लेण्याद्री (जुन्नर)गणेश लेणी समुह

लेण्याद्री (जुन्नर)गणेश लेणी समुह

जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे. व याच रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौध्द कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. संपूर्ण देशांत शैलगृहांमध्ये जुन्नर तालुक्यातील गुंफा (लेणी) समुह सर्वात मोठा असून येथील शैलगृहांची संख्या जवळपास 350 इतकी आहे. येथील जवळपास सर्व बौद्ध गुंफा (लेणी) हीनयान (थेरवाद)परंपरेतील आहेत. या शैलगृहांची निर्मिती इ.स.पुर्व 1ल्या ते 3र्या शतकात झाली. जुन्नर तालुक्यातील गुंफा(लेणी) समुह त्यांच्या निर्मिती व स्थानानुसार वेगवेगळ्या भागात व गटात विभागलेले आहेत. जसे की तुळजा लेणी, मानमोडी, भिमाशंकर,अंबा अंबिका, भुतलेणी,शिवनेरी,गणेश, चावंड, जीवधन,नाणेघाट,हडसर,निमगीरी,खिरेश्वरलेणी या गटात व विभागात विभागलेल्या आहेत.
शिलालेखात ‘कपिचित’ म्हणजेच माकडांचे आवडते ठिकाण अशा उल्लेखलेल्या लेण्याद्री गटाला ‘गणेश पहाड’ व सुलेमान डोंगर अशी नावे असून हा एक प्रमुख वेगळाच गट आहे. या ठिकाणी 40 शैलगृह असून मुख्य 30 शैलगृह पुर्व-पश्चिम रांगेत दक्षिणेकडील जुन्नर शहराकडे तोंड करून आहेत. या 30 शैलगृहांपैकी गुंफा क्र. 6 व 14 हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत.या पैकी गुंफा क्र.7 हा सर्वात मोठा( प्रशस्त )विहार आहे. बाकिच्या इतर गुंफा(लेणी) विहार लहान असुन काही दोन ते तीन भागात विभागलेल्या दिसतात. या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असाच गणला गेला आहे. गुफा क्र. 6 हे या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे. दर्शनी भागात स्तंभ असलेला व्हरंडा असून चापाकृती विधानातील प्रार्थनामंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे. छत गजपृष्ठाकार आहे. गौतम बुद्धाचे प्रतीक असलेला स्तुप मंडपाच्या शेवटच्या भागात आहे. इ.सन 2 र्या शतकातील एक शिलालेख व्हरांड्यातील आतल्या भिंतीवर द्वारकमानिवर कोरलेला आहे. या शिलालेखात ‘सुलसदत्त, ह्या कल्याण येथील सोनाराच्या मुलाने दिलेल्या दानाचा उल्लेख केला आहे. गुंफा क्र. 7 ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा(विहार) आहे.
विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असुन तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे 20 निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायर्यांचा जीन आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो.मध्ययुगातील मागील भिंतीतील दोन निवासकक्ष एकत्र करून तिथे “गिरीजात्मज” गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. हा गणपती अष्टविनायकांपैकी एक असुन “गिरीजात्मज “नावाने जगप्रसिद्ध आहे. गुंफा क्र.14 ही एक चैत्यगृह आहे. पण त्याचा मंडप आयताकार असुन छत सपाट आहे. चैतगृहाला व्हरांडा असून व्हरांड्यात एक शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख ‘कपिलाचा नातू व तपसाचा पुत्र असलेल्या आनंद’ या भक्ताने चैत्यगृसाठी दिलेल्या दानाविषयीचा आहे. या गुंफांचा काळ साधारण इ.स 2 रे शतक आहे.
या लेण्या अष्टविनाय गणपती ” गिरीजात्मज ” कामुळे जगप्रसिद्ध असुन इतर लेण्या प्रसिद्धीपासून खुपच वंचित झालेल्या आहेत. आपण एकदा या संपूर्ण लेण्यांना आवश्य एकदा भेट देऊन आनंद घ्यावा हीच सदिच्छा.
छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370

12931090_1684011531853618_361601009825453766_n12931187_1684011545186950_7413066567509550882_n12801573_1684011558520282_5484099116081626846_n12670899_1684011585186946_6543700463877330920_n12920538_1684011611853610_4244058612381386697_n

3 thoughts on “लेण्याद्री (जुन्नर)गणेश लेणी समुह

  1. सर आपले अँप खूप छान आहे आपल्या अँप वरून आम्हाला हि आमच्या तालुक्यातील वर अँप बनवण्याची इच्छा आहे तरी आपणास आम्ही संपर्क करू शकतो का
    कृपया आपला नंबर भेटू शकेल का

  2. उत्तम लेख, जुन्नर तालुक्यातील नैसर्गिक परंपरेचा एक उत्कृष्ट नमुना

Comments are closed.