अमृतेश्वर रतनवाडी

अमृतेश्वर रतनवाडी 
नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेने हा भाग समृद्ध आहे. याच ठिकाणीच्या भटकंतीसाठी आज जुन्नरहुन ब्राम्हणवाडा, कोतुळ, राजुर मार्गे सांदण दरीकडे सकाळी 11:30 निघालो होतो. सर्व भुभाग सौंदर्य टिपताना भांडारदरा धरण किणा-याने सांब्रद कडे चाललो होतो. अचानकच सोबत करणारे विनोद तारू सर बोलले सर थांबा ही रतनवाडी आहे व येथेल अमृतेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जाऊया. मी नको म्हणत होतो. कारण तीन वाजले होते व पुढे सांदण दरी पहायला रात्र होणार होती. परंतु येथून सांदण दरी पुढे आठ कि.मी अंतरावर होती. मी संतोष बिरादार व अक्षय साळुंके या परिसरात प्रथमच पाऊल ठेवले होते. रतनवाडी लागताच रस्त्याच्या उजव्या बाजूला मला पुष्करणी निदर्शनास पडली व नकळतच शब्द पुटपुटलो थांबा.
भटक्यांना सदैव आकर्षण ठरणारा भाग म्हणजे सह्याद्री व याच रांगेत वसलेले भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेने हा भाग समृद्ध आहे. या मांदियाळीतच रतनवाडीचे अमृतेश्वराचे कोरीव मंदिर भटक्यांची प्रथमदर्शी पावले पडताच आकर्षित करते.
अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर, रंधा धबधबा ही स्थळे आता पर्यटकांच्या चांगल्याच परिचयाची बनली आहेत. पण या भागाचे खरे सौंदर्य हे या धरणाच्या पल्याडच्या भागात दडले आहे. घाटमाथ्यालगतच्या या भागात उंच डोंगररांगांनी एक वेटोळेच घातले आहे . आकाशाला भिडलेल्या उंच पर्वत-सुळके फना काढताना दिसता. कोकणात कोसळणारे खोल कडे, अनेक घाटवाटा, रतन, अलंग, कुलंग आणि मदन सारखे गडकोट, सर्वोच्च स्थानी विसावलेली ती कळसुबाई, या साऱ्यांवर पसरलेली दाट वनसंपदा, जीवसृष्टी, छोटी-छोटी आदिवासी खेडी, त्यांची संस्कृती आणि या साऱ्यांवर लक्ष ठेवून मधोमध विसावलेला तो रतनवाडीचा अमृतेश्वर!

रतनवाडी पुण्याहून २००, मुंबईहून १८० तर जुन्नरहुन 101 किलोमीटरवर आहे. या दोन्ही ठिकाणांहून भंडारदऱ्यापर्यंत थेट एसटी बससेवा आहेत पण तुरळक प्रमाणात. या भंडारदऱ्याच्या जलाशय पाहिले की शरीरावर आलेल्या थकावटीचे सावट क्षणात दुर होते. जलाशयाभोवतीचा डोंगरदऱ्यांचा आपण खेळ समोर पाहत उभा राहतो व ते सर्व विसरुनच . खरेतर हाच भाग हिंडण्या-फिरण्याचा, निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा, इथला इतिहास जागवणारा. या देखाव्यात शिरायचे असेल, तर धरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने गेलेल्या वाटांवर स्वार व्हावे. या दोन्ही वाटा बरोबर मध्यावर असलेल्या घाटावरच्या घाटघरला जाऊन मिळतात. यातल्या डाव्या हाताच्या वाटेवर आहे रतनवाडी आणि या वाडीत दडले आहे एक देखणे कातळशिल्प अमृतेश्वर! भंडारदरा ते रतनवाडी हे अंतर आहे वीस किलोमीटर. वाडीपर्यंत एसटी बसही धावते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा हा भाग आहे. वाडीकडे निघालो, की सुरुवातीला पाबरगड, घनचक्कर हे ओळखीचे डोंगर हाक देतात. त्यांच्या नंतर मग रतनगड उगवतो त्याच्या त्या खुट्टा नावाच्या सुळक्याला घेत. या खालीच गडाची रतनवाडी. तसे वाडीत येण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. भंडारदऱ्याहून धरणाच्या आतील भागात ये-जा करण्यासाठी लाँच-बोटी धावतात. यातील एकात बसायचे आणि आपल्या भाषेत रतनवाडीचा स्टॉप सांगायचा. कुठल्याही मार्गे आलो, तरी या भागाला पाय लागण्यापूर्वी त्या निळय़ा जलाशयाच्या पार्श्वभुमीच्या काठावरचा अमृतेश्वर, मागची छोटीशी रतनवाडी, त्यामागचा रतनगड, त्याच्या शेजारचा खुट्टा हे सारे निसर्गचित्र पाहणाऱ्याला गुंतवून टाकते. यातून त्या अमृतेश्वराबद्दलची उत्कंठा वाढते आणि मग या धुंदीतच त्या कोरीव वास्तू प्राकाराला आपण सामोरे जातो.
जलाशयाच्या काठावर एखाद्या गायीने पाय दुमडून बसावे तसे हे मंदिर दूरवरून दिसते. जवळ जाऊ तसे त्याचे कोरीव देखणेपण, सुडोल रचना मन खेचू लागते. नंदीमंडप, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. मंदिर वास्तुशैलीतील हे नवलविशेष याच भागातील सिद्धेश्वर (अकोले), हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड) येथेही पाहण्यास मिळते. या आगळय़ा शैलीमुळे नंदीमंडपातून गाभारा आणि त्यानंतर सभामंडप असा आपला प्रवास होतो. आत शिरताच इथले कोरीवपण आपला ताबा घेते. नक्षीदार खांब, कोरीव प्रवेशद्वारे, बाह्य़ भिंतीवरील विविध भौमितीक रचना, आतील भिंतीवरील मूर्तिकाम, छतावरील शिल्पपट हे सारे एकेक करत मंत्रमुग्ध करू लागते. या साऱ्यांवर पुन्हा ते यक्ष, अप्सरा, गंधर्व स्वार झालेले असतात. देव, दानव आणि नरांनीही इथे आपआपली जागा पटकावलेली असते. मैथुन शिल्पेही इथे आहेत. यातील तो समुद्रमंथनाचा देखावा तर अवश्य पाहावा असाच. आतील स्तंभ भरजरी आहेत. गर्भगृहाच्या दारी कीर्तिमुख, शंख, कमळवेलींच्या पायघडय़ा घातल्या आहेत. मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळय़ांची रचना केलेली आहे. सारेच विलक्षण! एखादा लेण्यात फिरल्यासारखे!!
या मंदिराचे शिखरही तेवढेच कोरीव, श्रीमंत! जाळीदार नक्षीचे उभे थर, त्यावर पुन्हा शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृतींची रचना, समोरच्या बाजूस शूकनास..प्राचीन स्थापत्यातील ‘नागर शैली’ अमृतेश्वराच्या देहबोलीवर जागोजोगी विसावलेली. या साऱ्या सौंदर्याचे रसपान करता करता आपल्याच मनाचा गोंधळ उडतो. मग अशा या गोंधळलेल्या अवस्थेतच अमृतेश्वराचे दर्शन घ्यायचे. खरेतर अमृतेश्वराची ही शिवपिंडीही कोरीव अशा पाच थरांपासून बनवलेली होती. पण कुणाच्या तरी डोक्यात खुळ आले आणि त्यांनी देव जुना झाला म्हणून हे दगड बाजूला करत त्या जागी नव्या शिवलिंगाची स्थापला केली. अमृतेश्वराचे दर्शन घेत पुन्हा बाहेर येत त्याच्यावर प्रेमाने नजर फिरवावी. या राईत एखादे रानफुल उमलावे तसे हे मंदिर भासते. त्या जलाशयाच्या काठावर आणि या कोरीव शिल्पासवे खूप सुखद, शांत आणि समृद्ध वाटू लागते. वैशाखाचे तप्त ऊन खात आलेल्या पावलांचा सारा क्षीण नाहीसा होतो. अमृतेश्वराचे दर्शन झाले तरी खरे ‘अमृत’ मात्र अजून आपल्या प्रतीक्षेत असते. मंदिरातून वाडीच्या दिशेने निघावे. शेतीवाडीतून जाणाऱ्या या वाटेवर थोडे अंतर गेलो, की जमिनीलगत साकारलेली एक जलवास्तू तिच्या सौंदर्यात बुडवून टाकते. पुष्करणी! नावाप्रमाणेच सुंदर! आपल्याकडे आड, विहीर, तलाव, तळी, टाकी अशी पाण्याशी नाते सांगणाऱ्या अनेक वास्तू आहेत. या साऱ्यांतील देखणी, कोरीव श्रीमंती लाभलेली वास्तू म्हणजे पुष्करणी! देवांचा सहवास लाभलेली ही जलवास्तूची निर्मितीही त्या देवांसाठी. प्राचीन मंदिराच्या भवतालात ही अशी पुष्करणी हमखास दिसणार. या पुष्करणीची निर्मितीही या अमृतेश्वराच्या रहाळात झालेली. सौंदर्य आणि पावित्र्य यांचा एकत्रित मिलाफ असलेला मंदिरानंतरचा हा दुसरा वास्तुप्रकार. त्याच्या ‘पुष्करणी’ या शब्दाएवढाच दुर्मिळ!

अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद. जमिनीलगत कोरीव, आखीव-रेखीव अशी तिची रचना. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या. आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले. भोवतीच्या भिंतीत सालंकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली. त्यांच्या डोईवर पुन्हा छोटय़ा-छोटय़ा कोरीव शिखरांची रचना. या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार विसावलेले. ही सर्वच शिल्पे पुन्हा सालंकृत. ही जलवास्तू जेवढी देखणी, तितक्याच नितळ पाण्याचीही तिला साथ मिळालेली. यामुळे की काय अमृतेश्वराच्या त्या भव्य शैल मंदिराने जसे सारे अवकाश व्यापल्यासारखे वाटते तेच सारे निळे रंग इथे या पाण्यावर विश्रांतीला आल्यासारखे वाटतात. कुठल्याही स्थापत्याला असे निसर्गाचे कोंदण मिळाले, की ते अजून खुलते. प्रसन्न होते. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. या कथांमधून बाहेर येत खरा इतिहास शोधू लागलो, की आपल्याला दहाव्या शतकातील झंज नावाच्या राजाजवळ येऊन थांबावे लागते. या झंज राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थळी एकेका सुंदर शिवालयाची निर्मिती केली. यातील प्रवरा नदीच्या उमगस्थळीचे हे अमृतेश्वर!

पूर्वजांच्या या कलासक्तीचे कधी-कधी खूप कौतुक वाटते. ..आज हजार एक वर्षे उलटून गेली. काळही बराच पुढे सरकला. इथले हे निर्माणही आता एक इतिहास झाला. इथल्याच निसर्गाचा एक भाग बनला. अगदी त्या डोंगर-झाडी, निर्झर पाण्याप्रमाणे..!
हे सर्व न्याहाळत आम्ही सांदण दरीकडे मार्गस्थ झालो.
(अभिजीत बेल्हेकर यांच्या लेखाचा आधार घेऊन हा लेख लिहिला आहे )
लेखक / छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश 
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .