंबर व गिर्यारोहक प्रत्येक वर्षी व प्रत्येक ऋतूत या ठिकाणास रात्री व दिवसा वेगवेगळ्या अनुभवासाठी येथे भेट देत असतात त्याच ठिकाणातील मन आकर्षित करणार त्यापैकी असलेल हे ठिकाण म्हणजेच हरिश्चंद्रगडावर असलेली पुष्करणी. कालच या ठिकाणास भेट दिली. ती वेळ पण खुप महत्वाची ठरली कारण पुष्करणीत उतरलेल्या तारामती शिखराचे लावण्य पाहण्याची संधी व मनातील उत्साहाचे लाभलेल वैभव पहावयास मिळेल याची कल्पना पण केली नव्हती.
संपूर्ण डोंगर रांगच येथे स्नान करण्याचा आनंद घेत आहे की काय अस वाटत होत. खुप वेळ या वैभवाचा भोग घेत बसलो होतो. त्याच देखाव्याचे दर्शन आपणास घडाव म्हणून घेतलेले हे एक अप्रतिम छायाचित्र.

छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद

हरिश्चंद्रगडाच्या कातळ कोरीव लेणीत…

हरिश्चंद्रगडाच्या कातळ कोरीव लेणीत आवाढव्य कोरीव विराजमान श्री गणेश.

छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )