हि छायाचित्र चीन देशातील नसुन आपल्याच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहेत बरं का?
किल्ले हरीहरचा चित्तथरारक अनुभव इतिहास व माहितीसह
रात्री झोपायला 11:00 वाजले होते. प्रथमच मी मित्र श्री. प्रमोद अहिरे सरांकडे नाशिकला आलो होतो. वयाची 55 वी गाठलेल्या हया ग्रहस्थांची माझी भेट जुन्नर भटकंतीत झाली होती. भटके म्हटले की लवकरच मैत्री बनते व ती सह्याद्री सारखी अफाट पसरली जाते. कारण या भटक्यांची भेट कोणत्या ना कोणत्या तरी सह्याद्री रांगेवर निश्चित होतच असते. आम्ही तीघे सकाळी 5:00 वाजता नाशिक मधुन किल्ले हरीहरकडे पावसाच्या सरींच्या स्वागतामध्ये चारचाकीतुन प्रस्थान केले होते. लवकरात लवकर किल्ले हरीहर दर्शन पुर्ण करून पुढे किल्ले ब्रम्हगीरी व किल्ले रामशेज पहायचे नियोजन होते. त्रंबकेश्वर आता मागे टाकत पुढे मुख्य रस्त्यावर उजवीकडे वळण घेत ब्रम्हगीरीला वळसा घेत जणु प्रदिक्षणा चालू केली होती. तीन कि.मी अंतरा नंतर एक घाटवाट चढण्यास आम्ही सुरूवात केली होती. नैसर्गिक सौंदर्य पाहण्यात मी आणि चिन्मय गुंग होऊन गेलो होतो. चारचाकी चढाला लागली होती. ब्रम्हगीरीच्या उत्तरेला असलेल्या तलावाचे दृश्य उंचावरून खुपच मनमोहक दिसुन येत होत. त्या हिरव्यागार गालीचा पांघरलेल्या ब्रम्हगिरीच्या रूद्र रांगा आता सजलेल्या नवरीच्या सौंदर्याला लाजवेल अशा नेत्रदीपक दिसत होत्या.
तलावाच्या पाण्यात ब्रम्हगीरीचे दिसणारे प्रतिबिंब ब्रम्हदेव तलावात स्नानासाठी उतरल्याचा भास करत होते. ते सौंदर्य न्याहाळताच मी आहिरे सरांना चारचाकी थांबविण्याची मी विनंती केली. कारण हे दृष्य एवढे विलोभनीय होते की ते मी वाचकांनीपण पहावे व आपल्या डोळ्यांसमोर ब्रम्हगीरी प्रत्यक्ष छायाचित्राद्वरे उभा रहावा म्हणून टिपले. आता आम्ही डोंगर माथ्यावरून पश्चिमेस उतरणीला लागलो होतो. वेडी वाकडी वळणे घेत आमचा प्रवास किल्ले हरिहरच्या दिशेने चालू होता. वेळ सकाळची असल्याने व जंगल परीसरातून प्रवास असल्याने जंगली प्राणी गाडीखाली येवू नये व अपघात घडू नये म्हणून सरांना गाडी हळू घ्या म्हणजे आपणास कदाचित प्राण्यांचे दर्शनही घडेल म्हणुन विनंती केली. एवढे वाक्य पुर्ण होताच क्षणी आमच्या समोर तरस प्राणी रस्त्या ओलांडताना आमच्या निदर्शनास पडला. हे लाईव्ह दृश्य आज प्रथमतःच चिन्मय व आहिरे सर पाहत होते. हे दृष्य पाहताना त्यांच्या चेहर्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. पुढे तीन कि.मी अंतरानंतर मुख्य रस्ता सोडत आम्ही डावीकडे वळण घेतले.
समोर आडव्या पसरलेल्या डोंगररांगा अद्याप ही झोपेतून उठलेल्या दिसत नव्हत्या कारण धुक्याची चादर त्यांच्या तोंडावर अद्यापही ओढलेलीच होती. रस्त्यावरील खड्डे चुकवत आम्ही हर्षवाडीला पोहचलो. ग्रामपंचायत कळमुस्ते असलेल्या हर्षवाडीला ऐतिहासिक वारसा लाभला तो येथील किल्ले हरिहरचा. 20 घरे असलेली व सह्याद्रीच्या पोटात चारही बाजूंनी वेढलेली ही वाडी ही तर नटून थटून बसलेल्या नवरी सारखीच मला भासली. किल्ले हरीहरने रोजगाराची संधी निर्माण केलेल्या एका हाॅटेल जवळ चारचाकी पार्क करत खाली उतरलो. अंगाला सकाळची बोचरी थंडी जानवत होती. 7:00 वाजता आम्ही येथे पोहचलो होतो. आर्धी हर्षवाडी तर अद्यापही झोपेतच होती. येथेच आहिरे सर खाली थांबणार होते. सोबतीला गाईड घेऊन आम्ही किल्ले हरीहरवर चढाई करणार होतो. 80 वर्ष ओलांडलेली व्यक्ती हाॅटेलातुन बाहेर येत आमची विचारणा करू लागली. चहा मिळेल का म्हणताच हो म्हटले. व गाईड हवाय म्हटले तर समोरच्या घराकडे गेले. चहाची शेवटची चुस्की घेत गाईड सोबत आम्ही पावसात अंघोळ करत असलेल्या किल्ले हरीहरकडे चालु लागलो. अद्यापही किल्ले हरीहरचे धुक्यामुळे आम्हाला दर्शन घडले नव्हते. आज तो आमच्या सोबत लपाछपीचे खेळ खेळत होता. त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी डोळे आसुसले होते. खळखळ वाहणारा हर्ष ओढा आमचे स्वागत करताना भासत होता. किल्ले हरीहरचा इतिहास डोळ्यासमोर येत होता. हरिहर किल्ला उर्फ हर्षगड हा नाशिक जिल्ह्यातील एकेकाळी खुप महत्वाचा हा किल्ला होता. हा किल्ला सातवाहन काळातील स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून हा किल्ला यादवांनी बांधून घेतलाय असा उल्लेख सरकारी कागदपत्रात असल्याचे वाचनात होते. किल्याची उंची समुद्र सपाटीपासून.११२०.४४ मीटर (३६७६ फूट) प्रकार : गिरीदुर्ग श्रेणी : सोपी ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र ,जवळचे गाव : हर्षवाडी, त्र्यंबकेश्वर डोंगर रांग : सह्याद्री हे मनोमन गिरवत चाललो होतो. किल्ले पायथ्याला लागलो होतो. पावसाच्या धारा सुरू झाल्या होत्या. जंगलातून चिखलातून पायवाट तुडवत चढाईला प्रारंभ केला होता पावलागणिक किल्याचा इतिहास आठवू लागला होता. त्याकाळी हरिहर किल्ला अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. श्री शहाजीराजे भोसले यांनी १६३६ साली शेजारी असलेला त्र्यंबकगडासोबत हरिहर किल्ला पण जिंकून घेतला होता. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढं १६७० मध्ये पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यानं हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला होता. नंतर ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बर खान याने हरिहर जिंकून घेतला. पुढं १७०० मध्ये मराठ्यांनी परत हरीहर घेतला. नंतर १८१८ मध्ये इंग्रजांच्या मराठेशाही बुडवूण्याच्या लढाईत इंग्रज अधिकारी कॅप्टन बेन्जामीन स्पूनर ब्रिंग्ज्स याने हरिहर जिंकून घेतला हा कॅप्टन बेन्जामीन ब्रिंग्ज्स प्रत्येक गडाच्या पायथ्याच्या पायऱ्या उद्ध्वस्त करणारा क्रुर व्यक्ती या पायऱ्या पाहून मोहीत झाला त्यामुळे त्याने ह्या सुंदर पायऱ्यांच्या वाटेला धक्काच लावला नाही. यावरून पायऱ्यांचा आकर्षकपणा किती मनमोहक आहे याचा अंदाज येतो. यामागील कार्यवाहीत त्यानं अलंग-मलंग-कुलंग गड, सिद्धगड, पदरगड, औंढा आणि गडगडा या किल्ल्यांच्या पायऱ्यांची मोडतोड केली होती. असा हा विविध प्रकारची मालिकी अनुभवनारा नाशिक जिल्ह्यातील हरिहर हा महत्वाचा किल्ला मानला जात होता. इतिहास आठवतच मी प्रथम टप्पा असलेल्या छोट्या माळरानावर पोहचलो. गाईड सोमनाथने या माळाची ओळख चिर्याची माळी म्हणुन करून दिली. या माळरानावरून आम्ही डाव्या बाजूला गेलेल्या पाऊलवाटेने चालु लागलो. अगदी जवळच एक कुंड निदर्शनास पडले. या कुंडातील भींतीत शिल्पावर कोरलेला शिलालेख होता
श्री श्री गणेशाय नम: ——तिथौशुक्ल——त: श्रीमान्नारायाणा—-गिरि—-सु—-क्त–सातशालीवाहो—-पनामा—-हरिहर—विलसद्देवता—केसुतीर्थमा—-धि-ण्यार्त–लोकश्रमनिर—हैसते—-श्रेय—-सो—-मंगलाय ll१ll
याच शिलालेख असलेल्या भिंतीच्या माथ्याच्या पाठीमागे शेजारीच थोड वर चढून गेल्यावर मारुती मंदिर निदर्शनास पडले मारूतीचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा माघारी फिरलो. आम्ही पुन्हा जेथून डावीकडे वळन घेतले होते येथुन किल्ला सर करण्यासाठी सुरूवात केली. पुन्हा आम्ही धुक्यात हरवलेल्या वाटेने चालू लागलो. हर्षवाडी ला पोहचण्याच्या वाटा गाईड सोमनाथला विचारू लागलो त्याने दोन मार्ग सुचवले.
१) नाशिक-त्रंबकरोड-मोखाडारोड-हर्षवाडी-हरिहर पायथा (४८ कि.मी.)
२) इगतपुरी-घोटी-त्रंबकरोड-कोटमपाडा-हरिहर पायथा (४८ कि.मी.) हे दोन्ही रस्ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. बोलता बोलता आम्ही उघड्यावर असलेल्या वेताळ देवस्थानापाशी पोहचलो. या ठिकाणी छोटीशी हाॅटेल आहे येथे पोहचलो. पाऊस येथे जोराचा येऊ लागला होता. पुढील दोन किल्ले पुर्ण करायचे असल्याने बसून चालणार नव्हते. आम्ही समोर चढाईला चालू लागलो. येथे मात्र पाऊसात चढाई करताना दमछाक होत होती. हवा मात्र खुपच जोराची वाहू लागली होती. पुढे पाऊल टाकताना हवा पुन्हा मागे ढकलत होती. सहज या चढाईच्या ठिकाणाचे नाव सोमनाथला विचारले तेव्हा समजले की या छोटय़ा टेकडीला “म्हातारी” म्हणतात. हे शब्द ऐकताच थोडे आश्चर्य वाटले परंतु हे नाव का देण्यात आले असावे याचा अर्थ उलगडून गेला. कारण हवेचा दबाव या ठिकाणी शरीरावर एवढ्या जोरात असतो की मनुष्य प्रयत्न करून सुध्दा झप झप न चालता अगदी म्हातारी जशी लटपटत चालते अगदी तसाच चालतो.
धुक्यांच्या लाटातुन समोरच्या पाय-यांचे दृश्य अस्पष्ट दिसून येत होते. आम्ही आता पाय-यांच्या खालच्या टप्यावर पोहचलो होतो. पायरीमार्ग कधी पाहिल असे झाले होते. खालच्या हाॅटेल टपरीपासून आम्ही झपझप वर चढून आलो व समोरचे दृश्य पाहून आपोआप ओठ हालले व कंठातून शब्द बाहेर फेकले गेले होते ते इंग्रज अधिकारी कॅप्टन बेन्जामीन स्पूनर ब्रिंग्ज्स यांच्या भाषेतच wow. हा इंग्रज ब्रिंग्ज्स या पाय-यांच्या प्रेमात खरच पडला असेल का? या प्रश्नांचे उत्तर समोरच होत. 45 मिनीटे जवळपास छायाचित्रे टिपण्यासाठी आम्ही त्या तेज वाहणाऱ्या व पडत असलेल्या पावसाचा सामना करत उभे होतो. धुक्याच्या गर्द अशा लाटेमुळे छायाचित्रे काढणे कठीण वाटत होते. शेवटी अट्टाहास सोडत जशी छायाचित्रे जमतील तशी घेत पा-यांवरच्या वाहणाऱ्या पाण्यात आमचा किल्ला सर करायचा प्रयत्न सुरू झाला. प्रथम पायरीवर पाय ठेवत आम्ही पाय-यांच्या पृष्ठभागावर दोन्ही बाजूला कोरलेल्या खोबण्यात हाताची बोटे खुपसत वर चढू लागलो. प्रचंड वेगाने वाहणारा वारा जणू आम्हाला त्या खोल खाईत लोटतो की काय असे वाटत होते. हा विचार करत असतानाच त्या वा-याची साथ देण्यासाठी धो धो पाऊस कोसळू लागला होता. क्षणात दिसणा-या पाय-यांनी तेज पाण्याने भरून वाहण-या ओढ्याचे रूप धारण केले होते, तरीही आम्ही न डगमगता त्या प्रसंगाला तोंड देत चढाई करत होतो. तोंडात ते वाहते पाणी जात होते. 90 डिग्री मध्ये कोरलेल्या त्या पायर्या चढताना यमदूत भासू लागल्या होत्या. आतातर कहरच झाला होता धुक्याने संपूर्ण सफेद चादर ओढण्यास सुरुवात केली होती. जवळ असलेल्या दोन तीन पाय-याच फक्त त्या धुक्यात दिसत होत्या. आम्ही किती उंचावर आहोत हे मात्र धुक्यामुळे समजत नव्हते. किल्ला हरीहर पाहण्याचे स्वप्न पूर्ण होणार ही आशा आमच्या प्रोत्साहनात भर घालत दिलासा देत होती. शेवटी सह्याद्री रांगा व गडकोट यांच्याशी जडलेली घनिष्ठ मैत्रीचा विजय झाला व आम्ही किल्ले हरीहरच्या भगव्या रंगाने सजवलेल्या प्रवेद्वारापाशी पोहचलो. देशासाठी सुवर्णपदक पटकाविलेल्या खेळाडूच्या ह्रदयातुन जसे आनंदाचे फवारे उफाळून येतात तसाच आनंद आमच्या ह्रदयातुन उफाळून आला होता.
पाऊस थांबला होता पाय-यांचे चित्र व ती खाई स्पष्ट दिसत होती. यावेळी समोर कातळातून (खडकातून) कोरलेल्या पायऱ्यांचे या गडाचे विषेश आकर्षण का आहे हे दिसत होते. जवळपास एक पायरी २.४ फूट असावी. अशा या पायऱ्यांची लांबी सुमारे ६०.९६ मीटर म्हणजे २०० फूट चढण्यासाठी व उतरण्यासाठी होती. चढाई सोपी व्हावी व भक्कम आधार मिळावा म्हणून प्रत्येक पायरीवर खोबणी (खाचे) बनवले गेले आहेत. चढाई करून गेल्यावर गडाचा पहिला मुख्य दरवाजा की ज्या ठिकाणी आम्ही उभे होतो तो आपल्या मजबूतीची साक्ष देत आजही तगधरुन उभा होता. जणूकाही तो आमचे व येणाऱ्या पर्यटकांचे स्वागतच करण्यासाठी टिकून आहे की काय? असा भास होतो. थोडा वेळ ते सौंदर्य न्याहाळत आम्ही पुन्हा चढाईला लागलो. समोर पुढं ७० ते ८० फूट कातळातून सपाट कोरलेली वाट आहे या काळाच्या डाव्याबाजूचे परीसर दृश्य पाहून पर्यटक थक्क होत असावेत अस वाटत. हे दृश्य धुक्यामुळे पाहता न येणे हेच आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. सपाट भाग संपताच पुन्हा कातळात कोरलेल्या जागिचवर भुयारी मार्ग पाय-या दिसतात व तिथंच किल्याचा दुसरा दरवाजा नजरेत पडतो. पुढं खडकातून कोरलेल्या पाय-या नागमोडी वळणे घेत तिसऱ्या दरवाजा पाशी येतात. दरवाजाचं बांधकाम जरा ढासळलेले निदर्शनास पडते. याच दरवाजा शेजारीच एक गुहा निदर्शनास पडते. त्यात उतरण्यासाठी दोरी असली पाहिजे. व पावसाळ्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये. हा दरवाजा पार केल्यावर आपण थेट किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. पठाराचा आकार त्रिकोणी असल्याचे वाचनात होत परंतु तो आकार धुक्यामुळे पाहता येन शक्य नव्हते. पठारावर खडकात कोरलेली पाच पाण्याची टाके, एक मोठा तलाव आहे त्यासमोर हनुमान मंदिर आहे. थोडं पुढे गेल्यावर उजवीकडे दारूचे कोठार आहे आजही छप्परसह सुस्थितीत असल्याचे दिसून येते खरे परंतु काही निर्लज्ज पर्यटकांनी बापाची जहागिरदारी समजून त्या भिंतीवर नावे टाकून त्याचे विद्पीकरण केल्याचे दिसते. डाव्याबाजूला छोटं तळं आहे. या गडाच्या बालेकिल्यावरून वैतरणा धरण, त्र्यंबकगड, फणाडोंगर, भास्करगड, कावनई, त्रिंगलवाडी हे गडकिल्ले फार आकर्षक दिसतात अस वाचनात होते परंतु धुक्याने आम्हाला ते दर्शन घेता आले नाही. हा गड सर करण्यासाठी आमचा कालावधी :
हर्षवाडी पासून 3 तास पावसाळ्यात लागतो तर इतर वेळी हा किल्ला सहज 1:30 किंवा 2 तासात सर होऊ शकतो. किल्यावर राहण्याचीसोय : फक्त दारूच्या कोठारातच होऊ शकते. वर किल्यावर जेवणाचीसोय नसल्याने भाकर बांधून न्यावी. सोबत पाणी ठेवले तर उत्तमच नसेल तर गडावरील टाके व तळे आहेतच. कडक उन्हाळ्यात पाणी सोबत न्यावे लागत असावे असे वाटते.
आम्ही सर्व गोष्टींचा साठा डोक्यात साठवून पुन्हा उतरणीला लागलो होतो. पावसाने पुन्हा हजेरी लावली होती. नंबर 3 दरवाजातून उतरताना पाय-या वरून पुन्हा पाण्याच्या लोटांचा सामना करत आम्ही दोन नंबर दरवाजापाशी पोहचलो. तेथून पुन्हा एक नंबर दरवाजा पाशी येऊन थांबलो होतो. पाय-यांवरून पाण्यात उतरने धोक्याचे होते म्हणून वेट करत थांबलो. परतीला पुन्हा दोन किल्ले पहायचे होते. धोका टळला होता. किल्याच्या आठवणींना उजाळा देत आम्ही झपझप उतरत केव्हा हर्षवाडीत पोहचलो समजलेच नाही. घड्याळ 11:00 ची वेळ दाखवत होते. चारचाकीत बसत आम्ही ब्रम्हगीरीकडे प्रस्थान केले ते या किल्ले हरीहरच्या दर्शनाच्या आठवणीतच. एक निश्चित सल्ला द्यावासा वाटतो की भर पावसात हा किल्ला सर करणे धोक्याचे आहे.
हे वैभव आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढील आमचा चायनलवर पाहु शकता. YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G
लेखक/छायाचित्र – श्री खरमाळे रमेश
शिवनेरी भुषण
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – वनविभाग जुन्नर
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
सदस्य :- रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी
विकसित अंड्राॅईड अॅप- निसर्ग रम्य जुन्नर तालुका अँड्रॉइड अँप डाऊनलोड करीता लिंक खालील प्रमाणे देत आहोत. त्यावर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details…