भुयारी-मार्ग-एक-उत्सुकता

भुयारी मार्ग एक उत्सुकता… 
(इतिहास जुन्नरचा)
लहानपणी भुयारीमार्ग असलेल्या अनेक भाकडकथा ऐकावयास मिळत असत. त्या ऐकत असताना त्यांच्या विषयी जाणून घेण्याची, पाहण्याची उत्सुकता अगदी शिगेला पोहचत असे. परंतु वय लहान व त्याठिकाणी न जाण्याचा घरच्यांचा आदेश नेहमीच आड येत असे. जस जसा मोठा होत गेलो तर या इच्छेच्या आड शिक्षण येत गेल व गरीबी एवढी की एकवेळचे जेवण मिळणे कठीण. या संघर्षाचा अगदी जन्म झालेल्या दिवसापासूनच जन्म झाला होता. त्यामुळे कोणत्याही गोष्टी ऐकावयास मिळाल्या किंवा दुरून पहावयास मिळाल्या कि त्यातच समाधान मानावे लागत असे. घरची परिस्थिती उपभोगताना आईवडलांना होणार्या यातना पाहुनही त्या दुर करू शकत नव्हतो. या परिस्थितीत बहीनींचे जेमतेम 4 थी पर्यंत शिक्षण झाले. मोठा भाऊ आठवीपर्यंतच शिकु शकला. व भाऊ बहिणींना वाटे की मी तरी जास्त शिकावे. त्यात त्यांना मदत करता करता माझाही शिक्षणाकडे कानाडोळा झाला व इयत्ता आठवीचे नापास झाल्याने दोन वेळा शिक्षण पुर्ण झाले.
इयत्ता 12 वी पुर्ण करून पुढे निघालो न शिकण्याचा निर्णय घेतला व नोकरीच्या शोधात प्रयत्न करू लागलो. वडीलांच्या इच्छे खातिर एफ वाय ला अॅडमीशन घेतले. त्याच कालावधीत पुण्यात मिलेट्रीची भरती निघाली. व पत्रव्यवहार करून काॅल लेटर मिळाले. व योगायोग म्हनावा की काय मी मिलेट्रीच्या परीक्षा देऊन त्यात उतीर्ण झालो. व ट्रेनिंगला बेळगावला गेलो. पुढे ट्रेनिंग झाले 17 वर्षे सर्विस करून रिटायर होऊन पेन्शन आलो तेंव्हा पुन्हा एकदा या लहानपणी ऐकलेल्या भुयारीमार्गाने डोक वर काढले. आज सर्व अनुभव दांडगे होते. मिलेट्रीच्या शिक्षणाचे धडे मिळाल्याने भय हा शब्द विरून गेलेला होता. त्यामुळे निश्चय केला जुन्नर तालुक्यात असलेल्या भुयारीमार्गांची सत्यता स्वतः पडताळून पहायची. खोडद गावच्या महात्मा फुले विद्यालयात शिक्षण घेत असताना “निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ” हे रंगदास स्वामींचे वाक्य रोजच वाचनात असायचे तेच ब्रिदवाक्या मनी बाळगून अगदी दोन वर्षांत तालुक्यातील सात सह्याद्री रांगा चाळुन काढल्या. त्यावर असलेल्या भुयारीमार्गाच्या शेवटपर्यंत पोहचलो. व आपल्याला सांगण्यात येणार्या भाकडकथा या फक्त भिती दाखवण्यासाठीच उपयोगात आणल्या गेल्या एवढीच त्यात सत्यता आहे हे सत्य निदर्शनास आले.
मित्रांनो पाच भुयारीमार्ग मला जे ऐकावयास मिळाले व ते मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.

1) किल्ले शिवनेरीच्या साखळदंडाच्या तोडाशी असलेल्या टाकीतील तीन भुयारी मार्ग.

सांगितले जायचे कि किल्ले रायगड, किल्ले नारायणगड व किल्ले शिवनेरीच्या गर्भा जाण्यासाठी व फिरण्यासाठी हे मार्ग आहेत. परंतु गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी 2015 ला रात्री ठिक 1:30 वाजता या टाकीत मी शिरून हे मार्ग मित्राच्या मदतीने चेक केले. परंतु येथे काहीही नसुन ते फक्त तीन ते चार फुट आडवे कोरलेले असून शत्रुंना संभ्रमात पाडण्यासाठी अतिशय चातुर्याने केलेला हा प्रयत्न आहे.

2) पंचलिंग मंदिराच्या जवळ असलेला भुयारीमार्ग.
हा भुयारीमार्ग नसुन एक भुयारी पाण्याची टाकी आहे की जिचा जमिनीत 30 ते 35 फुट आडवा बांधीव तोडीतील विस्तार असुन. पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याचा साठा येथे केला जायचा व उत्कृष्ट पध्दतीने तो वर्षभर पंचलिंगाच्या मंदिराच्या समोरील टाकीत तो चालू राहील याची केलेली ती सुविधा आहे. तो कोणत्याही प्रकारचा भुयारी मार्ग नाही.

3) हटकेश्वरावरील भुयारीमार्ग. ( साळुंकी)
आपणास नेहमीच ऐकवले जाते की अष्टविनायक लेण्याद्री “गिरीजात्मजाचे” आपण जे रूप पहात आहोत तो भाग हा पाठीमागील भाग आहे व गणेशाचे तोंड पश्चिम दिशेला असणाऱ्या भुयारीमार्गाकडे आहे. हा भुयारीमार्ग हटकेश्वरावर असलेल्या भुयारातुन सुरू होतो कि ज्याच्या तोंडाशी एक शिवलिंग आहे. मित्रांनो या भुयारीमार्गाच्या तोंडाशी शिवलिंग आहे हे खरे आहे परंतु हा मार्ग पंधराफुट सरळ जाऊन उत्तरेकडे पंधरा फुट गेलेला असून तेथेच संपतो.

4) किल्ले जिवधनच्या जुन्नर दरवाजा मार्गाच्या मध्यावर उजव्याहाताला असलेला भुयारीमार्ग.
मी किल्ले जीवधनवर अनेक वेळा गेलो व अनेक वेळा सांगितले जायचे कि हा मार्ग संपूर्ण जीवधन मध्ये अंतर्गत फिरण्यासाठी कोरलेला आहे. परंतु तसे काहीही नसुन तो तीस फुट कोरत नेलेला असुन पुढे दहा बारा फुट आडवा कोरला असून तेथे आराम करण्यासाठी सुविधा केली आहे.

5) बोतार्डेगावच्या दक्षिणेस असलेल्या डोंगरावरील रांजण मार्ग.
स्थानिक सांगतात की पुर्वी या मार्गाने तांबे गावला जायला आठ दिवस लागायचे. परंतु असे काहीही नसून डोंगराच्या आतून येणाऱ्या पाण्याने हा नैसर्गिक चाळीसफुट लांबीचा मार्ग तयार झाला असून यात सरपटत पुढे शेवटार्यंत जाता येते. व त्यापुढे टिपटिप पाणी येईल येवढेच छिद्र आहे. या मध्ये प्रवेश करताना विशेष काळजी घ्यावी कारण खूपच दमछाक होते. नैसर्गिक तयार झाल्याने त्यातएकरूपता नसल्याने किटक व प्राणी असू शकतात.
वरील भुयारीमार्ग आपणास अभ्यासवयाचे असतिल तर स्वतः काळजी घेणे आवश्यक आहेत. माझा मिलेट्रीचा अनुभव माझा गुरू असल्याने मी ही माहिती आपणापर्यंत पोहचवू शकलो याचा मला सार्थ अभिमान वाटतो. व तालुक्यात अजुन अशी काही ठिकाणे असतील तर ती मला पर्सनल शेर करावीत कि त्यांची सत्यता पडताळून मला आपणापर्यंत उजेडात आणता येतील हीच सदिच्छा व्यक्त करतो.

लेखक / छायाचित्रे – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
निसर्ग रम्य जुन्नर तालुका

2 thoughts on “भुयारी-मार्ग-एक-उत्सुकता

 1. मेजर साहेब अप्रतिम असे निसर्गरम्य जुन्नर तालुका अँप तयार केले आहे. मी आताच डाउनलोड केले. यातील थोडेच महिती वाचली. त्यातील तुमची भुयारी मार्ग एक उत्सुकता हे आर्टिकल वाचले. छान आहे. अश्याच एका भुयारी मार्गाची भीती आम्हाला लहानपणी आम्हाला दाखवली जायची तो मार्ग म्हणजे नारायणगडा वरील मार्ग कि जो शिवनेरी ला जातो असे सांगितले जायच ,पण मागील वर्षी दुर्गमित्र निसर्गमित्र हा ग्रुप तयार करून नारायणगडावरील दुर्गसंवर्धन चालू केले आणि आणि हा भुयारी मार्ग भुयारी मार्ग नसून एक मोठे पाण्याचे टाके आहे हे कळाले.
  मेजर साहेब तुम्ही जुन्नर तालुक्यातील निसर्गरम्यता जगासमोर आणण्यासाठी जे कष्ट घेत आहे त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून व आपल्या सर्व ग्रुप कडून सलाम आणि आपले आभार. निसर्गरम्य जुन्नर तालुका हे अँप तयार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचे आभार. ह्या अँप च्या माध्यमातून आम्हाला अशीच नाविन्यपूर्ण माहिती मिळत राहील.
  धन्यवाद,
  निलेश डोंगरे

 2. मेजर साहेब अप्रतिम असे निसर्गरम्य जुन्नर तालुका अँप तयार केले आहे. मी आताच डाउनलोड केले. यातील थोडेच महिती वाचली. त्यातील तुमची भुयारी मार्ग एक उत्सुकता हे आर्टिकल वाचले. छान आहे. अश्याच एका भुयारी मार्गाची भीती आम्हाला लहानपणी आम्हाला दाखवली जायची तो मार्ग म्हणजे नारायणगडा वरील मार्ग कि जो शिवनेरी ला जातो असे सांगितले जायच ,पण मागील वर्षी दुर्गमित्र निसर्गमित्र हा ग्रुप तयार करून नारायणगडावरील दुर्गसंवर्धन चालू केले आणि आणि हा भुयारी मार्ग भुयारी मार्ग नसून एक मोठे पाण्याचे टाके आहे हे कळाले.
  मेजर साहेब तुम्ही जुन्नर तालुक्यातील निसर्गरम्यता जगासमोर आणण्यासाठी जे कष्ट घेत आहे त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून व आपल्या सर्व ग्रुप कडून सलाम आणि आपले आभार. निसर्गरम्य जुन्नर तालुका हे अँप तयार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्या सर्वांचे आभार. ह्या अँप च्या माध्यमातून आम्हाला अशीच नाविन्यपूर्ण माहिती मिळत राहील.
  धन्यवाद,
  निलेश डोंगरे

Comments are closed.